प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे अल्प चरित्र

प.पू. डॉ. आठवले
प.पू. डॉ. आठवले

कर्मयोग, ज्ञानयोग, भक्‍तीयोग अशा सर्वच साधनामार्गांचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ आचरण्यास सांगून साधकांना अल्पावधीत संतपदी पोहोचवणारी सध्याच्या काळातील अलौकिक विभूती म्हणजे प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले ! हिंदु समाज, राष्ट्र आणि जग यांच्या उत्कर्षाचा दुर्दम्य ध्येयवाद त्यांच्या विचारांत आणि कृतींत ठायी ठायी आढळतो. साहित्य, पत्रकारिता, कला, भाषा अशा सर्वच क्षेत्रांतील त्यांचे कार्य स्पृहणीय आहे. थोडक्यात हिंदु समाजासाठी ते धर्मरक्षकांचेही शिरोमणी आहेत, राष्ट्रहितासाठी त्यांनी आरंभलेली चळवळ पहाता ते राष्ट्रपुरुष आहेत आणि जगाच्या हिताचा विचार करतांना ते जगद्‍गुरु आहेत !

 

जन्म आणि लौकिक जीवन

प.पू. डॉ. आठवले यांचा जन्म ६ मे १९४२ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी झाला. त्यांनी वैद्यकीय शिक्षणात पदवी घेतली आणि पुढे ‘मानसोपचार’ या क्षेत्रात शिक्षण घेतले. त्यांनी ब्रिटनमध्ये सात वर्षे आणि त्यानंतर मुंबई येथे संमोहनाविषयीचे संशोधन, तसेच उपचारतज्ञ म्हणून व्यवसाय केला. या कालावधीत त्यांनी ४०० हून अधिक डॉक्टरांना संमोहन-उपचारशास्त्राचे शिक्षण दिले.

 

साधनेतील वाटचाल आणि गुरुप्राप्ती

सद्गुरूंच्या छायाचित्राची पूजा करतांना
सद्गुरूंच्या छायाचित्राची पूजा करतांना

१९६७ ते १९८२ अशी १५ वर्षे संमोहन-उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर जवळजवळ तीस टक्के रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत आणि बरे न झालेल्या रुग्णांपैकी काही जण तीर्थक्षेत्री किंवा संतांकडे गेल्यामुळे वा एखादा धार्मिक विधी केल्यामुळे बरे झाले, असे त्यांच्या लक्षात आले. शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय शास्त्रांपेक्षा ‘अध्यात्मशास्त्र’ हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जिज्ञासू वृत्तीने अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला, अनेक संतांकडे जाऊन शंकानिरसन करून घेतले आणि स्वतः साधनाही केली. १९८७ साली इंदूर येथील थोर संत प.पू. भक्‍तराज महाराज यांनी त्यांना गुरुमंत्र दिला.

 

व्यापक अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृती

प.पू. डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना
प.पू. डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना

गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. यासाठी त्यांनी १९९० साली ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ आणि त्यानंतर १९९९ साली ‘सनातन संस्था’ यांची स्थापना केली. त्यांनी राष्ट्रभर ठिकठिकाणी स्वखर्चाने जाऊन प्रवचने घेण्यास सुरुवात केली. त्या प्रवचनांत येणार्‍या जिज्ञासूंना आपलेसे करून अल्पावधीत सहस्रावधी जिज्ञासूंमध्ये ईश्‍वरभक्‍तीची ज्योत प्रज्वलित केली. आज देशभरात प्रवचने, तसेच साप्ताहिक सत्संग आणि बालसंस्कारवर्ग यांच्या माध्यमातून समाजाला धर्मपरायण आणि नीतीमान बनवण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे हजारो साधक निर्माण झाले आहेत. १९९७ नंतर प.पू. डॉ. आठवले यांनी ज्ञानदानाच्या चळवळीला व्यापक स्वरूप दिले. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत फिरून १००हून अधिक जाहीर सभा घेतल्या.

 

समाजाला धर्मशिक्षणार्थ सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा

सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथ
सनातन-निर्मित सात्त्विक ग्रंथ

समाजाला धर्मशिक्षण मिळाले, तर तो योग्य प्रकारे धर्माचरण करू शकतो, हे जाणून त्यांनी आतापर्यंत शास्त्रीय परिभाषेत ज्ञान देणार्‍या ३१६ हून अधिक ग्रंथांची निर्मिती केली आहे. अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारपालन, धार्मिक कृती, राष्ट्ररक्षण, स्वभाषारक्षण अशा विविधांगी विषयांवरील ग्रंथांच्या मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. ग्रंथांतील ज्ञानाला आता दूरचित्रवाहिन्यांद्वारेही प्रसिद्धी मिळत आहे.

 

व्यष्टी आणि समष्टी साधना !

१. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या अध्यात्मातील तत्त्वानुसार त्यांनी साधनेला व्यापकतेची शिकवण दिली.

२. कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी शेवटी गुरुकृपेविना मोक्षप्राप्ती नाही ! गुरुकृपा संपादन करण्यासाठी त्यांनी नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, निरपेक्ष प्रीती, भावजागृती, स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन, ही अष्टांगे शिकवली.

३. व्यष्टी साधना (नामजप आदी वैयक्‍तिक साधना) कितीही केली, तरी समष्टी साधना (धर्मप्रसार, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आदी समाजहितासाठीची साधना) केल्याविना ईश्‍वरप्राप्ती होऊ शकत नाही, ही महत्त्वाची शिकवण त्यांनी दिली.

 

संत अन् संप्रदाय यांचे संघटन

प.पू. डॉ. आठवले समाजाला अध्यात्म सांगून थांबले नाहीत, तर विविध संप्रदायांच्या माध्यमातून साधना करणार्‍यांना संघटित करण्यासाठी त्यांनी विविध शहरांत ‘सर्वसंप्रदाय सत्संग’ घेतले. विविध संतांना एकाच व्यासपिठावर आणले. सहस्रावधी किलोमीटर भ्रमंती करून शेकडो संतांच्या भेटीगाठी घेतल्या. ईश्‍वरनिष्ठांची मोट बांधून ही संघशक्‍ती राष्ट्र आणि धर्म यांच्या पुनरुत्थानाच्या कार्यात लावण्यासाठी त्यांनी ही धडपड केली.

 

हिंदुसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती

धर्महितासाठी कार्य करण्याची स्फूर्ती सहस्रावधी लोकांमध्ये निर्माण करणार्‍या व्यक्‍तीमत्त्वांना ‘धर्मरक्षक’ ही उपाधीही तोकडी ठरते. प.पू. डॉ. आठवले यांचे कार्यही तितक्याच उंचीचे आहे. हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष या हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानांच्या हेटाळणीच्या विरोधात आवाज उठवण्याचे स्फुल्लिंग त्यांनी समाजात चेतवले. ‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात होत असतांना, पहिला आवाज सनातन संस्थेचा हवा’, हे सूत्र त्यांनी साधकांना घालून दिले. हे सूत्र तंतोतंत पाळणारे सनातनचे सहस्रो साधक म्हणजे त्यांनी समाजाला दिलेली देणगीच आहे.

समाजाला राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करायला शिकवायची, तर समाजमनावरील निष्क्रीयतेची काजळी सातत्याने पुसण्याचे वैचारिक माध्यम हवे, म्हणून त्यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह स्थापन केला. या माध्यमातून सध्या मराठी भाषेतील दैनिकाच्या चार आवृत्त्या, मराठी आणि कन्नड भाषांतील साप्ताहिक, तसेच हिंदी, इंग्रजी अन् गुजराती भाषांतील मासिके चालू आहेत.

 

अध्यात्मविश्‍वातील अलौकिक कार्य

१. देवतांची सात्त्विक चित्रे आणि श्री गणेशमूर्ती यांची निर्मिती

देवतांची सात्त्विक चित्रे काढतांना
देवतांची सात्त्विक चित्रे काढतांना

प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिलेल्या देवतांच्या चित्रांत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आले आहे. विश्‍वव्यापी देवतांची तत्त्वे कागदावरच्या चित्रांमध्ये येण्यासाठी, म्हणजेच ते चित्र देवतेच्या विश्‍वव्यापी रूपाशी अधिकाधिक मिळतेजुळते येण्यासाठी साधक देवतांची चित्रे रेषांचे सूक्ष्म-परीक्षण करून काढतात. देवतांची सात्त्विक चित्रे सिद्ध करतांना प.पू. डॉक्टर साधक-चित्रकारांना सांगायचे, ‘‘आपण इतकी भक्‍ती केली पाहिजे की, देवालाच वाटले पाहिजे की, साधकांसमोर जाऊन साक्षात् उभे रहावे आणि ‘माझे चित्र काढ’, असे सांगावे.’’ आरंभी सनातनला एक-एक चित्र काढायला ६ ते ८ मास लागले. या चित्रात त्या त्या देवतेचे तत्त्व टप्प्याटप्प्याने वाढत आहे.

२. सनातन संस्थेचे आध्यात्मिक संशोधन

संशोधन
संशोधन

सध्याच्या विज्ञानयुगातील मानवाला अध्यात्मासारख्या सूक्ष्मातील विषयाचे महत्त्व पटावे, यासाठी त्यांनी वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे संशोधनकार्य करवून घेतले. या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी शाकाहार; भारतीय वेशभूषा, संगीत अन् नृत्य; साधना आदींचा मनुष्यावर होणारा इष्ट परिणाम आणि मांसाहार; पाश्‍चात्त्य वेशभूषा, संगीत अन् नृत्य आदींचा मनुष्यावर होणारा अनिष्ट परिणाम विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवला. (सध्याच्या विज्ञानयुगातील मानवाला अध्यात्मासारख्या सूक्ष्मातील विषयाचे महत्त्व पटावे, यासाठी त्यांनी वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे संशोधनकार्य करवून घेतले.)

३. वाईट शक्‍तींच्या त्रासांविषयी संशोधन आणि उपाय

भूत, पिशाच्च आदी वाईट शक्‍ती, अतृप्त पूर्वजांचे लिंगदेह यांच्या त्रासांमुळे जगातील अनेक व्यक्‍ती त्रस्त आहेत. त्यांच्या त्रासांचे निवारण करण्याच्या नावाखाली लाखो व्यक्‍तींची आर्थिक पिळवणूक होत आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी वाईट शक्‍तींचे प्रकटीकरण आणि त्यावरील उपाय यावरही संशोधन केले. त्यातून कोणताही खर्च करावी न लागणारी देवतेच्या नामजपासारखी आध्यात्मिक उपायपद्धत त्यांनी जगाला शिकवली. या उपायांचा लाभ देश-विदेशातीलही अनेक जण घेत आहेत.

४. साधक-पुरोहित पाठशाळा

साधक-पुरोहित पाठशाळा
साधक-पुरोहित पाठशाळा

समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्‍त करणार्‍या आणि ईश्‍वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्‍या पुरोहितांना तयार करून अल्प कालावधीत मोक्षाला नेण्याच्या व्यापक उद्देशाने प.पू. डॉ. आठवले यांनी ‘साधक-पुरोहित पाठशाळे’ची स्थापना केली आहे. साधना म्हणून पौरोहित्य करणारी पुरोहितांची पिढी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. साधना म्हणून पौरोहित्य केल्यामुळे त्यांची वाटचाल लवकरच साधक-पुरोहिताकडून शिष्य-पुरोहिताकडे आणि शिष्य-पुरोहिताकडून संत-पुरोहिताकडे होईल. या पाठशाळेतील पुरोहित यजमानाला धार्मिक विधींचा अर्थ सांगून त्यांच्याकडून त्या शास्त्रशुद्ध करवून घेत असल्याने त्या विधींतून यजमानाला अधिकाधिक आध्यात्मिक लाभ होतो.

५. ‘गुरुकुला’च्या रूपाने आध्यात्मिक विश्‍वविद्यालयाच्या अंशात्मक रूपाची स्थापना

तक्षशिला, नालंदा अशा विद्यापिठांनंतर हिंदूंचे विश्‍वविद्यालय उभारण्याचा प्रयत्‍न झाला नव्हता. प.पू. डॉ. आठवले यांनी १९८९ साली अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानासाठी ज्ञान देण्यासाठी विश्‍वविद्यालय स्थापन करण्याचा त्यांचा दृष्टीकोन नाही, तर विद्यार्थ्यांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी, हा त्यांचा अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या स्थापनेमागील मुख्य हेतू आहे. आध्यात्मिक विश्‍वविद्यालयाच्या अंशात्मक रूपाची स्थापना ‘सनातन गुरुकुल’ या उपक्रमाच्या माध्यमातून झाली आहे. सध्या या गुरुकुलामध्ये जन्मतःच चांगली आध्यात्मिक पातळी आणि ईश्‍वरप्राप्तीची तळमळ असणारे साधक प्रतिदिन ११ तास शिकत आहेत. सध्या ते प्रामुख्याने अध्यात्मातील जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली धर्मग्रंथांचा अभ्यास करत आहेत. पुढे त्यांना धर्मग्रंथांबरोबरच कला, व्याकरण, योगविद्या यांसारखे विषयही शिकवले जातील. त्यांना शिकवणारेही अध्यात्मातील उन्नत साधक आणि संत असतील.

 

उपसंहार

प.पू. डॉ. आठवले यांनी धर्म, संस्कृती, कला, राष्ट्रहित अशा सर्वच विषयांत मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार साधना केल्याने सनातन संस्थेचे १०४ साधक (मार्च २०२०) अल्पावधीत संत झाले आणि आता जवळजवळ १०० साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत ! स्वार्थ आणि सत्तालोलुपतेच्या अंधःकारात चाचपडणार्‍या हिंदु समाजाला ‘धर्माचरण आणि राष्ट्ररक्षण’ यांद्वारे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेचा तेजःपुंज सूर्य दाखवून त्या दिशेने मार्गक्रमण करण्यास लावणारा हा महापुरुष आहे.

Leave a Comment