रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर, साधक, नामजपाची खोली यांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘जुलै २०१७ या मासात मला गुरुकृपेने सनातनच्या रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा रामनाथी आश्रमात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. आश्रमात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१ अ. आश्रमातील चैतन्य वाढल्याचे जाणवणे

मी ४ वर्षांनंतर आश्रमात गेले होते. पूर्वीपेक्षा आश्रमातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे मला जाणवले.

१ आ. ‘काही साधकांचे वय वाढूनही ते पूर्वीइतकेच तरुण दिसत आहेत’, असे वाटणे

आश्रमातील काही साधकांकडे पाहिल्यावर ‘त्यांचे वय वाढूनही ते पूर्वीप्रमाणेच तरुण दिसत आहेत’, असे मला वाटले, उदा. कु. युवराज्ञीताई, श्री. घनश्याम गावडे इत्यादी. ‘साधनेने स्वत:तील चैतन्य वाढल्यावर स्थूल देहावरही त्याचा परिणाम होत असल्यामुळे असे वाटले असावे’, असे मला वाटले. (आश्रमात मला पू. आनंदी पाटीलआजींचे दर्शन झाले. त्यांचे वयही ९५ वर्षे असल्याचे वाटत नाही.)

१ इ. येथील साधकांमध्ये मला भाव, प्रेमभाव, साधकत्व आणि स्थिरता वाढल्याचे जाणवले.

 

२. आलेल्या अनुभूती

२ अ. ‘सर्व साधक गुरुमाऊलीचीच रूपे असून गुरुमाऊली
प्रत्येकाच्या माध्यमातून माझ्यावर पुष्कळ प्रेम करत आहे’, असे वाटणे

खरेतर आश्रमात आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होईल का ?’, याची साधकाला तळमळ लागलेली असते. या वेळी आश्रमातील साधकांचे प्रेममय वागणे पाहून ‘ही गुरुमाऊलीचीच रूपे असून गुरुमाऊली प्रत्येकाच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत आहे’, असे मला वाटले. परात्पर गुरु डॉक्टरांनीही ‘साधक ही देवाचीच रूपे आहेत. आपण त्यांच्याशी बोललो नाही, तर कसे चालेल ?’, असे सांगितले आहे.

२ आ. आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

२ आ १. ध्यानमंदिरात देवता प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे जाणवणे

‘आश्रमातील ध्यानमंदिरात देवता प्रत्यक्ष उपस्थित आहेत’, असे मला जाणवले. ‘जेथे प्रत्यक्ष श्रीमन्नारायण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात वास्तव्यास आहे, तेथे सर्व देवता येणारच ना ?’, असे मला वाटले.

२ आ २. श्री भवानीमातेने दृष्टांत देऊन ‘मला रामनाथीला यायचे आहे’, असे सांगितल्याचे कळल्यावर पुष्कळ भावजागृती होणे

श्री भवानीमातेची पाषाणाची मूर्ती मी पूर्वी मिरज आश्रमात पाहिली होती. ‘देवीने दृष्टांत देऊन मला रामनाथीला यायचे आहे’, असे सांगितल्याचे मला कळले. हे ऐकल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. ही मूर्तीसुद्धा जागृत असल्याचे जाणवले. ‘साधकांवर उपाय आणि त्यांचे रक्षण करण्याची देवतांनाच किती तळमळ आहे आणि हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या घोर कलियुगातही आम्हाला अनुभवायला मिळत आहे’, हे जाणवून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.

२ आ ३. संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘ते प्रत्यक्षच ध्यानमंदिरात आहेत’, असे जाणवणे

संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून ‘ते येथे प्रत्यक्ष आहेतच’, असे मला जाणवले. ध्यानमंदिरात मी ज्या भागात बसत असे, तिकडे दृष्टी करून ते माझ्याशी बोलत असत. त्यांनी माझ्याशी बोलून आणि मला आधार देऊन पुष्कळ सकारात्मक केले. त्यांचे मी पुष्कळ प्रेम अनुभवले.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या
खोलीत नामजप करतांना चैतन्याच्या जाड कवचाने लपेटली गेल्याचे जाणवणे

मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या खोलीत नामजप करत होते. तेव्हा ‘मी पूर्णपणे चैतन्याच्या जाड कवचाने लपेटली गेले आहे’, असे मला जाणवले. तेथे किती उपाय होतात, याला काही सीमाच नाही ! मी घरी असतांना सूक्ष्मातून त्या खोलीत उपायांना बसते. तेव्हाही मला असाच अनुभव येतो. तेथे मला मनाची निर्विचार अवस्था अनुभवता आली.

रामनाथी आश्रमात मी पुष्कळ आनंद अनुभवला. श्रीगुरूंनीच वरील अनुभूती दिल्या. त्यासाठी मी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. राजश्री खोल्लम, पुणे (८.८.२०१७)

Leave a Comment