श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

Article also available in :

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल
ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करण्याची पद्धत रूढ झाली’, असे ‘शास्त्र असे सांगते’ या ग्रंथात दिले आहे. ‘गणेशचतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीच्या मूर्तीमध्ये पुढील दिवसांत आध्यात्मिक स्तरावर काही पालट होतात का ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी मडकई, गोवा येथील सनातन संस्थेचे साधक श्री. उमेश नाईक यांच्या घरी पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने १३.९.२०१८ (गणेशचतुर्थी) ते १७.९.२०१८ (पाचवा दिवस) या कालावधीत प्रत्येक दिवशी चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत १३.९.२०१८ या (गणेशचतुर्थीच्या) दिवशी साधकाच्या घरी आणलेल्या गणेशमूर्तीच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. त्यानंतर १६.९.२०१८ पर्यंत प्रत्येक दिवशी या मूर्तीच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तर १७.९.२०१८ या दिवशी उत्तरपूजेपूर्वी आणि उत्तरपूजेनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. गणेशमूर्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे

गणेशमूर्तीच्या केलेल्या कोणत्याही दिवशीच्या मोजणीत तिच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’, तसेच ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत प्रतिदिन झालेले पालट

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. गणेशमूर्ती घरी आणल्यावर तिची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वीही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात ‘यू.ए.’ स्कॅनरच्या भुजांनी केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ‘पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ प्रतिदिन किती होती ?’, हे पुढील सारणीत दिले आहे.

गणेशोत्सवात पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीच्या नोंदीं सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ( मीटर )
पूजनापूर्वी पूजनानंतर
१. १३.०९.२०१८ (पहिला दिवस) १.७० २.०६
२. १४.०९. २०१८ (दुसरा दिवस) ३.०५ ४.१८
३. १५.०९.२०१८ (तिसरा दिवस) २.५० ३.२०
४. १६.०९. २०१८ (चौथा दिवस) २.०४ २.४७
५. १७.०९. २०१८ (पाचवा दिवस) १.५८ २.३५

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. गणेशमूर्तीच्या पूजनानंतर तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढते.

आ. दुसर्‍या दिवशी गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक होती आणि त्यानंतर ती प्रतिदिन न्यून होत गेली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ इ १. पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीच्या एकूण प्रभावळीत प्रतिदिन झालेले पालट

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. ‘पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीची एकूण प्रभावळ प्रतिदिन किती होती ?’, हे पुढील सारणीत दिले आहे.

गणेशोत्सवात पाच दिवस पूजलेल्या गणेशमूर्तीच्या नोंदीं एकूण प्रभावळ (मीटर)
पूजनापूर्वी पूजनानंतर
१. १३.०९.२०१८ (पहिला दिवस) २.१५ ३.४१
२. १४.०९. २०१८ (दुसरा दिवस) ४.१८ ४.९०
३. १५.०९.२०१८ (तिसरा दिवस) २.८४ ४.७४
४. १६.०९. २०१८ (चौथा दिवस) २.२५ २.९२
५. १७.०९. २०१८ (पाचवा दिवस) १.८७ २.८७

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. गणेशमूर्तीच्या पूजनानंतर तिची एकूण प्रभावळ वाढते.

आ. दुसर्‍या दिवशी गणेशमूर्तीची एकूण प्रभावळ सर्वाधिक होती आणि त्यानंतर ती प्रतिदिन न्यून होत गेली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

 

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. गणपतीमूर्ती श्री गणेशाचा सात्त्विक आकारबंध असलेली आणि शाडू मातीपासून
बनवलेली असल्याने तिच्यामध्ये पूजनापूर्वीही नकारात्मक ऊर्जा नसून उलट सकारात्मक ऊर्जा असणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे श्री गणेशाचे ‘रूप’ (मूर्ती) आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. प्रयोगातील गणेशमूर्ती धर्मशास्त्राप्रमाणे योग्य आकाराची आणि शाडू मातीपासून बनवलेली असल्याने सात्त्विक होती. अशा मूर्तीमध्ये गणेशाची स्पंदने येतातच. त्यामुळे त्या मूर्तीमध्ये पूजनापूर्वीही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. याउलट तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली.

३ आ. गणेशमूर्तीचे पूजन केल्यावर श्री गणेशाची स्पंदने मूर्तीमध्ये आकृष्ट
झाल्यामुळे मूर्तीतील सकारात्मक ऊर्जा, तसेच मूर्तीची एकूण प्रभावळ यांमध्ये वाढ होणे

‘जिथे देवाचे रूप आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती असते’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार प्रत्येक दिनी श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन केल्यावर श्री गणेशाची स्पंदने मूर्तीमध्ये आकृष्ट झाली. त्यामुळे प्रत्येक दिवशी मूर्तीचे पूजन केल्यानंतर पूजनापूर्वीच्या तुलनेत पूजनानंतर मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि तिची एकूण प्रभावळ यांत वृद्धी झालेली आढळली.

३ इ. गणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तिच्यातील देवत्व एकच दिवस रहात असणे

‘मृत्तिकेच्या (मातीच्या) गणेशमूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवस टिकते. याचाच अर्थ गणेशमूर्तीचे विसर्जन कोणत्याही दिवशी केले, तरी मूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून त्याच दिवशी किंवा दुसर्‍या दिवशी मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे.’ (संदर्भ : ‘शास्त्र असे सांगते’, पृष्ठ ११५-११६)

वरील सूत्रानुसारच प्रयोगातही आढळले. दुसर्‍या दिवसानंतर प्रत्येक दिवशी मूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि तिची एकूण प्रभावळ यांत उत्तरोत्तर घट झालेली आढळली.

३ ई. गणेशमूर्तीमध्ये आलेल्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीमध्ये २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाणे

‘मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस रहात नाही’, असे वर ‘सूत्र ३ इ’मध्ये म्हटले आहे. असे असतांना गणेशोत्सवात एक दिवसापेक्षा जास्त काळ पूजल्या जाणार्‍या गणेशमूर्तीच्या उपासनेचा लाभ भाविकांना कसा मिळेल ?’, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. याचे उत्तर असे आहे – ‘मूर्तीमधील देवत्व नष्ट झाले, तरी त्या देवत्वाचा परिणाम म्हणून मूर्तीमध्ये २१ दिवसांपर्यंत चैतन्य टिकून रहाते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीची पूजाअर्चा होत असल्याने पूजकाच्या भक्तीभावाप्रमाणे मूर्तीमधील चैतन्यात (सकारात्मक ऊर्जेत) पूजेनंतर वाढही होऊ शकते. २१ दिवसांनंतर मूर्तीमधील चैतन्य हळूहळू घटू लागते.’ (संदर्भ : सनातन संस्थेचे प्रकाशन ‘श्री गणपति’)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.९.२०१८)

ई-मेल : [email protected] 

Leave a Comment