आर्यांचे भारतावरील आक्रमण : राजकीय आणि धार्मिक स्वार्थासाठी रचलेले एक कुभांड

आर्यांनी भारतावर आक्रमण करून तो पादाक्रांत केला’, असा जावईशोध ब्रिटिशांनी स्वतःच्या आक्रमणाच्या समर्थनार्थ लावला. त्या काल्पनिक उपपत्तीद्वारे (theory) पाश्‍चात्त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्या खोडसाळ उपपत्तीचे सांगोपांग खंडन करण्याकरता डॉ. डेव्हिड फ्रॉली यांनी वर्ष १९९४ मध्ये एक पुस्तक लिहिले. नाव आहे : The Myth Of The Aryan Invasion Of India (आर्यांच्या भारतावरील आक्रमणाची खोटी नि काल्पनिक कथा), प्रकाशक Voice of India, New Delhi ! जेमतेम ५६ पानांची ही पुस्तिका संशोधनाने भरलेली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाला अभिमान वाटेल, असे आहे. प्रस्तुत पुस्तकातील शेवटच्या, म्हणजे समारोप-रूप छेदिकेचा प्रा. मनोहर रा. राईलकर यांनी केलेला हा स्वैर मराठी अनुवाद आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

डॉ. डेव्हिड फ्रॉली

१. आर्य-आक्रमण सिद्धांताचे भारतीय जीवनावर झालेले दुष्परिणाम

आर्य-आक्रमण सिद्धांताचे आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर कोणकोणते दुष्परिणाम झाले आहेत आणि होत आहेत, हे पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच आक्रमण-सिद्धांताचा पुरस्कार करून त्यांनी काय काय साध्य केले, हेही समजून घेतले पाहिजे.

डॉ. डेव्हिड फ्रॉली लिखित The Myth Of The Aryan Invasion of India या ग्रंथाचे मुखपृष्ठ

१ अ. आर्य आणि द्रविड नावाचे दोन भिन्न वंश असल्याचे भासवणे

या सिद्धांतामुळे उत्तरेची आर्य संस्कृती आणि दक्षिणेची द्रविड संस्कती, असे (देशाचे) दोन (काल्पनिक) भाग पाडता आले. त्यातून परस्परांत शत्रुत्वाची भावना निर्माण करता आली आणि हिंदूंमध्ये भेदभाव पेरता आला. आर्य आणि द्रविड नावाचे दोन भिन्न वंश असल्याची भावना वाढीस लावता आली; मात्र प्रत्यक्षात, असे दोन भिन्न वंश असल्याचा कोणताही शास्त्रशुद्ध पुरावा नाही. त्यातून उद्भवलेले ताणतणाव दुर्दैवाने आजही टिकून राहिले आहेत.

१ आ. इंग्रजांना त्यांनी केलेल्या भारतावरील आक्रमणामागे आयते कारण मिळणे

भारतावर इंग्रजांनी केलेल्या आक्रमणाच्या समर्थनाकरता त्यांना एक कारण मिळाले. नाहीतरी पूर्वी आर्यांनीही भारतावर आक्रमण केले होतेच, असे म्हणून त्यांनी स्वतःच्या आक्रमणाचे समर्थन केले. त्याचप्रमाणे नंतर मुसलमानांना आणि इतर आक्रमकांनाही ते आयतेच कारण मिळाले.

१ इ. हिंदु संस्कृतीचे मूळ स्वरूप पाश्‍चात्त्य संप्रदाय आणि संस्कृती यांच्याखाली दाबण्यात येणे

वैदिक संस्कृतीचा उदय मध्यपूर्वेतील संस्कृतीनंतरचा असून ती त्याच संस्कृतीपासून जन्माला आली, असेही प्रतिपादन करायला कारण मिळाले. भारताची प्राचीन संस्कृती एकसंध नसून ती अनेक संस्कृतींच्या संकरातून निर्माण झाली, असे प्रतिपादता आले; हडाप्पा संस्कृती कशी लुप्त झाली, हे वास्तव दाबून ठेवता आले आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे तुकडे करून दाखवता आले. मध्यपूर्वेचे भौगोलिक सान्निध्य आणि बायबल अन् ख्रिस्ती संस्कृती यांच्यातील संबंधांच्या साहाय्याने, हिंदु संस्कृतीचे मूळ रूप पाश्‍चात्त्य संप्रदाय आणि संस्कृती यांच्याखाली दाबून टाकता आले.

१ ई. भारतीय संस्कृती ही ग्रीक संस्कृतीपासून उदयाला आल्याची दाखवणे

वास्तविक पाहिल्यास गणित, ज्योतिषशास्त्र, यांसंबंधीचे उच्च किंवा प्रगत पातळीवरचे पुष्कळ उल्लेख वेदांमध्ये आढळतात. असे असले, तरी आक्रमण-सिद्धांताच्या आधारे, भारतीय संस्कृती खरे म्हणजे ग्रीक संस्कृतीपासूनच उदयाला आली, असे प्रस्थापित करता आले आणि त्यावरून मूळ भारतीय संस्कती ग्रीस, युरोप, येथील संस्कृतींच्या तुलनेत किती हीन पातळीची आहे, असेही दाखवता आले.

१ उ. ‘ब्राह्मणांनी मागासवर्गीयांवर आक्रमण केले’, हे कारस्थान मार्क्सवाद्यांना रचता येणे

मार्क्सवाद्यांनाही ते एक आयतेच कोलीत मिळाले. ‘परकीय ब्राह्मणांनी स्थानिक हीन जातींच्या शुद्रांवर आक्रमणे केली’, असे प्रतिपादन करून त्यांना वर्गविग्रहाच्या तत्त्वाचा प्रसार करता आला. इतकेच काय; पण आक्रमण-सिद्धांताचा आधार घेऊन परकीय ब्राह्मणांनी येथील स्थानिक मागासवर्गीयांवर आक्रमण केले आणि त्यांना शूद्र बनवले, असाही प्रचार करण्याचे त्यांचे कारस्थान आजही यशस्वी होत आहे.

१ ऊ. संपूर्ण हिंदु परंपरा आणि प्राचीन वाङ्मय यांना क्षुद्र ठरवता येणे 

आर्य-आक्रमण सिद्धांतामुळे केवळ वेदांनाच हीन लेखता आले, असे नसून पुराणांनाही क्षुद्र ठरवता आले. बुद्ध, कृष्ण यांच्याही पूर्वी होऊन गेलेल्या शेकडो पराक्रमी राजांच्या इतिहासावर ‘काल्पनिक भारुडे’ असल्याचा आरोप करण्याचे कारस्थान साधता आले. हे राजे वेदपूर्व आणि अनार्य होते, असे सिद्ध करण्यात आले. वास्तविक भारतीय युद्धात (महाभारतात) भारतातील सर्व क्षत्रियांनी, वीरांनी, योद्ध्यांनी उपस्थिती लावली होती; पण ते युद्ध फालतू चकमकींच्या पातळीवर ढकलण्याचे कारस्थानही साधता आले. महर्षि व्यासांनी तिचे अकारण उदात्तीकरण केले, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवता आला. थोडक्यात, आक्रमण सिद्धांताच्या आधारावर संपूर्ण हिंदु परंपरा आणि प्राचीन वाङ्मय यांना क्षुद्र ठरवता आले. या तत्त्वाच्या आधाराने हिंदूंच्या वेदपुराणांना ‘भाकडकथां’च्या पातळीवर आणि ऋषिमुनींच्या चरित्रांना ‘कल्पित कथां’च्या पातळीवर ढकलता आले.

२. आर्य आक्रमणाच्या थोतांडामागील मूळ उद्देश

ह्या सर्व खटपटी-लटपटींमागील उद्देश काय, तर हिंदूंच्या तुलनेत पाश्‍चात्त्य संस्कृती, संप्रदाय, राजकीय पद्धती कशा श्रेष्ठ आहेत, असे प्रतिपादन करून भारतावर सामाजिक आणि आर्थिक दडपशाहीसुद्धा करता आली. यासाठी पदोपदी आक्रमण सिद्धांताचा आधार घेतला गेला. परिणामतः ‘आपल्या ऋषिमुनींचे तत्त्वज्ञान, आपली सभ्यता आणि संस्कृति इत्यादी सांगितल्या जातात, तेवढ्या उच्च पातळीच्या नाहीत’, असा हीनगंड हिंदूंच्या मनात रुजवता अन् वाढवता आला आणि त्यांनाही आपल्या हीन संस्कृतीची लाज वाटू लागली. आपल्या सभ्यता आणि संस्कृती यांना कोणताही शास्त्रीय अथवा ऐतिहासिक पाया नसून ती सारी काल्पनिक भारुडे आहेत, अशी भावना हिंदूंच्या अंतःकरणात दृढमूल झाली. सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी प्रगती प्रथम मध्यपूर्वेत, नंतर युरोपात होऊन मग तिचा प्रसार आपल्या देशात झाला, असे त्यांनाच वाटू लागले. पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत आपली संस्कृती नि सभ्यता क्षुद्र आहे, याबद्दल त्यांची मनोमन खात्री होऊ लागली.

(टीप : आर्य हे टोळ्या-टोळ्यांनी भारतावर आक्रमण करून आले, असे आजही काही विद्वान लिहितात, तेव्हा खेद होतो. मग त्यांना पत्र लिहिणे शक्य असेल, तर मी लिहितो. आणि प्रस्तुत पुस्तकाचा संदर्भ देऊन स्वतःच्या ऐतिहासिक कल्पना सुधारून घेण्यास सुचवतो. – अनुवादक)

३. ‘फोडा आणि झोडा’च्या कुटिल नीतीचा पाश्‍चात्त्य विद्वानांनी वापर करणे

खरेतर ह्या दृष्टीकोनाला शास्त्रीय अथवा पुरातत्वीय संशोधनाचा काडीचाही आधार नाही. त्यातून केवळ सांस्कृतिक साम्राज्यवादच डोकावतो. हिंदूंना हीन लेखायचे आणि त्यांच्यात नाना प्रकारचे भेद वाढवायचे. ‘फोडा आणि झोडा’ ही जी कुटिल नीती इंग्रजांनी आपल्या राजकीय आक्रमणाच्या समर्थनाकरता पसरवली होती, तीच पाश्‍चात्त्य विद्वानांनी वेदवाङ्मयाच्या बौद्धिक क्षेत्रातही अवलंबली.

४. सत्य इतिहास लिहिणार्‍यांची मार्क्सवाद्यांनी ‘जातीय’ म्हणून केलेली हेटाळणी

कहर म्हणजे वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष पुरातत्वीय संशोधनाच्या, शास्त्रशुद्ध आधारांच्या अन् पुराव्यांच्या साहाय्याने ज्यांनी सरस्वती संस्कृतीचा मागोवा घेतला आणि आक्रमण सिद्धांताला आव्हान दिले, त्यांच्यावरच, दुर्दैवाने राजकीय हेत्वारोप करण्यात आला. तोसुद्धा कुणाकडून ? स्वतःचाच राजकीय हेतु साधण्याकरता आक्रमण सिद्धांताचे कातडे ज्यांनी सातत्याने पांघरले त्यांनी, म्हणजे भारतातीलच मार्क्सवाद्यांनी ! गंमत म्हणजे, भारतात बहुसंख्येने नांदणार्‍या हिंदूंना अभिमान वाटावा, असा सज्जड पुरावा ज्यांनी पुढे आणला त्यांचीच मार्क्सवाद्यांनी ‘जातीय’ म्हणून हेटाळणी केली.

५. आर्य आक्रमण सिद्धातांमागे राजकीय आणि धार्मिक स्वार्थ, हे एकमेव कारण !

सारांश, आक्रमण-सिद्धांताचा अवलंब करण्यामागे कोणतेही वाङ्मयीन अथवा पुरातत्त्वीय कारण नसून केवळ राजकीय आणि धार्मिक स्वार्थ हे एकमेव कारण होते. हे करण्याकरता चिकित्सक बुद्धीऐवजी स्वार्थी पूर्वग्रहांचाच आधार घेण्यात आला. होय, हे पूर्वग्रह, कदाचित्, जाणून बुजून करून घेतलेले नसतीलही ! ज्या राजकीय किंवा पंथनिष्ठ विचारांचा मार्ग त्यांनी वर्षानुवर्षे केला होता, त्यांच्या प्रभावामुळे स्वच्छ आणि स्वतंत्र विचार करण्याच्या त्यांच्या शक्तींवर झापडेही आली असतील. जगाकडे पहातांना आपल्याच संस्कृतीबद्दलच्या पूर्वग्रहांचा पुनर्विचार आताशी कुठे आपण करू लागलो आहोत. जागतिक संदर्भात त्याची आवश्यकताही आहे. एकोणिसाव्या शतकातील राजकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्यासुद्धा पूर्वग्रहदूषित आणि कालबाह्य असल्याचे जर आढळते, तर इतिहासाचे अवलोकन करतांनाही एकोणिसाव्या शतकात पूर्वग्रदूषित आणि कालबाह्य दृष्टीचा वावर स्वाभाविकच म्हणायचा.

६. जगातील इतरही संस्कृतींचा इतिहास पुनःश्‍च तपासून पाहिला जाईल, अशी अपेक्षा !

पुरातत्व शास्त्राकडे नव्या दृष्टीने पहाण्याचे काम अलीकडे चालू झाले आहे. विशेषतः स्थानिक विद्वान आपलाच पूर्वेतिहास जेव्हा नव्याने तपासून पहाण्याचे अवघड कार्य अंगावर घेतात, तेव्हा नव्या दृष्टिकोनांचा अवलंब अटळ ठरतो. त्यातही भारताच्या प्राचीन इतिहासातील अर्थ चुकीचे लावल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे नव्याने पुनरावलोकन करणे आणि त्यांचे यथातथ्य दर्शन घेणे यांची आवश्यकताही नाकारता येणार नाही. मध्यपूर्वेबाहेरील आणि मध्यपूर्व संस्कृती यांची वैशिष्ट्ये नेमकी समजून घेण्यातील अपात्रता, हाच वेद आणि मध्यपूर्वेचा इतिहास यांचा यथातथ्य अर्थ लावण्यातील मुख्य अडसर आहे. जगभर नव्याने सापडलेल्या पुराव्यांच्या प्रकाशात जगातील इतरही संस्कृतींचा इतिहास पुनःश्‍च तपासून पाहिला जाईल, अशी अपेक्षा करायला आता अडचण वाटत नाही.

७. देशाला गौण स्थान देणारी पाश्‍चात्यांची पुस्तके
भारतातील विद्यापिठांमध्ये वापरली जाणे, हे आश्‍चर्यकारक !

युरोपीय विद्वानांनी मांडलेल्या आक्रमण सिद्धांताला कुणीच अगदी हिंदूंनीसुद्धा आव्हान दिलेले नाही, हे दुर्दैव ! त्यातही वसाहतवादाला सातत्याने विरोध करणार्‍या मार्क्सवाद्यांनीसुद्धा अशा प्रकारची वसाहतवादी मीमांसा स्वीकारावी, हे तर विलक्षणच म्हणायला हवे. स्वामी दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद यांनी हा सिद्धांत स्पष्टपणे नाकारला होता. तरीही बहुतेक हिंदु विद्वान अजाणतापणे तो आजही स्वीकारतात आणि हिंदूंनाच गौण स्थान देणारी हिंदु इतिहासाची मीमांसा करण्याचे स्वातंत्र्य पाश्‍चात्त्य अन् विशेषतः ख्रिस्ती विद्वाने यांना घेऊ देतात. मॅक्सम्यूलर, ग्रिफिथ आणि मोलियर विल्यम्स् यांच्यासारख्या १९ व्या शतकातील ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेली वेदांची भाषांतरे कित्येक हिंदू केवळ स्वीकारतात. एवढेच नव्हे, तर त्यांना आदराने मान्यताही देतात. ख्रिस्त्यांना हिंदु धर्म स्वीकारायला प्रवृत्त करेल, असा बायबलचा आणि बायबलकालीन इतिहासाचा अर्थ लावला, तर आधुनिक ख्रिस्ती त्याचा स्वीकार करतील का ? मग आपली संस्कृती आणि इतिहास यांचे चुकीचे अर्थ लावणारी, त्यांना अन् आपल्या देशाला गौण स्थान देणारी पाश्‍चात्त्यांची पुस्तके अद्यापही भारतातील विद्यापिठे वापरतात, हे नवल नव्हे का ?

८. आपली संस्कृती आणि धर्म यांच्याविषयी मांडलेले चुकीचे
विचार बिनबोभाट स्वीकारणे, म्हणजे सहिष्णुता नसून ती केवळ आत्मवंचनाच !

सामाजिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रहांसंबंधांत केलेल्या टीकेविषयी पाश्‍चात्त्य विद्वानांचा गट फार हळवा आहे. वैदिक इतिहासाविषयीच्या पूर्वग्रहांविषयी जर हिंदु पंडितांनी ठाम उभे रहायचे ठरवले, तर प्राचीन इतिहासातील कित्येक घटनांचे पुनरावलोकन करता येईल. कारण आजवर पाश्‍चात्त्यांनी लावलेले कोणतेही अर्थ वस्तुनिष्ठ टीकेपुढे टिकाव धरूच शकणार नाहीत; पण ‘स्वस्थच बसायचे’, असे हिंदु पंडितांनी ठरवले, तर ते अर्थ तसेच चालू रहातील आणि मग त्यातून होणार्‍या परिणामांचा दोष हिंदु पंडित दुसर्‍या कुणाला देऊ शकणार नाहीत, हे निर्विवाद आहे. ही गोष्ट अशी सहजासहजी उडवून लावण्यासारखी नाही. त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण कोणत्याही संस्कृतीचे मूल्यांकन ऐतिहासिकदृष्ट्या कसे होते, यातूनच सामाजिक आणि बौद्धिक संबंधात जगाने त्या संस्कृतीच्या भवितव्याकडे कसे पहावे, हे ठरत असते. आपल्या संस्कृती आणि धर्म यांच्याविषयी मांडलेले चुकीचे विचार बिनबोभाट स्वीकारणे, त्यांच्याविषयी कसलाही आक्षेप उपस्थित न करता ते सहन करत रहाणे, म्हणजे सहिष्णुता नव्हे, तर ती केवळ आत्मवंचनाच होय.

 

डॉ. फ्रॉली यांची भारतीय विद्वानांना विनंती !

स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी मांडलेली
उज्ज्वल परंपरा आणि दिव्य भविष्य यांचा जागर होणे आवश्यक !

अलीकडेच काही वर्षांपूर्वी मेहेरगड येथे पुराणवास्तूशास्त्राच्या संशोधकांनी केलेल्या उत्खननावरून निखळ भारतीय संस्कृती आणि सभ्यता इ.स. पूर्व ७ सहस्र वर्षांपूर्वीची असल्याचे उघड होते. ख्रिस्तापूर्वी निदान ३ सहस्र वर्षांपूर्वीची येथील संस्कृती अतिशय प्रगत आणि सिंधु अन् सरस्वती नदीच्या खोर्‍यांत कितीतरी नगरे वसलेली असल्याचेही आढळले आहे. ख्रिस्तयुगापूर्वी २ सहस्र वर्षांपूर्वी वैदिक काळात जेव्हा सरस्वती नदी आटली, तेव्हा तेथील समाज पूर्व दिशेला गंगेपाशी सरकला असावा आणि तिथे ती आणखी भरभराटीला आली असावी. ‘भारतीय लोक बाहेरून कोठून तरी भूमीवर आक्रमण करून इथे आले’, ही कल्पना आता धुक्यासारखी वितळून गेली आहे. अगदी प्रागैतिहास-कालापासून ही संस्कृती आणि सभ्यता अव्याहतपणे अस्तित्वात असल्याचे सज्जड पुरावे मिळाले आहेत. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही गेली ५० वर्षे येथील पंडित स्वतःच्या मूळ स्रोताविषयी नवीन संशोधन न करता अजूनही पाश्‍चात्त्यांचीच नक्कल करत राहिले आहेत. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद या महान विभूतींनी मांडलेली उज्ज्वल परंपरा आणि दिव्य भविष्य यांचा त्यांना विसरच पडला आहे. एकीकडे आध्यात्मिक मार्गदर्शनाकरता पाश्‍चात्यच आपल्याकडे पहात असतांना दुसरीकडे आपले बुद्धिवंत त्यांच्या पुढे अगदीच लाचारीने वागतात. असे जरी नसले, तरी त्यांचीच महती गात आणि त्यांचाच अनुनय करतांना आढळतात.

डेव्हिड फ्रॉली (David Frawley) हे एक अमेरिकी विद्वान असून हिंदु धर्माच्या प्रेमात पडून त्यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केला. त्यांनी ‘वामदेव शास्त्री’ असे नवीन नावही धारण केले. वेदांचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्यांना ‘वेदाचार्य’ अशी पदवीसुद्धा मिळाली. खरे तर, त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आयुर्वेद होय. त्या व्यतिरिक्त त्यांच्या चिंतनात वेद, प्राचीन इतिहास, पुरातत्वीय उत्खननातून सापडलेल्या पुराव्यांच्या अध्ययनातून प्राचीन इतिहासाचे पुनरावलोकन इत्यादी विषय असतात. अमेरिकेतील वेदांचा अभ्यास करणार्‍या संस्थेत सध्या ते प्राध्यापक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment