भारतात २०० वर्षांपूर्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया !

कुशल नेत्रचिकित्सक राजा सरफोजी

१. आजच्या हिंदूंमधील गुलामगिरीची मानसिकता !

शीर्षक बघून आपण आश्‍चर्यचकीत झालात ना ! बरोबर आहे, नेहमी असेच होते. जेव्हा आम्ही भारतातील प्राचीन काळातील ज्ञान किंवा इतिहासातील एखाद्या पंडिताविषयी काही सांगतो, तेव्हा त्याच्यावर कोणी विश्‍वास ठेवत नाही. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोन असा बनवला गेला आहे की, जणू आम्ही कोणी नाहीच ! जे काही आम्हाला मिळाले आहे, ते पाश्‍चिमात्य आणि इंग्रज यांची देणगी आहे. खरेतर वास्तविकता या उलट आहे. पाश्‍चिमात्यांनी अनेक भारतीय ग्रंथांमधून तसेच प्राचीन भाषांत लिहिलेल्या कागदपत्रांतून ज्ञान प्राप्त केले आहे; परंतु गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे आम्ही आपले ज्ञान आणि पंडित यांना विसरलो आहोत.

२. नेत्ररोग विशेषज्ञ राजा सरफोजी !

दक्षिण भारतात तंजावर आहे. वर्ष १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मराठा साम्राज्य स्थापन केले. त्यांनी आपला भाऊ व्यंकोजी याला तंजावरचे दायित्व दिले. अठराव्या शतकाच्या अंतापर्यंत तंजावर येथे मराठा साम्राज्य होते. त्या दरम्यान ‘सरफोजी’ नावाचा विद्वान राजा होऊन गेला. त्यांनी वर्ष १७९८ ते वर्ष १८३२ या कालखंडात तंजावर येथे राज्य केले. राजा सरफोजी यांना नेत्ररोगांचा विशेषज्ञ म्हणूनही लोक ओळखत असत.

या पार्श्‍वभूमीवर चेन्नई येथील ‘शंकरा नेत्रालय’ या प्रसिद्ध नेत्र चिकित्सालयातील विशेषज्ञ आणि प्रयोगशाळेतील मदतनीस यांच्या गटाने तमिळनाडू सरकारच्या पुरातत्व विभागाचे अध्यक्ष तसेच कांचीपुरम् विश्‍वविद्यालयाचे सेवानिवृत्त कुलपती डॉ. आर्. नागस्वामी यांच्यासमवेत राजा सरफोजी यांचे वंशज श्री. बाबा भोसले यांची भेट घेतली. भोसले साहेबांकडे राजा सरफोजी यांनी त्या काळात उपचार केलेल्या रुग्णांची कागदपत्रे मिळाली. ही सर्व कागदपत्रे मोडी किंवा प्राकृत भाषेत लिहिली होती. ही कागदपत्रे ‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली.

३. प्राचीन भारतात डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियांना जागतिक स्तरावर कोणतेही स्थान नाही !

प्राप्त झालेल्या नोंदींनुसार राजा सरफोजी ‘धन्वंतरी महल’ नावाचे डोळ्यांचे चिकित्सालय चालवत होते. एक इंग्रजी वैद्य मैक्बीन हे त्यांचे सहकारी म्हणून काम पहात होते. शंकरा नेत्रालयाचे सल्लागार डॉ. ज्योतिर्मय बिस्वास यांनी सांगितले, ‘या वर्षी दुबईमध्ये आयोजित केलेल्या ‘वल्ड ऑप्थॅल्मोलॉजी काँग्रेस’ या जागतिक संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये मी याच विषयावर माझा शोधनिबंध प्रस्तुत केला. त्यावेळी विशेषज्ञांनी मान्य केले की, नेत्र चिकित्सा पद्धतीच्या क्षेत्रात युरोपीय चिकित्सकांना सर्व यशाचे मानकरी ठरवले जाते; परंतु त्या काळात भारतात डोळ्यांवर केलेल्या शस्त्रक्रियांना कोणतेही स्थान नाही.’

४. राजा सरफोजी यांची नेत्रचिकित्सा या क्षेत्रातील वाखाणण्याजोगी कुशलता !

डॉ. बिस्वास तसेच शंकरा नेत्रालय, चेन्नई यांच्या एका गटाने राजा सरफोजी यांच्या कालखंडातील हस्तलिखित प्रतींमध्ये ५ ते ६० या वयोगटातील ४४ रुग्णांच्या नोंदी मिळवल्या. मिळालेल्या अंतिम नोंदींनुसार राजा सरफोजी यांनी ९ सप्टेंबर १८२७ या दिवशी एक शस्त्रक्रिया केली होती. त्यात ‘विशेष निळ्या रंगाच्या वटी (गोळी)’चा उल्लेख सापडतो. या वटीचा उल्लेख आधीही अनेक वेळा झाला आहे; परंतु या वटीची रचना किंवा यामधील रासायनिक घटकांसंदर्भात कोणालाही माहिती नाही. राजा सरफोजी यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर या निळ्या वटीचे चार डोस दिल्याचे पुरावेसुद्धा मिळतात.

प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार शस्त्रक्रियेमध्ये बेलाडोना पट्टी, माशांचे तेल, तसेच पेपरमिंट यांचा उपयोग केल्याचा उल्लेख मिळतो. त्याचवेळी जे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सिद्ध होत, त्यांना बरे वाटल्यावर प्रोत्साहन रक्कम किंवा बक्षीस म्हणून ‘दोन रुपये ’ दिले जात. त्याकाळी ती मोठी रक्कम होती.

५. पाश्‍चिमात्य नि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांच्या षड्यंत्राला हाणून पाडणे आवश्यक !

सांगण्याचे तात्पर्य, भारतीय इतिहास किंवा संस्कृती यांमध्ये पुष्कळ काही लपलेले आहे, जे जाणून बुजून आज लपवण्यात आले आहे. ते समजून घेऊन जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, अन्यथा पाश्‍चिमात्य किंवा डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांकडून भारतियांना न्यूनगंडाने पछाडण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्याचे कार्य कसे होईल ? आजकालच्या मुलांना ‘मराठा साम्राज्य’ आणि ‘विजयनगर साम्राज्य’ या नावाने गौरवशाली शौर्याचा इतिहास आहे’, हेसुद्धा ठाऊक नाही. त्यांना केवळ मुघलांचा इतिहास ठाऊक आहे.

संदर्भ : श्री. सुरेश चिपळूणकर यांचे chiplunkar1.rssing.com हे संकेतस्थळ

Leave a Comment