ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

ग्रहणाचा ‘आध्यात्मिक त्रास असलेला’, ‘आध्यात्मिक त्रास नसलेला’ आणि ‘६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेला’, असे साधक आणि संत यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यू.टी.एस्. उपकरण

‘प्रत्येक ग्रह आपापल्या गतीने स्वतःच्या कक्षेतून (स्वतःभोवती फिरत फिरत) सूर्याभोवती फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यास तिची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचे तेज न्यून होते. याला ‘चंद्रग्रहण’, असे म्हणतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो, तेव्हा सूर्यावर चंद्राची सावली पडते. याला ‘सूर्यग्रहण’, असे म्हणतात. ७.८.२०१७ या दिवशी चंद्रग्रहण होतेे. धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली. ‘आध्यात्मिक त्रास असलेला’, ‘आध्यात्मिक त्रास नसलेला’ आणि ‘६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेला’, असे ३ साधक आणि १ संत यांच्यावर ग्रहणाचा होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणे, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. ७.८.२०१७, ८.८.२०१७ आणि ९.८.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीमध्ये ३ साधक आणि १ संत (टीप) यांची ग्रहणाचे वेध लागल्यावर (संध्याकाळी ५.३० नंतर), ग्रहणाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

टीप – संत : निर्जीव वस्तू म्हणजे शून्य टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी, असे गृहीत धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याची वर्तमान आध्यात्मिक पातळी निश्‍चित करता येते. कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असणार्‍यांना ‘संत’ म्हणतात.

 

२. वैज्ञानिक चाचणीतील ३ साधक आणि १ संत यांविषयी माहिती

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

 

३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

(यू.टी.एस्. उपकरणाविषयी अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)

३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ इ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात. त्यासाठी -IR हा नमुना ठेवतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात. त्यासाठी -UV हा नमुना ठेवतात.

३ इ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.

या चाचणीतील साधकांची प्रभावळ मोजण्यासाठी त्यांच्या लाळेचा नमुना म्हणून वापर केला आहे.

३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन झाल्यास) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

 

५. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्याघटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

 

६. निरीक्षणांचे विवेचन

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – त्रास
असलेल्या साधकामधील नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीची व्याप्ती ग्रहण काळात आणि
त्यानंतर तिसर्‍या दिवशी, म्हणजे ग्रहण काळाचा परिणाम न्यून झाल्यावर जवळजवळ सारखीच असणे

त्रास नसलेला साधक, ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेला साधक आणि संत यांच्यात ग्रहणाच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दोन्ही दिवशी दोन्ही प्रकारची नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. ग्रहणाच्या दिवशी त्रास असलेल्या साधकाच्या ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा पूर्ण उघडल्या, म्हणजे त्याच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती. तिची स्पंदने त्या साधकापासून ५३ सें.मी. दूरपर्यंत जाणवत होती. ग्रहणाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशीही त्या साधकाभोवती या नकारात्मक ऊर्जेची स्पंदने जाणवत होती अन् ती त्याच्यापासून अनुक्रमे ७७ सें.मी. आणि ५० सें.मी. दूरपर्यंत होती.

ग्रहणाच्या दिवशी त्रास असलेल्या साधकाच्या ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणातही स्कॅनरच्या भुजा पूर्ण उघडल्या, म्हणजे त्याच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती आणि तिची स्पंदने त्याच्यापासून ८६ सें.मी. दूरपर्यंत जाणवत होती. ग्रहणाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी या नकारात्मक ऊर्जेची स्पंदने त्याच्यापासून अनुक्रमे ६२ सें.मी. आणि ९० सें.मी. दूरपर्यंत होती. त्रास असलेल्या साधकामधील दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांच्या संदर्भात ग्रहणाच्या काळात आणि त्यानंतर तिसर्‍या दिवशी (म्हणजे ग्रहणाचा परिणाम न्यून झाल्यावर) केलेल्या निरीक्षणांतून वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट लक्षात आली. त्या दोन्ही दिवशी त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळींची व्याप्ती जवळजवळ सारखीच आली. हीच गोष्ट त्याच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात दिसून आली. याचे कारण म्हणजे या साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे त्याच्यामध्ये मुळातच पुष्कळ नकारात्मक ऊर्जा होती. त्यामुळे ग्रहण काळातील वाढलेल्या नकारात्मकतेचा त्याच्यातील या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांवर मोठा परिणाम दिसून आला नाही.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन –
ग्रहण काळात सर्व साधकांची सकारात्मक ऊर्जा नष्ट होणे,संतांमधील सकारात्मक ऊर्जा
अल्प होणे आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वृद्धी होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. ग्रहण काळात त्रास असलेला साधक, त्रास नसलेला साधक आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेला साधक यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा उघडल्या नाहीत, म्हणजे या तिन्ही साधकांमध्ये त्या वेळी सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. ग्रहणानंतरच्या पुढील दोन दिवसांत मात्र सर्वच साधकांच्या यासाठी केलेल्या निरीक्षणांत स्कॅनरच्या भुजा पूर्ण उघडल्या, म्हणजे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती.

ग्रहणानंतरच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी सकारात्मक ऊर्जेची स्पंदने त्रास असलेल्या साधकापासून अनुक्रमे ०.९४ मीटर आणि २.२२ मीटर, त्रास नसलेल्या साधकापासून अनुक्रमे १.३९ मीटर आणि ४.३८ मीटर अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकापासून अनुक्रमे ०.५७ मीटर आणि २.४२ मीटर दूरपर्यंत जाणवत होती. संतांमधील सकारात्मक ऊर्जेची स्पंदने ग्रहणाचा दिवस आणि त्यानंतरचे २ दिवस त्यांच्यापासून अनुक्रमे ०.७६ मीटर, ०.८० मीटर आणि १.४१ मीटर दूरपर्यंत जाणवत होती. याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र क्र. ‘८’ मध्ये दिले आहे.

६ इ. सारणीतील व्यक्तीच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन –
ग्रहण काळात सर्वांची प्रभावळ अल्प होणे आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यात उत्तरोत्तर वृद्धी होणे

सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. ग्रहण काळात प्रयोगातील सर्व व्यक्तींची प्रभावळ अल्प का झाली, याविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण सूत्र क्र. ‘८’ मध्ये दिले आहे.

 

७. निष्कर्ष

‘ग्रहणाचा मानवावर आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक परिणाम होतो’, हे या चाचणीतून लक्षात येते.

 

८. ग्रहणाचा मानवावर आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक परिणाम होण्यामागील अध्यात्मशास्त्र

८ अ. ग्रहण काळात वातावरणातील रज-तम यांत वाढ होणे

सर्व प्रकारच्या ग्रहणांच्या काळात सूर्य किंवा चंद्र यांच्याकडून पृथ्वीवर येणार्‍या प्रकाशाला पृथ्वीवर पोचण्यात अडथळा निर्माण होतो. नेमाने चालणारे दिवस-रात्रीचे चक्र ग्रहण काळात तात्पुरते खंडित होते आणि त्यामुळे नित्य कालचक्रानुसार जेव्हा पृथ्वीवर प्रकाश असायला हवा, त्या वेळी पृथ्वीवर काळोखाचे साम्राज्य निर्माण होते. या काळोखामुळे वातावरणातील रज-तम गुणांत वाढ होते आणि सत्त्वगुण अल्प होतो. ही रज-तमातील वाढ जरी स्थूल स्तरावर लक्षात आली नाही, तरी ती सूक्ष्म स्तरावर हानीकारक असते. या रज-तमप्रधान वातावरणात वाईट शक्तींची त्रासदायक शक्ती नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी वाढते; कारण वाईट शक्ती या रज-तमप्रधान वातावरणाचा उपयोग त्यांची साधना वाढवून अधिक त्रासदायक शक्ती मिळवण्यासाठी किंवा साधकांची आध्यात्मिक शक्ती हिरावून घेण्यासाठी करतात. या त्रासदायक शक्तीचा उपयोग त्या समाजाला त्रास देण्यासाठी करतात. वाईट शक्ती समाजाला त्रास देण्यासाठी नैसर्गिक रात्रीच्या कालखंडात होणार्‍या काळोखाचा आणि त्यामुळे होणार्‍या नैसर्गिक रज-तमातील वाढीचा ग्रहण काळाच्या तुलनेत केवळ २ टक्के लाभ घेऊ शकतात. ग्रहण काळात वातावरणातील रज-तमात झालेल्या वाढीचा परिणाम ग्रहण संपल्यावरही पुढे काही मास टिकून रहातो.

८ आ. ग्रहण काळात वातावरणातील वाढलेल्या रज-तमाचा व्यक्तीवर होणारा परिणाम

ग्रहणाच्या कालावधीत वातावरणातील वाढलेले रज-तम आणि वाईट शक्तींनी निर्माण केलेली त्रासदायक शक्ती यांच्या आधारे पूर्वजांचे लिंगदेह त्यांच्या वंशजांना त्रास देतात. त्यामुळे ग्रहण काळात पूर्वजांच्या त्रासांमध्ये वाढ होते. एकूणच वाढलेले त्रास शारीरिक स्तरावर गुंगी, थकवा, आजारपण अशा प्रकारे जाणवतात, तर मानसिक स्तरावर भावनिक आणि नकारात्मक विचारांत वाढ होते. चंद्र हा मनाचा कारक म्हटला जातो. चंद्राचा मनावरील परिणाम पौर्णिमेच्या दिवशी पुष्कळ जास्त असतो. चंद्रग्रहणाच्या वेळी तो अधिकच वाढतो. ग्रहणाचा बुद्धीच्या स्तरावरही परिणाम होतो. या काळात निर्णयक्षमता अल्प होते आणि त्यामुळे लोकांकडून अयोग्य निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाढते. ग्रहण ज्या भूभागात प्रत्यक्ष दिसते, तिथे त्याचा परिणाम सर्वाधिक असतो.

८ इ. ग्रहणाचा एकूण मानवजातीवर होणारा परिणाम

वाईट शक्ती ग्रहणकाळात मिळवलेल्या त्रासदायक शक्तीचा एकूण मानवजातीची हानी करण्यासाठी विविध प्रकारे उपयोग करतात. यासाठी त्या व्यक्तींच्या मनामध्ये हिंसा आणि नाश यांची बिजे पेरतात. वाईट शक्तींनी सूक्ष्म स्तरावर पेरलेल्या या बिजांचा परिणाम प्रत्यक्ष स्थूल स्तरावर पुढे अनेक दिवस, तसेच काही वर्षांनंतरही दिसून येतो. देशभरात हाहाकार माजवणार्‍या साथीच्या संसर्गजन्य आजारांची बिजे रोवणे, उदा. पक्षी-ज्वर, ‘इबोला’ विषाणु-ज्वर किंवा तिसर्‍या महायुद्धाची बिजे रोवणे, ही वाईट शक्ती करत असलेल्या मानवजातीच्या हानीची काही उदाहरणे होत.

८ ई. ग्रहणकाळात साधना वाढवा !

ग्रहणकाळात वातावरणात वाढलेले रज-तम आणि त्रासदायक शक्ती यांपासून होणार्‍या अपरिमित हानीपासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना करणे. साधनेमुळे वाढलेले रज-तम आणि त्रासदायक शक्ती यांचा परिणाम अल्प किंवा नष्ट होतो, तसेच ग्रहणकाळात केलेल्या साधनेचा नेहमीच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लाभ मिळतो.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected]

टीप : ‘चंद्रग्रहणाचा होणारा परिणाम अभ्यासत असतांना आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला आलेले अनुभव’ वाचा उद्याच्या अंकात… !

संपूर्ण ग्रहण काळात साधना करा !

‘जेव्हा समष्टी पाप वाढते, तेव्हा भूकंप, पूर, साथीचे रोग, दुष्काळ इत्यादी आपत्ती येतात. ही आपत्कालीन स्थिती अचानक उद्भवते. त्यामुळे पापाचारी आणि ‘वाढलेले समष्टी पाप नष्ट करण्यासाठी काहीही प्रयत्न न करणारे’ यांना त्यापासून वाचण्यासाठी काही करायला वेळ मिळत नाही. याउलट साधना करून आधी ठाउक असलेल्या ग्रहणासारख्या घटनांपासून होणार्‍या हानीपासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो. यासाठी संपूर्ण ग्रहण काळात (वेध लागल्यापासून ते मोक्ष होईपर्यंत) साधना करणे आवश्यक आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment