अनुक्रमणिका

आयुष्याचा कालावधी मर्यादित आहे; म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येक कृती वेळेवर करणे आवश्यक आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गेलेला वेळ पुन्हा कधीच परत येत नाही; म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून आजच आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा !
१. वेळेचे महत्त्व
मानवी जीवनात वेळेचे महत्त्व अनमोल आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’ पैशांची तूट प्रयत्नांनी भरून काढता येते; पण गमावलेला आजचा अमूल्य वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही. व्यक्तीला तिच्या लहानपणापासूनच प्रत्येक बाबतीत वेळ पाळावी लागते, नाहीतर तिची हानी होण्याची शक्यता असते. सृष्टीचक्राचीही वेळ ठरलेली असते. ‘व्यक्तीने वेळेचे पालन करणे’, हे तिचे जीवन यशस्वी होण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे.
वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. वेळेचे महत्त्व अनमोल असून ते अनेक प्रकारे समजावून सांगितले जाते. ‘आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणे’, हे आपल्याच हातात आहे. आपले जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि संतुलित करण्यासाठी ‘ते सत्कार्य, शुभकार्य आणि श्रेष्ठ कार्य यांत व्यतीत करणे’, ही काळाची आवश्यकता आहे.
जवळपास प्रत्येकालाच वेळेचे महत्त्व ठाऊक असले, तरीही वाईट परिस्थितीत काही लोक धैर्य हरवून स्वत:चा वेळ वाया घालवतात. वेळ ही प्रकृतीने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे. मोल देऊन वेळ इकडे तिकडे खर्च करणे योग्य नाही. जीवनभराची सर्व कमाई देऊनही आयुष्य एक दोन क्षणही खरेदी करता येत नाही. मानवाच्या जीवनातील एकेक क्षण पुष्कळ अमूल्य आहे; म्हणून वेळेचा दुरूपयोग करणे थांबवले पाहिजे.
२. वेळेचे मूल्यांकन
२ अ. निरंतर गतीशील
वेळ ही निरंतर गतीशील आणि सदैव परिवर्तनशील आहे. प्रत्येक क्षणी वेळ निघून जात आहे. आताचा क्षण आता आहे, नंतर नाही. ‘वेळ ही कुणासाठीच थांबत नाही’, हे कटू असले, तरीही हेच सत्य आहे. माणूस वेळेचा गुलाम आहे. आजवरचा इतिहास साक्षी आहे की, योग्य वेळी जर निर्णय घेतले गेले नाहीत, तर त्यांचे परिणाम भयंकर असू शकतात. प्रसंग आणि परिस्थिती यांनुसार वेळेचे मूल्य त्या त्या वेळी वाढत जाते.
२ आ. अनिश्चित
वेळ ही सर्वांत अनिश्चित गोष्ट आहे. ‘पुढच्या क्षणी कुणाच्या समवेत काय होईल ?’, हे कोणताही ज्योतिषी किंवा कोणताही शास्त्रज्ञ अचूक सांगू शकत नाही.
२ इ. सृष्टीचक्र वेळेनुसार चालणे
संपूर्ण जग वेळेचे गुलाम आहे. ते वेळेबरोबर चालते. सृष्टीचक्रही आपली वेळ सांभाळते. ठरलेल्या वेळी सूर्य-चंद्र यांचा उदय आणि अस्त होतो. निसर्गातील सर्व कार्ये वेळेनुसार होतात, जसे सूर्य उगवणे, दिवसानंतर रात्र होणे, ऋतू पालटणे इत्यादी. जर ही सर्व कार्ये वेळेवर झाली नाहीत, तर निसर्गाचे संतुलन बिघडून अनेक संकटे निर्माण होतील.
२ ई. बुद्धिमान व्यक्तीची ओळख ‘वेळ’
वेळेचे पालन करणे, म्हणजे शिस्तबद्ध जीवन जगणे. वेळ आणि वेळेचे चक्र स्थिर नसते. ‘वेळेचे मूल्य माहिती असणे’, ही बुद्धिमान व्यक्तीची ओळख आहे. ज्याला वेळेची किंमत असते, तो त्यानुसार कार्य करतो आणि त्याला यश मिळते, तसेच ज्याला वेळेची पारख नसते, त्याला आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला अनेक वेळा पश्चात्ताप करावा लागतो.
२ उ. ‘वेळेचे पालन करणे’, ही यशाची एक गुरुकिल्ली
वेळ जीवनातील एक परिमाण आहे, ज्याचा उपयोग आपण जीवन जगण्यासाठी करतो. वेळेचे महत्त्व विविध पैलूंमधून समजून घेता येते. संत कबीर यांनी वेळेचे महत्त्व समजावतांना पुढील ओळी म्हटल्या.
काल करे सो आज कर, आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी, बहुरि करेगा कब ।।
संत कबीरांच्या या ओळींचा अर्थ आहे की, ‘आज करता येण्यासारखी कामे आजच करावीत. ती उद्या करण्यासाठी ठेवू नयेत. जर पुढील क्षणी प्रलय आला, तर आपण काम कधी करणार ?’
२ ऊ. ‘वेळेचा सदुपयोग करणे’ हे यशस्वी जीवनाचे एक रहस्य
यशस्वी व्यक्ती आपल्या वेळेचा कधीही अपव्यय करत नाही. ते आपल्या कामांमध्ये सातत्य ठेवतात आणि ‘वेळेचा सदुपयोग’ करतात. हेच यशस्वी झालेल्या लोकांच्या यशाचे रहस्य असते. जगात सर्वच गोष्टींपेक्षा वेळेला अधिक शक्तीशाली मानले गेले आहे.
वेळेचे हे चक्र पुढे पुढेच सरकत असते. प्रत्येकाला वेळेसह चालावे लागते. जी व्यक्ती वेळेचा आदर करून योग्य नियोजन करते, ती व्यक्ती यशस्वी होते. अनेक यशस्वी व्यक्तींनी वेळेचे महत्त्व ओळखून त्याप्रमाणे नियोजन करून त्यांचे उद्दिष्ट गाठले आहे. असे इतिहासात अनेक दाखले सापडतात.’
३. वेळेचा सदुपयोग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे जून १९०६ मध्ये ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी इंग्लंडला गेले. या कालावधीत ते अभ्यास पूर्ण करून ‘बॅरिस्टर’ झाले. हा अभ्यास चालू असतांनाच ‘मॅझनीचे चरित्र’ आणि ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथ लिहून पूर्ण केले. याच वेळी पुण्यातील ‘काळ’ दैनिकाचे वार्ताहर म्हणून ते लंडनहून बातमीपत्रे पाठवत होते. त्यांनी याच काळात ‘इंडिया हाऊस’च्या माळ्यावर सेनापती बापट यांच्यासह बॉम्बविद्येचे यशस्वी प्रयोग केले आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेसाठी युवकांचे संघटन केले. या युवकांपैकी एक असलेले मदनलाल धिंग्रा यांनी पुढे कर्झन वायली याला ठार मारले. वयाच्या २३ ते २६ या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकाच वेळी वरील अनेक कार्ये पार पाडली. तुम्हीही निर्धार केलात आणि ध्येयनिष्ठ असाल, तर तुमच्याकडूनही वेळेचा सदुपयोग होईल अन् भव्यदिव्ये कार्येही पार पाडली जातील, याविषयी शंका बाळगू नका !
४. वेळ वाया जाण्यास कारणीभूत दोष आणि त्यावरील उपाय
४ अ. वेळेचे गांभीर्य नसणे
निसर्गातील हवा, पाणी इत्यादी बर्याचशा गोष्टी विनामूल्य मिळतात. त्यामुळे त्यांचे महत्त्व वाटत नाही. वेळेचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःचा वेळ वाया गेल्याविषयी किंवा इतरांना वेळ वाया घालवल्याविषयी काहीही वाटत नाही. जो वेळेचा आदर आणि योग्य वापर करतो, त्याचा वेळ आणि लोकही नेहमी आदर करतात.
४ आ. निरर्थक कृती सुखदायी वाटणे
काही जण मनोरंजन किंवा सुखप्राप्तीसाठी मोकळ्या वेळेत ‘इंटरनेट’मध्ये रमून जातात किंवा ‘व्हिडिओ गेम’ खेळण्यात मग्न होतात. यात त्यांचा बराचसा वेळ वाया जातो. कित्येक लोक अनावश्यक गप्पा मारण्यात किंवा शेजार्यांशी भांडण करण्यात वेळ वाया घालवतात.
वेळेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी आपण मनाला पुढीलप्रमाणे स्वयंसूचना देऊ शकतो.
‘वेळेचे महत्त्व नसणे, या दोषामुळे जेव्हा मी …… (आपला वेळ वाया घालवणारी कृती लिहावी.) या कृतीमध्ये निरर्थक वेळ वाया घालवत असेन, तेव्हा मला त्याची तीव्रतेने जाणीव होईल आणि मी लगेचच ………. (नियोजित कृती लिहावी.) करीन.’
४ इ. आळस
वेळेचे पालन आणि तिचा सदुपयोग न होण्यामागे आळस हा दोषही कारणीभूत ठरतो. आळसामुळे वेळेचे पालन किंवा सदुपयोग करण्याविषयीचा उत्साह घटतो आणि व्यक्ती अकार्यक्षम रहाण्यास किंवा पलंगावर सतत लोळत रहाण्यात सुख मानते. बर्याचदा दैनंदिन कामे करण्यास आळस केल्यामुळे नंतर ती कामे महत्त्वाच्या कामात आणि वेळेत व्यत्यय आणतात किंवा अधिक वेळ घेतात. उदाहरणार्थ गाडीमध्ये पेट्रोल घालण्यास आळस केल्यामुळे नंतर कुटुंबियांना अचानक रुग्णालयात नेतांना गाडीतील पेट्रोल भरण्यासाठी महत्त्वाचा वेळ द्यावा लागतो. तसेच गाडीमध्ये वेळीच पेट्रोल न भरल्यामुळे मध्येच गाडी बंद पडते. अशा वेळी ती रस्त्याच्या शेजारी ठेवून पेट्रोलपंपावर रिक्शाने जाणे, पेट्रोल खरेदी करणे आणि नंतर पुन्हा गाडीजवळ येणे, यात वेळ आणि रिक्शाने भाडे यांचा अपव्यय होतो.
आळस या दोषाचे निर्मूलन करण्यासाठी आपण मनाला पुढीलप्रमाणे स्वयंसूचना देऊ शकतो.
‘आळसामुळे मी गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी पेट्रोलपंपावर टाळत असेल, तेव्हा मला त्याची तीव्रतेने जाणीव होईल आणि मी लगेचच गाडीमध्ये पेट्रोल घालण्यासाठी जाईन.’
वरील प्रकारच्या स्वयंसूचना दिवसांतून १५ वेळा देणे अपेक्षित आहे.
५. वेळेचा सुविनियोग व्हावा, यासाठी करावयाचे प्रयत्न
५ अ. प्रत्येक क्षणाचा योग्य वापर
वेळेचे नियोजन करणे, म्हणजे दिवसातील प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणे होय. यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. वेळेचा सदुपयोग होण्यासाठी आणि जीवन यशस्वी होण्यासाठी प्रत्येक क्षणाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
५ आ. मोकळ्या वेळेचा उपयोग करणे
दैनंदिन जीवनात आपल्याला काही प्रमाणात मोकळा वेळ उपलब्ध होतो. ‘या मोकळ्या वेळेचा विनियोग कसा करावा’, हे त्या व्यक्तीवर, तसेच काळाच्या प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असते. काळाची प्राप्त परिस्थिती सतत पालटू शकते; पण व्यक्तीवर अवलंबून असलेला मोकळा वेळ आपण उपयोगात आणू शकतो. जी व्यक्ती उत्साही, ध्येयनिष्ठ आणि सकारात्मक असते, ती मोकळ्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करून घेते. याउलट चिंताग्रस्त, आळशी आणि नकारात्मक विचार असलेली व्यक्ती मोकळ्या वेळेचा दुरुपयोगच करते. मोकळा वेळ ही संपत्ती आहे. त्यातील एकही क्षण वाया घालवता कामा नये; कारण ती वेळ गमावणे, म्हणजे आपले सामर्थ्य गमावणे होय.
५ इ. नियोजित कार्ये वेळेतच पार पाडणे
नेहमीची कामे वेळच्या वेळीच करायला हवीत. विलंबाने केली, तर ती महागात पडू शकतात. आजचे महत्त्वाचे काम उद्यावर ढकलले, तर ते अधिकच कठीण वाटू लागते. अशा काम पुढे ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे बर्याच वेळा ते काम कधीच वेळेवर पूर्ण होत नाही. अशा व्यक्तीपासून यशही दूर पळते.
५ ई. घड्याळाकडे लक्ष ठेवणे
घड्याळाकडे दृष्टी फिरवून आपल्या कार्याशी संबंधित वेळेच्या प्रगतीविषयी आढावा घेतला पाहिजे. घड्याळाला आपले साहाय्यक समजून आपण कार्य केले, तर वेळेचे नियोजन करणे सहज शक्य होते.
५ उ. वेळापत्रक बनवून त्यानुसार कृती करणे
पूर्वनियोजित ठिकाणी, पूर्वनियोजित वेळी, पूर्वनियोजित पद्धतीने आणि पूर्वनियोजित लोकांच्या सहकार्याने पूर्ण नियोजित कामे करणे, याच्या विवरणाला ‘वेळापत्रक’ म्हटले जाते. ठरलेले काम जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्व ‘ते कुठल्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने करायचे’, यालासुद्धा महत्त्व आहे. उदाहरणार्थ शासकीय कार्यालयात एखादे काम असल्यास ‘ते काम करण्यास किती वेळ लागेल’, याचे विवरण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ‘ते शासकीय कार्यालय घरापासून किती वेळ दूर आहे’, याचेही विवरण तेवढेच महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाने स्वतःच्या सुविधेप्रमाणे स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक करावे. त्यामध्ये प्रत्येक दिवशी वेळेनुसार काय कृती करणार ते नमूद करावे.
कौटुंबिक, कार्यालयीन या वेळेचा योग्य वापर करणे, निरोप लिहून घेणे, कृतींची व्याप्ती काढणे, कृती करतांना सूची बनवणे, प्राधान्य ठरवणे, इतरांचे साहाय्य घेणे, एकाच वेळी विविध कृती करणे, पर्यायांचा विचार करणे यांमुळे कृती परिणामकारक होतात. वैयक्तिक आवरतांना प्रार्थना, नामजप किंवा स्वयंसूचना सत्र करणे, दूरभाषवर बोलतांना केर काढणे किंवा अन्य कामे करणे, अशा कृतींमुळे वेळेचा सदुपयोग होतो.
५ ऊ. विश्रांती घेणे
वेळेचे नियोजन करतांना आपले शरीर आणि मन यांना विश्रांती मिळण्यासाठी वेळ द्यायला हवा. काम करतांना आपण मधून मधून थोडी विश्रांती घेतल्यास आपली ऊर्जा टिकून रहाते आणि आपली कार्यक्षमता वाढते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामाचा ताण न्यून होऊन मानसिक शांती मिळते.
६. वेळेचे नियोजन केल्याने होणारे लाभ
६ अ. व्यक्तीने ‘वेळेचे पालन करणे’, हे तिच्या उत्तम आरोग्याचे साधन !
व्यक्तीने ‘वेळेचे योग्य नियोजन करणे’, हे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले होण्यासाठीही महत्त्वाचे आहे. ‘वेळेवर खाणे, झोपणे आणि व्यायाम करणे’, यांमुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले रहाते, तिच्यावरील ताणतणाव न्यून होतो आणि तिची जीवनातील अडचणी सोडवण्याची क्षमता वाढते. वेळेची कदर असणार्या व्यक्ती शांत आणि समाधानी असतात. त्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठीही वेळ काढता येतो. त्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध आणि आनंदी बनते.
६ आ. निर्णयक्षमतेत वाढ होणे
वेळेचा सदुपयोग करून व्यक्ती अधिक चांगले निर्णय घेऊ शकते आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकते.
६ इ. तणावमुक्ती
व्यक्तीने वेळेचे नियोजन केल्यामुळे तिच्यावरील कामाचा ताण न्यून होतो. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा वेळ देतो, तेव्हा आपणसुद्धा तिचा वेळ घेतलेला असतो. अशा वेळी ‘दिलेली वेळ सांभाळणे’, हे आपले कर्तव्य असते.
७. वेळेचे महत्त्व न जाणल्याने होणारी हानी
७ अ. यश गमावणे
वेळेचा अपव्यय करणे, म्हणजे आयुष्यातील यशाच्या दारातून बाहेर पडणे होय. ज्याप्रमाणे वेळेचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे ‘वेळेचा अपव्यय करणे’ अत्यंत हानीकारक असते.
७ आ. वर्तमान हरवणे
‘वेळ पालटत असणे’, हा निसर्गाचा नियमच आहे. माणसाने कायम वर्तमानात जगले पाहिजे. भूतकाळात जे झाले, ते विसरून त्यातून धडा घेऊन पुढे गेले पाहिजे. ‘भविष्यकाळात काय होईल ?’, याचा विचार आपण करत बसलो, तर हातात असलेली वेळही निघून जाते. आपण वर्तमानात जगून परिस्थितीचा (वेळेचा) आनंद घेतला पाहिजे.
८. वेळेचा साठा करता येत नाही
वेळ हे एक अमूल्य संसाधन आहे, जे आपण पैसे, संपत्ती किंवा इतर कोणत्याही साधनांसारखे साठवू शकत नाही; म्हणूनच ‘वेळेचा योग्य वापर आणि नियोजन करणे’, हे प्रत्येकाचे आवश्यक कर्तव्य आहे.
मनुष्यजन्म वारंवार मिळत नाही, म्हणून मानवी जीवनातील काळ हा बहुमूल्य आहे. प्रत्येकाचे आयुष्य मर्यादित आणि अनिश्चित काळ आहे. या मर्यादित आणि अनिश्चित काळातच आपल्याला मनुष्यजन्माचे सार्थक करायचे आहे. या वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !
‘वेळ ही संपत्ती आहे. ती आमच्याकडून वाया जाऊ नये. आम्हा सर्वांकडून वेळेचा आदर आणि योग्य वापर होऊ दे’, अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. अशोक लिमकर (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !
स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !
व्यायाम आणि योगासने यांचे मानवी जीवनातील महत्त्व !
हिंदु धर्मशास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार होऊ नये; म्हणून सांगितलेली स्वच्छतेविषयीची सूत्रे !
ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !
मनःशांती आणि निरोगी जीवन देणारी योगविद्या !