सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! – श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री पंच दिगंबर अनी आखाडा

हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानांतर्गत संत-महंतांची भेट !

श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष १. श्री महंत कृष्णदासजी महाराज यांची भेट घेतांना २. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, ३. पू. नीलेश सिंगबाळ आणि ४. श्री. चेतन राजहंस

प्रयागराज (कुंभनगरी), ८ जानेवारी (वार्ता.) – ‘सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे’, असे गौरवोद्गार श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत कृष्णदासजी महाराज यांनी काढले. श्री पंच दिगंबर अनी आखाड्यात ५ जानेवारी या दिवशी ध्वजारोहणासाठी सनातन संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर अन् पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि अनेक साधक उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वतीने श्री महंत कृष्णदासजी महाराज यांची भेट घेतली.

या वेळी त्यांना सनातन संस्थेच्या वतीने हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’, तसेच संस्थेचे माहितीपत्रक भेट देण्यात आले. श्री. चेतन राजहंस यांनी श्री महंत कृष्णदासजी महाराज यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तसेच कुंभमेळ्यातील प्रदर्शनास भेट देण्याची आणि सनातनच्या आश्रमात येण्याची विनंती केली. त्यावर महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही मला बोलावल्यास मी यायला सिद्ध आहे.’’

वैष्णवांमध्ये दिगंबर, निर्वाणी आणि निर्मोही असे ३ प्रमुख आखाडे आहेत. त्यांत दिगंबर आखाडा हा प्रमुख आणि सर्वांत मोठा आखाडा म्हणून सुप्रसिद्ध आहे. या आखाड्याच्या अंतर्गत देशभरात ४०० हून अधिक खालसे आहेत. वर्ष २०१५ मध्ये नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी सनातन संस्थेचे प्रदर्शन पहाण्यासाठी श्री महंत कृष्णदासजी महाराज त्यांच्या आखाड्यातील साधू-संत यांना घेऊन आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात