वाढदिवस साजरा करणे !

अनुक्रमणिका

१. वाढदिवसाचा आध्यात्मिक अर्थ

२. वाढदिवसाचा इतिहास आणि महत्त्व

अ. सत्ययुगातील जिवांचा वाढदिवस

आ. त्रेता आणि द्वापर युगांतील जिवांचा वाढदिवस

३. वाढदिवस तिथीनुसार साजरा करण्याचे महत्त्व

अ. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मदिवसाची तिथी ही ‘घाततिथी’ असली, तरी त्या तिथीला होणारे लाभ जास्त असल्याने वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे योग्य असणे

आ. शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद सर्वाधिक फलद्रूप होणे

इ. जीवनात येणार्‍या अडथळ्यांविरुद्ध लढण्याची क्षमता प्राप्त होणे

४. वाढदिवस दिनांकानुसार साजरा करणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य

 


 

 

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत वाढदिवस साजरा करायची प्रथा आहे. कोणतीही धार्मिक, धर्मशास्त्राला अभिप्रेत असलेली अथवा रूढी-परंपरेशी सुसंगत कृती त्यामागील शास्त्र समजून घेऊन केली, तर त्याचा जिवाला अधिक लाभ होतो. त्याप्रमाणे वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि लाभ यांविषयी शास्त्रीय भाषेत समजून घेऊया.

जन्मतिथीला औक्षण करून वाढदिवस साजरा करणे

 

 

वाढदिवसाचा आध्यात्मिक अर्थ

१. वाढदिवस साजरा करणे, म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करतांना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे होय.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून )

२. वाढदिवस म्हणजे जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे मूल्यमापन करण्याचा दिवस

वाढदिवस म्हणजे जिवाची आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती होणे. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती होण्यासाठी जिवाच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होऊन त्यांना पूरक असे देवतांचे त्रिगुणात्मक तत्त्व योग्य त्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. आध्यात्मिक उन्नतीचेच दुसरे नाव ‘वृद्धी’ किंवा ‘वाढ’ असे आहे. जिवाच्या निर्मितीपासून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. जीव प्रत्यक्षात साधना करत नसला, तरी त्याच्यावर केलेल्या संस्कारांमुळे त्याच्यातील सात्त्विकता वाढून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो. ‘जिवावर केलेला संस्कार त्याच्या सूक्ष्म-देहांवर रुजला का’, याचा आढावा घ्यायचा दिवस म्हणजे वाढदिवस़ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

३. वाढदिवस म्हणजे चैतन्य ग्रहण करण्याच्या क्षमतेत वृद्धी करण्याचा दिवस

वाढदिवस म्हणजे जिवाच्या चैतन्य ग्रहण करण्याच्या क्षमतेत देवतांच्या आवाहनफलस्वरूप आशीर्वादातून प्राप्त होणार्‍या लहरींद्वारे वृद्धी करणे. या चैतन्यात्मक प्रक्रियेतून सात्त्विक झालेल्या बाह्य वायूमंडलाला पूरक बनून जीव आंतरिक स्थिरता प्राप्त करून घेतो. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

 

वाढदिवसाचा इतिहास आणि महत्त्व

१. सत्ययुगातील जिवांचा वाढदिवस

सत्ययुगात जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना उन्नतांनी अव्यक्त संकल्प करून जिवाच्या आवश्यक त्या कुंडलिनी चक्रावर अक्षता टाकून, चक्राला स्पर्श करून किंवा दृष्टीने (नजरेने) कुंडलिनीचा पुढील प्रवास चालू करणे

कोणताही जीव जन्माला येतांना गतजन्मीची आध्यात्मिक पातळी समवेत घेऊन येतो. त्यानुसार त्याच्या कुंडलिनीतील आवश्यक ते चक्र जागृत असते किंवा त्या चक्रापर्यंत त्याच्या कुंडलिनीचा प्रवास होऊन थांबलेला असतो. सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांत जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत येत असत किंवा जिवाला आशीर्वाद मिळण्यासाठी उन्नतांकडे नेले जात असे. हे उन्नत या जिवाचे औक्षण करून आणि जिवासाठी अव्यक्त संकल्प करून त्याच्या शरिराच्या विविध अवयवांवर अक्षता टाकून त्या त्या ठिकाणी असलेले चक्र जागृत करीत अन् ज्या चक्रापर्यंत जिवाची उन्नती झालेली असेल, त्याच्या पुढच्या चक्राला आपल्या हाताच्या बोटांत अक्षता घेऊन बोटांनी स्पर्श करत. त्यामुळे जिवाच्या कुंडलिनीचा पुढील प्रवास चालू होत असे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पातळीच्या उन्नतांना कोणत्याही जिवाकडे पाहिल्यावर ‘त्याची आध्यात्मिक उन्नती कोणत्या चक्रापर्यंत झालेली आहे’, हे लक्षात येत असे. त्यामुळे त्यांनी केवळ त्या चक्रावर दृष्टी टाकली, तरीही जिवाची उन्नती होत असे. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून )

२. त्रेता आणि द्वापर युगांतील जिवांचा वाढदिवस

जिवाच्या वर्षभराच्या आध्यात्मिक उन्नतीचा आढावा घेऊन उन्नतांनी त्याला आशीर्वाद देणे

सत्ययुगात जिवाची सरासरी पातळी ६० टक्के इतकी असायची. ‘स्वतःच्या कुंडलिनीचा प्रवास कोठपर्यंत झालेला आहे’, ते जिवाला कळत होते. त्रेतायुगातही काही जिवांना याची जाणीव होत होती; परंतु द्वापरयुगामध्ये अनेक जिवांना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीच्या ज्ञानाचा विसर पडला. त्रेता आणि द्वापर युगांत जिवाच्या वाढदिवसाला अनेक उन्नत येऊन त्याच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याला आशीर्वाद देत असत किंवा जीव आशीर्वाद घेण्यासाठी उन्नतांकडे जात असे. उन्नतांकडून प्राप्त झालेल्या आशीर्वादानंतर जीव त्याच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी अधिक गांभीर्याने प्रयत्न करत असे. पुढील वर्षी वाढदिवसाच्या दिवशी जीव पुन्हा उन्नतांचा आशीर्वाद घ्यायला जात असे, तेव्हा उन्नत त्याच्या वर्षभराच्या आध्यात्मिक उन्नतीचा आढावा घेऊनच त्याला आशीर्वाद देत. म्हणजेच जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीत वाढ झालेली असल्यासच उन्नत त्याला आशीर्वाद देत. ‘उन्नतांनी दिलेल्या आशीर्वादामुळे माझी आध्यात्मिक उन्नती होत आहे’, याची जिवाला जाणीव होत असल्याने त्याला अहं होण्याची शक्यता अल्प असायची.

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

वाढदिवस : चलच्चित्रपट (Birthday video – Playlist of 7 videos)

 

वाढदिवस तिथीनुसार साजरा करण्याचे महत्त्व काय ?

१. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मदिवसाची तिथी ही ‘घाततिथी’ असली, तरी
त्या तिथीला होणारे लाभ अधिक असल्याने वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे योग्य असणे

संकलक : आपण वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला सांगतो. ज्योतिष-शास्त्रामध्ये ‘ज्या दिवशी आपला जन्म झाला, त्या तिथीला कोणतेही शुभ कर्म करू नये; कारण ती घाततिथी असते’, असे सांगितले आहे. मग त्या दिवशी नेमके काय करावे ?

 

एक विद्वान : ‘घाततिथी’ म्हणण्यातील गर्भितार्थ वेगळा आहे. त्या त्या तिथीला जन्मलेल्या जिवाची स्पंदने त्या त्या तिथीशी मिळतीजुळती असल्याने करणी करणारे मांत्रिक त्या त्या तिथीला त्या जिवाच्या प्रतिकृतीवर विधी करून त्या जिवाला ७० टक्के एवढ्या प्रमाणात त्रास देऊ शकतात; म्हणून त्या तिथीला ‘घाततिथी’, म्हणजेच ‘सर्वांत जास्त त्रास देता येण्याची शक्यता असलेली तिथी’, असे संबोधले जाते. कलियुगात अर्थाचा अनर्थ होण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. त्या दिवशी घात होण्याची शक्यता, म्हणजेच शुभ कर्मात बाधा येण्याची शक्यता असल्याने ‘त्या जिवाशी संबंधित कोणतेही शुभ कर्म करू नये’, असा अर्थ यातून काढला गेल्याने वरीलप्रमाणे चुकीचा समज रूढ झाला आहे. या दिवशी शुभ कर्म, म्हणजेच वाढदिवस करतांना औक्षणातून कुलदेवतेला केलेल्या प्रार्थनेतून चैतन्याची फलप्राप्ती करून घेऊन त्या त्या स्तरावर होणार्‍या आक्रमणांना प्रतिकार करण्याचे बळ जिवाला प्राप्त होते; म्हणून ‘या दिवशी कोणतेही शुभ कर्म करू नये’, असा संकेत नाही. ते एक अभ्यासहीन वक्तव्य आहे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

२. शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद सर्वाधिक फलद्रूप होणे

ज्या तिथीला आपण जन्मलो, त्या तिथीची स्पंदने आपल्या स्पंदनांशी सर्वाधिक जुळणारी असतात. त्यामुळे त्या तिथीला आपल्या आप्तेष्टांनी आणि हितचिंतकांनी आपल्याला दिलेल्या शुभेच्छा अन् शुभाशीर्वाद सर्वाधिक फलद्रूप होतात; म्हणून वाढदिवस तिथीनुसार साजरा करावा.

३. जीवनात येणार्‍या अडथळ्यांविरुद्ध लढण्याची क्षमता प्राप्त होणे

वाढदिवसाच्या दिवशी (तिथीला) ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या लहरी त्या त्या जिवाच्या प्रकृतीला, तसेच प्रवृत्तीला पोषक असल्याने त्या तिथीला केलेल्या सात्त्विक आणि चैतन्यात्मक कृतींचा जिवाच्या अंतर्मनावर खोल संस्काररूपी ठसा उमटण्यास साहाय्य होते. यामुळे जिवाच्या पुढील जीवनक्रमाला आध्यात्मिक बळ प्राप्त होऊन त्याला जीवनात येणार्‍या अडथळ्यांविरुद्ध लढण्याची क्षमता प्राप्त होते. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

४. दिनांकानुसार वाढदिवस साजरा न करता, तिथीनुसार वाढदिवस साजरा केल्याने होणारे लाभ

दिनांकानुसार वाढदिवस साजरा करणे

तिथीनुसार वाढदिवस साजरा करणे

१. ‘संबंधित देह केवळ स्थूलदेह स्थूलदेह ५ टक्के आणि सूक्ष्म-देह ९५ टक्के.
२. देहावर होणारा परिणाम वाढदिवस साजरा करण्याची कृती केवळ स्थूलदेहाशी संबंधित असल्याने जिवाला नगण्य प्रमाणात सात्त्विक लहरींचा लाभ होतो. यामुळे जिवावर आलेले रज-तमाचे आवरण न्यून होण्याची शक्यता अल्प असते. सूक्ष्म-देहाची सात्त्विकता वाढते
३. नाडीवर होणारा परिणाम औक्षण केले, तरी जिवाच्या सूक्ष्म-देहाची सात्त्विकता आवश्यक तेवढ्या प्रमाणात वाढलेली नसल्यामुळे प्रामुख्याने सूर्यनाडी आणि काही वेळा चंद्रनाडी जागृत होते; परंतु त्याचा जिवाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होत नाही. तिथीला प्रारंभ झाल्यापासूनच प्रत्येक क्षणी जिवाला त्याच्या सूक्ष्म-देहाच्या स्पंदनांशी जुळणारी आणि देहशुद्धीसाठी आवश्यक अशी सात्त्विक स्पंदने मिळतात. त्यामुळे औक्षण केल्यावर जिवाची सुषुम्नानाडी जागृत होते. जिवाची पातळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्याची सुषुम्नानाडी दिवसभर जागृत रहाते.
४. जिवाच्या वृत्तीवर होणारा परिणाम जिवाची सात्त्विकता न वाढल्याने त्याची बहिर्मुख वृत्ती वाढते. जिवाची सात्त्विकता वाढल्याने त्याची अंतर्मुख वृत्ती वाढते.’

५. दिनांकानुसार वाढदिवस साजरा केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

दिनांकानुसार वाढदिवस साजरा केल्यास आध्यात्मिक लाभ होत नाही, असे का ?

दिनांकानुसार वाढदिवस साजरा करणे म्हणजे तो इंग्रजी मासानुसार साजरा करणे. इंग्रजी मासांची निर्मिती ही मानवनिर्मित आहे. ख्रिस्तजन्मापासून ही गणना आरंभ झाली. त्यामुळे त्यात ईश्वरी नियोजनाप्रमाणे काही नसल्याने वाढदिवस दिनांकानुसार साजरा करण्यातून जिवाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही. तसेच इंग्रजी मास मानवनिर्मित असल्यामुळे त्यात अहंची स्पंदनेही कार्यरत असतात.

 

दिनांकानुसार वाढदिवस साजरा करणार्‍यांकडून होणार्‍या अयोग्य कृतींतून वाढदिवस असलेल्या जिवाकडे तमोगुणी स्पंदने आकृष्ट होणे आणि त्याच्या देहाभोवती काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होणे, तसेच त्याची वृत्ती बहिर्मुख होणे

वाढदिवसाला मेणबत्ती विझवून केक कापू नये

वाढदिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजल्यानंतर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, वाढदिवसाच्या दिवशी केक कापणे, मेणबत्ती फुंकर मारून विझवणे इत्यादी गोष्टींमुळे वाढदिवस असलेल्या जिवाकडे तमोगुणी स्पंदने आकृष्ट होतात आणि त्याच्या देहाभोवती काळ्या शक्तीचे आवरणही निर्माण होते. तसेच या कृतींमुळे त्याची वृत्ती बहिर्मुखही होते.

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (आषाढ शु. १३, कलियुग वर्ष ५११२)

 

तिथीनुसार वाढदिवस साजरा केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

वाढदिवसाच्या दिवशी टाळावयाच्या कृती आणि त्यांमागील शास्त्र

१. या गोष्टी कटाक्षाने टाळा !

वाढदिवशी नखे आणि केस कापणे, वाहनाने प्रवास, कलह, हिंसाकर्म, अभक्ष्यभक्षण, अपेयपान, स्त्रीसंपर्क (स्त्रीसमवेत शारीरिक संबंध) या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

२. वाढदिवसाच्या दिवशी प्रज्वलित केलेला दिवा विझवू नये !

शास्त्र : दिव्याच्या ज्योतीची तुलना जिवाच्या शरिरातील पंचप्राणांच्या ऊर्जेवर चालणार्‍या स्थूल कार्याशी केली आहे. दिवा विझणे हे जिवाच्या शरिरातील पंचप्राणांचे कार्य संपुष्टात येऊन जिवाच्या प्राणशक्तीचा र्‍हास होणे आणि त्याची जीवनज्योत मालवणे, याचे प्रतीक आहे. पेटवलेला दिवा विझणे, हे अचानक होणार्‍या मृत्यूशी, म्हणजेच अपमृत्यूशी निगडित असल्याने अशुभ मानले आहे. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून) आणि
ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

३. वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता देऊ नयेत !

शास्त्र : पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे बरेच लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता देतात. रात्री १२ वाजता वातावरणात रज-तम कण मोठ्या प्रमाणात असतात. अशा वेळी शुभेच्छा दिल्यास त्या फलद्रूप होत नाहीत. हिंदु संस्कृतीप्रमाणे दिवसाचा आरंभ सूर्योदयाला होतो. ही वेळ ऋषीमुनींची साधनेची वेळ असल्याने या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणात सात्त्विकता असते. त्यामुळे सूर्योदयानंतर शुभेच्छा दिल्यास त्या फलद्रूप होतात; म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा सूर्योदयानंतरच द्याव्यात. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून )

४. आधी मेणबत्त्या पेटवून अन् नंतर विझवून वाढदिवस साजरा करू नका !

शास्त्र : पाश्चात्त्य पद्धतीचे अंधानुकरण करून आजकाल बरेच जण मेणबत्त्या पेटवून आणि केक कापून वाढदिवस साजरा करतात. मेणबत्ती ही तमोगुणी असल्याने ती लावल्याने वास्तूत त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. तसेच ‘ज्योत विझवणे’ या कृतीला हिंदु धर्मात अशुभ आणि त्याज्य मानले आहे; म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती लावून आणि नंतर जाणूनबुजून विझवू नये.

५. केक कापून वाढदिवस साजरा करू नका !

शास्त्र : केकवर सुरी फिरवणे, हे अशुभ क्रियेचे प्रतीक असल्याने वाढदिवसाच्या शुभप्रसंगी ती क्रिया केल्याने पुढच्या पिढीवर कुसंस्कार होण्यास साहाय्य होते. औक्षण झाल्यानंतर आकृष्ट झालेले ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याच्या वेळी असे विधीकर्म करणे, म्हणजे त्या चैतन्यात त्रासदायक स्पंदनांच्या योगे बाधा आणण्यासारखेच आहे. कोणत्याही शुभप्रसंगी जाणूनबुजून अशा प्रकारचा लयकारी विधी करणे, हे धर्मविघातक प्रवृत्तीचे लक्षण आहे.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

‘वाढदिवसाच्या दिवशी केकवर सुरी फिरवू नये’, असे असतांना इतर दिवशी फिरवली तर चालते का, तसेच आपण भाजी-फळे चिरतांना विळी, सुरी यांचा वापर करतो; तसे करणे निषिद्ध आहे का’, अशा प्रकारचे प्रश्न वाचकांच्या मनात येऊ शकतात. या प्रश्नांची उत्तरे पुढे दिली आहेत.

१. कोणत्याही गोष्टीवर सुरी फिरवतांना चैतन्यात अडथळा येत असल्याने पाप लागणे

संकलक : वाढदिवस सोडून इतर दिवशी केकवर सुरी फिरवणे अशुभ आहे का ?

एक विद्वान : कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही दिवशी सुरी फिरवणे, हे अशुभच आहे. कलियुगात सुविधेच्या दृष्टीने या लयकारी क्रिया कनिष्ठ स्तरावर ग्राह्य धरल्या आहेत. या कृतीने चैतन्यात बाधा येत असेल, तर १० टक्के पाप आणि सहज सुविधाजन्य कृतीच्या स्तरावर केलेली प्रक्रिया असेल, तर २-३ टक्के पाप लागते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

२. भाजी सुरीद्वारे चिरतांना ती सहज कृती असल्याने चैतन्यलहरींना अडथळा न येणे

संकलक : केकवर सुरी फिरवणे अशुभ आहे, तर भाजी सुरी किंवा विळी यांद्वारे चिरली जाते, ते योग्य कि अयोग्य ?

एक विद्वान : कलियुगात अन्न चिरण्याच्या सुविधेसाठी विळी, सुरी आणि कात्री अशी माध्यमे वापरली जातात. शक्यतो अशी माध्यमे वापरू नयेत; कारण त्यांतून गतीवाचक अशी त्रासदायक स्पंदने निर्माण होतात. शक्यतो भाजी हाताने खुडता आली, तर खुडावी. अशी भाजी जास्त सात्त्विक असते. पूर्वीचे जीव कंदमुळे शिजवून तीच खात असल्याने त्यांच्या हस्तस्पर्शाच्या माध्यमातून भारित झालेले सात्त्विक अन्नच त्यांच्याकडून ग्रहण केले जात असे. विळी आणि सुरी ही माध्यमे कलियुगात निर्मिली गेली आहेत. भाजी चिरणे, ही एक सहज कृती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे चैतन्यलहरींना अडथळा आणणार्‍या असंस्कारजन्य प्रक्रियेची निर्मिती होत नसल्याने, असे करणे कलियुगात सुविधेच्या दृष्टीने कनिष्ठ स्तरावर ग्राह्य धरले आहे. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीसाठी पहा, ‘वाढदिवस साजरा करण्याची पद्धत

2 thoughts on “वाढदिवस साजरा करणे !”

 1. वाढदिवस हा वाढता करावा असे काही लोकांचे म्हणणे आहे, म्हणजे ज्या तिथीला आहे त्यानंतर एक दिवस नंतर करावा का,
  माझ्या मते ज्या तिथिला आहे त्याचे आधीचे दिवशी एक वर्ष पूर्ण होईल आणि जन्म तिथी म्हणजे वाढता वाढदिवस का कृपया खुलासा करावा वाढ दिवस साजरा करण्याची पद्धत आणि शास्त्रोक्त माहिती अत्यंत उपयुक्त आहे
  धन्यवाद

  Reply
  • नमस्कार,

   वाढदिवस तिथीनुसार करावा. लेखात ‘वाढदिवस तिथीनुसार साजरा करण्याचे महत्त्व’ या सदरा अंतर्गत ज्या तिथीला आपण जन्माला आलो त्या तिथीची स्पंदने, नक्षत्र ही आपल्याला मिळती-जुळती असल्याने त्या दिवशी वाढदिवस साजरा केल्याने, मोठ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्याने अधिक लाभ होतो.

   Reply

Leave a Comment