कपडे परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ

कपड्यांमुळे मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्‍तीमत्त्व यांची होणारी ओळख, कपड्यांचा मनुष्याच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि आध्यात्मिकदृष्ट्या कपडे परिधान करण्याचे महत्त्व याविषयी या लेखात दिले आहे.

१. शारीरिकदृष्ट्या महत्त्व

कपडे घातल्यामुळे मनुष्याचे लज्जारक्षण होते, तसचे थंडी, वारा, ऊन आणि पाऊस यांपासूनही त्याच्या देहाचे संरक्षणही होते.

२. मानसिकदृष्ट्या महत्त्व

अ. कपड्यांमुळे मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्‍तीमत्त्व यांची ओळख होणे

मनुष्य आपल्या स्वभावानुसार कपड्यांची निवड करत असतो. सर्वसाधारणतः जे लोक नेहमी टापटीप आणि कडक इस्त्रीचे कपडे घालतात, ते शिस्तप्रिय अन् काटेकोर स्वभावाचे असतात. जे नेहमी अनौपचारिक आणि सुखदायी कपडे घालतात, ते मनमोकळ्या आणि स्वच्छंद स्वभावाचे असतात. जे नेहमी अस्ताव्यस्त आणि विचित्र पद्धतीचे कपडे घालतात, ते आळशी अन् निष्काळजी (बेफिकीर) स्वभावाचे असतात. थोडक्यात कपड्यांवरून मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्‍तीमत्त्व यांची ओळख व्हायला साहाय्य होते. यामुळे व्यावहारिक जीवनात त्या त्या प्रसंगाला पूरक असेच कपडे मनुष्याने घालणे आवश्यक ठरते, उदा. नोकरीच्या मुलाखतीला जातांना टापटीप आणि कडक इस्त्रीच्या कपड्यांत गेल्यामुळे मनुष्यातील शिस्तप्रियता अन् नम्रता या गुणांचे दर्शन होते.

आ. कपड्यांचा मनुष्याच्या मानसिकतेवर परिणाम होणे

नवीन कपडे घातले असल्यावर आपल्याला एक प्रकारच्या सुखद संवेदना जाणवत असतात, तर अगदी मलीन किंवा घट्ट बसणारे कपडे घालण्याची वेळ आली असता आपल्याला सारखे त्याचे शल्य बोचत असते, हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. कपडे मनुष्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात, हे यातून लक्षात येते. इंग्लंडमधील ‘आर्थर अँडरसन’ या आस्थापनाने (कंपनीने) या गोष्टीवर संशोधन करून आपल्या कर्मचार्‍यांच्या वेशभूषेत पालट घडवून आणला. त्यामुळे कर्मचार्‍यांना काम करतांना समाधान मिळण्यासह त्यांच्या कामात विलक्षण प्रगती झाल्याचेही निदर्शनास आले.

३. आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व

अ. वस्त्र परिधान करणे, म्हणजे ब्रह्मपदावर आरूढ होण्यासाठी मायेचे (वस्त्राचे) आलंबन करणे

‘वस्त्र नसणे, म्हणजे जिवाने मायारूपी वैराग्याचा त्याग करून ब्रह्मपदावर आरूढ होणे, तर वस्त्र परिधान करणे, म्हणजे ब्रह्मपदावर आरूढ होण्यासाठी मायेत नटण्यासाठी मायेचे (वस्त्राचे) आलंबन करणे.’
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १८.६.२००७, सायं. ६.२७)

आ. धर्माचरणाचे प्रमाण देणारी वेशभूषा जिवाला पापाकडे वळायला अटकाव करत असणे

‘बाह्य जगाला धर्माचरणाचे प्रमाण देणारी धोतर (सोवळे), उपरणे, गंध, माळ इत्यादी वेशभूषा जिवाला पाप, अधर्म, मुक्‍त संभोग आणि मद्यपान यांपासून दूर राखते, प्रतिबंध करते.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

इ. वस्त्र परिधान केल्याने वायूमंडलातील लहरी जिवाकडे आकृष्ट होणे

‘शरिरावर वस्त्र धारण केल्याने निर्माण होणार्‍या सूक्ष्म-स्पर्शाच्या घर्षणामुळे वायूमंडलातील लहरी वस्त्राच्या साहाय्याने जिवाचा सूक्ष्म-कोश अन् देह यांत आकृष्ट होतात.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १८.६.२००७, सायं. ६.२७)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment