१. पचनशक्ती मंदावणे, हेच बहुतेक रोगांचे मूळ कारण असणे
रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ । म्हणजे बहुतेक रोगांचे मूळ कारण पचनशक्ती मंदावणे हे आहे, असे आयुर्वेद सांगतो. अन्न ही शरिरामध्ये प्रतिदिन जाणारी गोष्ट आहे. देहव्यापार सुरळीत चालण्यासाठी आत गेलेले अन्न व्यवस्थित पचावे लागते. ते पचले नाही, तर शरिरामध्ये एकप्रकारचे विष उत्पन्न होते. या विषाला आम असे म्हणतात. कोणत्याही रोगामध्ये शरिरातील हा आम पचवणे आवश्यक असते.
२. पचनशक्ती मंद झाल्याने रोग कसे निर्माण होतात ?
आपण चुलीमध्ये लाकडे घालून चूल पेटवतो. पेटलेल्या चुलीवर पातेल्यामध्ये पाणी आणि तांदूळ ठेवले की, कालांतराने तांदूळ शिजून भात बनतो. चुलीतील लाकडांवर राख जमलेली असल्यास अग्नी नीट पेटत नाही आणि तसे झाले, तर भात चांगला शिजत नाही. त्याचप्रमाणे शरिरातील अग्नीवर, म्हणजेच पचनशक्तीवर राख, म्हणजेच वात, पित्त आणि कफ या दोषांचे आवरण आल्यास तो अग्नीही मंद होतो आणि अशा स्थितीत केलेले भोजन नीट न पचल्याने आमाची निर्मिती होऊ लागते. यावर काहीही उपाय न केल्यास ताप, सर्दी, आम्लपित्त, संधीवात, बद्धकोष्ठता, मधुमेह आदी विकार निर्माण होतात.
३. बाह्य अग्नीप्रमाणे जठराग्नीही क्रमाक्रमाने वाढवणे आवश्यक असणे
चुलीतील अग्नी नीट पेटत नसल्यास आपण चुलीतील लाकडे विरळ करतो. अग्नी अगदीच मंद झाल्यास सर्व लाकडे बाहेर काढून चुलीत जमा झालेली अतिरिक्त राख बाजूला काढतो. त्यानंतर कागद पेटवून त्यावर लहान लहान काटक्या ठेवतो. त्या काटक्या पेटल्यावर त्यांवर त्यांपेक्षा मोठ्या काटक्या, त्या पेटल्यावर लहान लाकडे, मग मोठी लाकडे अशा क्रमाने हळूहळू अग्नी वाढवतो. असे केल्याने अग्नी चांगल्या रितीने प्रज्वलित होऊन तांदूळ शिजण्याचे अपेक्षित कार्य साधते. हीच गोष्ट देहाच्या ठिकाणी करता येते. किंबहुना कोणत्याही रोगामध्ये औषध चालू करण्यापूर्वी क्रमाक्रमाने जठराग्नी वाढवून तो प्रदीप्त केल्यास औषध घेण्यापूर्वीच रोग अर्धा बरा होतो. घेतलेले औषध पचले, तरच ते लागू पडते. अग्नी मंद असतांना घेतलेले औषध पचले नाही, तर ते शरिरात जाऊन अपायच करते. ज्याप्रमाणे बाह्य अग्नी क्रमाक्रमाने वाढवला जातो, त्याप्रमाणे अंतरग्नीही क्रमाक्रमाने वाढवायचा असतो. या क्रियेला आयुर्वेदामध्ये संसर्जन क्रम असे नाव आहे.
४. पचनशक्ती चांगली राखण्यासाठी पाळावयाचे पथ्य
समजा एखादी व्यक्ती दिवसाला २ वेळा जेवण आणि २ वेळा अल्पाहार करत असेल, तर तिने काही दिवस पुढीलप्रमाणे आहार ठेवावा. खालील सर्व पदार्थांमध्ये चवीपुरते सैंधव मीठ घालावे.
| दिवस | अल्पाहार किवा जेवण | आहारातील पदार्थ |
|---|---|---|
| १ | रात्रीचे जेवण | पूर्ण उपवास (या वेळी शक्य असल्यास पाणीही पिऊ नये ) |
| २ | सकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी |
| दुपारचे जेवण | पातळ पेज | |
| सायंकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी | |
| रात्रीचे जेवण | दाट पेज | |
| ३ | सकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी |
| दुपारचे जेवण | फोडणी न देता केलेले मुगाचे वरण | |
| सायंकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी | |
| रात्रीचे जेवण | फोडणी देऊन केलेले मुगाचे वरण | |
| ४ | सकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी |
| दुपारचे जेवण | मऊ भात आणि मुगाचे वरण | |
| सायंकाळचा अल्पाहार | पेजेचे पाणी | |
| रात्रीचे जेवण | साधा भात, मुगाचे वरण आणि १ चमचा तूप | |
| ५ | सकाळच्या अल्पाहारापासून रात्रीच्या जेवणापर्यंत | नेहमीचा अल्पाहार आणि जेवण नेहमीपेक्षा अर्ध्या प्रमाणात घ्यावे. |
| ६ | सकाळच्या अल्पाहारापासून रात्रीच्या जेवणापर्यंत | नेहमीचा अल्पाहार आणि जेवण |
५. आहाराचे पथ्य चालू असतांना लक्षात घ्यायची सूत्रे
अ. वैद्यांचा समादेश घेऊन शक्य तेवढी औषधे या काळापुरती बंद ठेवावीत.
आ. मधुमेहावरील औषधे चालू असल्यास आपल्या वैद्यांकडून या आहारानुसार औषधांचे प्रमाण पालटून घ्यावे.
इ. वर दिलेल्या अन्नपदार्थांव्यतिरिक्त अन्य काहीही खाऊ नये, तसेच चहा किंवा कशायही पिऊ नये.
ई. दिवसा झोपू नये, तसेच रात्री जागरण करू नये.
उ. पिण्यासाठी, तसेच स्नानासाठी गरम पाणी वापरावे.
ऊ. ब्रह्मचर्याचे पालन करावे.
ए. लघवी, संडास आदींचे नैसर्गिक वेग रोखून धरू नयेत.
ऐ. कडक ऊन, व्यायाम आणि अती श्रम टाळावेत.
६. निरोगी रहाण्यासाठीही अधूनमधून वरील पथ्य पाळणे आवश्यक
कोणत्याही रोगामध्ये वरीलप्रमाणे आहाराचे पथ्य पाळल्यास रोग मुळापासून बरा होण्यास साहाय्य होते आणि आपण घेत असलेले औषध चांगले लागू पडते. आपल्या पचनशक्तीचे अनुमान करून ती मंद झाली आहे, असे वाटत असल्यास प्रत्येक महिन्याला असे पथ्य केले, तरी चालते. पावसाळ्याचे ४ मास पचनशक्ती मंद असल्याने प्रत्येकाने हे पथ्य न्यूनातिन्यून ४ मास तरी पाळावे. यामुळे आरोग्य राखले जाते. ताप, अतीसार (जुलाब), आम्लपित्त, अजीर्ण, सर्दी, खोकला आदी विकार अन्य कोणतेही औषध न घेता केवळ वरील पथ्य पाळल्यानेही बरे होऊ शकतात. या पथ्याने अनावश्यक वाढलेले वजन न्यून होण्यासही साहाय्य होते.
संदर्भ : सनातन-निर्मित आगामी ग्रंथमालिका ‘शारीरिक विकारांवर घरच्या घरी करायचे उपचार’
#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?
चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !
निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !
‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !
देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र
कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणाम