‘श्री राजमातंगी यज्ञा’चा यज्ञातील अन्य घटकांच्या तुलनेत श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

श्री राजमातंगी यज्ञात आहुती देतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पुरोहित श्री. ईशान जोशी, श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. अमर जोशी आणि पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर व्हावे, त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत; तसेच ‘धर्मप्रसार, हिंदु राष्ट्राची स्थापना अन् महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी भूमी संपादन करणे’, या कार्यांतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यांसाठी ११.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्री राजमातंगी यज्ञ करण्यात आला. ‘श्री राजमातंगी यज्ञाचा यज्ञातील घटकांवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पुढील ८ घटकांच्या यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

अ. श्री राजमातंगीदेवीचे चित्र

आ. यज्ञाची विभूती

इ. तीव्र आध्यात्मिक त्रास  (टीप १) असलेला साधक

ई. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक

उ. पुरोहित – श्री. वझेगुरुजी

ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र

ए. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी

ऐ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

टीप १ – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. (या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.)

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. यज्ञानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या. त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे २.६९ मीटर आणि १.२९ मीटर होत्या. यज्ञानंतर साधकातील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांमध्ये अनुक्रमे ०.८१ मीटर आणि ०.५७ मीटर घट झाली.

२ अ २. चाचणीतील अन्य सातही घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. यज्ञानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती. यज्ञानंतर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिची प्रभावळ ०.७९ मीटर होती.

२ आ २. यज्ञानंतर चाचणीतील अन्य सातही घटकांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

टीप – यज्ञाची विभूती यज्ञानंतर मिळत असल्याने विभूतीची यज्ञापूर्वीची मोजणीची नोंद नाही. यज्ञानंतर प्राप्त झालेल्या यज्ञातील विभूतीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १२.४३ मीटर होती.

वरील सारणीतून पुढील २ घटकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात येते.

१. श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि २. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची पोपटी रंगाची साडी

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. यज्ञानंतर चाचणीतील सर्व घटकांची एकूण प्रभावळ वाढणे

टीप – यज्ञाची विभूती यज्ञानंतर मिळत असल्याने तिची यज्ञापूर्वीची मोजणीची नोंद नाही. यज्ञानंतर प्राप्त यज्ञातील विभूतीची एकूण प्रभावळ १४.२४ मीटर होती.

वरील सारणीतून पुढील ३ घटकांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात येते.

१. श्री राजमातंगीदेवीचे चित्र, २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि ३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची पोपटी रंगाची साडी

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्री राजमातंगीदेवी ही श्रीविष्णूच्या रामावताराची मारक शक्ती असल्यामुळे
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यासाठी तिला यज्ञाद्वारे आवाहन करण्यात येणे

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥’ धर्मकार्यासाठी श्रीविष्णु प्रत्येक युगात अवतार घेतो. तेव्हा त्याच्यासह त्याची शक्तीही असते. श्री राजमातंगीदेवी ही श्रीविष्णूच्या रामावताराची मारक शक्ती आहे. मारक रूपातील शक्ती श्री राजमातंगीदेवी असुरांचे वशीकरण करून त्यांचे निर्दालन करते. ईश्‍वरेच्छेने २०२३ मध्ये स्थापन होणारे ‘हिंदु राष्ट्र’ हे रामराज्याप्रमाणे असेल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी पूरक अशी शक्ती मिळवण्यासाठी हा यज्ञ करण्यात आला.

३ आ. यज्ञाच्या माध्यमातून चैतन्याची निर्मिती आणि प्रक्षेपण होणे आणि उपस्थितांच्या
गुणवैशिष्ट्यांनुसार अन् आवश्यकतेनुसार त्यांना यज्ञातून प्रक्षेपित झालेले चैतन्य ग्रहण करता येणे

या यज्ञाचा उद्देश ‘वैयक्तिक लाभ मिळवणे’ हा नसून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर करणे’ हा व्यापक होता. यज्ञाचे यजमान, संकल्पकर्ते आणि यज्ञात आहुती देणारे हे सर्व संत होते. यज्ञस्थळी उपस्थित सर्व जण आपले संपूर्ण जीवन ‘ईश्‍वरप्राप्ती’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या व्यापक ध्येयांसाठी समर्पित केलेले साधक होते. या सर्वांच्या समष्टी भावामुळे यज्ञ पुष्कळ परिणामकारक झाला. त्यामुळे यज्ञातून चैतन्याची निर्मिती झाली आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण झाले. यज्ञाला उपस्थित व्यक्तींची आध्यात्मिक पातळी, त्यांचा भाव, त्यांचा समष्टी कार्यातील सहभाग यांनुसार त्यांनी यज्ञातून प्रक्षेपित झालेले चैतन्य ग्रहण केले.

३ इ. चाचणीतील विविध घटकांवर यज्ञातील चैतन्याचा
झालेला सकारात्मक परिणाम आणि त्यामागील कारणमीमांसा

३ इ १. यज्ञातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली, त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि त्याची एकूण प्रभावळही वाढली.

३ इ २. यज्ञातून प्रक्षेपित झालेेले चैतन्य चाचणीतील अन्य सर्व घटकांनी ग्रहण केल्याने त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.

३ इ ३. यज्ञातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पुष्कळ चैतन्य आकृष्ट झाल्याने त्यांच्या छायाचित्राच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाली.

३ इ ४. श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु बिंदाताई यांनी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांच्यामध्ये श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व आकृष्ट होणे

अन्य घटकांच्या तुलनेत यज्ञातील चैतन्याचा परिणाम श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु बिंदाताई यांनी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांच्यावर पुष्कळ प्रमाणात झाल्याचे चाचणीतून दिसून आले. याचे कारण पुढे दिले आहे.

३ इ ४ अ. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. जेथे देवीचे चित्र (रूप) आहे, तेथे तिच्याशी संबंधित शक्ती (स्पंदने) असते. यज्ञातील श्री राजमातंगीदेवीच्या चित्राकडे श्री राजमातंगीदेवीची शक्ती आकृष्ट झाली. त्यामुळे देवीच्या चित्राच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ इ ४ आ. लाल जास्वंदीचे पुष्प, रक्तचंदन इत्यादीमध्ये श्री गणेशतत्त्व आकृष्ट होते. तसे श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व पोपटी रंगाकडे आकृष्ट होते. सद्गुरु बिंदाताई यांनी परिधान केलेल्या साडीचा रंग पोपटी होता. पोपटी रंगाच्या साडीमध्ये श्री राजमातंगीदेवीची शक्ती (स्पंदने) आकृष्ट झाल्याने त्या साडीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि तिच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

 

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘सद्गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात
चैतन्य असणे आणि त्यांनी यज्ञातील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील चैतन्यात वाढ होणे

सर्वसामान्य व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही. प्रतिदिन साधना करत असलेल्या साधकामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते, तर संतांमध्ये ती पुष्कळ अधिक प्रमाणात असते. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सद्गुरु पदावरील संत असल्याने त्यांच्यात पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीमुळे त्यांच्यामध्ये आरंभीच पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तसेच त्यांची एकूण प्रभावळही पुष्कळ अधिक होती. यज्ञातून प्रक्षेपित झालेले चैतन्य त्यांनी ग्रहण केल्याने यज्ञानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

थोडक्यात ‘श्री राजमातंगी यज्ञा’चा यज्ञातील सर्वच घटकांवर सकारात्मक परिणाम झाला. त्या घटकांपैकी श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांवर सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (९.२.२०१९)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment