सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या समवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !

श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर (राजस्थान) येथील महंत स्वामी संवित सोमगिरीजी महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन !

 

साधनेविना विकास म्हणजे विनाश ! – स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

आपले हृदय हे मूलतः प्रेम आणि सद्भावना यांचा सागर आहे; पण ईश्‍वरविषयक संकल्पना, आध्यात्मिक दृष्टी नसल्याने बहुतांश जण ते अनुभवू शकत नाहीत. ईश्‍वरविषयक आपल्या संकल्पना सुस्पष्ट असायला हव्यात, तरच धर्मकार्य करणे सुलभ जाते. आपण विकासाच्या विरोधात नाही; पण साधनेविना विकास करणे म्हणजे विनाशाकडे वाटचाल करण्यासारखे आहे, असे मार्गदर्शन करतांना बिकानेर, राजस्थान येथील श्री लालेश्‍वर महादेव मंदिराचे महंत स्वामी संवित सोमगिरिजी महाराज यांनी केले.

स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ईश्‍वराचे अस्तित्व विसरल्यानेच आज आपली दयनीय स्थिती आहे.

२. सज्जनांना जर एकत्र करायचे असेल, तर वैचारिक सुस्पष्टता हवी. ही वैचारिक सुस्पष्टता वेद-पुराणे-स्मृति यांच्या अभ्यासाने आणि अनुकरणानेच येईल.

३. आज सर्व जगात हिंदु संस्कृतीचा प्रसार होत आहे. सर्व जग आयुर्वेदाकडे वळत आहे आणि आपण मात्र या संस्कृतीची उपेक्षा करत आहोत. त्यामुळेच आज भारताची दयनीय अवस्था झाली आहे.

४. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या काही संघटना कार्य करतांना भरकटल्या. त्याची कारणे शोधावी लागतील. ते टाळून पुढे जावे लागेल.

५. भारताची मूळ भाषा संस्कृत आहे. जगातील सर्व भाषांची जननीसुद्धा संस्कृत आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

६. ‘विज्ञानाने प्रगती केली’, असे म्हणतात. ‘बिग बँग’ने सृष्टीच्या उत्पत्तीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तेच विज्ञान आज ‘त्यापुढे काय’, असे अध्यात्माला विचारत आहे. यावरून विज्ञानाच्या मर्यादा लक्षात येतात.

७. आपण भगवद्गीतेला केवळ पूजेपुरते मर्यादित ठेवले आहे. गीतेचे आचरण आपण करत नाही. त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

८. लिव्ह-इन-रिलेशनशीपविषयी निर्णय देतांना न्यायाधीश पवित्र अशा राधा-कृष्ण यांच्या संबंधाचे उदाहरण देतात आणि संपूर्ण हिंदु समाज शांत रहातो. हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याचे हे लक्षण आहे.

९. घराघरांत हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना देशात ते स्थापन होणार नाही. प्रत्येकामध्ये महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रकट व्हायला हवेत.

 

स्वामी संवित सोमगिरिजी महाराज यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातनच्या पाठीशी असलेल्या गुरुपरंपरेला शरण जाऊन कार्य केले पाहिजे !

१. हिंदु राष्ट्राचा विषय सर्वत्र प्रज्वलित केल्याविषयी मी सनातनच्या साधकांचे विशेष अभिनंदन करतो. सनातनच्या साधकांनी गृहस्थाश्रमात राहून संतपद प्राप्त केले. हे सनातनचे वैशिष्ट्य आहे.

२. साध्य, साधनसामुग्री, सिद्धांत यांविषयीच्या संकल्पना सुस्पष्ट करण्यासाठी सिद्ध पुरुषाची म्हणजे गुरुंची आवश्यकता असते. त्यासाठी शास्त्र, गुरु, आत्मा यांना शरण जावे लागते. गुरुला एक व्यक्ती म्हणून पहाणे हे शास्त्रविरोधी आहे. सनातनकडे गुरुपरंपरा आहे. महान गुरु तुमच्याकडे आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्यामागे गुरुपरंपरा आहे. गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तर गुरु काळस्वरूप असतात. अशा गुरुपरंपरेला शरण जाऊन आपण कार्य केले पाहिजे.

३. सनातनचे सर्व साधक मला निरंतर मुरली वाजवतांना दिसत आहेत.

४. प्रतिकूल वातावरणात एक नवी ज्योत घेऊन सनातन संस्था भारतभरात निघाली आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून नवी उर्जा आणि शक्ती घेऊन पुढे जात आहे.

५. या हिंदु राष्ट्राच्या यज्ञकुंडात अर्पित होण्याची इच्छा पूर्ण विश्‍वात पसरावी, अशी प्रार्थना !

 

अधिवेशनात सहभागी झालेल्यांच्या अंतरी दिव्य शक्ती, बाहेर साहस अन् वीरता यांचा प्रत्यय !

हिंदू अधिवेशनात निर्माण झालेले हिंदु राष्ट्राचे तरंग आता जगभर पसरत आहेत. येथे उपस्थित असलेल्या धर्मविरांच्या हातात आता अर्जुनाचे गांडीव धनुष्य आले आहे. आपल्या आत मधुरता आणि एक दिव्य शक्ती कार्यरत असून बाहेर साहस अन् वीरता यांचा प्रत्यय येत आहे. आपण पांचजन्यचा घोष केला असून जगातील कोणतीही शक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेपासून रोखू शकत नाही.

क्षणचित्रे

स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज यांनी काही श्‍लोकांचे उच्चारण केल्यावर संपूर्ण सभागृहात नवचैतन्य पसरले. वातावरणात उत्साह वाढून सभागृहात शांत लहरी प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. स्वामी संवित सोमगिरीजी महाराज यांनी मार्गदर्शनाचा प्रारंभ करण्यापूर्वी ‘आज हिमालय, सप्तनद्या, सप्ततीर्थ येथे उपस्थित असून येथील चेतना आणि उत्साह यांना मी नमस्कार करतो’, असे भावपूर्ण उद्गार काढले.

Leave a Comment