रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री सत्यनारायण पूजा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांसाठी केला संकल्प !

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात चैत्र पौर्णिमेला, म्हणजे हनुमान जयंतीला (१९ एप्रिल या दिवशी) श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संकल्प करून ही पूजा केली. सनातन पुरोहित पाठशाळेचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. या मंगलप्रसंगी सनातनच्या संतांसह आश्रमातील साधक उपस्थित होते.

 

श्री सत्यनारायण पूजेच्या वेळी ईश्‍वराच्या अस्तित्वाची आलेली प्रचीती

श्री सत्यनारायणाची पूजा करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पौरोहित्य करतांना श्री. दामोदर वझेगुरुजी

१. पूजनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान श्री सत्यनारायणाच्या प्रतिमेला (चित्राला) पुष्पहार अर्पण करून त्याच्या मध्यभागी झेंडूचे फूल वाहिले होते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या पूजेचा संकल्प करत असतांना हे फूल आपोआप खाली पडले. यातून ‘संकल्पपूर्ती होईल’, याची प्रचीती भगवान सत्यनारायणाने दिल्याचे सर्वांना जाणवले.

२. भगवान सत्यनारायणाच्या षोडशोपचार पूजेच्या अंतर्गत सद्गुरु (सौ.) बिंदाताई या मूर्तीला दह्याने स्नान घालत होत्या. तेव्हा मूर्तीच्या चरणांच्या ठिकाणी साठलेल्या दह्याला भगवान विष्णूच्या हातात असलेल्या ‘गदे’सारखा आकार आला होता. यातून ‘भगवान श्रीविष्णूची मारक शक्ती साधकांवरील संकटांचे हरण करत आहे’, याची प्रचीती साधकांना आली.

३. भगवान विष्णूला, म्हणजे श्री सत्यनारायणाला तुळशीपत्र प्रिय आहे. यामुळे षोडशोपचार पूजेत त्याला १०८ वेळा तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी तुळशीपत्र अर्पण करण्यापूर्वीच त्यांनी घातलेल्या वेणीतील पुष्प खाली पडले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘श्री सत्यनारायणाच्या पूजेला लक्ष्मी, गणेश, नवग्रह आणि अष्टदिक्पाल उपस्थित असतात’, असे शास्त्र सांगते. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) बिंदाताई या श्री महालक्ष्मीस्वरूपच असल्याने देवीने त्यांच्या माध्यमातून आशीर्वाद दिल्याचे उपस्थित साधकांना जाणवले.

४. श्री सत्यनारायण व्रतकथा (पाच अध्याय) सांगितल्यानंतर त्याचे सार सांगतांना श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी ‘सर्व साधकांनी शरणागत भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे सांगितले. त्याच वेळी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळेचा शंखनाद झाला. यातून श्री सत्यनारायणानेच साधकांना हा संदेश दिल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांना जाणवले.

श्री. निषाद देशमुख हे पूजेच्या वेळी साधकांना दैवी प्रचीती मिळत असल्याचे सांगत असतांना श्री सत्यनारायणदेवतेच्या पूजेसाठी केलेल्या फुलांच्या रचनेतून एक झेंडूचे फूल खाली पडले. यातून देवाने शरणागत भावामध्ये वृद्धी होण्यासाठी सर्व साधकांना आशीर्वाद दिल्याचे उपस्थितांना जाणवले.

५. पूजनाच्या शेवटी सद्गुरु (सौ.) बिंदाताई श्री सत्यनारायणदेवाला नैवेद्य अर्पण करत असतांना पूजेसाठी केलेल्या रचनेतून एक पुष्प नैवेद्याच्या ताटात पडले. यातून भगवान श्री सत्यनारायणाने साधकांनी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचा स्वीकार केल्याची प्रचीती दिल्याचे उपस्थित सर्वांना जाणवले.

६. पूजनाच्या शेवटी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी ज्या आसनावर उभे राहून आरती केली, त्या आसनावर त्यांच्या पायांतून आलेल्या द्रवाने दैवी आकृती उमटल्या.

क्षणचित्र

केवळ कथा न सांगता त्यानुसार आचरण करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी !

‘सत्यनारायण व्रतकथा ५ अध्यायांची आहे. या कथेत निष्ठेने देवभक्ती करण्याचे आणि भक्ती करत असतांना त्यात मानवी स्वभावामुळे काही उणिवा राहिल्या असल्यास, त्यासाठी भगवंताला अंत:करणापासून क्षमायाचना करण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार कथा सांगतांना झालेल्या ज्ञात-अज्ञात चुकांसाठी पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी भगवान श्री सत्यनारायणाची क्षमा मागितली. शिकलेले लगेच कृतीत आणणे, हे साधकत्वाचे लक्षण आहे. या कृतीतून श्री. वझेगुरुजी यांनी सर्व साधकांसमोर आदर्श निर्माण केला. कथा श्रवण करतांना झालेल्या ज्ञात-अज्ञात चुकांविषयी उपस्थित साधकांनी भगवान श्री सत्यनारायणाची सामूहिक क्षमायाचना केली.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment