युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिक !

भारताने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० रहित केले आहे आणि त्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहेत. यामुळे स्वाभाविक पाकिस्तान आणि चीन संतप्त झाले आहेत. पाकचे मंत्री भारताशी युद्ध करण्याची मागणी करत आहेत, तर इम्रान खान यांनी मी सैन्याला आक्रमण करण्याचा आदेश देऊ का ?, अशी विचारणा केली आहे. दुसरीकडे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतच पाकव्याप्त काश्मीरसाठी प्राण देऊ, असे विधान केले आहे. तत्पूर्वी काही दिवस भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे भारताचे भाग आहेत अन् ते चर्चा करून कि अन्य कोणत्या मार्गाने परत मिळवायचे ?, हे राज्यकर्त्यांनी ठरवावे, असे म्हटले होते. या दोन्ही विधानांचा परस्परांशी संबंध नाकारता येणार नाही. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे कलम ३७० रहित करणे आहे, असा तर्क कोणी करत असेल, तर ते चुकीचे ठरणार नाही. जर असे करायचे ठरले, तर युद्ध अटळ आहे. प्रश्‍न एवढाच रहातो की, ते कधी होणार ?

 

युद्धस्य कथा रम्या ।

युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते. भारताच्या इतिहासात असे युद्ध झालेले नाही. पूर्वीच्या काळातील लढाया १ दिवसांपासून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कालावधीच्या होत्या. त्यातही मुसलमान आक्रमकांनी भारतावर केलेल्या आक्रमणानंतर जवळपास ७०० वर्षे हिंदू त्यांच्याशी लढत होते, हा भाग वेगळा. पहिले महायुद्ध ४ वर्षे आणि दुसरे महायुद्ध ६ वर्षे चालले. याचा आवाकाही मोठा होता. दोन देशांतील युद्धामध्ये व्हीएतनाम येथील युद्ध २० वर्षे चालू होते. यात उत्तर व्हीएतनामच्या बाजूने चीन आणि रशिया होते, तर दक्षिण व्हीएतनामच्या बाजूने अमेरिका होती. तसेच इराण आणि इराक यांच्यातील युद्ध जवळपास ८ वर्षे चालू होते. इस्रायल गेली ७० वर्षे प्रतिदिन युद्धस्थितीत रहात आहे. या तुलनेत भारतातील वर्ष १९४८, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ चे कारगिल युद्ध हे काही दिवस आणि काही मासच चालले. याचा परिणाम संपूर्ण देशावर तितकासा झालाच नाही. त्यामुळे भारतियांनी युद्धाच्या झळा काय असतात, हे तसे अनुभवलेेले नाही. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात युरोपातील देशांनी हे अनुभवले आहे. त्या वेळी हिटलरचा छळही अनुभवला आहे.

आता कुठे युद्ध झाल्यास ते सर्वसामान्य युद्ध न रहाता अणूयुद्ध होण्याचा धोकाच अधिक आहे. त्यामुळे त्याचा कालावधी काही मास वा काही वर्षे असण्यापेक्षा काही दिवसांचा असू शकतो, असा तर्क मांडण्यात येतो. दुसरे महायुद्ध ६ वर्षे सतत चालल्यानंतर केवळ २ अणुबॉम्बमुळेच थांबले होते, हे लक्षात घ्यायला हवे. तरीही युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता ते किती दिवस चालेल ?, याचा विचार करून त्याची सर्व स्तरावर सिद्धता करणे आवश्यक असते. त्यानंतरच युद्ध करता येते. यातही स्वतःहून युद्ध करणारा देश आणि युद्ध लादला गेलेला देश यांच्या सिद्धता वेगळ्या असू शकतात. युद्ध करणारा देश नियोजनबद्धरित्या युद्धाची सिद्धता करतो, तर युद्ध लादले गेलेल्या किंवा आपल्यावर अशी स्थिती येऊ शकते, हे जाणून सतत युद्धसज्ज असणारा देश यांची स्थिती वेगवेगळी असते. युद्ध करणार्‍या देशाच्या सिद्धतेमध्ये कोणकोणते घटक असतात, त्याचा पुढे संक्षिप्त स्वरूपात आवाका पहाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातून वाचकांना युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिकांचा  सहभाग कसा असतो ? आणि कसा असायला हवा ?, हे थोडेफार लक्षात येईल. तसेच हा आवाका पहातांना भारताचे पारंपरिक शत्रू पाक आणि चीन यांना समोर ठेवण्यात आले आहे.

 

युद्धाची सिद्धता

१. शांततेच्या काळात आक्रमण कधी करायचे ?, याचे नियोजन

आक्रमण करणार्‍या देशाने युद्धाची सिद्धता करतांना त्याला किती दिवस युद्ध करायचे आहे आणि यात त्याला कोणते लक्ष्य साध्य करायचे आहे, याचा विचार करायचा असतो. हे लक्ष्य किती दिवसांत पूर्ण होणार आणि त्यासाठी लागणारी सैनिकी साधने अन् अन्य साधने यांचा विचार करावा लागतो. समजा, पाकमधील जिहादी आतंकवाद्यांना नष्ट करण्यासाठी भारताला पाकवर आक्रमण करायचे असेल, तर प्रथम आतंकवाद्यांची सर्व ठिकाणे नष्ट करण्यास लागणारा वेळ, पाकची प्रत्युत्तराची क्षमता, त्याला अन्य देशांकडून मिळू शकणारे साहाय्य, तिन्ही सैन्यदलांचा वापर करण्याची आवश्यकता, त्याच वेळेस चीन आणि अन्य शेजारी देशांच्या सीमेवरील सिद्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाला तोंड देणे, तसेच कोणत्या ऋतूमध्ये युद्ध करण्यात येणार आहे आदी गोष्टींचा विचार करून हे युद्ध किती दिवस चालू शकते ?, हे ठरवावे लागेल. युद्ध करण्याच्या नियोजनाला काही दिवस ते काही मास किंवा काही वर्षेही लागू शकतात. वर्ष १९७१ च्या वेळी युद्ध करण्याचा विचार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेव्हाचे फिल्ड मार्शल माणेकशॉ यांना सांगितला होता. तेव्हा त्यांनी त्यासाठी ६ मासांची मुदत मागितली होती. ६ मासांमध्ये सैन्याची सिद्धता केल्यावर भारताने युद्ध केले होते आणि ते जिंकले होते.

समजा, अधिक काळापर्यंत युद्ध चालू ठेवायचे असेल किंवा ते नियोजित कालावधीपेक्षा अधिक काळ लांबू शकत असेल, तर कोणती सिद्धता करायला हवी ?, याचाही विचार करण्याची आवश्यकता असते, उदा. चीनवर आक्रमण करण्याचे धाडस भारताला करायचे झाल्यास असा विचार करता येऊ शकतो किंवा पाकवर आक्रमण केल्यावर चीनने त्याच्या बाजूने युद्धात सहभाग घेतला, तर पुढे ते युद्ध किती दिवस चालणार ?, याचा विचार करून तशी सिद्धता करावी लागेल. हिटलरने जर्मनीची सत्ता कह्यात घेतल्यावर त्याने पहिल्या युद्धाच्या पराभवाचा सूड घेण्याच्या विचाराने युद्धाचीच सिद्धता चालू केली होती. त्याने युरोप पादाक्रांत करण्याचाच विचार केला होता आणि तशी त्याने काही वर्षे युद्धसज्जता चालू केली होती. त्यामुळे जवळपास ६ वर्षे तो युद्ध करू शकला आणि त्याने युरोपमधील काही देश, तसेच रशियाचा काही भाग जिंकला होता. तसेच फ्रान्स आणि इंग्लंड यांना जेरीस आणले होते. रशियात त्याला थंडीमुळे हार पत्करावी लागली अन्यथा त्याने युरोपवर राज्य केले असते.

१ अ. आक्रमण होऊ शकण्याच्या शक्यतेने सिद्धता !

शेजारील देश आपल्यावर आक्रमण करू शकतो, याचा विचार करून आक्रमण झेलणार्‍या देशाने नेहमीच युद्धसिद्धतेत रहाणे आवश्यक असते. इस्रायल देश वर्ष १९४७ मध्ये ज्यू यांनी निर्माण केल्यापासून ते त्यांच्यावर शेजारील इस्लामी राष्ट्रांपासून आक्रमण होण्याच्या सिद्धतेत राहून त्यांना प्रत्युत्तर देत त्याने त्याच्या देशाचा विस्तार केला आहे.

१. आ. शत्रूच्या आक्रमणापूर्वी युद्धाची सिद्धता नसल्यास काय होते, याचे उदाहरण !

चीनने वर्ष १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले, त्यापूर्वीच तो भारतावर आक्रमण करणार, हे संरक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आधीच सांगितले होते; कारण त्याने तिबेट गिळंकृत केल्यावर तो भारतावर आक्रमण करणार, हे अपेक्षितच होते; मात्र राष्ट्रघातकी नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते हिंदी-चिनी भाई भाईच्या स्वप्नात मग्न राहिले, त्याचा परिणाम नंतर भारताला मोठ्या प्रमाणात भोगावा लागला. तसेच ८४ सहस्र चौ. कि.मी. भूभाग चीनने गिळंकृत केला. या पराभवाचा डाग भारतावर कायमचा लागलेला आहे आणि आज ५६ वर्षांनंतरही चीनची भीती कुठेतरी आपल्या मनात आहेच. असे होऊ नये म्हणून सातत्याने युद्धसज्ज स्थितीत रहाणे अशा देशांंना आवश्यक असते.

१ इ. युद्ध करण्याचे ठरल्यावर करायची सिद्धता

युद्ध करण्याचे ठरल्यास आवश्यक सैनिकीक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. शत्रूराष्ट्राच्या तुलनेत किती शस्त्रसाठा लागणार, किती विमाने आणि युद्धनौका, तसेच त्यांच्यासाठीचा दारूगोळा, पेट्रोल अन् डिझेल इंधनाची व्यवस्था करणे, सैनिकांची नवीन भरती करणे आदी गोष्टी कराव्या लागतात. काही मासांपूर्वी असे वृत्त प्रसिद्ध झाले होते की, भारतीय सैन्याकडे काही दिवस पुरेल इतकाच दारूगोळा उपलब्ध आहे. यावरून लक्षात येते की, भारत स्वतः युद्ध करण्याच्या सिद्धतेत नाही किंवा अन्य देशाने भारतावर आक्रमण केल्यास भारत त्याला किती दिवस तोंड देऊ शकतो, हेही यातून स्पष्ट झाले होते. असा देश पराजित झाल्यास कुणालाही आश्‍चर्य वाटणार नाही. म्हणजेच भारताला पाकवर किंवा चीनवर आक्रमण करायचे झाल्यास शून्यापासून सिद्धता करावी लागू शकते, हे लक्षात येते.

१ ई. आर्थिक स्थिती

युद्ध करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च होतो. अल्प कालावधीचे आणि मर्यादित क्षेत्रात युद्ध असेल, तर त्याचा परिणाम पूर्ण देशावर होत नाही, उदा. कारगिलचे युद्ध. मात्र मोठे युद्ध करायचे आहे, तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. किती काळ युद्ध चालणार आणि त्यासाठी देशाकडे किती विदेशी चलनाची गंगाजळी आहे, हे पहावे लागते. निर्धारित कालावधीच्या युद्धासाठी ते पुरेसे आहे का ? युद्धाचा कालावधी वाढला, तर अन्य पर्यायांचा विचार करून त्यांवर मात करता येऊ शकते का ?, याचा विचार करावा लागतो. या काळात आयात आणि निर्यात यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो ?, याचाही विचार करावा लागतो.

२. नागरिकांची सिद्धता

शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात. त्यांना सैनिकी शिक्षण घेणे बंधनकारक आहे. केवळ पुरुषच नाही, तर महिलांनाही ते घ्यावे लागते. त्यांच्यात राष्ट्रभक्तीचा संस्कार जन्मापासूनच झालेला असतो. त्यामुळे इस्रायलसारखा देश गेली ७० वर्षे शेजारील इस्लामी राष्ट्रांना तोंड देत अभिमानाने उभा आहे आणि त्याचा आदर्श जगातील सर्वच देश घेत असतात. असे भारतात तरी नाही. प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. त्यानंतरही अनेक प्रखर राष्ट्रभक्तांनी ती मांडली; मात्र तथाकथित अहिंसावादी काँग्रेसी राज्यकर्त्यांनी ती स्वीकारली नाही. मुळात हिंदु धर्मात सैनिक शिक्षणालाही तितकेच महत्त्व आहे. हिंदु धर्माने एक वर्णच सैन्यासाठी निर्माण केलेला आहे. तरीही अन्य वर्णियांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी हातात शस्त्र घेणे, हे आपले कर्तव्य आहे, हे जाणून त्यांनी वेळोेवेळी हाती शस्त्र घेतले आहे. भारताच्या सहस्रो वर्षांच्या इतिहासात शक, हुण, मोगल, इंग्रज आदींनी आक्रमणे केली आणि भारताला गुलाम बनवले. ते पहाता स्वातंत्र्यानंतर भारतियांना युद्धसज्ज करण्याची आवश्यकता असतांना प्रथम नेहरूंनी त्याला विरोध केला आणि नंतर त्यांची री प्रत्येक राजकारण्याने ओढली, हे भारतियांचे दुर्दैव !

२ अ. अंतर्गत उठाव

युद्धाच्या काळात प्रत्येक देशात अंतर्गत उठाव होतील, असे नसते. भारतासारख्या देशात याकडे मात्र लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुकतेच पाकच्या महंमद अली या मंत्र्याने पाकमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात विधान केले होते, भारताने पाकवर आक्रमण केले, तर केवळ ५ लाख पाकिस्तानी सैन्यच नव्हे, तर २२ कोटी पाकिस्तानी नागरिक आणि इतकेच नव्हे, तर तेथील (भारतातील) ३० कोटी लोकही (मुसलमानही) भारताच्या विरोधात उभे रहातील अन् गजवा-ए-हिंद (भारतातील काफिरांच्या (हिंदूंच्या) विरोधात मुसलमानांकडून करण्यात येणारे युद्ध) करतील. हे चिथावणी देणारे विधान गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. हे विधान प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक दडपले. त्यामुळे भारतियांनी हा धोका लक्षात घेऊन सतर्क रहाण्यासमवेतच कुणी देशद्रोह केलाच, तर पोलीस आणि सुरक्षादले यांना साहाय्य करावे लागेल. पाकसमवेतच्या गेल्या ४ युद्धांत असा प्रसंग निर्माण झाल्याचे उदाहरण नाही; मात्र आताची स्थिती पहाता काही ठिकाणी असे घडलेच, तर तेथे त्याला तोंड द्यावे लागणार; कारण पोलीस आणि अन्य सुरक्षादल त्यांच्याशी लढण्यात पुरेसे पडतील का ?, असा प्रश्‍न असेल.

२ आ. काटकसर आणि त्याग करणे !

भारतियांना शांततेच्या काळात युद्धाची सिद्धता करण्याचा अनुभव नाही किंवा तसे शिक्षण त्यांना देण्यात आलेले नाही आणि त्यांच्यावर तसे संस्कारही करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे युद्धाच्या वेळी आपण काही करायचे असते, हेच त्यांना ठाऊकच नाही. अशा वेळी त्यांनी ते जाणून घ्यायला हवे. मुळात मोठ्या कालावधीचे युद्ध झाले, तर भारतियांना काटकसर करण्यासमवेत अनेक त्याग करण्याची सिद्धता ठेवावी लागणार आहे, याची जाणीव त्यांनी आतापासून ठेवावी लागणार आहे. ऐन वेळी भारतावर युद्ध लादले गेले आणि ते बर्‍याच कालावधीपर्यंत चालू राहिले, तर ते नागरिकांना सहन करता येणार नाही, असे आताच्या त्यांच्या स्थितीवरून म्हणावेसे वाटते. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इंधनाचा वापर. भारतामध्ये इंधनाचे उत्पादन अपेक्षित तेवढे होत नाही. भारताला आखाती देशांकडून इंधन विकत घ्यावे लागते.

नियोजित युद्धकाळात तसा साठा करून ठेवता येतो आणि त्याचा काटकसरीने वापर करावा लागतो; मात्र आक्रमण झाल्यावर तशी कोणतीही सोय केलेली नसते. अशा वेळी देशात आहे ते इंधन सैन्याला प्राधान्याने द्यावे लागते. अशा वेळी नागरिकांना इंधनाचा तुटवडा भासतो. त्या वेळी त्याकडे संयमाने पहावे लागणार आणि मिळणार्‍या इंधनाचा वापर काटकसरीने करावा लागेल. वैयक्तिक वाहने वापरण्याऐवजी सार्वजनिक परिवहनाचा वापर करावा लागेल. अनावश्यक प्रवास टाळावा लागणार आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नधान्यांचे वहन थांबू शकते. त्यामुळे तेही लोकांना मिळणे कठीण होऊ शकते. अशा वेळी पैसे असूनही खाद्यपदार्थ मिळणार नाहीत, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

२. इ. वीज आणि पाणी यांच्या वापरावर मर्यादा !

पाण्याचे वहनही इंधनावर चालवण्यात येणार्‍या पंपांद्वारे केले जाते, अशा वेळी पाण्याच्या वापरावरही मर्यादा येणार. विजेसाठी लागणार्‍या कोळशांचे वहन करण्यासाठी इंधन अल्प पडल्यास वीजनिर्मितीतही घट होऊ शकते. त्यामुळेही पाण्याच्या वापरासहित विजेचा वापरही मोजकाच करावा लागेल. त्यातही शत्रूने नद्यांवरील धरणांना लक्ष्य करून ती उद्ध्वस्त केेली, तर त्यावर अवलंबून असणार्‍यांवर मोठाच आघात होईल. ही स्थिती पहाता शांतताकाळात तलाव आणि विहिरी यांना वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्याची आवश्यकता असते. भारतातील गावांमध्ये हे साध्य होऊ शकते; मात्र सध्या देशातील मोठ्या महानगरांमध्ये, स्मार्ट सिटीमध्ये अशी सोय करणे आता अशक्यच आहे. त्यामुळे जी शहरे अशा धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांतील लोकांना शहर सोडण्याविना पर्यायच नसेल. त्याचप्रमाणे शत्रूने वीजनिर्मिती केंद्रेच उद्ध्वस्त केली, तर आणखीच मोठा आघात होईल. दुसर्‍या महायुद्धात धरणे आणि वीजनिर्मिती केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रान्समधील काही भाग जिंकून घेऊन तेथील कारखान्यांमधून शस्त्रनिर्मिती चालू केली होती. त्यांना आवश्यक असणारी वीज धरणांच्या पाण्याद्वारे निर्माण करण्यात येत होती. तेव्हा फ्रान्सनेच स्वतःच्या; पण जर्मनीच्या कह्यात असणार्‍या या धरणांना स्वतःच उद्ध्वस्त केले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. तसेच रशियानेही जर्मनीपासून माघार घेतांना त्यांच्या देशातील रस्ते, धरणे आदी उद्ध्वस्त केले होते.

युद्धाच्या वेळी रात्रीच्या वेळी ब्लॅक-आऊट केला जातो; म्हणजे रात्री दिवे लावणेच बंद केले जाते. यासाठी प्रशासनच रात्रीचा वीजपुरवठा बंद करते. दिवे असल्यास किंवा प्रकाश असल्याने शत्रूची विमाने देशात घुसल्यास त्यांना त्यांचे लक्ष्य शोधण्यास वेळ लागत नाही. पूर्वीच्या युद्धाचा अनुभव असणार्‍या नागरिकांना हे ठाऊक असणार. त्यामुळे रात्री दिवे लावून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत, हे लक्षात ठेवावे लागणार. उन्हाळ्याच्या वेळेस असे युद्ध झाले, तर पाणी आणि वीज यांच्या अभावामुळे किंवा तुटवड्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल आणि असे युद्ध १ – २ वर्षे किंवा अधिक काळ चालले, तर काय स्थिती होऊ शकते ?, याची कल्पना करता येईल.

२ ई. नागरिकांची मानसिक स्थिती

सध्याच्या समाजाला देशासाठी सीमेवर जाऊन प्राणत्याग करण्याहून वेगळा काही त्याग करायचा असतो, हेच ठाऊक नाही; कारण गेल्या ७१ वर्षांत राज्यकर्त्यांनी समाजाला असे काही शिकवलेलेच नाही. त्यामुळे युद्धाच्या वेळी वीज, पाणी आणि इंधन यांच्यावर मर्यादा येणार आहे. त्यांमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध येणार आहेत. तसेच मनोरंजनाची साधनेही बंद ठेवावी लागतील, उदा. चित्रपटगृह, नाट्यगृह, अन्य साधने.  अशा वेळी त्यांच्याविना राहू न शकणार्‍या लोकांना संघर्षच करावा लागेल. या काळात रोजगाराची अनेक साधने बंद असतील आणि त्याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर होईल. हा सर्वांत मोठा परिणाम असेल. अशा वेळी पूर्वी केलेल्या बचतीचा वापर करावा लागेल. ज्यांच्याकडे पर्याप्त स्वरूपात बचत नसेल, त्यांची प्रचंड ओढाताण होणार, याविषयी शंकाच नाही. त्यातही युद्ध अधिक काळ चालू राहिल्यास सरकार बँकेतून मर्यादित पैसेच काढण्याचे निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत जगणे अधिक कठीण होईल. अशा वेळी सरकार आणि प्रशासन यांच्याकडून साहाय्य मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. अशा वेळी नागरिकांनाच एकमेकांना, शेजार्‍यांना साहाय्य करावे लागणार आहे. त्यातही सीमेवर युद्ध करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी लागणार आहे. अशा वेळी राष्ट्रबंधुत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे या काळात सर्वांनी संघटित रहाणे आवश्यक असेल. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युरोपमधील लोकांनी ही युद्धे कशी अनुभवली असतील, याचा विचार केला पाहिजे. अशा वेळी कणखर मानसिकता ठेवण्यासमेवत उपाशी रहावे लागण्याची सिद्धता ठेवावी लागणार आहे. त्यातही आजारी लोकांचे हाल अधिक होण्याची शक्यता असेल. त्यांना मिळणार्‍या औषधांचा तुटवडा होऊ शकतो. त्या वेळी त्यांना ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा लागेल; मात्र देशात सर्वच जण आस्तिक नाहीत. अशा वेळी कदाचित परिस्थिती त्यांना आस्तिक बनवू शकते.

३. देशाची आर्थिक स्थिती

एखाद्या देशाने युद्ध करायचे ठरवल्यास सैनिकी सिद्धतेसह आर्थिक सिद्धताही करण्याची आवश्यकता असणार आहे. हे युद्ध अधिक कालावधीत चालू राहिले, तरी आर्थिक अडचण येणार नाही, यासाठी काय उपाय करता येतील, हे ठरवावे लागते. प्रथम विदेशी गंगाजळी पहावी लागते. परदेशातून कोणतेही साहित्य विकत घेतांना ते भारतीय रुपयांमध्ये नाही, तर अमेरिकी डॉलरमध्ये घ्यावे लागते. अशा वेळी भारताकडे ही विदेशी चलनाची गंगाजळी असणे आवश्यक असते. वर्ष १९९१ मध्ये भारताला ती अपेक्षित एवढी नसल्याने विदेशांकडे मोठ्या प्रमाणात सोने गहाण ठेवावे लागले होते. तेव्हा युद्धाची स्थिती नव्हती, तर आर्थिक स्थिती युद्धासारखी झाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जर ही गंगाजळी पुरेशी नसेल, तर शस्त्रास्त्र खरेदी, इंधन खरेदी, अन्य साहित्यांची खरेदी आणि व्यापार यांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार अन् अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता निर्माण होईल. जेव्हा एखाद्या देशावर आक्रमण होते आणि ते युद्ध लांबते, तेव्हा आक्रमण करणार्‍यापेक्षा ज्यावर आक्रमण झाले आहे, त्याची हानी अधिक होते. त्यामागील कारण आर्थिक हेही असते; कारण तो त्या सिद्धतेत असतोच, असे नाही. अशा वेळी सरकार नागरिकांकडे पैसे, सोने आदी द्या, असे आवाहन करू शकते. तेव्हा जनतेला देशासाठी हेही करावे लागेल. याचीही मानसिक सिद्धता करावी लागेल. सर्व सोंगे आणता येतात; मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही. या वेळी बँकेतील लोकांचे पैसेही सरकार काढू देणार नाही, याचीही शक्यता असेल.

४.  प्रत्यक्ष युद्ध

प्रत्यक्ष युद्ध चालू झाले आणि ते एकच नव्हे, तर अनेक आघाड्यांवर चालू झाले, तर त्याच्या सीमा कशा आहेत आणि त्या देशाचे क्षेत्रफळ शत्रूच्या तुलनेत किती आहे, यांवरून संपूर्ण देशाला त्याला सामारे जावे लागणार कि नाही, हे लक्षात येतेे , उदा. वर्ष १९६२ मध्ये चीनच्या समवेत झालेल्या युद्धाच्या वेळी ते हिमालयाच्या सीमेवर होते. त्या वेळी त्याचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांवर झाला नव्हता. वर्ष १९७१ च्या वेळी पूर्व आणि पश्‍चिम या दोन्ही सीमांवर झाला होता अन् यात तिन्ही सैन्यदलांनी सहभाग घेतला होता. याचा आवाका तसा मोठा होता. त्या वेळी मुंबईतही ब्लॅक-आऊट करण्यात आले होते; कारण भारताच्या नौदलाने कराची बंदरावर प्रचंड आक्रमण केले होते. त्यामुळे पाककडून मुंबईला लक्ष्य करण्याची शक्यता होती. आता चीन हिंदी महासागरामध्ये घुसखोरी करून त्याचे बस्तान बसवू पहात आहे. त्यामुळे दक्षिणेकडून भारतावर आक्रमण होण्याची शक्यता आहे.

४ अ. खासगी कारखान्यांतून शस्त्रनिर्मिती

प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर आणि ते अधिक कालावधीत चालू राहिले, तर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासू शकतो. अशा वेळी सरकार सैनिकी कारखान्यांसह अन्य खासगी कारखान्यांतूनही शस्त्रांची निर्मिती चालू करू शकते. सैन्याला लागणारे शस्त्रांचे सुटे भाग येथे बनवण्यात येऊ शकतात.

४ आ. रक्ताची आवश्यकता

युद्ध चालू झाले की, सैनिक मोठ्या संख्येने घायाळ होतात. त्यांना रक्ताची आवश्यकता असते. त्यासाठी सरकारकडून रक्तदानासाठी आवाहन करण्यात येते. या वेळी देशभक्त नागरिकांनी पुढाकार घेऊन ते दिले पाहिजे. रुग्णालयेही सैनिकांसाठी राखीव ठेवावी लागतात. औषधांचा तुटवडा भासू नये, म्हणून औषधे प्रथम प्राधान्याने सैनिकांसाठी देण्यात येतात.

४ इ. सैन्यभरती

सैन्यात भरतीसाठीही आवाहन करण्यात येते. अशा वेळी तरुणांनी त्याला प्राधान्य देऊन सैन्यात भरती होण्याची आवश्यकता असते. त्यातही या संदर्भातील प्रशिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

५. अणूयुद्धाचा धोका !

भारत आणि पाक यांच्यात आता कोणतेही युद्ध झाले, तर त्याचे पर्यवसान अणूयुद्धातच होणार आहे, हे भारतियांनी आता कायमचे लक्षात ठेवून त्या दृष्टीने सतत सिद्ध असणे आवश्यक आहे. शासनकर्ते, प्रशासन आणि राजकीय पक्ष, तसेच जनता यांनी परिणामांचा विचार करून तशी सिद्धता करणेही आवश्यक आहेच.

भारताने यापूर्वी घोषित केले होते की, भारत पहिल्यांदा अणूबॉम्बचा वापर करणार नाही; मात्र नंतर त्याने स्वतःहून स्वतःवर घातलेले हे बंधन आता काढून टाकले आहे. तरी भारतीय मानसिकता पहाता भारत पहिल्यांदा अणूबॉम्बचा वापर करण्याची शक्यता ९९ टक्के नाही, असेच म्हणायला हवे. मग पाकसमवेत युद्ध झाले, तर प्रथम पाकच भारतावर अणूबॉम्ब टाकू शकतो. असे असेल, तर त्याचे लक्ष्य प्रथम कोणती शहरे असतील, याचा विचार केला, तर काही नावे समोर येतात. ती म्हणजे, भारताची राजधानी नवी देहली, चंडीगड , मुंबई, जयपूर, आगरा, मेरठ आदी शहरे असू शकतात. त्यातही पाककडे भारतापेक्षा अधिक अणूबॉम्ब आहेत. पाकने असे आक्रमण केले, तर भारताला प्रत्युत्तरादाखल पाकवर अणूबॉम्ब टाकावे लागतील आणि त्यात संपूर्ण पाक बेचिराख केल्याविना भारताला थांबता येणार नाही; कारण पाकची हाताच्या बोटावर मोजता येणारी प्रमुख शहरे आहेत. त्यात इस्लामाबाद, कराची, लाहोर, रावळपिंडी, हैद्राबाद, सियालकोट आणि पेशावर ही आहेत. यातच पाकचे सर्व व्यवहार चालतात.

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

भारत आणि पाक यांच्याकडील अणूबॉम्बची क्षमता !

सध्या पाकिस्तानकडे असणार्‍या सर्वोच्च क्षमतेच्या अणूबॉम्बची क्षमता ४५ किलोटन इतकी आहे. या अणुबॉम्बमध्ये २८० मीटरचा परिसर बेचिराख करण्याची क्षमता आहे. भूमीवर या बॉम्बच्या स्फोटामुळे १.१६ किलोमीटरच्या परिसरात किरणोत्साराचे दुष्परिणाम पहायला मिळू शकतात. या अणूबॉम्बचा स्फोट हवेत झाला, तर जवळपास २.५ किलोमीटरच्या कक्षेतील परिसरावर त्याचा परिणाम होईल आणि ३.०५ किलोमीटरच्या कक्षेतील लोकांना गंभीर दुखापत होऊ शकते.

भारताने स्वत:जवळ असणारा ६० किलोटन क्षमतेचा अणूबॉम्ब पाकमधील प्रमुख शहरांवर टाकल्यास संबंधित शहरातील ३१० मीटरचा परिसर बेचिराख होईल. तसेच १.१६ किलोमीटरच्या परिसरात या स्फोटामुळे किरणोत्साराचे दुष्परिणाम पहायला मिळू शकतात. हा स्फोट हवेत झाला, तर या शहरांमधील २.७५ किलोमीटरचा प्रदेश बेचिराख होईल आणि ३.४८ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना गंभीर स्वरूपाची दुखापत होईल. सध्या पाककडे १२०, तर भारताकडे ११० अणूबॉम्ब आहेत.

 

भारतातील खालील शहरांवर अणूबॉम्ब पडल्यास होणारे परिणाम !

१. चंडीगड : येथील १ पीएस्आयच्या (अणूबॉम्बची नेमकी तीव्रता ओळखण्यासाठी वापरण्यात येणारे परिमाण) परिसरातील १३ लाख १६ सहस्र ३२६ इतक्या लोकसंख्येचा विचार करता या ठिकाणी अणूबॉम्ब टाकण्यात आल्यास २ लाख २८ सहस्र २२० जण मृत्यूमुखी पडतील, तर ४ लाख ८९ सहस्र ३४० लोक घायाळ होतील.

२. नवी देहली : येथील १ पीएस्आयच्या परिसरातील ३८ लाख २८ सहस्र ८७७ इतक्या लोकसंख्येचा विचार करता येथे अणूबॉम्ब टाकण्यात आल्यास ३ लाख ६७ सहस्र ९०० जण मृत्यूमुखी पडतील, तर १२ लाख ८५ सहस्र १८० लोक घायाळ होतील.

३. मुंबई : येथील १ पीएस्आयच्या परिसरातील ५९ लाख ५९ सहस्र ९२५ इतक्या लोकसंख्येचा विचार करता येथे अणूबॉम्ब टाकण्यात आल्यास ५ लाख ८६ सहस्र १२० जण मृत्यूमुखी पडतील, तर २० लाख ३७ सहस्र ३२० लोक घायाळ होतील.

 

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अणूबॉम्ब टाकल्यास होणारा परिणाम

इस्लामाबादमधील १ पीएस्आयच्या परिसरातील ७ लाख ७४ सहस्र ३९८ इतक्या लोकसंख्येचा विचार करता येथे अणूबॉम्ब टाकण्यात आल्यास १ लाख ४२ सहस्र ४५० जण मृत्यूमुखी पडतील, तर २ लाख ६० सहस्र ५० लोक घायाळ होतील.

(संदर्भ : लोकसत्ता ६.८.२०१५)

 

अणूयुद्धाचा धोका पहाता करायची सिद्धता

अणूयुद्ध झालेच, तर त्या वेळी मोठ्या संख्येने जीवितहानी होऊन किरणोत्सर्ग होणार. त्यामुळे लगेच कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न वाचवणार्‍यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. अशा वेळी कशा प्रकारचे बचावकार्य करायचे, याचे आतापासूनच शिक्षण आणि तशी यंत्रणा सरकारने स्थापन करणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करून जनतेला त्याविषयी माहिती देऊन जागरूक करण्याचीही आवश्यकता आहे.

 

किरणोत्सर्गाचा परिणाम रोखण्यासाठी अग्निहोत्र हा प्रभावी उपाय !

अग्निहोत्र हा त्यासाठीचा एक पर्याय आहे. साध्या बॉम्बच्या तुलनेत अणूबॉम्ब सूक्ष्म आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक परिणामकारक असते. त्यामुळे अणूबॉम्बचा परिणाम रोखण्यासाठी सूक्ष्मस्तरावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी अग्निहोत्राचा उपाय सांगितला आहे. हा अत्यंत साधा आणि अल्प वेळेतला सूक्ष्मस्तरावरील अत्यंत प्रभावी उपाय आहे. अग्निहोत्रामुळे वातावरण चैतन्यमय बनते, तसेच सुरक्षाकवचही निर्माण होते. यामुळे अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाचा परिणाम रोखला जाऊ शकतो.

(अग्निहोत्र विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.) 

Leave a Comment