‘श्रीमद्भगवद्गीता’ या धर्मग्रंथाचे पठण केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्रीमद्भगवद्गीतेमुळे ‘जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये’, याचे ज्ञान होते. ती वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करते आणि दुःखी-कष्टी लोकांना आश्‍वस्त करते. गीतेमधील प्रत्येक शब्दात चैतन्य सामावलेले आहे. गीता हा संन्यास, ज्ञान, कर्म, ध्यान, भक्ती इत्यादी योगमार्गांचे मार्गदर्शन करणारा धर्मग्रंथ आहे. ‘श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने त्याचा व्यक्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ५.१२.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्रीमद्भगवद्गीतेतील १८ व्या अध्यायातील श्‍लोकांचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असणारी १ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा १ साधक यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. संस्कृत वाचनाचा सराव नसलेल्या दोन्ही साधकांना श्रीमद्भगवद्गीतेतील १८ वा अध्याय वाचायला साधारण २० ते २५ मिनिटे लागली.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ आ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा घटणे आणि तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा होत्या अन् त्यांच्या प्रभावळी अनुक्रमे १.५८ मीटर आणि ०.९८ मीटर होत्या. भगवद्गीतेच्या पठणानंतर साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत ०.५८ मीटर घट झाली आणि तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली.

२ आ २. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये आरंभी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ १.३२ मीटर होती. भगवद्गीतेच्या पठणानंतर साधकातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली. साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ इ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा नव्हती. भगवद्गीतेच्या पठणानंतर तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिची प्रभावळ १.३२ मीटर होती.

२ इ २. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ १.९१ मीटर होती. भगवद्गीतेच्या पठणानंतर साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत ०.८३ मीटर वाढ झाली.

२ ई. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

२ ई १. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठणानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्या एकूण सकारात्मक प्रभावळीत वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्या एकूण सकारात्मक प्रभावळी अनुक्रमे २.११ मीटर आणि २.४१ मीटर होत्या. भगवद्गीतेच्या पठणानंतर त्यांच्या एकूण सकारात्मक प्रभावळीत अनुक्रमे ०.४६ मीटर आणि ०.९२ मीटर वाढ झाली.

३. निष्कर्ष

अ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्रासदायक शक्तीचे स्थान होते, तसेच तिच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरणही होते. शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवली जाते आणि शरिराभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवले जाते. भगवद्गीतेचे पठण केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील नकारात्मक ऊर्जा (‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा) पूर्णपणे नष्ट झाली आणि साधिकेभोवतीची नकारात्मक ऊर्जा (‘इन्फ्रारेड’ ऊर्जा) पुष्कळ प्रमाणात न्यून झाली, तसेच तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, हेही विशेष आहे.

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाभोवती काही प्रमाणात नकारात्मक ऊर्जा होती. सध्या कलियुगातील वातावरण रज-तमात्मक असल्याने आध्यात्मिक त्रास नसलेल्यांभोवतीही त्रासदायक शक्तीचे आवरण येऊ शकते. साधकाभोवतीचे हे आवरण भगवद्गीतेच्या पठणामुळे पूर्णपणे नाहीसे झाले आणि त्याच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हा सर्व परिणाम श्रीमद्भगवद्गीतेतील सकारात्मक ऊर्जेमुळे झाला.

आ. सकारात्मक ऊर्जेमुळे एखाद्याभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे सोपे आहे; पण एखाद्यातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती दूर होण्यासाठी पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आवश्यक असते. भगवद्गीतेच्या केवळ २० – २५ मिनिटांच्या पठणाने हे दोन्ही साध्य झाले. या वैज्ञानिक चाचणीतून ‘भगवद्गीतेचे पठण करणे आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायी आहे’, हे स्पष्ट झाले. भगवद्गीतेमध्ये साक्षात् भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्वज्ञान आहे. संपूर्ण विश्‍वात भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही. भगवद्गीतेचे पठण करण्यासह त्यातील सिद्धांत आचरणात आणले, तर जीवन खर्‍या अर्थाने समृद्ध होऊन परमात्म्याच्या चरणी सार्थकी लागेल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.१२.२०१८)

ई-मेल : [email protected]

 

‘युरोपीय विद्वानांनी ओळखलेले गीतेचे महत्त्व !

जगातील १९२ भाषांत गीतेचे भाषांतर झाले आहे. अनेक युरोपीय आणि अमेरिकी विद्वानांनी गीतेचे माहात्म्य मुक्तकंठाने गायिले आहे. थोरो नावाच्या पाश्‍चात्त्य तत्त्ववेत्त्याला एकदा एकाने प्रश्‍न विचारला, ‘‘तुमचे आचार आणि विचार एवढे चांगले कसे ?’’ त्यावर तो तात्काळ उत्तरला, ‘‘मी प्रतिदिन पहाटे उठून भगवद्गीता वाचतो.’’

भगवद्गीतेची शिकवणच भारतवर्षाला आणि जगालाही तारू शकेल !

गीता ही ज्ञानमय चैतन्याची शिकवण आहे. अज्ञान, रज-तम प्रवृत्ती, दुःख आणि अन्याय यांविरुद्ध लढण्याची वीरवृत्ती आहे. भगवद्गीता मानवामध्ये देवत्व निर्माण करते. आज राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती झाली असून भारतीय हतबल झाले आहेत. भगवद्गीतेची शिकवणच भारतवर्षाला आणि जगालाही तारू शकेल !’

– (पू.) श्री. संदीप आळशी, रामनाथी आश्रम, गोवा.

Leave a Comment