यजमानांच्या रुग्णाईत अवस्थेत आणि शस्त्रकर्माच्या वेळी अपार गुरुकृपा अनुभवल्याने सौ. पल्लवी हंबर्डे यांनी गुरुचरणी वाहिलेले कृतज्ञतापत्रपुष्प !

श्री. अमोल हंबर्डे आणि सौ. पल्लवी हंबर्डे

 

१. श्री. अमोल यांची उपायांविषयी आणि प्रकृतीची काळजी घेण्याविषयीची उदासीनता !

१ अ. श्री. अमोल (माझे यजमान) यांनी मागील दीड
मासांपासून आध्यात्मिक उपाय न करणे आणि औषधे वेळेत न घेणे

गुरुदेवा, श्री. अमोल (माझे यजमान) हे गेल्या दीड मासांपासून (माझ्या सासर्‍यांचे बायपास शस्त्रकर्म झाल्यापासून) आध्यात्मिक उपाय करत नसत आणि औषधेही वेळेत घेत नसत. त्यांनी व्यायाम करणे पूर्णतः बंदच केले होते. याची त्यांना जाणीव करून दिल्यावरही ते हो. मी करतो, असे उत्तर देऊन ते माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत.

१ आ. गावावरून परत आल्यावर अमोल यांचा तोंडवळा राकट दिसून ते श्री. अमोल आहेत, असे न वाटणे

२०.११.२०१७ या दिवशी श्री. अमोल गावावरून परत घरी आले. त्या वेळी त्यांचा तोंडवळा पुष्कळ वेगळा (राकट) दिसत होता. या वेळी गावावरून आलेले ते श्री. अमोल आहेत, असे मला वाटतच नव्हते. तेव्हा मी त्यांना तुम्ही उपाय विचारून घ्या, असे म्हटले; पण त्यांनी तशी कृती केली नाही. २३.११.२०१७ या दिवशी मी चिडून त्यांना म्हणाले, तुम्ही उपाय करण्याकडे लक्ष देत नाही, तर आता तुम्हाला देवच सांगेल.

 

२. हृदयविकाराचा झटका आल्यावर संतांनी केलेले साहाय्य

२ अ. श्री. अमोल यांच्या छातीत तीव्रतेने दुखायला लागणे
आणि आधुनिक वैद्यांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगणे

२४.११.२०१७ या दिवशी मध्यरात्री अकस्मात् त्यांचा एक खांदा पुष्कळ दुखायला लागला. पहाटे खांदा शेकल्यावर तो दुखायचा थांबला. २५.११.२०१७ या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून त्यांच्या छातीत तीव्रतेने दुखायला लागले. त्यांना पुष्कळ दुखत असूनही ते मला थोडेच दुखत आहे, असे म्हणाले. सकाळी ९.३० वाजता आधुनिक वैद्यांनी अमोल यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.

२ आ. गुरुकृपेनेच अशा प्रसंगातही स्थिर रहाता येणे

गुरुदेव, हे ऐकल्यावर आपल्या कृपेनेच मला स्थिर रहायला जमले. या परिस्थितीवर मात कशी करायची, ते आपणच सांगणार आणि बघणार आहात, असा मला विश्‍वास होता. गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे त्या वेळी माझ्याकडून सर्व कृती सहजतेने होत होत्या. मी स्थिर राहून परिस्थितीकडे सहजतेने पाहू शकत होते. त्या वेळी आपण सांगितलेला नामजपसुद्धा सहजपणे होत होता.

२ इ. परात्पर गुरु पांडे महाराज अन् देवद आश्रमातील संत यांनी नामजपादी
उपाय करायला प्रारंभ केल्याने अमोल यांना वेदना सहन करता येऊन ते नामजप करू शकणे

श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले. (मला आश्रमात आल्यावर कळले की, परात्पर गुरु पांडे महाराज आणि देवद आश्रमातील संत यांनी ११ वाजल्यापासून त्यांच्यासाठी नामजप करायला प्रारंभ केला होता. त्याचा परिणाम म्हणून श्री. अमोल यांना वेदना सहन करता येऊन ते नामजप करू शकत होते आणि शुद्धीवर होते. या वेळी मंत्रजपाचा त्यांच्यावर होणारा परिणाम मी स्वतःच्या डोळ्यांनी पहात होते.) रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेतांनासुद्धा ते नामजप करत आहेत, असे मला जाणवले.

२ ई. श्री. अमोल यांना गुरुदेवांच्या चरणी अर्पण केल्यावर
गुरुदेव ३ दिवस त्यांच्यावरील आवरण काढत असल्याचे जाणवणे

गुरुदेवा, श्री. अमोल यांना रुग्णवाहिकेतून नेतांना आपण माझ्याकडून भावप्रयोग करून घेत होता. श्री. अमोल यांच्या भोवती पुष्कळ मोठे (दोन ते अडीच फुटांपर्यंत) आवरण असल्याचे जाणवत होते. ते अल्प व्हायला पुष्कळ वेळ लागेल, असे वाटून मी अमोल यांना गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. तेव्हा गुरुदेव अमोल यांच्यावरील आवरण तीन दिवस काढत होते, असे मला जाणवले.

 

३. गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या माध्यमातून
शस्त्रकर्मासाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने पुष्कळ कृतज्ञता वाटणे

आधुनिक वैद्यांनी सांगितले, श्री. अमोल यांचे शस्त्रकर्म करावे लागणार आणि त्यासाठी पुष्कळ व्यय येणार आहे. त्या वेळी ताण न येता आपण आहात आणि आपल्याच कृपेने सर्व होणार, असे मला वाटले. तेव्हा शस्त्रकर्मासाठी साधकांकडून आर्थिक साहाय्य मिळाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, मी घरी असते, तर काय केले असते ? अधिकोष किंवा एटीएम्. यातून पैसे कसे काढायचे ?, तेही मला ठाऊक नाही. अधिकोषातील सर्व व्यवहार श्री. अमोलच बघतात. साधकांनीच आमची रुग्णालयात जाण्याची सर्व सिद्धता करून दिली. त्या वेळी आपल्याकडे पैसे असूनही त्याचा काहीच उपयोग नाही आणि आपणच साधकांच्या माध्यमातून किती सहजपणे नियोजन करून साहाय्य करता !, या विचारांनी गुरुदेव मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

 

४. बिकट प्रसंगातही गुरुदेवांनी स्थिर ठेवणे

४ अ. श्री. अमोल यांच्याकरता नामजप करतांना एका साधकासाठी नामजप करत आहे, अशा भावाने होणे आणि गुरुदेवांनी प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडते, आपण केवळ साक्षीभावाने पहायचे, असा विचार देणे

मी अमोल यांच्याकरता नामजप करतांना तेथे अमोल नसून मी एका साधकासाठी नामजप करत आहे, अशा भावाने होत होता. त्यामुळे मला वाईट वाटणे किंवा रडू येणे असे काहीही होत नव्हते. त्या वेळी मला आपणच प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे घडते आणि आपण केवळ साक्षीभावाने पहायचे, असा विचार देत होतात.

४ आ. गुरुकृपेने सर्वच कुटुंबीय स्थिर असणे

मी काहीच करू शकत नव्हते. केवळ नामजप करणे, एवढेच करत होते. त्या वेळी वाटले, कठीण प्रसंगी आपले नातेवाइक जवळ असले, तरी ते काय करणार ? सर्वकाही करणारा देवच (परात्पर गुरुदेवच) आहे. हे गुरुदेवा, या वेळी मीच नाही, तर घरी आई-बाबा (सासू-सासरे) आणि कु. अंबिका (मुलगी) हे सर्वच जण स्थिर होते, तेही आपल्याच कृपेमुळे !

 

५. श्री. अमोल यांच्या तापावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले नामजपादी उपाय

अ. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी श्री. अमोल यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी केली. त्यानंतर तीन दिवस ते सी.सी.यू. मध्ये होते. तेथे त्यांना ताप आला. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांना मंत्रजप ऐकवायला आणि ताईत बांधायला सांगितले. नंतर दुसर्‍या दिवशी त्यांचा ताप न्यून झाला.

आ. तिसर्‍या दिवशी श्री. अमोल यांना सी.सी.यू. मधून त्यांच्या खोलीत आणले. तेव्हा त्यांना पुन्हा ताप आला. सायं. ६ ते ८ या कालावधीतच ताप यायचा. गोळी देऊनही दुसर्‍या दिवशी पुन्हा ताप आला. त्यानंतर ३ दिवस परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ज्वरावरील मंत्रजप दिला. तो ३ दिवस केल्यावर तिसर्‍या दिवसापासून ताप येणे बंद झाले. या दिवशी कुठलीही गोळी न देता केवळ मंत्रजपाने ताप येणे बंद झाले, ही गुरुदेवा केवळ आपलीच कृपा !

 

६. प्रारब्ध संपवून आपत्काळाला सामोरे जाण्याची
शक्ती देत असल्याविषयी गुरुचरणी व्यक्त झालेली कृतज्ञता !

हे गुरुदेवा, आज श्री. अमोल जिवंत आहेत, ते केवळ आपल्याच कृपेमुळे ! हे गुरुदेवा, ऑक्टोबर मासापासून ते डिसेंबर मासापर्यंत घरी प्रत्येकालाच काही ना काही शारीरिक त्रास चालू आहेत. प्रारंभी सासर्‍यांचे शस्त्रकर्म झाले. नंतर अमोल यांची अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली. त्यानंतर मी गाडीवरून पडले आणि मुलगी तापाने रुग्णाईत झाली. तेव्हा वाटले, आपण आमचे प्रारब्ध संपवत आहात आणि पुढे येणार्‍या आपत्काळाची सिद्धता करवून घेत आहात. मनात कधीही कुठलाही किंतु येऊ न देता आपणच या प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती देत आहात. हे गुरुदेवा, याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

हे गुरुदेवा, आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत, तरीही हे कृतज्ञतापत्रपुष्प मी आपल्या चरणी अर्पण करते. येणार्‍या आपत्काळापूर्वी आपणच आम्हा सर्वांना आमचे स्वभावदोष आणि अहं घालवून आपल्या चरणी घ्या, हीच प्रार्थना ! – सौ. पल्लवी अमोल हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०१७)

 

जिवावर बेतलेल्या संकटातून परात्पर गुरुदेवांच्या
कृपेने सुखरूप बाहेर पडल्याची श्री. अमोल हंबर्डे यांना आलेली अनुभूती !

१. अकस्मात् छातीत दुखायला लागणे, आधुनिक वैद्यांनी तपासून रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर देवाच्या कृपेमुळे ताण न येणे आणि प.पू. डॉक्टर असा जप आपोआप चालू होणे

२५.११.२०१७ या दिवशी सकाळी अकस्मात् माझ्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी तपासून मला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. हे सगळे व्हायला अनुमाने एक घंटा लागला; पण त्या वेळी देवाच्या कृपेने मला कुठल्याच प्रकारचा ताण आला नाही. परात्पर गुरुदेव माझ्या पाठीशी आहेत आणि देवाला माझी काळजी आहे, याची मला जाणीव होती. माझा प.पू. डॉक्टर असा जप आपोआप चालू झाला.

२. आधुनिक वैद्यांनी हृदयावर तातडीने शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेणे आणि ते चालू असतांना आधुनिक वैद्यांच्या शेजारी परात्पर गुरुदेव असून ते करुणामय दृष्टीने पहात आहेत, असे दिसणे, तेव्हा देवासमोर मृत्यू यायलाही भाग्य लागते, असे वाटणे

मला रुग्णालयात नेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी तातडीने शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सिद्धता चालू केली. शस्त्रकर्म चालू झाले त्या वेळी मला भूल दिली नव्हती. तेव्हा आधुनिक वैद्य माझ्याशी बोलत होते. काही वेळाने मला आधुनिक वैद्यांच्या शेजारी परात्पर गुरुदेव उभे आहेत आणि ते माझ्याकडे करुणामय दृष्टीने पहात आहेत, असे दिसले. माझ्या मनात विचार आला, परात्पर गुरुदेव इथे आहेत ना ! मग काही काळजी नाही. आता परात्पर गुरुदेव बघतील, असे वाटून मी निश्‍चिंत होऊन डोळे बंद केले. माझ्या मनात आले, त्यांची (देवाची) इच्छा असेल, तर हृदय चालू राहील, नाहीतर बंद होईल आणि त्यांच्यासमोर हृदय बंद पडले, तरी काही हरकत नाही. देवासमोर मृत्यू यायलाही भाग्य लागते. नंतर मला शांत झोप लागली.

३. शस्त्रकर्म झाल्यावर आधी छातीवर जाणवत असलेला दाब नाहीसा होऊन हलकेपणा जाणवणे

शस्त्रकर्म एक घंटा चालले. त्यानंतर मला जाग आली. आधुनिक वैद्यांनी मला विचारले, आता कसे वाटते ? छातीत दुखते का ? त्या वेळी मला आधी छातीवर जाणवत असलेला दाब नाहीसा झाला आहे, असे वाटले. मला हलकेपणा जाणवत होता आणि दुखणेही नाहीसे झाले होते.

४. देवाने संतांच्या माध्यमातून केलेली कृपा !

माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर पू. गाडगीळकाका आणि सद्गुरु सत्यवान कदम यांनी जप सांगितला. देवद आश्रमातून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझ्यासाठी भ्रमणभाषवरून मंत्र म्हटला. त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. माझ्यासाठी तीन संत आश्रमात सतत जप करत होते. मी रुग्णालयात असतांना ते प्रतिदिन माझी विचारपूस करत होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यासाठी विभूती आणि अष्टगंध पाठवले. तेव्हा देव संतांच्या माध्यमातून किती काळजी घेतो, याची मला प्रचीती आली.

हे श्रीकृष्णा, परात्पर गुरुदेवा, आपल्याच कृपेने ही अनुभूती आली. आपल्याच कृपेने मी जिवावर बेतलेल्या संकटातून सुखरूप बाहेर पडलो. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

– आपल्या चरणांची धूळ होण्यास आतुरलेला,

श्री. अमोल हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.