एका धर्माभिमान्याला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आणि आश्रमातून परततांना आलेल्या अनुभूती

१. आश्रमात येण्यापूर्वी ‘आश्रमात खरेच चैतन्य आणि सात्त्विकता असेल का ?’, असे वाटणे

‘मला बर्‍याच वर्षांपासून रामनाथी आश्रम पहाण्याची इच्छा होती. मी आश्रमातील चैतन्य आणि सात्त्विकता यांविषयी ऐकून होतो. माझ्या मनात ‘खरंच असे असेल का ?’, याविषयी अनेक शंका होत्या. श्रीकृष्णाच्या कृपेने आम्हाला रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे भाग्य लाभले. आम्ही कोल्हापूरहून आलेले १२ जण २ दिवस आश्रमात होतो.

 

२. आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ. आश्रमातील वातावरण आणि परिसर पाहून प्रसन्न वाटणे

मला आश्रमातील वातावरण आणि परिसर पाहून पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूत सात्त्विकता जाणवते. आश्रमातील चैतन्यमय वातावरणाचा परिणाम तेथील परिसरावर झाला आहे.

२ आ. आश्रमात बराच वेळ मन शांत असणे

माझे मन कधी एकाग्र होत नसे. माझ्या मनात सतत चलबिचल असायची; पण आश्रमात आल्यावर माझे मन शांत झाले. मी कधीच एका जागी अधिक वेळ बसू शकत नाही; पण आश्रमात सकाळी ९.३० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत माझे मन शांत होते. मला मनावर कसलाच ताण जाणवला नाही.

२ ई. आश्रमातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहून ‘विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एकमेकांना कसे पूरक आहेत ?’, हे लक्षात येणे

तेथील औदुंबराच्या वृक्षाचे उदाहरण असो कि साधकांनी दाखवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असोत, त्या प्रत्यक्ष पाहिल्यामुळे ‘विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एकमेकांना कसे पूरक आहेत ?’, हे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पहाणार्‍या माझ्या लक्षात आले.

 

३. आश्रमातून निघाल्यावर प्रवासात आलेली अनुभूती

आश्रमातील चैतन्यमय वातावरणाचा भ्रमणभाषवर परिणाम होऊन
‘रेंज’ नसूनही डोंगराळ भागात मानचित्राद्वारे (नकाशाद्वारे) स्थाननिश्‍चिती (लोकेशन) दिसणे

दुसर्‍या दिवशी सायंकाळी आम्ही कोल्हापूरला जायला निघालो. आम्हाला हा मार्ग नवीन असल्याने आमच्यातील एक साधक भ्रमणभाषवर मानचित्राद्वारे कोल्हापूरला जाण्याचा मार्ग शोधत होता; पण काही वेळाने भ्रमणभाषची ‘रेंज’ नसूनही तो डोंगराळ भागातही स्थाननिश्‍चिती दाखवत होता. ही अनुभूती आल्यामुळे माझी आश्रमातील सात्त्विक आणि चैतन्यमय वातावरणावरील श्रद्धा वाढत गेली. पूर्वी माझाही या गोष्टीवर विश्‍वास बसत नव्हता आणि काही वाचकांचाही बसणार नाही; पण हे सत्य आहे की, आश्रमातील चैतन्यमय आणि सात्त्विक वातावरणाचा भ्रमणभाषवर परिणाम झाला असावा; म्हणून ‘नेटवर्क रेंज’ नसूनही स्थाननिश्‍चिती दिसत होती.’

– श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले, वडणगे, कोल्हापूर. (२४.७.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment