कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावीत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी ?

१. औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता

आगामी भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आपल्याला अ‍ॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा आधार असणार आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते !, अशा आशयाची एक म्हण आहे. आगामी भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या विविध आयुर्वेदीय औैषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड घराभोवती, परिसरात किंवा शेतात करणे आवश्यक आहे.

 

२. औषधी वनस्पतींच्या लागवडीपूर्वी लक्षात घेण्याचे सूत्र

औषधी वनस्पतींची लागवड पावसाळ्याच्या आरंभी, म्हणजेच १५ जून ते १५ जुलै या कालावधीत केल्यास त्यांची वाढ चांगली होते.

 

३. कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावीत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी ?

३ अ. कुंडीत माती भरण्याची पद्धत

कुंडीच्या तळाशी पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या छिद्रांवर प्रत्येकी एकेक खापरीचा तुकडा किंवा पातळसा दगड ठेवावा. यामुळे कुंडीला पाणी दिल्यावर त्या छिद्रांतून आतील माती बाहेर वाहून जाणार नाही. त्यानंतर कुंडीच्या तळाशी नारळाचा काथ्या किंवा विटांचे लहान तुकडे अथवा लहान दगड ठेवावेत. असे केल्याने जास्तीच्या पाण्याचा निचरा होईल. यावर सनातन भीमसेनी कापराच्या एका लहान वडीचे बारीक बारीक तुकडे करून टाकावेत. आता आपण सिद्ध केलेली माती हळूवार हाताने कुंडीत अर्ध्यापर्यंत भरून कुंडी हळूहळू हलवावी. यामुळे आतील खाचा, कोपरे आपोआप भरले जातील. त्यानंतर ती माती थोडी दडपून घ्यावी. आता आपली कुंडी झाड लावण्यास सिद्ध झाली.

 

३ आ. कुंडीत प्रत्यक्ष झाड लावून त्याला पाणी देणे

जे झाड आपण लावणार आहोत, ते कुंडीच्या मधोमध ठेवून राहिलेली कुंडी भरावी. माती भरतांना झाडाच्या मुळांजवळ पोकळी रहाणार नाही, अशा पद्धतीने भरावी. त्यासाठी माती हाताने नीट दाबून घ्यावी. पुरेसे पाणी रहाण्यासाठी कुंडीचा २ इंच वरचा भाग रिकामा सोडावा. झाड लावल्यावर लगेच पाणी द्यावे. थंडीच्या दिवसांत कुंडीतील झाडांना २४ घंट्यांतून एकदा दिलेले पाणी पुरेसे होते. शक्यतो संध्याकाळच्या वेळी पाणी द्यावे, म्हणजे झाडांना पूर्ण विश्रांती मिळून ती टवटवीत होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र अशा झाडांना दोनदा पाणी देणे आवश्यक असते. कुंडीमध्ये झाडाच्या चारही बाजूंनी पाणी देऊन झाल्यावर कुंडीच्या तळाशी असलेल्या छिद्रांतून पाणी बाहेर झिरपू लागले की, पाणी देणे बंद करावे. कुंडीमधून आलेले मातीचे पाणी बाहेर सांडून घरातील फरशी खराब होऊ नये, यासाठी कुंडीच्या खाली प्लास्टिकची किंवा धातूची जुनी ताटली ठेवावी.

 

३ इ. झाडाला वरखत (पातळ खत) देणे आणि ते बनवण्याची पद्धत

कुंड्यांतील झाडांना १५ दिवसांच्या अंतराने पातळ खत दिल्यास ती अधिक प्रफुल्लित आणि नेहमी पाना-फुलांनी डवरलेली दिसतात. त्यासाठी गायीचे अनुमाने वाटीभर ताजे शेण तांब्याभर पाण्यात घालून काठीने ढवळून २४ घंटे भिजत ठेवावे. त्यानंतर त्यात सनातन भीमसेनी कापराचा लहान तुकडा चुरडून घालावा आणि हे मिश्रण पुन्हा ढवळून घ्यावे. असे सिद्ध झालेले खत प्रत्येेक झाडाला एक पेला या प्रमाणात द्यावे. हे वरखत देण्याआधी झाडाला साधे पाणी देणे आवश्यक आहे; कारण काही झाडे अधाशासारखी हे पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या मुळांना धोका पोहोचून झाड मरू शकते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’