वाढदिवस साजरा करण्याची पद्धत

अनुक्रमणिका

१. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत १

२. अहेर न घेण्यामागील शास्त्र

३. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत २

४. वाढदिवस साजरा करतांना आलेल्या अनुभूती

५. वाढदिवस : लघुपट (Birthday video)


‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग ’ हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळ्या आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्त ठरते. वाढदिवस साजरा करण्याच्या दोन पद्धती पुढे दिल्या आहेत.

जन्मतिथीस औक्षण करून वाढदिवस साजरा करणे
जन्मतिथीस औक्षण करून वाढदिवस साजरा करणे

वाढदिवस : पद्धत १

१. ‘पहिल्या वर्षी दर महिन्यास आणि नंतर दरवर्षी जन्मतिथीस वाढदिवस साजरा करतांना प्रथम अभ्यंगस्नान करून कुंकुमतिलक लावावा.

अभ्यंगस्नान करण्यामागील शास्त्र : पाण्याच्या निर्गुण लहरींशी संबंधित सात्त्विक प्रवाहऊर्जेमुळे जिवाच्या देहातील सूक्ष्म-कोषांची शुद्धी होऊन जीव वाढदिवसाच्या दिवशी करण्यात येणार्‍या संस्कारात्मक कृतींतून मिळणार्‍या चैतन्यलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील आणि सक्षम बनतो. अभ्यंगस्नानामुळे त्याचा प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी झाल्याने त्याच्यावर धर्मातील ‘पवित्रता’ नामक प्रथम संस्कार होण्यास साहाय्य होते.

२. ‘आयुरभिवृद्ध्यर्थं वर्ष (किंवा मास) वृदि्धकर्मं करिष्ये ।’ असा संकल्प करून एका पाटावर किंवा चौरंगावर कुलदेवता, जन्मनक्षत्र, माता-पिता, प्रजापति, सूर्य, गणेश, मार्कंडेय, व्यास, परशुराम, राम, अश्वत्थामा, कृपाचार्य, बली, प्रल्हाद, हनुमान, बिभीषण आणि षष्ठीदेवता यांच्या नावाने प्रत्येकी मूठभर तांदळाचे सतरा पुंज करावेत आणि त्या त्या देवतांचे आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. षष्ठीदेवतेला दहीभाताचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो भात गायीला किंवा अन्य प्राण्याला द्यावा. इतर देवतांना पेढे किंवा खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा.

३.प्रार्थना करून मूठभर तीळ, गुळाचा एक खडा आणि अर्धा पेला दूध यांनी बनवलेले मिश्रण प्राशन करावे.

४. नातेवाइकांना आणि मित्रमंडळींना भोजन द्यावे. तसेच अधिकाधिक दानधर्म आणि अन्नदान करावे.

५. प्रतिग्रह म्हणजे दुसर्‍याकडून पैसे वा भेटवस्तू घेणे टाळावे.’

अहेर न घेण्यामागील शास्त्र

अ. ‘अहेर’चा अर्थ

‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.

आ. अहेर कसा असावा ?

आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्‍या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, देवतांप्रती भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे आणि नामपट्ट्या, ही अशा प्रकारच्या अहेराची काही उदाहरणे होत.

इ. अहेर करतांना भाव कसा असावा ?

आजकाल अहेर करतांना बडेजावपणा दाखवला जातो. हे अयोग्य आहे. अहेर अहंरहित आणि निरपेक्ष भावनेने द्यायचा असतो. तसे न दिल्यास देवाण-घेवाण निर्माण होतो. अहेर स्वीकारणार्‍या जिवानेही ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवायचा असतो.

ई. अहेर करतांना द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू का लावतात ?

अहेर म्हणून द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावल्यामुळे हळद-कुंकवाकडे ब्रह्मांडातील कार्यरत ईश्वरी चैतन्याच्या लहरी आकृष्ट होतात. यामुळे भेटवस्तूबरोबरच जिवाला या चैतन्याचा लाभ होण्यासही साहाय्य होते.

उ. सर्वोच्च अहेर कोणता आणि तो कोण देऊ शकतो ?

ईश्वर हाच सर्वोच्च दाता आहे; म्हणून ईश्वराचे साक्षात सगुण रूप, म्हणजेच संत किंवा गुरु यांनाच केवळ अहेर करण्याचा अधिकार असतो. गुरु शिष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करून घेतात. गुरूंनी शिकवलेली साधनाच केवळ कुणालाही हिरावून घेता येत नाही; कारण साधना करणार्‍याच्या मागे गुरुकृपेचे म्हणजेच ईश्वरी कृपेचे छत्र असते. साधना करण्याची संधी मिळणे आणि ईश्वरी कृपा होणे, हाच जिवाला ईश्वराकडून मिळालेला सर्वोच्च अहेर आहे. जिवाने अहेर देणार्‍या ईश्वररूपी संतांपुढे ‘याचक’ व्हायचे असते. ईश्वराच्या चरणी सतत शरणागत असणारा तो याचक. संतांच्या अहेराला पात्र होणे, म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठी लायक होणे, हाच खरा ‘शिष्यधर्म’ आहे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

वाढदिवस : पद्धत २

अ. अभ्यंगस्नान करणे

वाढदिवसाच्या दिवशी सचैल म्हणजे वस्त्रांसहित अभ्यंगस्नान करावे. (वाढदिवसाच्या दिवशी स्नान करणे, हे स्नानाच्या माध्यमातून भूतकाळ विसरून सतत वर्तमानकाळाचे भान रहाण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याचे प्रतीक आहे.) स्नान करतांना ‘स्नानाचे जल निर्मळ आणि शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपला देह अन् अंतःकरण यांची शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवावा.

अभ्यंगस्नान करण्यामागील शास्त्र : पाण्याच्या निर्गुण लहरींशी संबंधित सात्त्विक प्रवाहऊर्जेमुळे जिवाच्या देहातील सूक्ष्म-कोषांची शुद्धी होऊन जीव वाढदिवसाच्या दिवशी करण्यात येणार्‍या संस्कारात्मक कृतींतून मिळणार्‍या चैतन्यलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील आणि सक्षम बनतो. अभ्यंगस्नानामुळे त्याचा प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी झाल्याने त्याच्यावर धर्मातील ‘पवित्रता’ नामक प्रथम संस्कार होण्यास साहाय्य होते.

आ. स्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करणे

अभ्यंगस्नानानंतर नवीन वस्त्रे घालण्यामागील शास्त्र : ‘नवीन वसन (वस्त्र) परिधान करणे, म्हणजे अभ्यंगस्नानाच्या माध्यमातून स्वतःच्या देहाभोवती निर्माण झालेल्या ईश्वरी चैतन्याच्या प्रभावळीला वस्त्राच्या माध्यमातून मूर्तस्वरूप देऊन, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये येणार्‍या अडथळ्यांपासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना करणे. नवीन वस्त्राची तुलना ही ईश्वराने देहाभोवती निर्माण केलेल्या चैतन्यमय संरक्षक-कवचाशी केली आहे.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून )

इ. आई-वडील तसेच अन्य वडीलधार्‍या व्यक्ती यांना नमस्कार करणे

ज्येष्ठांना नमस्कार करतांना
ज्येष्ठांना नमस्कार करतांना

ज्येष्ठांना नमस्कार करण्यामागील शास्त्र : यातून कर्तव्यपालनाचा, म्हणजेच मातृ-पितृ आणि समाज ऋण फेडण्याचा संस्कार होऊन जिवात लीनभावाचे संवर्धन होते. ज्येष्ठांच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या आशीर्वादात्मक कनिष्ठ तत्त्वांशी संबंधित लहरींमुळे जिवाच्या स्थूलदेहाची आणि मनोदेहाची शुद्धी होऊन त्याला कनिष्ठ देवतांच्या आशीर्वादाचे फळ मिळते. ज्येष्ठांविषयी आदरभाव दुणावल्याने त्याच्या मनाची मलीनता नष्ट होऊन त्याच्यावर धर्मातील ‘निर्मळता’ नामक द्वितीय संस्कार होण्यास साहाय्य होते.

ई. पूजा करणे

कुलदेवतेला अभिषेक करावा किंवा तिची मनोभावे पूजा करावी.

उ. औक्षण करणे

ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. औक्षण करवून घेणारा, तसेच ते करणारा यांनी ‘एकमेकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वरच कृतीस्वरूप कार्य करून आम्हाला आशीर्वाद देत आहे’, असा भाव ठेवावा. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात. या अक्षतांच्या माध्यमातून चैतन्यरूपी आशीर्वादात्मक लहरींचा स्रोत जिवाच्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण देहात संक्रमित होतो. त्यामुळे त्याला ब्रह्मांडातील इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन लहरींचे बळ प्राप्त होऊन त्याच्या देहात चैतन्य स्रोताचे संवर्धन होते. या प्रक्रियेमुळे दोन्ही जिवांच्या देहांतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे बाह्यवायूमंडलाची शुद्धी होते, तसेच वाढदिवसाला आलेल्या इतर जिवांनाही सात्त्विकतेचा लाभ मिळून व्यष्टी आणि समष्टी उद्देश साध्य होण्यास साहाय्य होते. दोन्ही उद्देश एकाच वेळी साध्य करण्याचा संस्कार म्हणजेच धर्मातील ‘शुचिता’ नामक तृतीय संस्कार होय. हा संस्कार जिवाच्या स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही देहांची शुद्धी करतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

औक्षण करतांना
औक्षण करतांना

औक्षण करण्याची पद्धत आणि शास्त्र यांविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

ऊ. भेटवस्तू देतांना काय दृष्टीकोन ठेवावा ?

ज्याचा वाढदिवस असेल, त्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू देतांना पुढील दृष्टीकोन ठेवावा. लहान मुलाला कर्तव्यबुद्धीने त्याचे कौतुक करण्यासाठी भेटवस्तू द्यावी. मोठ्यांना भेटवस्तू देतांना कर्तेपणा बाळगू नये. अपेक्षा न ठेवता एखाद्याला दान दिले, तर काही काळाने आपण त्या दानाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे दान हे असे असावे लागते. दानाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाण-घेवाण निर्माण होते. दान किंवा भेटवस्तू स्वीकारणार्‍याने ‘हा ईश्वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे’, असा भाव ठेवल्यास देवाण-घेवाण निर्माण होत नाही.

ए. वस्त्रांसहित स्नान करणे

वाढदिवसाच्या दिवशी ज्या वस्त्रांसहित स्नान केले, ती वस्त्रे स्वतः न वापरता कोणालाही अपेक्षा न ठेवता दान करावीत. दान हे ‘सत्पात्रे दानम्’ होण्यासाठी ते भिकारी इत्यादींना देण्यापेक्षा देवाची उपासना करणार्‍यांना किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी कार्य करणार्‍यांना देणे पुण्यदायी ठरते.

वस्त्रांसहित स्नान केलेली वस्त्रे दान करण्यामागील शास्त्र : ‘वाढदिवसाच्या दिवशी वस्त्रांसहित स्नान करतांना ‘स्नानाचे जल निर्मळ, शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपल्या देहाची आणि अंतःकरणाची शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक आहे. असा भाव ठेवून जीवन व्यापक करणार्‍या जिवाने वस्त्रे दान देणे, म्हणजे आपण आवाहन केल्यामुळे गंगारूपी जलाच्या माध्यमातून कार्यरत झालेला ईश्वरी स्रोत वस्त्रांच्या माध्यमातून दुसर्‍याकडे संक्रमित करणे होय. वस्त्रांचा असा शुद्ध उपयोग केल्याने दुसर्‍या जिवाच्या शरिरावरील रज-तम कणांचे आवरणही नष्ट होण्यास साहाय्य होते, म्हणजेच यातून समष्टीही साधते. यावरून जीवनातील प्रत्येक कृतीतून जिवाची व्यष्टी अन् समष्टी साधना होऊन जिवाकडून धर्माचरण व्हावे आणि त्यातून संपूर्ण समाज उन्नत व्हावा, असा हिंदु धर्माचा व्यापक दृष्टीकोन लक्षात येतो. वाढदिवसाच्या दिवशी वस्त्रांसहित स्नान केल्यानंतर ती वस्त्रे कोणालाही दान म्हणून देता येतात; मात्र वस्त्रे दान देणारा जीव सात्त्विकच हवा, नाहीतर अपेक्षा ठेवून दिलेले दान सत्कारणी लागत नाही, उलट दान स्वीकारणार्‍या जिवाला रज-तम कणांनी भारित अशा वस्त्रांचा त्रास होऊ शकतो. पूर्वीच्या काळी सर्व जण साधना करणारे असल्याने सात्त्विक वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी दान म्हणून दिलेली वस्त्रे परिधान करणार्‍या जिवाला वर सांगितल्याप्रमाणे लाभ होत असे. त्रेतायुगात गुरुकुलांमध्ये आपल्या गुरूंच्या वाढदिनी त्यांना स्नान घालून त्यांनी दिलेली वस्त्रे वापरण्यास लायक होणे, हे शिष्यधर्माचे प्रतीक समजले जात होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

वाढदिवस साजरा करतांना आलेल्या अनुभूती

१. वाढदिवस तिथीनुसार अन् शास्त्रानुसार साजरा होतांना आज्ञा आणि सहस्रार चक्रांतून पिवळ्या किरणांचा देहात प्रवेश होणे, शरिराच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होणे, शरिरात आलेले सोनेरी कण आणि पांढरे किरण यांची हालचाल झाल्याने वर्षभरात वाईट शक्तींची आक्रमणे होऊनही शरीर अन् सूक्ष्म-देह यांना ऊर्जा मिळू शकणे

‘२००३ मध्ये माझा वाढदिवस तिथीनुसार आणि शास्त्रानुसार साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मला दिवसभर पुष्कळ प्रसन्नता जाणवत होती. माझ्या आज्ञाचक्रातून सातत्याने पिवळे किरण माझ्या देहात प्रवेश करत होते. माझी एकाग्रता वाढत होती. त्या दिवशी आरती आणि नामजप करतांना मला माझ्या सहस्रार चक्रातून पांढरे किरण माझ्या शरिरात प्रवेश करतांना दिसत होते. त्यामुळे माझे संपूर्ण शरीर आणि मनोदेह यांची शुद्धी होतांना जाणवली. दिवसभर माझ्या शरिरात येणार्‍या पिवळ्या आणि पांढर्‍या रंगांच्या किरणांमुळे माझ्या देहाभोवती ७० टक्के पिवळ्या अन् ३० टक्के पांढर्‍या रंगाचे संरक्षक-कवच निर्माण झाले होते. माझ्या शरिरात २० टक्के सोनेरी कण आणि ५ टक्के पांढरे प्रकाशकिरण आले होते. हे कण आणि प्रकाशकिरण यांची वर्षभर माझ्या शरिरात हालचाल होतांना मला जाणवत होती. त्यामुळे वर्षभरात माझ्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होऊनही माझे शरीर आणि सूक्ष्म-देह यांना ऊर्जा मिळत होती. त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होत असतांनाही मला सत्सेवा करता आली.’ – कु. मधुरा

२. वाढदिवस तिथीनुसार आणि शास्त्रानुसार साजरा करायला आरंभ केल्यापासून मुलाला होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होऊन त्याचे वर्तन सुधारणे

‘माझा मुलगा चि. प्रणव याला वाईट शक्तींचा फार त्रास आहे. तो पूर्वी नियमित नामजप करायचा; पण नंतर नंतर त्याचे नामजपात सातत्य राहिले नाही. त्यामुळे मीच त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. २००३ पासून आम्ही त्याचा वाढदिवस तिथीनुसार आणि शास्त्रानुसार साजरा करायला आरंभ केला. तेव्हापासून त्याचा त्रास न्यून झाल्याचे जाणवले. त्या काळात तो अभ्यास चांगल्या रितीने करू लागला, त्याची चिडचीड न्यून झाली आणि प्रकटीकरण पूर्णपणे बंद झाले. या वर्षीच्या वाढदिवसानंतर तो नामजप करणे, विभूती लावणे, विभूती घातलेल्या पाण्याने आंघोळ करणे, देवाला नमस्कार करणे इत्यादी आध्यात्मिक उपाय स्वतःच करतो आणि मला त्रास न देता ध्यान करण्याकरता बसू देतो.’ – सौ. जयश्री

वाढदिवस साजरा करण्याच्या तात्त्विक विवेचन वाचण्यासाठी पहा ‘वाढदिवस साजरा करणे !

वाढदिवस : चलच्चित्रपट (Birthday video – Playlist of 7 videos)

Leave a Comment