“हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन सनातन संस्थेचे साधक कार्य करत आहेत !” – नैमिष सेठ, रा.स्व. संघ

भोपाळमध्ये धर्मरक्षक संघटनेच्या वतीने तृतीय प्रांतीय हिंदू अधिवेशन

डावीकडून श्री. योगेश व्हनमारे, श्री. योगेश पटवाजी, दीपप्रज्वलन करतांना श्री. नैमिष सेठ आणि श्री. विनोद यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – हे वर्ष गुरु गोविंदसिंह यांचे ३५० वे जयंतीवर्ष आहे. त्यांच्या कार्यकाळात चमकोर लढाईत केवळ ४० खालसा योद्ध्यांनी ३ सहस्र मोगलांना पराभूत केले होते. गुरु गोविंदसिंह यांच्या खालसा पंथात हिंदूंनी धर्मयोद्ध्याप्रमाणे सहभागी होणे अपेक्षित आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आता आपल्याला जातपात विसरून धर्मयोद्धे बनले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भोपाळ समरसता विभागप्रमुख श्री. नैमिष सेठ यांनी केले. ते येथील धर्मरक्षक संघटनेच्या वतीने आसूदानी चॅरिटेबल ट्रस्टच्या धर्मशाळेत आयोजित केलेल्या तृतीय प्रांतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर धर्मरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनोद यादव, संघटनेचे अध्यक्ष श्री. योगेश पटवा, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आदी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी शौर्य आणि स्वाभिमान जागृत करणे आवश्यक ! – योगेश व्हनमारे

हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे या अधिवेशनात म्हणाले, ‘‘भारतात आज हिंदु बहुसंख्य असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे. स्वतःच्या हक्कांसाठी हिंदूंना झगडावे लागत आहे. हिंदू स्वतःचे शौर्य आणि स्वाभिमान विसरल्यामुळेच त्यांची अशी स्थिती झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी स्वतःमधील शौर्य आणि स्वाभिमान जागृत करण्याची आवश्यकता आहे.’’

हिंदूंच्या समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय ! – आनंद जाखोटिया

‘हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ?’ या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, ‘‘आज धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सर्वत्रचे शासनकर्ते हिंदूंना दुय्यम वागणूक देत आहेत. यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे.’’

आता सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाचे पूजन करण्याची आवश्यकता ! – योगेश परमार

मुख्यमंत्री जनकल्याण योजनेचे भोपाळ नगर संयोजक श्री. योगेश परमार म्हणाले, ‘‘आता सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाची पूजा आणि भक्ती करण्याची आवश्यकता आहे. चुकीचा इतिहास शिकवला जात असल्यामुळे हिंदू आपले शौर्य विसरले आहेत. आपल्या आसपासच्या हिंदूंचे संघटन केले, तर भारत हिंदु राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.’’ ‘धर्माचरण करून आदर्श हिंदु राष्ट्र-संघटक बनणे, ही काळाची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी केले. धर्मरक्षक संघटनेचे श्री. आकाश यादव यांनी सांगितले की, धैर्य, वेळेचे पालन करणे, साहस, शिस्त आणि निर्णयक्षमता असणे, ही धर्मरक्षक संघटनेची पंचतत्त्वे आहेत.

क्षणचित्रे

१. सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढतांना नैमिष सेठ म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे साधक या अधिवेशनात उपस्थित आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय घेऊन ते कार्य करत आहेत. त्यांना भेटून आनंद झाला.’’

२. सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन अधिवेशनस्थळी लावण्यात आले होते.

३. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदु राष्ट्र, आचारधर्म, तसेच क्रांतीकारक यांच्याविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन अधिवेशनस्थळी लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment