मासिक धर्माच्या काळात होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासणे

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका, आध्यात्मिक त्रास
नसलेली साधिका आणि संतपद प्राप्त केलेली साधिका यांच्यावर
त्यांच्या मासिक धर्माच्या काळात होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासणे

पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, वर्षभराच्या साठवणीतील वस्तूंना स्पर्श न करणे, विश्रांती घेणे इत्यादी. मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने एक चाचणी घेण्यात आली. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जुलै २०१६ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातर्फे ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेली साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका आणि संतपद प्राप्त केलेली साधिका यांची मासिक धर्म चालू होण्यापूर्वी आणि मासिक धर्म चालू असतांना यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास. नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील यू.टी.एस् उपकरणाची ओळख, उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण, घटकाची प्रभावळ मोजणे, परीक्षणाची पद्धत आणि चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता, उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणांची सारणी, ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

२ अ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात निर्माण झाली (कारण स्कॅनरने ३० अंशाचा कोन दर्शवला). साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात आढळली (कारण स्कॅनरने २० अंशाचा कोन दर्शवला). मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील अल्ट्राव्हायोलेट या नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली (कारण स्कॅनरने ९० अंशाचा कोन दर्शवला). थोडक्यात सांगायचे तर, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२ अ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेमध्ये मासिक धर्म चालू होण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. मासिक धर्म चालू असतांनाही तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

२ अ ३. संतपद प्राप्त केलेल्या साधिकेमध्ये मासिक धर्म चालू होण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. मासिक धर्म चालू असतांनाही तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

२ आ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी घट होणे

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिच्यामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; कारण स्कॅनरने ९० अंशाचा कोन दर्शवला. मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट झाली; कारण स्कॅनरने २० अंशाचा कोन दर्शवला. निरीक्षणांवरून असे लक्षात येते की, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट झाली.

२ आ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निम्म्याने घटणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती आणि तिची प्रभावळ ३ मीटर होती (स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला असल्यामुळे साधिकेतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली). साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतरही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती; पण तिची प्रभावळ अनुमाने ५० टक्क्यांनी घटून ती १.५९ मीटर आली; म्हणजे मासिक धर्म चालू असतांना तिच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निम्म्याने घटली.

२ आ ३. संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत नगण्य घट होणे

संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे असून तिची प्रभावळ २ मीटर होती. साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतरही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती आणि तिची प्रभावळ १.५७ मीटर आली, म्हणजे त्यात नगण्य घट झाली.

२ इ. साधिकांच्या स्वतःच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

२ इ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची स्वतःची प्रभावळ थोडी घटणे

सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिची स्वतःची प्रभावळ ३.८८ मीटर होती. मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची प्रभावळ २.५६ मीटर झाली, म्हणजे त्यात १.३२ मीटरने घट झाली.

२ इ २. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची स्वतःची प्रभावळ पुष्कळ घटणे

आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिची स्वतःची प्रभावळ ६.०६ मीटर होती. मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची प्रभावळ २.४५ मीटर झाली, म्हणजे त्यात ३.६१ मीटरने घट झाली. यावरून लक्षात येते की, या साधिकेची प्रभावळ मासिक धर्म चालू असतांना पुष्कळ घटली.

२ इ ३. संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची स्वतःची प्रभावळ नगण्य घटणे

संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी तिची स्वतःची प्रभावळ ६.०८ मीटर होती. मासिक धर्म चालू झाल्यानंतर तिची प्रभावळ ५.२७ मीटर झाली, म्हणजे त्यात नगण्य घट झाली.

या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र ३ मध्ये दिले आहे.

 

३. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र

३ अ. मासिक धर्माच्या काळात स्त्रियांमधील रजोगुणात
वाढ होऊन त्यांच्या देहातून वातावरणात रजोगुणी स्पंदनांचे प्रक्षेपण होणे

मासिक धर्म चालू झाल्यावर स्त्रियांमधील रजोगुणात वाढ होते. त्यामुळे मासिक धर्माच्या काळात तिच्या देहातून वातावरणात रजोगुणी स्पंदनांचे प्रक्षेपण होत असते. त्यामुळे मासिक धर्म चालू असतांना स्त्रियांनी सात्त्विक ठिकाणी (म्हणजे मंदिर, पूजाविधीचे ठिकाणी इत्यादी) जाणे टाळावे, साठवणीच्या वस्तूंना स्पर्श करू नये, इत्यादी आचार पाळण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे.

३ आ. मासिक धर्माच्या काळात स्त्रियांमधील रजोगुणात वाढ होत असल्याने तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट होणे

मासिक धर्माच्या काळात स्त्रियांमधील रजोगुण वाढलेला असतो. मासिक धर्माच्या वेळची तिची शारीरिक अन् मानसिक स्थिती, तिला आध्यात्मिक त्रास असणे वा नसणे यांसारख्या घटकांंवर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत अल्प-अधिक प्रमाणात घट होऊ शकते. चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांच्या निरीक्षणांत मासिक धर्म चालू असतांनाच्या काळात त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत घट झालेली दिसून आली.

३ इ. मासिक धर्माच्या काळात स्त्रियांकडून प्रक्षेपित होणार्‍या
रजोगुणी स्पंदनांकडे वातावरणातील नकारात्मक स्पंदने आकृष्ट होऊ शकणे

मासिक धर्माच्या काळात स्त्रियांमधील रजोगुणात वाढ होत असल्याने वातावरणातील नकारात्मक स्पंदने तिच्याकडे आकृष्ट होऊ शकतात. त्यामुळे तिला आध्यात्मिक त्रास असल्यास तिच्यातील नकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होऊ शकते. चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या निरीक्षणात असेच दिसून आले.

३ ई. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांची स्वतःची प्रभावळ घटणे

मासिक धर्म चालू असतांना वाढलेल्या रजोगुणाचा परिणाम म्हणून तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांची स्वतःची प्रभावळ घटली.

३ उ. संतपदावर आरूढ असलेला जीव पुष्कळ सात्त्विक असणे आणि त्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम न होणे

संतपद प्राप्त केलेल्या साधिकेचा मासिक धर्म चालू होण्यापूर्वी आणि चालू असतांना तिच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि तिच्या स्वतःच्या प्रभावळीत नगण्य घट झाली. यावरून आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवावर बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही, असे लक्षात येते. असे असले तरीही इतरांवर योग्य संस्कार होण्याच्या दृष्टीने उन्नत जीवसुद्धा आचारधर्माचे पूर्णपणे पालन करतात.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.११.२०१७)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment