नवरात्रोत्सवाच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री काळभैरवपूजन, महाचंडी याग आणि श्री बगलामुखी याग !

पूर्णाहुतीच्या वेळी चंडीयागाचे पौरोहित्य करतांना डावीकडून श्री. दामोदर वझे, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी

रामनाथी (गोवा) – नवरात्रोत्सवाच्या काळात देवीतत्त्व पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. ‘देवीच्या या कार्यरत शक्तीद्वारे हिंदु राष्ट्र-स्थापनेतील विविध अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा आणि साधकांना विविध कारणांमुळे होणारे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भृगु महर्षि यांनी सांगितल्यानुसार येथील सनातनच्या आश्रमात श्री काळभैरवपूजन, दोन दिवसांचा ‘महाचंडीयाग’, तसेच सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्री बगलामुखी याग करण्यात आला. या यागांसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या राहत्या खोलीत बसून संकल्प केले. हे याग ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत मंगलमय वातावरणात पार पडले. याप्रसंगी आश्रमातील संत आणि साधक उपस्थित होते.

नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी या २ तिथींच्या दिवशी महाचंडीयाग झाला. या वेळी श्री दुर्गादेवीचे षोडशोपचार पूजन, कुंकूमार्चन, तसेच सप्तशतीच्या १३ अध्यायांचे पठण करत आहुती देण्यात आल्या. पूर्णाहुतीने चंडीयागाची सांगता झाली. यागाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक तथा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी, पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी केले. नवरात्रीच्या काळात झालेल्या या यागामुळे श्री दुर्गादेवीची कृपा आणि आशीर्वाद लाभल्याविषयी सर्व साधकांनी श्री दुर्गादेवी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

 

सप्तशतीच्या पठणाचे महत्त्व

चंडी हे श्री दुर्गादेवीचे एक नाव आहे. मार्कंडेय पुराणात चंडीदेवीचे माहात्म्य सांगितले असून त्यात तिचे अवतार आणि पराक्रम यांविषयी विस्ताराने वर्णन केले आहे. चंडीयागाच्या वेळी शप्तशतीच्या १३ अध्यायांचे पठण करण्यात येते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment