पुणे येथील संत प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचा देहत्याग

प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

पुणे – पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांच्या सुविद्य पत्नी आणि प.पू. सदानंद स्वामी यांच्या निस्सीम भक्त प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये (वय ८८ वर्षे) यांनी २१ एप्रिलला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला. प.पू. (सौ.) उपाध्येआजी गेल्या ३ आठवड्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. प.पू. (सौ.) उपाध्येआजी यांच्या पश्‍चात त्यांचे पती प.पू. आबा उपाध्ये, मुलगा श्री. उदयकुमार उपाध्ये, सून, ४ मुली, जावई, ९ नातवंडे आणि ५ पतवंडे, असा परिवार आहे.

प.पू. (सौ.) उपाध्येआजी यांनी १९ वर्षे गोरेगाव (मुंबई) येथील महाराष्ट्र विद्यालयात मुख्याध्यापिकापदाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि पुण्यातील साधक परिवार यांना जोडून ठेवले होते. सद्गुरु सदानंद स्वामी यांनी सांगून दिलेल्या साधनापथावर मार्गक्रमण करत त्यांनी उच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त केला होता. त्यांच्या साधनाप्रवासात त्यांना अनेक अत्युच्च दर्जाच्या अनुभूतीही आल्या.

 

सनातन परिवाराशी विशेष स्नेह

सनातन परिवाराशी  प.पू. आबा आणि प.पू. (सौ.) मंगलाआजी यांचा विशेष स्नेह होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला, तर ३ ते ७ जून २०१६ या काळात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली होती. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला त्यांचा नेहमी आशीर्वाद असे. त्यांच्या देहत्यागाने त्यांचे स्थूलरूपातील दर्शन आणि मार्गदर्शन यांपासून साधकपरिवार वंचित रहाणार असला, तरी त्यांनी आतापर्यंत दिलेली शिकवण आणि केलेले मार्गदर्शन साधकांना अखंड प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.

सनातन परिवार  प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये आजींच्या चरणी कृतज्ञताभावाने नतमस्तक आहे

परात्पर गुरु डॉ. आठवले पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याशी बोलतांना आणि मध्यभागी प.पू. आबा उपाध्ये (३.६.२०१६)

प.पू. मंगला उपाध्येआजी स्थूलदेहाने जरी आज आपल्यात नसल्या, तरी त्या सूक्ष्मरूपाने सदैव साधकांबरोबरच आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बसलेले डावीकडून परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. आबा उपाध्ये, प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये, श्री. उदयकुमार उपाध्ये, तर उभ्या असलेल्या श्रीमती संध्या कोठावळे आणि सौ. राजश्री फणसळकर (३.६.२०१६)

‘प.पू. मंगला उपाध्ये यांच्या देहत्यागाची वार्ता ऐकली आणि मनात पुढील विचार मनात आले. ‘३ जून ते ७ जून २०१६ या कालावधीत प.पू. मंगला उपाध्ये आणि प.पू. आबा उपाध्ये हे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले होते. ते केवळ ५ दिवसच आश्रमात राहिलेे होते. त्या वेळी त्या दोघांशी माझी एकूण ५ – ६ घंटेच भेट झाली; परंतु ‘आम्ही एकमेकांना आधीपासूनच ओळखत आहोत’, अशी ती भेट होती. प.पू. मंगलाआजी यांनी त्यांच्यातील वात्सल्यभावाने सर्व साधकांची मने जिंकून घेतली. तेव्हापासून प.पू. आबा आणि प.पू. मंगलाआजी यांचा सनातनला आधार वाटतो. तेव्हापासून प.पू. (सौ.) मंगलाआजी यांची आठवण आली की, त्यांचा सुहास्य चेहरा लगेचच दृष्टीसमोर येतो. प.पू. आबा आणि प.पू. मंगलाआजी सनातनला कधीच परके वाटले नाहीत. चैतन्याचे नाते असेच असते. ते अनंत काळ टिकणारे आणि युगानुयुगे पुढे चालू रहाणारे असते.

प.पू. मंगलाआजी संत असल्याने कशातच अडकल्या नव्हत्या. त्यामुळे देहत्यागानंतर त्या थेट जनलोकात गेल्या. ‘त्यांची कृपादृष्टी सनातनच्या साधकांवर अखंड राहो’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !

प.पू. मंगलाआजी यांच्या देहत्यागानंतर प.पू. आबा यांच्याशी दुपारी २.३० वाजता दूरभाषवर बोललो. या प्रसंगातही प.पू. आबांशी बोलतांना त्यांच्या वाणीतून नेहमीसारखा आनंद अनुभवत होतो. ही एक दुर्मिळ अनुभूती आहे.

प.पू. मंगलाआजी स्थूलदेहाने जरी आज आपल्यात नसल्या, तरी त्या सूक्ष्म रूपाने साधकांबरोबरच सदैव असणार आहेत. संत हे जन्म-मृत्यूच्या पुढे गेलेले असतात.

‘प.पू. मंगलाआजी यांचे चैतन्य सनातनला निरंतन मिळू दे’, अशी मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment