कुपोषण (Malnutrition) : लक्षणे, प्रकार आणि उपचार

Article also available in :

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !


‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पिडीअ‍ॅट्रीक्स’च्या मते एखाद्याचे वजन सर्वसाधारणपणे उंची आणि वय यांप्रमाणे योग्य वजनापेक्षा २० टक्क्यांपर्यंत अल्प असले, तरी त्याला कुपोषण म्हटले जात नाही. कुपोषणाचे वजनाप्रमाणे वर्गीकरण केले जाते.

सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले

१.  कुपोषणामागील कारणे

कुपोषणाची सामान्यतः आढळणारी कारणे पुढीलप्रमाणे –

अ. गरिबी

आ. आईचे कुपोषण : गर्भवती महिला कुपोषित असल्यास तिचे जन्माला येणारे बाळ अशक्त असते आणि त्याचे वजनही अल्प असते.

इ. जीर्ण संसर्गजन्य रोग : उदा. क्षयरोग

ई. जीर्ण रोग : उदा. अपचन

उ. वाढती लोकसंख्या आणि मोठे कुटुंब

ऊ. चुकीच्या पद्धतीने अन्न देणे : उदा. खूप पाणी घातलेले दूध देणे किंवा केवळ सेरेलॅक देणे.

 

२. कुपोषणाचे प्रकार

आधुनिक वैद्यकशास्त्राने कुपोषणाचे पुढील २ प्रकारांत वर्गीकरण केले आहे.

अ. पुरेसे अन्न आणि ऊर्जा न मिळाल्यामुळे होणारे कुपोषण

आ. अन्न, ऊर्जा आणि त्याचसमवेत प्रथिने पुष्कळ अल्प प्रमाणात मिळाल्यामुळे होणारे कुपोषण

 

३. कुपोषणाची लक्षणे

अ. शारीरिक वाढ अल्प प्रमाणात होते किंवा खुंटते.

आ. सूज : अंगाला येणारी सूज रक्तातील प्रोटीनच्या, म्हणजेच प्रामुख्याने अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे येते. सूज येण्यास पायापासून सुरुवात होते आणि शेवटी चेहर्‍यावरही सूज येते.

इ. मानसिक बदल : मूल मरगळल्याप्रमाणे वागते, चिडचिड करते, त्याला खेळामध्ये रस वाटत नाही.

ई. त्वचा आणि केस यांमधील बदल : केस पातळ आणि शुष्क बनतात, लवकर तुटतात तसेच त्यांचा रंगही बदलतो. त्वचा रुक्ष होते आणि तिचा लवचिकपणा घटतो.

उ. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात.

ऊ. शरीराची रोगप्रतिकारशक्ती अल्प झाल्यामुळे जंतुसंसर्गाने होणारे सर्दी, खोकला, जुलाब इत्यादि रोग वारंवार होतात.

 

४. कुपोषणामुळे होणारे उपद्रव

अ. शरिराचे तापमान खालावणे

आ. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण न्यून होणे

इ. मोठ्या प्रमाणावर जुलाब होणे

ई. संसर्गजन्य रोग होणे

उ. रक्तातील हिमोग्लोबीनच्या न्यूनतेमुळे अ‍ॅनिमिया होणे

ऊ. यकृताचे कार्य मंदावणे

ए. हृदयाचे कार्य मंदावणे

ऐ. शरिरातील जलांश न्यून होणे (डीहायड्रेशन होणे )

 

५. कुपोषणावरील उपचार

मुलांना असा आहार द्यावा की, जो सहज पचणारा असेल, ज्यात अन्नातील सर्व आवश्यक घटक असतील आणि वजनाला अनुसरून योग्य तेवढे उष्मांक शरिराला पुरविले जातील. नंतर भुकेचे प्रमाण वाढू लागल्यावर अपेक्षित वजनासाठी आहार संतुलित होईपर्यंत त्यात हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढ करावी. तसेच तो आहार प्रथिने आणि उष्मांक यांनी युक्त असावा. त्याचप्रमाणे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची न्यूनताही दूर करावी. तसेच संसर्ग आणि जंतांचा त्रास यांवरही उपाय करावेत.

कुपोषणासंदर्भात आयुर्वेदीय दृष्टिकोन

आयुर्वेदात कुपोषणाला ‘कृशता’ म्हणतात. कृश म्हणजेच किडकिडीत शरीर.

१. कृशतेची कारणे

अ. वय : वृद्धावस्था

आ. आहार : अल्प खाणे, उपवास

रुक्ष आहार : तुरट, कडू आणि तिखट पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.

इ. श्रम : अतिश्रम, अतिसंभोग

ई. मसाज आणि स्नान : रुक्ष पावडरने मसाज करणे, रुक्ष औषधे घातलेल्या कोमट औषधी पाण्याने स्नान करणे.

उ. मानसिक अवस्था : दुःख करणे, चिंता करणे, घाबरणे, राग येणे,  वेगावरोध म्हणजे संडास, लघवी, खोकला इत्यादींचे वेग रोखून धरणे, मानसिक तणावाखाली काम करणे.

ऊ.  जुनाट आजार

ए. वात आणि पित्त प्रकृती

२. उपचार

२ अ. आहार : गोड, आंबट आणि अधिक उष्मांक असलेले पदार्थ खावेत.

धान्ये : तांदुळ, गहू

डाळी : मूग, चणा, तीळ, उडीद

दूध आणि दुधाचे पदार्थ : दूध, लोणी, दही, बर्फी, पेढा

स्निग्ध पदार्थ : तूप, तेल

ऊस आणि उसाचे पदार्थ : ऊस, साखर, गूळ

फळे : द्राक्षे, खजूर, डाळिंब

पचनशक्तीनुसार हळूहळू आहारात वाढ करावी. काजू, बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे खावेत. दूध आणि तूप यांपेक्षा अधिक पौष्टिक असे काही नाही.

२ आ. श्रम : आराम करावा, पुरेशी झोप घ्यावी. अतिश्रम, अतिव्यायाम आणि अतिसंभोग, तसेच दिवसा झोपणे टाळावे.

२ इ. तेलाने मालिश करावी.

२ ई. मानसिक अवस्था : सदैव आनंदी आणि चिंतारहित रहावे.

२ उ. औषधे

१. अश्‍वगंधा, क्षीरकाकोली, विदारी, शतावरी, बला, अतिबला, नागबला आणि इतर मधुर औषधे घ्यावीत.

२. तूप, तेल, मध, साखर आणि पिंपळी यांनी सिद्ध केलेले भाजलेल्या मक्याचे पीठ समप्रमाणात घ्यावे.

३. आवळा, च्यवनप्राश यांसारखी रसायनद्रव्ये, लोहभस्म, व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियमयुक्त टॉनिक्स घ्यावीत.

४. भाजलेल्या मक्याचे पीठ, मद्य (वाईन), मध आणि साखर मिसळून पौष्टिक पेये बनतात.

५. जसजशी भूक वाढेल, तसतसा आहार वाढवत जावा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ योग्य आहाराविषयी आधुनिक दृष्टीकोन (असंतुलित आहारामुळे होणार्‍या विकारांवरील आयुर्वेदीय उपचारांसह)

Leave a Comment