मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने

जीवसमाधीच्या स्थानी (१) श्री. सत्यकाम कणगलेकर, (२) सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, क्वालालंपूर (मलेशिया) येथील साधक (३) श्री. टोनी च्यांग (४) श्री. विनायक शानभाग

‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६ ते १३.३.२०१९ या कालावधीत मलेशिया येथे जाऊन तेथील सिद्धांची समाधीस्थाने शोधून काढावीत.’ या आधी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मलेशिया देशात जाऊन आल्या आहेत. तेव्हा साधकांना भेटण्यासाठी त्या तेथे गेल्या होत्या. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत असलेले साधक यांनी सिद्धांच्या समाधीस्थानांचा शोध घेतला आणि आम्ही ३ स्थानांच्या ठिकाणी जाऊन आलो. त्याचा वृत्तांत येथे देत आहे.

 

१. मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने

मलेशियातील ‘बतू’ पर्वताच्या पायथ्याशी असलेली ‘मौनगुरु’ नावाच्या सिद्धांची समाधी

१ अ. बतू पर्वत (क्वालालंपूर, मलेशिया) येथील मौनगुरु सिद्ध

मलेशियाची राजधानी क्वालालंपूरपासून २० कि.मी. अंतरावर ‘बतू’ पर्वत आहे. हेे कार्तिकेयांचे स्थान आहे. या ठिकाणी पर्वताच्या आत पंधरा माळ्यांची एक इमारत होईल, एवढी मोठी गुहा आहे. गुहेत जायला २०० पेक्षा अधिक पायर्‍या आहेत. या पायर्‍या जेथून चालू होतात, त्या ठिकाणी उजवीकडे एक सिद्धांची समाधी आहे. त्या सिद्धांचे नाव होते ‘मौनगुरु सिद्ध.’ या सिद्धांविषयी आधी कुणाला काही ठाऊक नव्हते. काही वर्षांपूर्वी मलेशियातील एक भक्त तमिळनाडूमध्ये स्वतःचे नाडी ज्योतिष बघायला आले असता त्यांच्या नाडीवाचनात अगस्ति ऋषीनी सांगितले, ‘मलेशियातील ‘बतू’ पर्वताच्या पायथ्याशी ‘मौनगुरु’ नावाच्या सिद्धांची समाधी आहे. तू तेथे जाऊन त्यांचा शोध घे आणि तिकडे एका शिवलिंगाची स्थापना कर. त्या सिद्धांच्या जीवसमाधीला मान दे.’ त्याप्रमाणे त्या भक्ताने केले. ज्यांना सिद्धांविषयी ठाऊक आहे, असे लोकच येथे दर्शनासाठी येतात.

मलेशियातील तापा नावाच्या स्थानी समाधी घेतलेले महान सिद्धपुरुष स्वामी जगन्नाथ

१ आ. तापा (मलेशिया) येथील जगन्नाथ स्वामी सिद्ध

वर्ष १८८१ मध्ये भारतातील ‘पुरी’ येथून ‘जगन्नाथ’ नावाचे सिद्धपुरुष मलेशियातील तापा नावाच्या स्थानी आले. हे ठिकाण म्हणजे अरण्य आहे. वर्ष १९५९ मध्ये त्यांनी जीवसमाधी घेतली. ते नाथ संप्रदायातील खडतर तपस्वी होते. वर्ष १८१२ मध्ये जगन्नाथ स्वामींचा जन्म झाला आणि ते १४७ वर्षे जगले. मलेशियातील ७८ वर्षांच्या कालावधीत लोक त्यांना ‘वेडा संन्यासी’ म्हणायचे. मलेशियातील अनेक स्थानिक हिंदू त्यांचे भक्त होते. वर्ष १९४२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेने’ला त्यांनी सूक्ष्मातून साहाय्य केल्याचे म्हटले जाते. जगन्नाथ स्वामींनी भाकीत केले होते, ‘पुढे त्यांची गुरुपरंपरा चालवणारे दोघे जण येतील. त्यांतील एक भारतातून आणि दुसरे अमेरिकेतून येतील.’ वर्ष १९२० मध्ये भारतातील तमिळनाडू राज्यातून आलेले चित्रमुत्तू अडिगळार हे त्यांचे परम शिष्य झाले आणि स्वामी चित्रमुत्तू यांनी भारतात गुरु जगन्नाथ स्वामी सिद्धांनी सांगितलेल्या सिद्धांतांचा प्रसार केला. त्यानंतर अमेरिकेतील हवाई द्विपावरील ‘शिवाय सुब्रह्मण्या’ नावाचे एक योगी त्यांचे शिष्य झाले. त्यांनी हवाई द्विपावरील ‘कुवाय’ या ठिकाणी मोठा आश्रम अन् मंदिर बांधले आहे. स्वामी शिवाय सुब्रह्मण्य आता शैव सिद्धांताचा प्रसार करत आहेत आणि ‘हिंदूइजम् टूडे’ नावाचे एक जागतिक नियतकालिक चालवत आहेत. सध्या जगन्नाथ स्वामींच्या जीवसमाधीच्या ठिकाणी पुनर्उभारणी आणि विस्तार काम चालू आहे. ‘मलेशिया हिंदू संगम’ या संघटनेने मलेशियातील हिंदूंच्या साहाय्याने हे कार्य हाती घेतले आहे.

चेंग गावातील एका महान सिद्धांची जीवसमाधी

१ इ. सन्नासीमलै (मलक्का, मलेशिया) येथील महान संन्यासी सिद्ध

मलेशियाचे आधीचे नाव मलक्का होते. त्या काळी तेथील सुलतान ‘राजा परमेश्‍वरा’ नवीन राजधानी शोधत मलक्का गावाजवळ आला आणि ‘आमलका’ (संस्कृत : आमलका, मराठी : आवळा) वृक्षाच्या खाली बसलेला असतांना त्याच्या समोर एक विचित्र घटना घडली. हरणासारखा एक लहानगा प्राणी त्याच्या शिकारी कुत्र्यांशी झुंज देत होता. हे बघून राजाला वाटले, ‘या ठिकाणी आपण नवीन राजधानी निर्माण करूया.’ हा निर्णय ‘आमलका’ वृक्षाच्या खाली घेतल्याने त्याने नवीन राजधानीला ‘मलक्का’ असे नाव दिले. पुढे त्याची राजवट ‘मलक्का सुलतानशाही’ अशा नावाने प्रसिद्ध झाली. ‘हुंग तुआ’ हा मलक्का सुलतानशाहीतील १५ व्या शतकात असलेल्या सुलतान मनसूर शाहचा सेनापती होता. त्या काळी मलक्कामध्ये राजाला ‘परमेश्‍वरा’ असे म्हणायचे आणि सेनापतीला ‘लक्ष्मणा’ असे संबोधायचे. या ‘हुंग तुआ’चे गुरु एक महान सिद्ध होते. त्यांना स्थानिक लोक ‘आदिपुत्रा’ असे संबोधायचे. ‘ते महान सिद्ध भारतातील आंध्रप्रदेशातून आले होते’, असे म्हटले जाते. या सिद्धांनी आपला शिष्य असलेल्या सेनापती ‘हुंग तुआ’ला अनेक युद्धकला आणि मंत्रविद्या शिकवल्या होत्या. ‘हुंग तुआ’ त्याचे शौर्य आणि प्रामाणिकपणा यांसाठी प्रसिद्ध झाला आणि आज त्याला मलेशिया देशाचा ‘राष्ट्रीय वीर’ मानले जाते. अशा वीरपुरुषाला तयार करण्यात त्याचे गुरु ‘एक महान संन्यासी’ यांचा मोठा हात होता. मलक्का शहरापासून ९ कि.मी. दूर असलेल्या चेंग नावाच्या गावात त्यांची जीवसमाधी आहे. आता तेथे शिव, पार्वती, कार्तिकेय आणि गणेश यांचे मंदिर आहे.

 

२. अनुभूती

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पोचल्यावर अकस्मात गडगडाट होऊन पाऊस पडू लागणे आणि पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांनी ‘आताचा पाऊस हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासाठी केवळ वरुणाशीर्वाद नसून तो आदरार्थीही आहे’, असे सांगणे : महर्षींच्या आज्ञेनुसार ७.३.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पोचल्या. त्या आधी तेथेे उन्हाळा होता. दुपारी ३.३० वाजता अकस्मात वातावरण पालटले आणि विजा चमकू लागल्या. गडगडाट होऊन चांगला पाऊस पडू लागला. याविषयी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘याआधी जेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे जायच्या, तेव्हा वरुणाच्या रूपाने त्यांना आशीर्वाद मिळायचा. आताचा पाऊस हा केवळ वरुणाशीर्वाद नसून तो आदरार्थीही आहे.’’

– श्री. विनायक शानभाग, मलेशिया (७.३.२०१९)

Leave a Comment