राष्ट्रीय गोसेवा परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या प्रदर्शनाला केंद्रीय कृषीराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली !

पुणे – गोआधारित उत्पादनांचा अधिकाधिक वापर करा. त्याने गोपालन आणि गोसंवर्धन यांना चालना मिळेल, असे आवाहन केंद्रीय कृषीराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. गोविज्ञान संशोधन संस्था, जनमित्र सेवा संघ आणि यशोदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आणि ७ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोसेवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी पालकंमत्री श्री. गिरीश बापट, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. हुकुमचंद सावला, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे श्री. राजेंद्र फडके, परिषदेचे आयोजक श्री. महेंद्र देवी, श्री. मिलिंद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. गोपालन, गोसंवर्धन, तसेच गोआधारित उत्पादनांचा उद्योग यांचा चालना मिळावी, या उद्देशाने या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कामधेनू आणि गोवंश या दोन विशेषाकांचे प्रकाशन करण्यात आले.

‘कामधेनू’ या विशेषांकाचे प्रकाशन करतांना मान्यवर

श्री. रुपाला पुढे म्हणाले,

१. गायींचे वसतीगृह ही संकल्पना महाराष्ट्रात राबवण्याचे विचाराधीन आहे. ज्यांना गाय प्रत्यक्ष पाळणे शक्य होत नाही, ते गायींना दत्तक घेऊन त्यांच्या वेळेनुसार वसतीगृहात गायीला भेटू शकतात. गायीचे आणि आपले नाते निर्माण होणे आवश्यक आहे.

२. ब्राझीलने भारतातून गीर गायीच्या जाती नेऊन त्यांची पैदास केली. आजही गीर जातीच्या गायी ब्राझीलमध्ये सर्वाधिक आहेत. ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा पुष्कळ लाभ झाला.

३. सध्या गायी इतस्ततः फिरतात. त्यांचे चांगले प्रजनन होण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होते. गोकुळ ग्राम मिशनच्या अंतर्गत गायींचा चांगला संकर होऊन उत्तम गायींची पैदास होईल, यासाठी अभियान चालू करण्याचा मानस आहे.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘मानवजातीचे हित गोहितामध्ये दडलेले आहे. जुने धान्य जे दारू व्यवसायासाठी दिले जाते, ते गोशाळांना द्यायला हवे. गोमंत्रालय काढण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.’’ केंद्र स्तरावर गोवंशहत्या बंदी करण्यात यावी, अशी मागणी श्री. हुकुमचंद सावला यांनी केली.

गायीच्या जिभेचा स्पर्श आध्यात्मिक आणि ज्योतिषदृष्ट्या उपयुक्त

अनेक जण गायीला लांबूनच चारा घालतात; पण आध्यात्मिकदृष्ट्या गायीच्या जीभेचा आपल्याला स्पर्श होणे महत्त्वाचे आहे. त्याने ग्रहदोषही दूर होतात, असे श्री. रुपाला यांनी सांगितले, तर श्री. हुकुमचंद सावला यांनीही ‘गायीने आपला हात चाटला, तर दोष नष्ट होतात’, असे सांगितले.

 

सनातनच्या वतीने लावलेल्या प्रदर्शनाला केंद्रीय कृषीराज्यमंत्र्यांनी भेट दिली !

सनातन संस्थेच्या वतीनेही आयुर्वेदिक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. याला केंद्रीयकृषी राज्यमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांनी भेट दिली. ‘आपले कार्य चांगले आहे. आयुर्वेद प्रत्येक घरात जाणे आवश्यक आहे’, असा अभिप्राय त्यांनी दिला. आयोजक महेंद्र देवी, समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे आदी मान्यवरांनीही कक्षाला भेट दिली. कार्यक्रमस्थळी पंचगव्य, गोआधारित अन्य संस्थांची उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment