भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी विविध स्तरांवर आतापासूनच सिद्धता करा !

‘वर्ष २००० पासूनच ‘कालमहिम्यानुसार लवकरच आपत्काळ येणार’, याची साधकांना जाणीव आहे; परंतु आता आपत्काळ अगदी दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच (महिनेच) राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर हळूहळू तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. प्रथम ते महायुद्ध मानसिक स्तरावर असेल; कारण कोणत्याही दोन राष्ट्रांमधील महायुद्ध हे आधी मानसिक स्तरावर असते, उदा. कोरिया-अमेरिका संघर्ष, चीन-अमेरिका संघर्ष. पुढे २ – ३ वर्षांनी महायुद्ध भौतिक स्तरावर असेल. तेव्हा ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार समाजातील सज्जन, साधक आदींनाही आपत्काळाची झळ बसणार आहे.

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डीझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक-व्यवस्थाही कोलमडून पडते. त्यामुळे स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत वा मिळाल्या तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी उपलब्ध होणे जवळजवळ अशक्यच असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

 

१. आपत्काळ म्हणजे काय ?

आपत् + काळ = आपत्काळ. संस्कृतमध्ये आपत् म्हणजे संकट. आपत्काळ म्हणजे संकटकाळ.

 

२. आपत्काळाच्या दृष्टीने शारीरिक स्तरावर करायची सिद्धता

२ अ. अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी हे करावे !

२ अ १. पुढील काही मास किंवा वर्षे पुरेल एवढे अन्नधान्य साठवून ठेवावे ! : यामध्ये डाळी, कडधान्ये, जोंधळा, गहू, तांदूळ, बटाटे, गूळ, हळद, तिखट, लोणचे, मुरांबे, तूप आदी वस्तूंचा समावेश असावा.

२ अ १ अ. काही सूचना

२ अ १ अ १. अन्नधान्य, तसेच अन्य साठवणुकीच्या वस्तू खरेदी करतांना कुटुंबाची आवश्यकता, आपण रहात असलेल्या ठिकाणाच्या हवामानानुसार त्यांचा टिकण्याचा कालावधी आदी सूत्रे विचारात घ्यावीत !

२ अ १ अ २. ठराविक कालावधीनंतर (उदा. प्रत्येक २ – ४ मासांनी) साठवलेले अन्नधान्य, तसेच अन्य वस्तू यांची स्थिती पडताळावी !

२ अ २. स्वयंपाकाचा गॅस, स्टोव्हसाठी लागणारे रॉकेल आदींची होऊ शकणारी टंचाई वा अनुपलब्धता लक्षात घेऊन पुढीलपैकी आवश्यक ते करावे !

२ अ २ अ. घरात चुलीची व्यवस्था करावी, तसेच चुलीवर स्वयंपाक करणे शिकून घ्यावे !

२ अ २ आ. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे (उदा. सोलर कुकर) घ्यावीत !

२ अ २ इ. गाय, बैल आदी प्राणी पाळणार्‍यांनी गोबर-गॅस संयंत्र बांधावे !

२ अ २ ई. पुरेशा प्रमाणात ओला कचरा (भाजीपाल्याची देठे, खरकटे, कुजणारे अन्य पदार्थ आदी) उपलब्ध असणार्‍यांनी बायो-गॅस संयंत्र बांधावे !

२ अ ३. स्वयंपाक करतांना यंत्रांचा (उदा. मिक्सरचा) वापर करणे टाळून पारंपरिक वस्तूंचा, उदा. पाटा-वरवंटा यांचा वापर करण्याची सवय आतापासूनच लावावी ! : अन्य जुन्या वस्तूही, उदा. दळण्यासाठी जाते, कांडण्यासाठी उखळ आणि मुसळ उपलब्ध झाल्यास त्या वस्तू वापरण्याचीही सवय करावी. यामुळे पुढे दैनंदिन जीवन कठीण वाटणार नाही.

२ अ ४. अन्नधान्याची लागवड, कंदमुळांची लागवड, गोपालन आदी करण्यास आतापासूनच आरंभ करावा !

२ आ. पाण्यावाचून हाल न होण्यासाठी हे करावे !

२ आ १. घराजवळ विहीर नसल्यास ती खणून घ्यावी ! : आपत्काळात शासकीय पाणी-पुरवठा न झाल्यास घराच्या आवारातील विहिरीचे पाणी उपयोगी पडेल. शेजारीपाजारी एकत्रित मिळून एक विहीर खणून घेऊ शकतात.

२ आ २. पाणी साठवण्यासाठी मोठ्या टाक्यांची सोय करावी !

२ आ ३. विजेअभावी घरातील जलशुद्धीकरण-यंत्र (वॉटर प्युरिफायर) बंद पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कँडल फिल्टर घेऊन ठेवावा !

२ इ. डॉक्टर, वैद्य, रुग्णालये आदींची होणारी
अनुपलब्धता लक्षात घेऊन आरोग्य चांगले रहाण्यासाठी हे करावे !

२ इ १. लहानसहान विकारांच्या उपचारांसाठी औषधांवर अवलंबून न रहाता उपवास करणे, अंगावर ऊन घेणे आदी विना-औषध उपचारांचा वापर आतापासूनच आरंभ करावा !

२ इ २. बिंदूदाबन, नामजप-उपाय, प्राणशक्तीवहन उपाय आणि रिकाम्या खोक्यांचे उपाय या विना-औषध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात ! : या उपायपद्धतींविषयीचे ग्रंथ सनातनने प्रकाशित केले आहेत.

२ इ ३. परिसरातील ओळखीच्या वैद्यांना / डॉक्टरना विचारून कुटुंबाला लागू शकणार्‍या आयुर्वेदीय, तसेच अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथी औषधांचा काही मास पुरेल इतका साठा करून ठेवावा !

२ इ ४. आपल्या सभोवतालच्या परिसरात आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची जाणकारांकडून माहिती करून घ्यावी आणि त्यांचा वापर करून पहावा !

२ इ ५. औषधी वनस्पतींची लागवड करावी ! : औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयीची माहिती आणि विविध रोगांवरील त्यांचे उपयोग सनातनचे ग्रंथ जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड आणि औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? यांत दिली आहे.

२ इ ६. विकार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत ! : नियमित व्यायाम करणे, भूक लागल्यावरच खाणे, अनावश्यक न खाणे आदी प्रयत्न करावेत. यांमुळे आताचे विकार लवकर बरे होऊन रोगप्रतिकारक्षमता वाढू शकेल. तसेच या सवयी आपत्काळातही लाभदायक ठरतील.

२ ई. मार लागणे, भाजणे, बेशुद्ध पडणे आदी प्रसंगी रुग्णावर
तात्पुरते उपचार करता यावेत, यासाठी कुटुंबातील एकाने तरी प्रथमोपचार प्रशिक्षण घ्यावे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी विनामूल्य प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. या प्रशिक्षणवर्गांचा लाभ घ्यावा. सनातनची ग्रंथमालिका प्रथमोपचार प्रशिक्षण (३ खंड) हीसुद्धा उपलब्ध आहे.

२ ई १. कौटुंबिक वापरासाठी प्रथमोपचार पेटी सिद्ध ठेवावी ! : वेदनाशामक गोळ्या, मलम, गॉज (जखमेवर लावायची जाळीदार पट्टी), जखमेवर लावायची पांढरी चिकटपट्टी इत्यादी; तसेच ताप, उलट्या इत्यादी आजारांवरील औषधे प्रथमोपचार पेटीत ठेवावीत. ती पेटी घरात सहज सापडेल, अशा ठिकाणी ठेवावी. प्रथमोपचार पेटीत शक्यतो गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) ठेवू नये; कारण तिच्यातून गोळ्या काढतांना औषध संपल्याच्या तारखेचा (एक्स्पायरी डेटचा) भाग फाटू शकतो. असे झाल्यास काही महिन्यांनी आपल्याला त्या गोळीची वैधता कधीपर्यंत आहे, हे कळू शकत नाही. त्यामुळे पाकिटातून गोळ्या काढून त्या एका हवाबंद डबीत ठेवाव्यात आणि त्या डबीवर गोळीचे नाव, कोणत्या विकारावर उपयोगी, उत्पादनाचा दिनांक (मॅन्युफॅक्चरिंग डेट), कालावधी संपण्याचा दिनांक (एक्स्पायरी डेट), अशा आवश्यक गोष्टींची चिठ्ठी (लेबल) चिकटवावी. (प्रथमोपचार पेटीविषयीचे सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार यात केले आहे.)

२ उ. बॉम्बस्फोटामुळे वा अन्य कारणाने आग लागणे, आगीने वेढले जाणे
आदी परिस्थितीत उपाययोजना काढता येण्यासाठी कुटुंबातील एकाने तरी अग्नीशमन प्रशिक्षण घ्यावे !

सनातनने अग्नीशमन प्रशिक्षण हा ग्रंथही प्रकाशित केला आहे.

२ ऊ. दंगलखोर, चोर, गुंड आदींपासून स्वतःसह
कुटुंबियांचे रक्षण करता यावे, यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

सनातनने स्वसंरक्षण प्रशिक्षण या नावाचा ग्रंथही प्रकाशित केला आहे.

२ ए. अन्य सूत्रे

२ ए १. डासांपासून रक्षण होण्यासाठी आवश्यकतेनुसार मच्छरदाण्या खरेदी कराव्यात !

२ ए २. आधुनिक वैद्यकीय यंत्रे वा उपकरणे यांद्वारे करायचे आवश्यक ते उपचार, उदा. डोळ्यांची शस्त्रक्रिया, दंतोपचार आताच करून घ्यावेत !

२ ए ३. एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !

२ ए ४. अन्न, पाणी, वीज, स्वयंपाकाचा गॅस, तसेच इतर वस्तू (उदा. गोडे तेल) काटकसरीने वापरायची सवय आतापासूनच लावावी !

२ ए ५. भावी आपत्काळात उपयुक्त होतील, अशा विविध शारीरिक कृती आतापासूनच करण्याचा सराव करावा ! : यात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (लिफ्टचा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात.

२ ए ६. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम रहाण्यासाठी प्रतिदिन व्यायाम (उदा. सूर्यनमस्कार घालणे, न्यूनतम १ – २ कि.मी. चालणे), प्राणायाम, योगासने आदी करावीत !

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने मानसिक स्तरावर करायची सिद्धता

३ अ. काही समस्यांच्या संदर्भात मनाला स्वयंसूचना द्याव्यात !

स्वयंसूचनांविषयीचे सविस्तर विवरण सनातनचा ग्रंथ स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन यात केले आहे.

३ अ १. दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणार्‍या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !

३ अ २. नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !

३ अ ३. आपत्काळातील एखाद्या प्रसंगात काहीच करणे आपल्या हातात नसेल, तर त्या कठीण प्रसंगाकडे तत्त्वज्ञाच्या भूमिकेत राहून किंवा साक्षीभावाने पहाता यावे आणि परिस्थिती आनंदाने स्विकारता यावी, यासाठी स्वयंसूचना द्यावी !

३ आ. अल्प-अधिक कालावधीसाठी कुटुंबियांचा वियोग सहन करण्याची सिद्धता ठेवावी !

 

४. आपत्काळाच्या दृष्टीने कौटुंबिक स्तरावर करायची सिद्धता

४ अ. कुटुंबासाठी आवश्यक ती वस्त्रे, वस्तू आदींचा साठा करून ठेवावा !

यात कपडे, अंथरुणे-पांघरुणे, सुई-दोरा, पादत्राणे, साबण, दंतमंजन, छत्र्या, काड्यापेट्या, मेणबत्त्या, बल्ब, दाढीचे सामान, आध्यात्मिक उपायांसाठीची सात्त्विक उत्पादने (उदा. अत्तर, कापूर, उदबत्ती) आदींचा समावेश असावा.

४ आ. शक्यतो नवीन घर वा सदनिका (फ्लॅट) विकत न
घेता असलेल्याच घरात किंवा भाड्याच्या घरात रहाण्याचा पर्याय निवडावा !

१. भूकंप, भूस्खलन इत्यादींमुळे इमारतींना हानी पोचू शकते आणि आपले पैसे वाया जाऊ शकतात, हे लक्षात घेऊन शक्यतो नवीन घर वा सदनिका (फ्लॅट) विकत घेऊ नये. असलेल्याच घरात रहाण्याचा किंवा भाड्याच्या घराचा वा सदनिकेचा पर्याय निवडावा.

२. काही अपरिहार्य कारणास्तव घर वा सदनिका विकत घेण्याची निकड भासल्यास कोणता प्रदेश त्यामानाने सुरक्षित वाटतो, याविषयी विचार करावा.

३. सदनिका विकत घ्यायची झाल्यास ती शक्यतो तिसर्‍या मजल्याच्या वर घेऊ नये. याचे कारण म्हणजे, भूकंपासारखा धोका निर्माण झाल्यास तिसर्‍या मजल्यापर्यंतच्या सदनिकेतून लवकर बाहेर पडणे सोपे जाते.

४. एखाद्याची सध्याची सदनिका तिसर्‍या मजल्याच्या वर असेल, तर त्याऐवजी अन्यत्र कोठे योग्य सदनिका मिळत असल्यास त्याविषयी विचार करावा.

४ इ. गावाला स्वतःचे घर असल्यास ते रहाण्यायोग्य स्थितीत ठेवावे !

आगामी काळात नैसर्गिक आपत्ती, वाढता दहशतवाद इत्यादींमुळे अनेक नगरे (शहरे) नष्ट होतील. तेव्हा खेड्यांमध्ये जाऊन रहावे लागेल. त्यामुळे कोणाचे गावाला घर असेल, तर त्यांनी ते आताच रहाण्यायोग्य स्थितीत करून ठेवावे.

४ ई. गावी स्वतःच्या मालकीची भूमी वा घर नसणार्‍या शहरवासियांनी
शक्य असल्यास सोयीच्या गावात रहाता येण्याच्या दृष्टीने आताच घराचा विचार करावा !

४ उ. नोकरी-धंद्यानिमित्त परदेशात गेलेल्या कुटुंबियांना शक्यतो भारतात बोलवावे !

भारत ही मुळात पुण्यभूमी आहे. आगामी आपत्काळात भारतापेक्षा अन्य देशांत जास्त हानी होण्याचा संभव आहे; कारण परदेशांत रज-तमाचे प्रमाण जास्त आहे. तसेच महायुद्ध चालू झाल्यावर परदेशातून भारतात सुखरूप परत येणे कठीण होईल.

४ ऊ. आपल्या पश्‍चात संपत्तीवरून (मालमत्तेवरून) नातेवाइकांत
वादविवाद होऊ नयेत, यासाठी वयस्कर व्यक्तींनी मृत्यूपत्र करून ठेवावे !

 

५. आपत्काळाच्या दृष्टीने आर्थिक स्तरावर करायची सिद्धता

५ अ. सध्याची मिळकत (उत्पन्न) आणि आतापर्यंतची बचत काटकसरीने वापरावी !

५ आ. आर्थिक गुंतवणूक करतांना पुढील सूत्रांचा विचार करावा !

सध्या बर्‍याच अधिकोषांचे (बँकांचे) आर्थिक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे स्वतःचे पैसे सुरक्षित रहावेत, यासाठी पुढील पर्यायांचा विचार करावा. ही गुंतवणूक करतांना You should not put all eggs in one basket (भावार्थ : एके ठिकाणी गुंतवणूक करून ती सर्व बुडण्यापेक्षा सुरक्षेच्या दृष्टीने ती गुंतवणूक विविध ठिकाणी करावी) या अर्थशास्त्रातील तत्त्वानुसार करावी.

५ आ १. ठेवी वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत अधिकोषांमध्ये (बँकांमध्ये) ठेवणे : एखादा अधिकोष डबघाईला आला, तर आपल्याकडील सर्वच पैसे बुडाले, असे होऊ नये, यासाठी आपल्या परिसरातील वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत अधिकोषांमध्ये ठेवी विखरून ठेवाव्यात. राष्ट्रीयकृत अधिकोषांत प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवीला १ लाख रुपयांचे विमा संरक्षण असते. त्यामुळे प्रत्येक ठेवीदाराने एका अधिकोषात जास्तीतजास्त १ लाख रुपयांपर्यंत ठेव ठेवावी.

५ आ २. अधिकोषाचे व्यवहार पत्नी, सुजाण मुले आदींनाही शिकवणे : बँकेत पैसे भरणे, बँकेतून पैसे काढणे आदी न्यूनतम व्यवहार आपल्या कुटुंबियांनाही करता यायला हवेत.

५ आ ३. सोने-चांदी आदी मौल्यवान वस्तूंंमध्ये गुंतवणूक करणे : एखाद्याला गुंतवणूक म्हणून सोने घ्यायचे असेल, तर त्याने अंगठीसारखे अलंकार विकत न घेता शुद्ध सोन्याचे वळे घ्यावे. यामुळे अलंकारांची घडणावळ द्यावी लागत नाही. पुढे परिस्थिती कशीही असली, तरी अशा वस्तूंचा उपयोग आपण करू शकतो.

५ आ ४. जमिनीमध्ये गुंतवणूक करणे : ज्यांना शक्य आहे, त्यांनी लागवडीस योग्य असेल, अशी भूमी खरेदी करावी. एका व्यक्तीला ती भूमी खरेदी करणे शक्य नसेल, तर काही जणांनी एकत्र येऊन भूमी खरेदी करावी. भूमीतील गुंतवणुकीचा आज ना उद्या परतावा मिळतो.

५ इ. ज्यांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांनी आतापासूनच उपाययोजना काढावी !

घरासाठी विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे आदी सर्व व्यय म्हणजे एक प्रकारची गुंतवणूकच आहे !

 

६. आपत्काळाच्या दृष्टीने करायची अन्य सिद्धता

६ अ. घरात अनावश्यक असलेले साहित्य न्यून करण्यास आरंभ करावा !

६ आ. दोन वेगवेगळ्या आस्थापनांचे सिम कार्ड असलेला भ्रमणभाष जवळ बाळगावा ! : एकाची रेंज न मिळाल्यास दुसर्‍याची रेंज मिळू शकते.

६ इ. नातेवाईक, शेजारी, पोलीस स्थानक, अग्नीशमन दल आदी अत्यावश्यक ठिकाणचे दूरभाष क्रमांक, पत्ते आदी स्वतंत्र वहीतही नोंद करून ठेवावेत ! : आपत्काळात भ्रमणभाष चालेलच, याची निश्‍चिती नसल्याने असे करावे.

६ ई. पुरासारख्या प्रसंगी शासकीय सूचना मिळाल्यानंतर काही मिनिटांतच घराबाहेर पडावे लागणार असल्यास पूर्वसिद्धता म्हणून एखाद्या लहान पेटीमध्ये (ब्रीफकेसमध्ये) महत्त्वाची कागदपत्रे (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, बँक पासबूक) आणि अन्य आवश्यक साहित्य एकत्रित करून ठेवावे !

६ उ. घराच्या रक्षणासाठी कुत्रा, दुधासाठी गायी, शेती आणि बैलगाडी यांसाठी बैल, प्रवासासाठी घोडे इत्यादी पाळावेत !

६ उ १. कुत्रा, गाय, बैल, घोडा आदींचा सांभाळ कसा करावा, तसेच त्यांना होणार्‍या विकारांवर कोणते उपाय करावेत इत्यादी शिकून घ्यावे !

६ ऊ. भावी आपत्काळात उपयुक्त होतील, अशा काही कला वा कृती आताच शिकून घ्याव्यात, तसेच त्या कृती करण्याचा सरावही ठेवावा ! : यात शिवणयंत्रावर कपडे शिवणे, पोहणे, बैलगाडी चालवणे, घोड्यावर बसणे यांसारख्या कृतींचा समावेश असावा.

६ ए. साबण, दंतमंजन आदी वस्तूंना असणार्‍या पर्यायांचाही विचार करून ठेवावा ! : यात कपडे धुण्यासाठी रिठ्यांचा वापर करणे, भांडी घासण्यासाठी राखेचा वापर करणे, गायीच्या शेणीपासून दंतमंजन करणे यांसारख्या कृतींचा समावेश असावा.

 

७. आपत्काळाच्या दृष्टीने विविध स्तरांवर
करायच्या सिद्धतेविषयीच्या काही सामाईक सूचना

७ अ. घरातील उपकरणे (स्वयंपाकघरातील उपकरणे, विद्युत उपकरणे इत्यादी), सायकल, बैलगाडी आदींच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग घेऊन ठेवावेत !

७ आ. घरातील उपकरणे, नळ, सायकल, बैलगाडी आदी वस्तूंची दुरुस्ती शिकून घ्यावी !

७ इ. काही वस्तूंची (उदा. धान्य दळण्यासाठी जातं) खरेदी आताच करावी, तर काही वस्तूंची (उदा. औषधांची) खरेदी टप्प्याटप्प्याने / त्यांचा टिकण्याचा कालावधी / शासकीय नियम आणि बंधने विचारात घेऊन करावी !

७ ई. दूरचित्रवाणीचे (टी.व्हीचे) प्रक्षेपण बंद पडल्यास आकाशवाणीवरून देण्यात येणार्‍या सूचना, वृत्ते आदी ऐकण्यासाठी रेडिओ घेऊन ठेवावा ! : भ्रमणभाषमध्ये रेडिओ असतो, तोही चालू शकतो.

७ उ. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्‍यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्याव्यात ! : यात बायो-गॅस संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे यांसारख्या सोयींचा समावेश असावा.

 

८. आपत्काळाच्या दृष्टीने आध्यात्मिक स्तरावर करायची सिद्धता

८ अ. स्वतःवर देवाची कृपादृष्टी रहाण्यासाठी आणि
स्वतःभोवती संरक्षक-कवच निर्माण होण्यासाठी पुढील कृती प्रतिदिन कराव्यात !

यात देवपूजा करणे, सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून दिव्याला नमस्कार करणे, दिवेलागणीनंतर घरातील सर्वांनी एकत्र बसून स्वास्थ्य आणि संरक्षक-कवच प्रदान करणारे श्‍लोक / स्तोत्रे म्हणणे (उदा. शुभं करोति०, रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र, देवीकवच), रात्री झोपतांना अंथरुणाभोवती देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे मंडल करणे आणि रक्षणासाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करणे आदी कृतींचा समावेश असावा.

८ आ. वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक उपाय आतापासूनच गांभीर्याने करावेत !

वाईट शक्तींचा त्रास नष्ट होण्यासाठी नामजप-उपाय, मीठ-पाण्याचे उपाय यांसारखे आध्यात्मिक उपाय नियमितपणे करावेत. [नामजप-उपाय आणि मीठ-पाण्याचे उपाय यांविषयीचे विवेचन नामजप-उपाय (३ खंड) या सनातनच्या ग्रंथमालिकेत केले आहे, तर विविध आध्यात्मिक उपायांचे विवेचन sanatan.org या संकेतस्थळांवर केले आहे.]

८ इ. आगामी तिसर्‍या महायुद्धात वापरल्या जाणार्‍या अण्वस्त्रांमुळे होणार्‍या किरणोत्सर्गाच्या जीवघातक परिणामांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करावे !

८ ई. आगामी काळात उद्भवणार्‍या भीषण आपत्तींतून वाचण्यासाठी चांगली साधना करणे आणि भगवंताचे भक्त बनणे अपरिहार्य !

८ ई १. साधना गांभीर्याने करावी ! : सनातन प्रभात नियतकालिकांत वेळोवेळी प्रसिद्ध होणार्‍या साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शनपर सूत्रांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करावा.

८ ई २. व्यष्टी साधनेची घडी चांगली बसवावी ! : साधकांनी स्वतःची व्यष्टी साधनेची घडी चांगली बसवून व्यष्टी साधना नियमित होण्यासाठी प्रयत्न करावेत.

 

९. आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने जनजागृती करणे, ही साधनाच आहे !

आगामी आपत्काळाविषयी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना सांगणे, प्रस्तुत लिखाण कार्यालयीन सहकार्‍यांना वाचायला देणे आदी स्तरांवर जनजागृती करणे आवश्यक आहे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडणे होय. असेे करणार्‍यांची यातून साधनाही होणार आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.३.२०१९)

संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची पूर्वसिद्धता

(आपत्काळाला खंबीरपणे सामोरे जाण्याची सिद्धता करता यावी, यासाठी साधक आणि वाचक यांनी ही लेखमालिका संग्रही ठेवावी.)

प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडे संरक्षित आहेत.

साधक आणि वाचक यांना आवाहन !

१. भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्याची सिद्धता कशी करावी, हे थोड्याफार प्रमाणात तरी कळावे, यासाठी काही क्षेत्रांतील सूत्रांचा वरील लिखाणात थोडक्यात उल्लेख केला आहे. याविषयीचे सविस्तर विवेचन करणारा ग्रंथही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.

२. या लेखाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील जाणकारांना किंवा साधकांना काही उपयुक्त सूत्रे लक्षात आल्यास त्यांनी ती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर येत्या महिन्याभरात पाठवावीत. यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment