आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असलेले आणि सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरगृह’, म्हणजे आयुर्वेदीय घर !

वैशिष्ट्य पूर्ण वास्तू असलेल्या आयुरगृहाची पुढील बाजू

‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवत असत, तर देवतांच्या मूर्तींची स्थापना सहस्रो वर्षे टिकू शकणार्‍या दगडी मंदिरांमध्ये केली जात असे. मातीची घरे बनवतांनाही आयुर्वेद, वास्तूशास्त्र आदी शास्त्रांत दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असे. अशा घरांना केरळमध्ये ‘आयुरगृह’ म्हणतात. ‘आयुरगृह’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या साधकांनी १८ एप्रिल २०१९ या दिवशी केरळमधील बलरामपुरम् येथील ‘आयुरवस्त्र’ आणि ‘आयुरगृह’ यांसंदर्भात कार्य करणार्‍या श्री. राजन् यांची भेट घेतली. त्यांच्याकडून ‘आयुरगृहा’विषयी साधकांना मिळालेली माहिती, त्यासंदर्भात ‘यु.ए.एस्.(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या प्रभावळमापक वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेले संशोधन आदी या लेखात दिले आहे.

सहस्त्रवधी वर्षांची परंपरा लाभलेले आयुरगृह आणि त्यासंबंधी कार्य करणारे श्री.राजन

 

१. ‘आयुरगृह’ म्हणजे काय ?

‘आयुरगृह’ हा शब्द ‘आयुर’ म्हणजे आरोग्य आणि ‘गृह’ या दोन शब्दांची संधी होऊन बनला आहे. आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणार्‍या अनेक वनस्पती मातीमध्ये मिसळून त्या मातीपासून बनवलेल्या विटांच्या घराला ‘आयुरगृह’, असे म्हणतात.

 

२. आयुरगृहाचा इतिहास

आयुरगृह बनवण्याची परंपरा सहस्र वर्षांहूनही अधिक जुनी आहे. केरळमधील थिरूवनंतपूरम् जिल्ह्यातील बलरामपूरम् येथील ‘आयुरगृह’चे निर्माते श्री. राजन् यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मातीची घरे असत. घराची भूमीही मातीची असे. काही ठिकाणी घराच्या भिंती, भूमी गोमयाने सारवलेली असायची. घरे बनवण्यासाठी वापरायच्या मातीमध्ये काही वनस्पतींचा वापर केला जात असे. ही घरे आरोग्यासाठी पूरक असल्याने त्यांना ‘आयुरगृह’ म्हणतात. आयुरगृहाच्या मातीतील औषधी वनस्पतींचे सूक्ष्म अंश गंधाद्वारे त्या घरात वावरणार्‍यांच्या शरिरात प्रवेश करतात आणि व्याधीनिवारणास साहाय्य होते.

 

३. आयुरगृह बनवणारे श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय

कोणत्या व्याधीसाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क वापरायचा, याचे एक शास्त्र आहे. पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे गेल्या अनेक वर्षांपासून श्री. राजन् आणि त्यांचे कुटुंबीय मुख्यत्वे आयुरवस्त्रांची निर्मिती करत आहेत. आयुरवस्त्रांची निर्मिती जेथे केली जाते, तेथेच जनप्रबोधनासाठी त्यांनी एक ‘आयुरगृह’ बनवले आहे. ते आयुरवस्त्र आणि आयुरगृह यांसाठी लागणार्‍या औषधी वनस्पती अगस्ति वनातून घेतात. तेथे आजही अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. काही वनस्पतींची श्री. राजन् स्वतः लागवड करतात. वनस्पती मिळवतांना परंपरागत नियमांचे पालन होईल अणि निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाते.

 

४. आयुरगृहाची काही वैशिष्ट्ये

४ अ. आयुरगृहासाठी वापरायच्या विटा आणि दगड

आयुरगृहासाठी लागणार्‍या विटा बनवणे, लाकूडकाम करणे आदी पारंपरिक कला आहेत. या विटा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मातीमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. या विटा भट्टीत न भाजता उन्हात सुकवतात. आवश्यकतेनुसार काही ठिकाणी बांधकामात चिर्‍याच्या दगडांचाही वापर केला जातो.

४ आ. मातीची भूमी आणि कौलारू छत

आयुरगृहाची भूमी मातीची असते, तर छत हे मातीच्या कौलांचे असते. ही कौले भट्टीत भाजून घेतात.

४ इ. बांधकामात सिमेंटचा वापर नसणे

आधुनिक बांधकामात सिमेंटचा वापर होतो, तर आयुरगृहाच्या बांधकामात माती, चुना, गूळ, वनस्पतींचे अर्क आदींचे मिश्रण असते. हे मिश्रण वापरून केलेल्या बांधकामाचे आयुष्य हे सिमेंट वापरून केलेल्या बांधकामापेक्षाही अधिक असते.

४ ई. घराच्या भागानुसार आणि दिशेनुसार विविध प्रकारच्या लाकडांचा वापर करणे

घराचा उंबरठा, दारे, खिडक्या, वासे आदींसाठी शास्त्रात सांगितल्यानुसार फणस, साग, बेल, कदंब आदी सुयोग्य लाकडांचा वापर केला जातो. दिशेनुसार खिडकी किंवा दार यासाठी कोणते लाकूड वापरायच ? हे शास्त्रात दिलेले आहे. त्यानुसारच लाकडाचा वापर केला जातो.

४ उ. वैदिक वास्तूशास्त्राचा उपयोग

वास्तूच्या निर्मितीत भूमी निवडण्यापासून ते वास्तूनिर्मितीपर्यंत सर्वच ठिकाणी वैदिक वास्तूशास्त्राचा उपयोग केला जातो.

४ ऊ. पाणी आणि वाळवी यांपासून धोका असणे

आयुरगृहाला पाणी आणि वाळवी यांपासून धोका असतो; पण त्यांपासून रक्षण करण्याचे उपायही आहेत. ते उपाय वेळोवेळी केले, तर आयुरगृह आधुनिक घरापेक्षाही पुष्कळ अधिक वर्षे टिकते.

४ ए. उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात उबदार जाणवणे

आयुरगृहात उन्हाळ्यात गारवा जाणवतो, तर हिवाळ्यात हे घर उबदार असते. आयुरगृहाची रचना आणि त्यासाठी वापरलेले घटक यांमुळे बाहेरच्या वातावरणात झालेल्या पालटांचा घरातील वातावरणाच्या संतुलनावर परिणाम होत नाही.

 

५. आयुरगृहाच्या विटेची ‘यु.ए.एस्.
(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करणे

सर्वसाधारण वीट आणि आयुरगृहासाठी तयार केलेली वीट यांच्यातील ऊर्जा अभ्यासण्यासाठी १२.९.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

५ अ. ‘यु.ए.एस्.’ उपकरणाची ओळख

या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, तसेच त्या वस्तूभोवती असलेली एकूण प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगण येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. (‘यु.ए.एस्’ उपकरणाविषयीच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)

५ आ. यु.ए.एस या उपकरणाद्वारे केलेल्या मोजनांच्या नोंदी

चाचणीतील मोजण्यांच्या नोंदी सर्वत्र वापरली जाणारी
सर्वसाधारण मातीची
भाजलेली वीट
औषधी
वनस्पतीयुक्त मातीची
भाजलेली वीट
आयुरगृहासाठी वापरायची
(औषधी वनस्पतीयुक्त
मातीची न भाजलेली) वीट
‘यु.ए.एस्.’ उपकरणाद्वारे नोंद
घेतल्याची वेळ
सायंकाळी ३.२० सकाळी ९.४१ सकाळी ९.३२
१. नकारात्मक ऊर्जा (मीटर)
२.सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) १.२३ ३.०४ ३.६७
३. एकूण प्रभावळ (मीटर) १.५६ ४.६५ ५.०४

५ इ. विवेचन

५ इ १. नकारात्मक ऊर्जा नसणे

मातीपासून बनवलेल्या तीनही प्रकारच्या विटांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जांपैकी कोणतीही नकारात्मक ऊर्जा नव्हती.

५ इ २. सकारात्मक ऊर्जा असणे

सर्वच व्यक्ती, वस्तू किंवा वास्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. मातीपासून बनवलेल्या तीनही विटांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजली, तेव्हा ‘सर्वसाधारण मातीच्या भाजलेल्या विटे’ची प्रभावळ १.२३ मीटर होती, तर त्याच्या दुपटीपेक्षाही अधिक (३.०४ मीटर) प्रभावळ ‘औषधी वनस्पतीयुक्त मातीच्या भाजलेल्या विटे’ची होती. ‘औषधी वनस्पतीयुक्त मातीच्या न भाजलेल्या विटे’ची प्रभावळ सर्वाधिक (३.६७ मीटर) होती.

५ इ ३. एकूण प्रभावळ पुष्कळ अधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. ‘सर्वसाधारण मातीच्या भाजलेल्या विटे’ची एकूण प्रभावळ १.५६ मीटर होती, तर त्यापेक्षा पुष्कळ अधिक (४.६५ मीटर) प्रभावळ ‘औषधी वनस्पतीयुक्त मातीच्या भाजलेल्या विटे’ची होती. आयुरगृहासाठी वापरायच्या ‘औषधी वनस्पतीयुक्त मातीच्या न भाजलेल्या विटे’ची प्रभावळ सर्वाधिक (५.०४ मीटर) होती.

थोडक्यात सांगायचे, तर आयुरगृहाच्या विटेमधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे आणि तिची एकूण प्रभावळ पुष्कळ अधिक असल्याचे यु.ए.एस्. उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीत स्पष्ट झाले. याचा अर्थ आयुरगृह आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.

 

६. आयुरगृहाच्या विटेमध्ये सात्त्विकता असण्यामागील अध्यात्मशास्त्र

‘आयुरगृहाच्या विटा बनवण्यासाठी वापरलेले घटक (उदा. विटेसाठी वापरलेली माती, त्यातील औषधी वनस्पती) आणि ती बनवण्याची प्रक्रिया (उदा. वीट भट्टीत भाजण्यापेक्षा उन्हात वाळवणे) यांमुळे आयुरगृहाच्या विटेमध्ये सर्वसाधारण विटेच्या तुलनेत अधिक सात्त्विकता आहे. एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी लागणार्‍या घटकांमध्ये आणि निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सात्त्विकतेच्या दृष्टीने पालट केल्यास त्यातून अधिक सात्त्विक वस्तू कशी बनवता येऊ शकते, याचे ‘आयुरगृहाची वीट’ हे एक उत्तम उदाहरण आहे.

 

७. भारतातील प्राचीन विद्या आणि कला यांना अध्यात्माचा
पाया असल्याने त्या चैतन्यमय असणे अन् काळाच्या ओघात टिकून राहू शकणे

भारतातील वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित आदी विद्या किंवा संगीत, नृत्य, चित्रकला आदी कला यांचा पाया अध्यात्माचा असल्याने ती विद्या किंवा कला साध्य करणार्‍यांना ईश्‍वराची, म्हणजेच सर्वोच्च आनंदाची अनुभूती येऊ शकते. अध्यात्माचा पाया असल्यानेच संगीत, नृत्यादी कला अद्याप टिकून राहिल्या आहेत; परंतु सांप्रतकाळी सामान्य लोकांनी कलेच्या आध्यात्मिक अंगाचा विचार न केल्याने वास्तूनिर्मितीतही परिपूर्णता पहायला मिळत नाही.

सांप्रतच्या घोर आपत्काळातही केरळ राज्यामध्ये आयुरगृह बनवण्याची प्राचीन कला अजूनही तग धरून आहे, तर भूतकाळात ती किती परिपूर्ण आणि विकसित असेल, याची आपण कल्पना करू शकतो. अशा दुर्मिळ कला आणि विद्या पूर्ण लय पावलेल्या नाहीत, हे आपले अहोभाग्यच म्हणायला हवे. अशा कला आणि विद्या यांचे संरक्षण अन् संवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’

– कु. प्रियांका विजय लोटलीकर आणि श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment