ओतूर (पुणे) येथील श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या यात्रेतील वैशिष्ट्य

‘श्रावण मासात येणारी विविध व्रते आणि सण यांमुळे ठिकठिकाणी जत्रांचे आयोजन केले जाते. ओतूर या पुणे जिल्ह्यातील गावात होणार्‍या श्रावणी सोमवारच्या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे श्री पंचलिंग क्षेत्र आहे. त्यात ‘ओतूर’ हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीकाठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव ‘उत्तमापूर’ असे होते. येथे श्री कपर्दिकेश्‍वराचे (शिवाचे) प्राचीन मंदिर आणि श्री चैतन्य स्वामी (श्री बाबाजी चैतन्य महाराज) समाधी मंदिर आहे. गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज  म्हणजे संत तुकाराम महाराजांना स्वप्नदृष्टांद्वारे ‘राम कृष्ण हरि’ मंत्र देणारे त्यांचे गुरु होय ! श्री बाबाजी चैतन्य महाराज हे वर्ष १५७१ मध्ये या श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराच्या सान्निध्यात समाधिस्त झाले. दोन्ही मंदिरे गावाबाहेर असून निसर्गरम्य आहेत.

ओतूर येथे श्री कपर्दिकेश्‍वराची यात्रा प्रतिवर्षी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या मांडवी नदीत ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभार्‍यात त्या तांदळापासून पाच घड्यां(घडा)ची पिंड बनवतात. दहींहंडीच्या वेळेला जसे गोपाळांचे एकावर एक असे मनोरे केले जातात, तशा एकावर एक अशा ५ पिंडी उभ्या केल्या जातात. घडे एकावर एक ठेवतांना त्यांच्यामधे एक लिंबू ठेवला जाता. म्हणजे दुसरा घडा ठेवतांना पहिल्या घड्यावर लिंबू ठेवून यावर दुसरा घडा ठेवला जातो. त्यानंतर पुढचे घडे ठेवतांना असेच लिंबू ठेवले जातात. असे घडे एकावर एक ठेवणार्‍या मंदिराच्या पुजार्‍याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्भुत समजली जाते. प्रत्येक सोमवारी पिंडींची संख्या वाढत जाते. या पिंडी पहाण्यासाठी विविध ठिकाणांहून लाखो लोक येतात. सोमवारी यात्रेच्या दिवशी इनामी कुस्त्यांचे जंगी आखाडे येथे भरतात. यासाठी राज्यभरातून मल्ल ओतूरला येतात.

– संकलक कु. पूजा नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment