सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास ! : नेपाळ

९.३.२०१७ – देहलीहून प्रस्थान

‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता मी, तसेच माझ्यासह सर्व साधक, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. डॉ. ॐ उलगनाथन् आम्ही सर्व जण त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी एकत्रच निघालो आणि देहली विमानतळावर पोहोचलो. आम्हा तिघांची विमाने वेळेवर सुटली. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी आश्रमात जाण्यासाठी गोव्याला गेल्या.

९.३.२०१७ – नेपाळची राजधानी काठमांडू येथे प्रयाण

१. काठमांडू येथे सुखरूप पोहोचणे आणि
तेव्हा तेथील हवामान अतिशय चांगले असणे

आज सकाळी सवा दहा वाजताच्या विमानाने आम्ही निघालो आणि दुपारी दीड वाजता नेपाळची राजधानी काठमांडू येथे सुखरूप पोहोचलो. आम्ही पोहोचलो, तेव्हा तेथील हवामान अतिशय चांगले होते.

२. गरुडदर्शन होणे

येथे पोहोचल्या पोहोचल्या आम्हाला गरुडदर्शन झाले.

३. मुक्तीनाथला जाणे तेवढे सोपे नाही, असे लक्षात येणे, तो हिमालयाचा भाग
असल्याने तेथे जाणे अवघड असणे, तसेच जाण्यासाठी पुष्कळ परवानेही लागत असणे

महर्षींनी आम्हाला सांगितले होते की, १२ मार्च या दिवशी पौर्णिमा असल्याने त्याच्या आत तुम्ही ‘मुक्तीनाथ’ या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी नेपाळ देशामध्ये पोहोचा. त्याप्रमाणे आम्ही येथे पोहोचलो. ‘मुक्तीनाथ’ हे श्रीविष्णूच्या दिव्य १०८ क्षेत्रांपैकी १०६ वे क्षेत्र आहे. उर्वरित २ क्षेत्रे भूतलावर नसून ती वैकुंठात आहेत. मुक्तीनाथ हे ५१ शक्तीपिठांपैकी एक शक्तीपीठही आहे. तेथे गंडकी चंडीदेवीचे देऊळ आहे.’ महर्षींनी असेही सांगितले होते, ‘समजा दैवयोगाने पौर्णिमेच्या दिवशी मुक्तीनाथला पोहोचता आले, तर तेव्हा तेथे नक्की पोहोचा’; पण येथे येऊन चौकशी केल्यावर लक्षात आले की, मुक्तीनाथला जाणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी पुष्कळ परवाने काढावे लागतात. नेपाळचा उत्तरेकडचा सर्व प्रदेश हा हिमालय आहे. हा भाग जतन करण्यासाठी, तसेच येथील निसर्गाचे रक्षण करण्यासाठी त्या सर्व भागामध्ये नेपाळ सरकारने १२ संरक्षित क्षेत्रे निर्माण केली आहेत. यांतील सर्वांत मोठे संरक्षित क्षेत्र म्हणजे ‘अन्नपूर्णा’ क्षेत्र. त्यामध्ये मुक्तीनाथ तीर्थ आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी पुष्कळ कायदे केले आहेत. तसेच तो हिमालयाचा परिसर असल्याने तेथे जाणे अवघड होते.

४. नेपाळमधील धर्माभिमानी श्री. भरत
शर्मा यांचे मुक्तीनाथला जाण्यासाठी साहाय्य मिळणे

नेपाळमध्ये श्री. भरत शर्मा नावाचे आपल्या ओळखीचे धर्माभिमानी आहेत. त्यांची स्वतःची यात्रा कंपनी आहे. ते म्हणाले, ‘‘आजपर्यंत मी ६४० लोकांना मुक्तीनाथला पाठवले आहे. त्याची सर्व प्रक्रिया मला ठाऊक आहे.’’

 

१०.३.२०१७ – काठमांडू, नेपाळ

१. महर्षींच्या कृपेने सर्व परवाने ३ – ४ घंट्यांतच मिळणे

१ अ. देवाच्या कृपेने २ परवाने थोड्या वेळातच मिळणे : मुक्तीनाथला जाण्यासाठी २ परवाने काढावे लागतात आणि ते मिळायला १ दिवस लागतो. भारतियांसाठी हिमालयाच्या संरक्षित क्षेत्री जायचा परवाना ६०० रुपयांचा आहे आणि हिमालयातल्या खडतर प्रवासासाठी २०० रुपयांचा परवाना आहे. इतर देशांतील नागरिकांसाठी या परवान्यांना अधिक मूल्य द्यावे लागते. देवाच्या कृपेने हे परवाने आम्हाला थोड्या वेळातच मिळाले.

१ आ. महर्षींना प्रार्थना केल्यावर मुक्तीनाथ प्रवासाच्या चित्रीकरणासाठी परवाना मिळण्याच्या कार्यालयातील अधिकारी महिला अचानक साहाय्य करू लागणे, तिने तिच्या वरच्या अधिकार्‍याला सांगितल्यावर त्यांनी स्वतः येऊन दौर्‍यातील सर्वांकडे बघून अर्जावर सही करणे आणि लगेच परवाना देणे : आम्हाला मुक्तीनाथच्या प्रवासातील चित्रीकरणही करायचे होते. महर्षि म्हणाले होते, ‘तुम्ही एवढ्या दूर आणि कठीण ठिकाणी जात आहात, तर तेथील चित्रीकरण करा; कारण तेथे परत परत जाऊ शकणार नाही.’ त्यामुळे चित्रीकरणासाठी आणखी १ परवाना काढावा लागणार होता. तो मिळण्यासाठी संहिता सादर करणे इत्यादी प्रक्रिया मोठी होती. त्यासाठी वेळ लागणार होता. भरत शर्मा म्हणाले, ‘‘आपण परवाना मिळण्याच्या कार्यालयात जाऊन बघूया.’’ आम्ही अर्ज इत्यादी व्यवस्थित भरून, आमच्याकडील सर्व दाखले घेऊन आणि प्रार्थना करून कार्यालयात गेलो. तेथे एक महिला अधिकारी होत्या. त्यांना तो परवाना देण्याविषयी आम्ही विनंती केल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला नेपाळच्या माहिती खात्यातून आधी एक पत्र घ्यावे लागेल. ते पत्र आणल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही.’’ त्यांनी आम्हाला पाऊण घंटा बसवून ठेवले. त्या सर्व नियमाप्रमाणेच करत होत्या; पण आम्हाला एवढे थांबणे अशक्य होते. पुन्हा उद्या शनिवार आणि रविवार कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे हा परवाना लवकर मिळण्यासाठी आम्ही महर्षींना प्रार्थना करत होतो. तेव्हा काहीतरी चमत्कार घडला आणि ज्या अधिकारी महिलेने आम्हाला पाऊण घंटा बसवून ठेवले होते, त्यांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच पालटला आणि त्या आम्हाला अचानक परवाना मिळण्यामध्ये साहाय्य करू लागल्या. आम्हाला आश्‍चर्य वाटले, ‘त्या महिलेमध्ये असा पालट कसा काय झाला ?’ त्या आपणहून परवाना देणार्‍या आपल्या वरच्या मुख्य अधिकार्‍याकडे गेल्या. ते अधिकारी स्वतः आले, त्यांनी आमच्याकडे एक क्षण बघितले आणि पटकन परवान्यावर सही केली. ते म्हणाले, ‘‘या परवान्याची पूर्तता करण्यासाठी संहिता, पत्र इत्यादी जे लागते, ते नंतर १५ दिवसांत आणून द्या. तुम्हाला आता मी परवाना देतो. तुम्ही तुमच्या प्रवासाची सिद्धता करू शकता.’’ अशा प्रकारे ३ – ४ घंट्यांमध्ये आमचे सर्व परवाने मिळण्याचे काम झाले.

२. बूढानीलकंठ मंदिराचे दर्शन

२ अ. बूढानीलकंठ मंदिरात श्रीविष्णूची पाण्यामधील शेषशायी मूर्ती असून ती अतिशय सुंदर, ५ मी. लांब आणि काळ्या पाषाणाची असणे : आमचे परवाना मिळण्याचे काम पूर्ण झाल्याने आम्ही काठमांडू जिल्ह्यातील बूढानीलकंठ मंदिरात गेलो. काठमांडू येथून हे स्थान ८ कि.मी. अंतरावर आहे. तेथे शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. आम्ही श्रीविष्णूचे दर्शन घेतले. ही विष्णूची मूर्ती अतिशय सुंदर आहे. ती ५ मी. लांब असून काळ्या पाषाणाची आहे आणि पाण्यात आहे.

बूढानीलकंठ मंदिरातील श्रीविष्णूची पाण्यामधील शेषशायी मूर्ती

२ आ. मूर्ती मिळण्याविषयी कहाणी : मंदिरात एक बाई बसली होती. आम्ही तिला मंदिराची माहिती विचारली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘ही स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती भूमीखालून मिळाली. या भागात एका शेतकर्‍याच्या गायी चरायला यायच्या. एक गाय चरून आल्यावर दूध द्यायची नाही. त्या शेतकर्‍याला कळेना की, ती असे का करत आहे ? तेव्हा त्याने विचार केला, ‘बघूया तरी, ही गाय कुठे जाते ?’ दुसर्‍या दिवशी तो त्या गायीच्या पाठीमागे गेला. त्याने बघितले की, ती गाय एका चौथर्‍यासारख्या ठिकाणी दूध देत आहे. त्यामुळे त्याला वाटले, ‘इथे काहीतरी आहे.’ त्याने तिथे भूमी खोदण्यास आरंभ केला. तेव्हा एके ठिकाणी रक्त येऊ लागले. आणखी खोदल्यावर त्याला समजले की, तो दगडाचा नाकासारखा भाग आहे. त्याने थोडे दुसरीकडे खोदायला सुरुवात केली. तेव्हा तिथेही रक्त येऊ लागले. बघितले, तर तो हाताच्या मनगटासारखा भाग होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे काहीतरी वेगळेच आहे. त्यामुळे मग त्याने तेथे हळुवारपणे खोदले, तर त्याला ही दगडी मूर्ती दिसली. त्या भूमीतून पाणीही येऊ लागले. त्यामुळे तो  भाग तळ्यासारखा झाला आणि ‘पाण्यात श्रीविष्णूची शेषशायी मूर्ती’, असे ते मूर्तीचे रूप सिद्ध झाले.

२ इ. चार वर्षांपूर्वी शाळिग्राम विकत घेतलेल्या दुकानदार बाईने आताही ओळखणे, तिच्याकडून वैशिष्ट्यपूर्ण अशा वस्तू विकत घेणे आणि तिने त्या स्वस्तात देणे : चार वर्षांपूर्वी मी तेथील एका दुकानदार बाईकडून शाळिग्राम विकत घेतले होते. मी देवळाची माहिती सांगणार्‍या त्या बाईला ‘इथे कुठे शाळिग्राम विकत मिळतात का ?’, असे विचारले. ती आम्हाला एका दुकानात घेऊन गेली. तेथे ती ४ वर्षांपूर्वी भेटलेली दुकानदार बाईच होती. तिने मला ओळखले. मला बघून तिला पुष्कळ आनंद झाला. आताही आम्ही तिच्याकडून वैशिष्ट्यपूर्ण असे शाळिग्राम, चामर, वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष, उदा. गौरिशंकर रुद्राक्ष (एका रुद्राक्षातच ‘शिव-पार्वती’ असे २ भाग असलेला रुद्राक्ष), एकमुखी ते बारामुखी रुद्राक्ष इत्यादी विकत घेतले. तिने त्या वस्तू पुष्कळ स्वस्तात दिल्या. ‘गौरिशंकर रुद्राक्ष ३ घ्यावेत’, असे मला वाटले आणि तेवढे मी घेतले. अशा प्रकारे आमचे बुढानीलकंठ मंदिराचे दर्शन झाले आणि आम्ही रात्री आमच्या रहाण्याच्या ठिकाणी आलो.

३. नेपाळमधील हवामान पालटून तेथे विजांसह पाऊस, गारा पडू लागणे, तसेच मुक्तीनाथ
येथेही हिमवर्षाव होत असणे आणि यावरून ‘आम्हाला काठमांडूत थांबवून ठेवणे’, हे महर्षींचेच नियोजन असल्याचे वाटणे

सायंकाळपासून इथले हवामान पूर्णपणे पालटले. इथे सातत्याने विजांसह पाऊस पडण्यास आरंभ झाला. तसेच गाराही पडू लागल्या. सर्व विमानसेवा बंद झाल्या. तसेच मुक्तीनाथ येथेही हिमवर्षाव होत होता. यावरून लक्षात येते की, हवामान वाईट होणार असल्याने ‘आम्हाला इथे थांबवून ठेवणे’, हे महर्षींचेच नियोजन होते.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

 

११.३.२०१७ – काठमांडू, नेपाळ

१. तमिळनाडूमधील नाडीभक्त वेदब्राह्मण अरुण नेपाळमध्ये आलेले
असणे, ते भेटायला येणे, त्यांना, तसेच त्यांच्याबरोबरच्या एकाला गौरिशंकर रुद्राक्ष
हवा असणे आणि देवाने २ जास्तीचे गौरिशंकर रुद्राक्ष घ्यायची बुद्धी का दिली, हे आता समजणे

तमिळनाडूमध्ये ईरोड येथे गुरुमूर्ती शिवाचार्य हे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचे भक्त आहेत. ईरोड येथे महर्षि जेव्हा जेव्हा आम्हाला यज्ञयाग करण्याचा आदेश देतात, तेव्हा तेव्हा हे गुरुमूर्ती शिवाचार्य त्या यज्ञाचे पौरोहित्य करतात. त्यामुळे ते आम्हाला चांगले ओळखतात. त्यांना महर्षींच्या कृपेने मुलगा झाला आहे. त्यांचे नाव अरुण. तेही आम्हाला ओळखतात. ते श्री श्री रविशंकरजींसह इथे नेपाळमध्ये आले होते. आज ते परत भारतात जाणार होते. त्यांना मी इथे आले असल्याचे कळले. त्यामुळे ते आज सकाळी मला भेटायला आले. त्यांना मी इथला आमचा प्रवास सांगितला. ते मला म्हणाले, ‘‘मला इथे सर्व प्रकारचे रुद्राक्ष मिळाले; पण ‘गौरिशंकर रुद्राक्ष’ मिळाला नाही. तुमच्याकडे आहे का ?’’ त्यांच्यासोबत तमिळनाडूतील त्रिचीचे आणखी एक वेदब्राह्मण होते. त्यांनाही तो रुद्राक्ष हवा होता. तेव्हा देवाने मला दुकानातून ३ गौरिशंकर रुद्राक्ष घेण्याची बुद्धी का दिली, हे समजले. मी त्या दोघांना माझ्याकडील जास्तीचे २ रुद्राक्ष दिले, तसेच आमच्याकडील प्रसादही दिला.

२. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा दूरध्वनी येणे, त्यांना वेदब्राह्मण अरुण आल्याचे कळल्यावर
त्यांनी अरुण यांना आम्हाला मंत्रांचा आशीर्वाद देण्यास सांगणे, त्यांनी कोणी न सांगताच निसर्गदेवतांना प्रार्थना करणारे
भाग्यसूक्त म्हणणे आणि ‘आम्हाला मुक्तीनाथचे दर्शन घडण्यासाठीच त्यांनी निसर्गाचा आशीर्वाद मागितला’, असे जाणवणे

तेवढ्यात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा श्री. विनायक शानभाग यांना दूरध्वनी आला. त्यांना हे दोन्ही पुरोहित भेटायला आल्याचे ठाऊक नव्हते. त्यांना ते सांगितल्यावर ते त्यांच्याशीही बोलले. त्यांनी अरुण यांना सांगितले, ‘‘तू माताजी (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि त्यांच्यासह असलेले साधक यांना मंत्रांचा आशीर्वाद दिल्याशिवाय जायचे नाही.’’ ते ‘ठीक आहे’, असे म्हणाले. बाहेर आजही पुष्कळ पाऊस पडत होता, तसेच पूर्ण ढगाळ वातावरण होते. ते दोघे उभे राहून आमच्यासाठी मंत्र म्हणू लागले. ते भाग्यसूक्त म्हणत होते. ते सूक्त म्हणजे निसर्गाला सुप्रभात करण्यासारखे आहे. ते वरुणदेवता, इंद्रदेवता, वायुदेवता, आकाशदेवता अशा निसर्गदेवतांना प्रार्थना करणारे मंत्र आहेत. ‘आम्हाला शक्ती द्या. आमचे रक्षण करा’, अशी त्यामध्ये प्रार्थना आहे. आम्हीही निसर्गाची कृपा झाली, तरच मुक्तीनाथचा प्रवास करू शकत होतो. त्यामुळे त्या दोघांनी आमच्यासाठी योग्य तेच मंत्र म्हटले आणि निसर्गाचा आशीर्वाद मागितला.

३. वेदब्राह्मण मंत्र म्हणून गेल्यानंतर ५ – १० मिनिटांतच पाऊस पडणे थांबणे, ढगाळ हवा जाऊन स्वच्छ ऊन
पडणे आणि त्यामुळे ‘हे भाग्यसूक्तातील मंत्रच आपल्याला मुक्तीनाथपर्यंत घेऊन जातील’, याची निश्‍चिती होणे

त्यानंतर आम्हाला निसर्गाची अशी अनुभूती आली की, ते वेदब्राह्मण मंत्र म्हणून गेले आणि त्यानंतर ५ – १० मिनिटांतच बाहेर जो पाऊस पडत होता आणि ढगाळ हवा होती, ती पालटली आणि स्वच्छ ऊन पडले. त्यामुळे आम्हाला निश्‍चिती झाली की, आता ते सूक्तमंत्रच आम्हाला मुक्तीनाथपर्यंत घेऊन जातील. आम्ही ते मंत्र ऐकत ऐकत प्रवास करू.

४. ‘सनातनचे ग्रंथ हॉटेलमध्ये ठेवल्याने आपल्या हॉटेलला भूकंपामध्ये काही झाले नाही’, असे हॉटेलचे
मालक प्रेमबहादूर लामा यांना वाटत असणे आणि या श्रद्धेमुळे त्यांनी या वेळी आमच्याकडून हॉटेलचे भाडे न घेणे

आम्ही ज्या हॉटेलमध्ये रहात आहोत, त्या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे प्रेमबहादूर लामा. वर्ष २०१३ मध्ये मी जेव्हा नेपाळमध्ये आले होते, तेव्हा याच हॉटेलमध्ये राहिले होते. तेव्हा मी त्यांना सनातनचे काही ग्रंथ त्यांना दिले होते. ते त्यांनी हॉटेलमध्ये ठेवले होते. या हॉटेलच्या दुमजली इमारतीच्या बाजूला १२ – १४ मजली इमारत होती. एप्रिल २०१५ मध्ये जेव्हा नेपाळमध्ये पुष्कळ मोठा भूकंप झाला, तेव्हा हॉटेलच्या बाजूची ती इमारत पूर्णपणे कोसळली; पण या हॉटेलच्या इमारतीला जरासुद्धा तडा गेला नव्हता. तेव्हा त्यांना वाटले, ‘सनातनच्या या ग्रंथांमुळे आपल्या हॉटेलला भूकंपामध्ये काही झाले नाही.’ अशी त्यांची सनातनवर श्रद्धा बसली. त्यामुळे त्यांनी या वेळी जेव्हा आम्ही तेथे रहायला गेलो, तेव्हा आमच्याकडून खोलीचे भाडे घेतले नाही.

१२.३.२०१७ – काठमांडू, नेपाळ

नगरकोट येथून हिमालयाचे दर्शन

आज आम्ही येथून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या नगरकोट येथे गेलो होतो. ते नेपाळमधील भक्तपूर जिल्ह्यात आहे. तेथील वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्वेकडे असल्याने तेथून हिमालयावरील उगवत्या सूर्याचे मनोहर दृश्य दिसते. त्यासाठी ते स्थळ प्रसिद्ध आहे. तसेच तेथून हिमालयाचे ‘माऊंट एव्हरेस्ट’ शिखरसुद्धा दिसते.

१३.३.२०१७ – काठमांडू, नेपाळ

१. देवळांची दर्शने

१ अ. श्री पशुपतिनाथ मंदिर : हे मंदिर येथील बागमती नदीच्या काठावर आहे. ते काठमांडूपासून ५ कि.मी. अंतरावर आहे.

१ आ. गुह्येश्‍वरी मंदिर : हे आदिशक्तीचे मंदिर काठमांडूपासून ५ कि.मी. अंतरावर आहे. हे श्री पशुपतिनाथ मंदिराजवळील शक्तीपीठ आहे. ती पशुपतिनाथ देवाची शक्ती आहे आणि ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे. पशुपतिनाथ मंदिराप्रमाणे हे मंदिरही बागमती नदीच्या काठावर आहे. ते तांत्रिक उपासना करणार्‍यांचे नेपाळमधील मुख्य स्थान आहे.’

१४.३.२०१७ – काठमांडू येथून मुक्तीनाथकडे प्रयाण

‘महर्षींनी आम्हाला आज मुक्तीनाथला जाण्याची आज्ञा दिली. तेथे जाण्यासाठी प्रथम पोखरा येथे, तेथून जोमसोम येथे, त्यानंतर तेथून मुक्तीनाथ गावात आणि तेथून घोड्याने मुक्तीनाथ देऊळ, असा ४ टप्प्यांत हा प्रवास करावा लागतो.

१. काठमांडू ते पोखरा प्रवास

१ अ. पोखरा येथे पोहोचल्यावर तेथील देवांच्या दर्शनाला जाणे : आज सकाळी आम्ही साडेबारा वाजताच्या विमानाने काठमांडूहून पोखरा येथे आलो. हे अंतर २१० कि.मी. आहे. ते पार करायला विमानाने अर्धा घंटा लागतो. पोहोचल्यानंतर आम्ही आमचे सामान ठेवून तेथील देवांच्या दर्शनाला गेलो.

पोखरा विमानतळावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

ताल वाराही मंदिर
ताल (तळ्यातील) वाराही मंदिर

१ अ १. ताल वाराही मंदिर : ‘ताल’ म्हणजे तळे आणि ‘वाराही’ हे देवीचे नाव आहे. या मंदिराला ‘तळ्यातील मंदिर’ किंवा ‘वाराही मंदिर’, असेही म्हणतात. हे मंदिर ‘फेवा’ नावाच्या मोठ्या तलावामध्ये आहे. तेथे आम्ही बोटीने गेलो.

१ अ २. गुप्तेश्‍वर महादेव : हे महादेवाचे स्वयंभू मंदिर आहे. ते गुहेमध्ये भूमीच्या खाली आहे. लाखो वर्षांपूर्वीची ही गुहा असून ती आपोआप निर्माण झालेली आहे. गुहेमध्ये ‘स्टॅलॅग्माईट’ खडक आहेत. गुहेत स्वयंभू शिवलिंग आहे, त्याचे नाव गुप्तेश्‍वर महादेव. तसेच तेथे पाण्याचा झराही आहे. आम्ही या महादेवाचे दर्शन घेतले.

असे हे देवांचे दर्शन करून आम्ही आमच्या रहाण्याच्या ठिकाणी गेलो. आमच्या सामानाची आवराआवर केली; कारण दुसर्‍या दिवशी सकाळच्या विमानाने आम्हाला पोखरा ते जोमसोम हा प्रवास करायचा होता.

गुप्तेश्‍वर महादेव गुहेत जाण्याचा मार्ग

 

गुप्तेश्‍वर महादेव गुहा

 

गुप्तेश्‍वर महादेव लिंग

 

१५.३.२०१७ – पोखरा ते जोमसोम आणि जोमसोम ते मुक्तीनाथ प्रवास

१. मुक्तीनाथच्या प्रवासात हवामान कधीही खराब होऊ शकत असल्याने, तसेच रस्त्याचा
प्रवास धोकादायक असल्याने महर्षींनी लवकरात लवकर मुक्तीनाथचे दर्शन घेऊन परतण्यास
सांगणे, तसेच पोखरा ते जोमसोम हा प्रवास चारचाकी गाडीने न करता विमानाने करण्यास सांगणे

पूर्वी आम्ही पोखरा ते जोमसोम हा १५८ कि.मी.चा प्रवास विमानाऐवजी चारचाकी गाडीने करणार होतो. या प्रवासाला १० घंटे लागतात; कारण हा मार्ग अतिशय कठीण आहे. चारचाकी गाडी केवळ १० ते १५ कि.मी. प्रतिघंटा एवढ्याच वेगाने धावते. महर्षि आम्हाला म्हणाले, ‘हवामान केव्हाही खराब होऊ शकते, बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मुक्तीनाथला पोहोचा आणि तेथून दर्शन घेऊन परता. तुम्ही विमानाने जोमसोम येथे जा.’ त्याप्रमाणे आम्ही केले.

२. विमानप्रवासाचे वर्णन

पहाटे साडेपाच वाजता आम्ही आमच्या निवासस्थानाहून निघालो आणि विमानतळावर पोहोचलो. आम्हाला गुरुकृपेने सकाळी साडेसात वाजताचे विमान मिळाले आणि आम्ही ८ वाजता जोमसोम येथे पोहोचलो.

२ अ. छोट्या विमानाने प्रवास : हा प्रवास १६ किंवा २४ आसनांच्या छोट्या विमानाने असतो. आमचे १६ आसनांचे विमान होते.

२ आ. विमानातून हिमालय दिसणे : हे विमान हिमालयाच्या जवळून जाते. त्यामुळे हिमालयाची हिमशिखरे आम्हाला पहायला मिळाली. त्यांची आम्ही छायाचित्रे काढली.

२ इ. जोमसोम येथील विमानाची धोकादायक धावपट्टी : जोमसोम हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २७०० मी. उंचावर आहे. त्यामुळे तेथील विमानाची धावपट्टी जगातील धोकादायक धावपट्टींमध्ये दुसऱ्यां क्रमांकाची आहे. या विमानप्रवासात दोन्हीकडे हिमालयाची शिखरे असतात आणि त्यांच्या मधून विमान जाते. विमान खाली-वर हेलकावे खात असते. त्यामुळे लोक घाबरून विमानप्रवास करत नाहीत.

२ इ १. विमान हिमशिखरांच्या मधून जात असतांना त्याने एकदाही खाली-वर हेलकावे न खाणे, नेपाळमधील ‘गाईड’ श्री. भरत शर्मा यांनी १७ वर्षांत प्रथमच असे अनुभवले असल्याचे सांगणे आणि ‘हनुमंतच विमान घेऊन चालला आहे’, अशी अनुभूती आम्हाला येणे : आम्ही जेव्हा हा विमानप्रवास केला, तेव्हा आम्हाला अशी अनुभूती आली की, आमचे विमान एकदाही खाली-वर झाले नाही. आमच्यासह नेपाळमधील भरत शर्मा होते, ते म्हणाले, ‘‘गेली १७ वर्षे मी ‘गाईड’ म्हणून लोकांबरोबर हा प्रवास करत आहे; पण या १७ वर्षांत एकदाही असे झाले नाही की, विमान खाली-वर न होता अगदी सरळ जात आहे. या वेळी हे पहिल्यांदाच झाले. हे आश्चनर्य आहे.’’ आम्हाला त्या वेळी असे वाटत होते, ‘हनुमंतच आमचे विमान घेऊन चालला आहे.’ अशा प्रकारे महर्षींच्या कृपेने आमचा हा विमानप्रवास निर्विघ्नपणे पार पडला आणि आम्ही जोमसोम येथे व्यवस्थित पोहोचलो.’

३. जोमसोम येथील थंड तापमान सहन करण्याइतपत असणे

‘जेव्हा आम्ही जोमसोम येथे विमानातून उतरलो, तेव्हा तेथील तापमान उणे २ होते. चार दिवसांपूर्वी हेच तापमान उणे १० होते.

४. हिमालयातील नीलगिरीवर सूर्यकिरण पडून प्रकाशमान झालेली त्याची शिखरे !

जोमसोम विमानतळावर उतरल्यावर आम्हाला समोरच हिमालयातील अन्नपूर्णा पर्वत रांगांतील नीलगिरीचे दर्शन झाले. तेव्हा सूर्याचे किरण त्या पर्वताच्या शिखरांवर पडले होते. त्यामुळे त्या पर्वताची शिखरे प्रकाशमान झाली होती.

५. जोमसोम ते मुक्तीनाथ प्रवास

हे अंतर २२.५ कि.मी. आहे. हा प्रवास चारचाकी जीपने करावा लागतो. जोमसोमला पोहोचल्यानंतर आम्ही लगेच जीप भाड्याने घेतली आणि पुढील प्रवासाला निघालो. हा रस्ता डांबरी रस्ता नसून कच्चा रस्ता आहे. त्यामुळे हे अंतर पार करायला साधारण दीड ते दोन घंटे लागतात. हा प्रवासही कठीण आहे. या गाडीच्या प्रवासात कधी गाडी गंडकी नदीच्या मार्गाने प्रवास करते, तर कधी डोंगरावरून प्रवास करते. वाटेत आपल्याला ३ गावे लागतात. यांतील ११ कि.मी. अंतरावर ‘कागबेनी’ हे गाव लागते. त्यापुढे साडेआठ कि.मी. अंतरावर ‘झारकोट’ हे गाव लागते आणि त्यापुढे अडीच कि.मी. अंतरावर ‘रानीपव्वा’ हे गाव लागते. त्यापुढे अर्ध्या कि.मी. अंतरावर आहे ‘मुक्तीनाथ’ गाव. तेथे आम्ही सकाळी पावणेअकरा वाजता पोहोचलो.

काळ्या कुत्र्याच्या रूपातील काळभैरव

५ अ. या प्रवासात आम्हाला काळ्या कुत्र्याच्या रूपात काळभैरवाचे दर्शन झाले.

५ आ. मुक्तीनाथ जवळ आल्यावर आम्हाला आकाशात मोठा गरुड दिसला.

१५.३.२०१७ – मुक्तीनाथ गाव ते मुक्तीनाथ देऊळ हा प्रवास

मुक्तीनाथ देवळासमोर (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

मुक्तीनाथ या गावापासून मुक्तीनाथ देऊळ अडीच कि.मी. अंतरावर थोड्या चढावावर आहे. हा हिमाच्छादित प्रदेश असल्यामुळे आणि ३ – ४ दिवसांपूर्वी तेथे हिमवर्षाव झालेला असल्यामुळे ही वाटही तशी खडतरच होती. हे अंतर घोड्यावर बसून पार करावे लागते. हा प्रवास करायला २५ मिनिटे लागतात. आम्ही ६ जण होतो, तरी आम्हाला घोडे लगेच मिळाले. देवाने आमच्यासाठी घोड्यांची सोय करूनच ठेवली होती. आम्ही हा घोड्यावरचा प्रवास करून मुक्तीनाथ देवळात पोहोचलो. आम्ही तेथे पोहोचलो, तेव्हा तेथे केवढा बर्फ होता, हे येथे दिलेल्या छायाचित्रावरून लक्षात येईल.

६ अ. मुक्तीनाथ स्थानाचे वैशिष्ट्य

६ अ १. श्रीविष्णूचे १०६ वे दिव्य क्षेत्र : हे श्रीविष्णूच्या १०८ दिव्य क्षेत्रांपैकी १०६ वे आणि पृथ्वीवरील शेवटचे क्षेत्र आहे. १०७ वे आणि १०८ वे क्षेत्रे वैकुंठात आहेत.

६ अ २. श्रीमत् नारायणाची शक्ती असलेले स्थान ! : मुक्तीनाथ हे श्रीविष्णूने तपश्‍चर्या केलेले स्थान आहे. ‘तेथे श्रीमत् नारायणाची शक्ती आहे. आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ती शक्ती हवी आहे. त्यामुळे त्या अवघड स्थानी जाऊन प्रार्थना करायला हवी’, असे महर्षि आम्हाला म्हणाले होते.

६ अ ३. या मुक्तीनाथ स्थानाहूनच पांडव स्वर्गारोहणाला गेले.

६ अ ४. एवढ्या उंचावर ऋषीमुनींना हे स्थान कसे समजले असेल आणि ते या स्थानी कसे आले असतील, हे आश्‍चर्यच असणे : हिमाच्छादित प्रदेशात समुद्रसपाटीपासून ३७१० मी. उंचावर हे मुक्तीनाथ स्थान आहे. या अवघड स्थानी जायला आता एवढी तरी सोय आहे. सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींना ‘या स्थानी देव आहे’, हे कसे कळले असेल आणि ते या स्थानी कसे आले असतील, याचे आश्‍चर्य वाटते ! त्यांनी आपल्याला हे श्रीविष्णूचे दिव्य क्षेत्र दाखवले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी आणि हे स्थान व्यवस्थित संरक्षित करायला हवे.

(हे मंदिर सहस्रो वर्षांपासून आहे. हिंदु राष्ट्रात ‘या मंदिराकडे यात्रेकरूंना व्यवस्थित जाता येईल’, अशी सोय करून देण्यात येईल. तसेच मंदिराचीही काळजी घेतली जाईल. – संकलक)

७. देवळाच्या परिसरातील १०८ गोमुखे

देवळाच्या परिसरात देवळाच्या मागे १०८ गोमुखे आहेत. त्यांतून गंडकी नदीचे पाणी वहाते. त्याला ‘तीर्थ’ म्हटले जाते. हे पवित्र जल आम्ही जतन केले.

८. देहशुद्धीसाठी देवळाबाहेरील पापकुंड आणि धर्मकुंड

मुक्तीनाथ देवळाबाहेरील पापकुंड

देवळाच्या समोर २ कुुंडे आहेत. त्यांतील उजवीकडच्या कुंडाला पापकुंड म्हणतात, तर डावीकडील कुंडाला धर्मकुंड म्हणतात. मुक्तीला जाण्यासाठी पापनिवारण करून मग धर्मकुंडामध्ये स्नान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे दर्शनाला आलेले लोक आधी उजवीकडील पापकुंडात स्नान करतात आणि त्यानंतर डावीकडील धर्मकुंडात स्नान करतात. या दोन्ही कुंडांचे वैशिष्ट्य म्हणजे सभोवती सगळीकडे बर्फ जमलेला असतो आणि तरीही या कुंडांतील पाण्याचा बर्फ होत नाही; कारण हे तीर्थ, म्हणजे पवित्र जल आहे. या दोन्ही कुंडांतील जल आम्ही जतन केले.

९. मुक्तीनाथचे दर्शन

आम्हाला मुक्तीनाथचे चांगले दर्शन झाले. तेथे श्रीमत् नारायणाची मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना श्रीदेवी आणि भूदेवी आहेत. तसेच त्याच्या चरणांजवळ गरुड आणि हनुमंत दास्यभावात बसले आहेत. तेथे श्री रामानुजाचार्यही आहेत. श्रीमत् नारायणाच्या चरणांजवळ वेगवेगळे शाळीग्राम ठेवलेले आहेत.

नाडीपट्टी श्रीमत् नारायणाच्या चरणांना लावून परत देतांना

९ अ. सप्तर्षि जीवनाडीपट्टी श्रीमत् नारायणाच्या चरणांजवळ काही वेळ ठेवणे : आम्ही तेथील पुजार्‍यांना आम्ही सप्तर्षि जीवनाडीच्या आज्ञेने या प्रवासाला आलो आहोत, असे सांगितले. तेथे पुजार्‍यांसोबत एक बाई होती. तिने आम्हाला म्हटले, तुमच्याजवळ असलेली सप्तर्षि जीवनाडीपट्टी मला द्या. मी ती श्रीमत् नारायणाच्या चरणांजवळ काही वेळ ठेवून तुम्हाला देते. तिने नाडीपट्टी देवाच्या चरणांजवळ ठेवली आणि मला परत दिली.

१०. मुक्तीनाथचे दर्शन होणे आणि त्यासाठी निसर्ग अनुकूल होणे, ही देवाचीच कृपा !

महर्षींनी आम्हाला दिनांक १४ मार्च या दिवशी मुक्तीनाथला जायला सांगितले. तेव्हा हवामान अनुकूल होण्याच्या संदर्भात चमत्कारच झाला. आम्हाला मुक्तीनाथचे दर्शन होणे, ही देवाचीच कृपा होती; कारण २ दिवस आधीपर्यंत येथील तापमान उणे १२ होते, तसेच काल हे तापमान उणे १० होते आणि एवढ्या न्यून (कमी) तापमानात येथे जाणे अशक्य होते. आज आम्ही येथे आलो, तेव्हा हे तापमान अधिक १४ झाले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. आजूबाजूला बर्फही होता; पण स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आम्हाला फारशी थंडी वाजत नव्हती. अशा प्रकारे निसर्ग अनुकूल झाल्यामुळेच आम्ही मुक्तीनाथचे दर्शन घेऊ शकलो. यावरून लक्षात आले, देव सारखा आमच्या बरोबरच आहे. तो आम्हाला असा कठीण दौरा करायला साहाय्य करत आहे.

१० अ. मुक्तीनाथच्या अवघड प्रवासात चित्रीकरण करता येणे, हीसुद्धा देवाचीच कृपा ! : या अवघड प्रवासात आम्हाला सर्व चित्रीकरण करता आले; कारण चित्रीकरणासाठी देवाच्या कृपेने चांगला प्रकाश होता. यावरून लक्षात येते की, देवाने आम्हाला किती साहाय्य केले !

११. परतीच्या प्रवासात कागबेनी येथील
काली गंडकी नदीचे आणि तेथील एका मठाचे दर्शन घेणे

गंडकी नदीचा प्रवाह

११ अ. गंडकी नदी : मुक्तीनाथ गावातून आम्ही चारचाकी गाडीने निघालो आणि कागबेनी येथे आलो. मुक्तीनाथला आपल्याला गंडकी नदी दिसत नाही. ती कागबेनी येथेच दिसते. येथे गंडकी नदीचे २ स्रोत एकमेकांना मिळून एक होतात. या नदीमध्ये शाळीग्राम मिळतात.

११ अ १. गंडकी नदीचा उगम : गंडकी नदी म्हणजे ब्रह्मदेवाचा घाम आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा त्याला ताण आला, आता ही सृष्टी चालवायची कशी ? त्यामुळे त्याला घाम आला आणि तो गालावरून ओघळला. गंड म्हणजे गाल. गालावरून ओघळलेला घाम म्हणून गंडकी.

११ अ २. काली गंडकी आणि तिच्यात सापडणारे काळे शाळीग्राम : ब्रह्मदेवाच्या गालावरून ओघळल्यावर गंडकी नदी तपश्चंर्येला बसली. तिने घोर तपश्चर्या आरंभ केल्यावर सर्व देवांना, तसेच इंद्राला भीती वाटू लागली, आता आपले राज्य डळमळीत होईल. त्यामुळे सर्व देव विष्णूकडे गेले. मग विष्णूने गंडकी नदीला विचारले, तुला काय हवे ? तेव्हा ती म्हणाली, मला सर्व देवांची आई बनायचे आहे. सर्व देव म्हणाले, हे तर काही शक्य नाही. तेव्हा तिला राग आला आणि तिने त्यांना शाप दिला, तुम्ही पृथ्वीवर किडा, मुंगी, कीटक अशा रूपात वावराल ! विष्णूने मग तिला सांगितले, मी तुझ्या गर्भामध्ये शिला बनून राहीन; म्हणून गंडकी नदीमध्ये शाळीग्राम आहेत. गंडकी नदीला राग आला होता. तिने रौद्र रूप घेतले होते. ती कालीमातेसारखी उग्र झाली होती; म्हणून तिला या मुक्तीनाथ क्षेत्री काली गंडकी म्हणतात. येथे तिचा रंग काळसर आहे. (आम्ही येथे काली गंडकीचे चित्रीकरण केले. त्यामध्ये ती खरोखरच काळसर दिसते.) येथील शाळीग्राम काळे आहेत.

श्‍वेत गंडकी नदीचे पात्र

११ अ ३. श्‍वेत गंडकी अन् तिच्यात सापडणारे श्‍वेत शाळिग्राम : पुढे काली गंडकी नदी वहात वहात पोखरा या गावात येते. तेव्हा तिचा राग शांत झाल्यामुळे ती हिमालयाचा शुभ्र रंग धारण करते. येथे तिला धवल गंडकी किंवा श्‍वेत गंडकी म्हणतात. येथे गंडकी नदीचा रंग दुधाळ आहे. या गंडकी नदीत शुभ्र पांढरे शाळिग्राम मिळतात. ते अगदी बर्फाच्या गोळ्यासारखे पांढरे असतात. वरून वहात वहात काली गंडकी श्‍वेत गंडकी बनते, तेव्हा काळे शाळिग्रामही पांढरे बनतात. हा देवाचा केवढा अद्भुत चमत्कार आहे ! काळ्याचे पांढरे शाळिग्राम बनण्याच्या या प्रक्रियेतील काळा-पांढरा असे दोन्ही रंग असलेले शाळिग्रामही आम्हाला मिळाले. पोखरा या क्षेत्राच्या पुढे जेव्हा गंडकी नदी वहात जाते, तेव्हा तिच्या पात्रात शाळिग्राम अजिबात मिळत नाहीत. हेही आश्‍चर्य आहे !

११ अ ४. शाळिग्राम निर्माण होण्यासंबंधीची आणखी एक गोष्ट : जालंदर नावाचा राक्षस होता. त्याला विष्णूने मारले. त्याच्या पत्नीचे नाव होते वृंदा. तिने विष्णूला शाप दिला, तू पृथ्वीवर शिला, वृक्ष, रोप आणि गवत अशा ४ रूपांमध्ये वास करशील. यांतील शिला म्हणजे शाळिग्राम, वृक्ष म्हणजे पिंपळ, रोप म्हणजे तुळस आणि गवत म्हणजे कुश.

११ अ ५. चक्रांकित, वलयांकित शाळिग्राम कसे बनतात, याविषयीची कहाणी : शापामुळे किडा, मुंगी, कीटक यांच्या रूपात ज्या देवता पृथ्वीवर आल्या, त्या ३३ कोटी देवता विष्णूची लीला बघण्यासाठी वज्र कीटकाच्या रूपात शाळिग्राममध्ये गेल्या. त्यांच्यामुळे शाळिग्रामच्या आतमध्ये कोरले गेले. थोडक्यात शाळिग्राम म्हणजे ब्रह्मांड आणि त्यात असलेल्या त्या ३३ कोटी देवतांनी कोरलेले कोरिवकाम म्हणजे चक्रांकित किंवा वलयांकित शाळिग्राम. असे सगळे सुंदर आहे. प्रत्येक शाळिग्रामवर शंख, चक्र, गदा आणि पद्म ही ४ चिन्हे असतात. त्यांच्या क्रमानुसार शाळिग्रामचे नाव आणि वैशिष्ट्य पालटते.

११ अ ६. सालिग्राम गावात मिळणारी शिळा ती शाळिग्राम ! : शाळीग्राम याचा मूळ शब्द सालिग्राम असा आहे. त्याचा अर्थ आम्हाला येथे समजला तो असा, साल नावाचे वृक्ष ज्या क्षेत्रात आहेत, ते ग्राम. असे ते सालिग्राम गाव आहे. तेथे मिळणारी शिला; म्हणून शाळिग्राम.

गावोगावी असलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण माहिती इतरांना ठाऊक नाही. हिंदु राष्ट्रामध्ये आता ती माहिती आपल्याला पुस्तकातून द्यावी लागेल.

११ आ. मुक्तीनाथबाबांचा मठ : कागबेनी येथे मुक्तीनाथबाबांचा एक मठ आहे. अनेक वर्षांपूर्वी तेथे एक संत होऊन गेले. त्यांचे नाव मुक्तीनाथबाबा. त्या मठात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर शाळिग्राम ठेवले आहेत. तो मठ म्हणजे एक छोटे मंदिरच आहे. तेथे सध्या ३ – ४ शिष्य रहातात. त्यांचे मुख्य गुरु काठमांडूला रहातात. त्या मठातील शिष्यांनी मला तेथील वेगवेगळ्या प्रकारचे शाळिग्राम दाखवले.

११ इ. या परतीच्या प्रवासात आम्हाला एका डोंगरावर ‘ॐ’ आणि त्याखाली ‘त्रिशूळ’ यांचे दर्शन झाले.

१२. जोमसोम येथे पोहोचणे

१२ अ. येथील हवामान पालटून ते खराब होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे आणि त्यामुळे तेथे आणखी एक दिवस न रहाता उद्या तेथून निघण्याचा निर्णय घेणे : कागबेनी हे स्थान पाहिल्यानंतर आम्ही दुपारी साडेचार वाजता जोमसोमला आलो. तेव्हा तेथील तापमान उणे २ झाले होते आणि सायंकाळी ७ वाजता ते उणे ७ झाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘येथील मुक्तीनाथदर्शन आता पूर्ण झाले आहे. तसेच येथील हवामानही उद्या खराब होऊ शकते. त्यामुळे आपण उद्या लवकरात लवकर येथून निघूया.’ खरेतर आम्ही उद्या आणखी एक दिवस येथे राहून पुन्हा कागबेनी येथे जाऊन गंडकी नदीचे चित्रीकरण करण्याचे ठरवले होते. जोमसोम हे असे ठिकाण आहे की, तेथे प्रत्येक अर्ध्या घंट्याने हवामान पूर्ण पालटून जाते. तेथे कधी हिमवर्षाव होत असतो, तर कधी १ घंट्यानंतर स्वच्छ ऊन पडलेले असते. त्यामुळे मी माझ्याबरोबरच्या साधकांना सांगितले, ‘आपण उद्या सकाळीच येथून निघूया.’

मुक्तीनाथबाबांच्या मठात ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर शाळिग्राम

१२ आ. दुसर्‍या दिवशी सकाळच्या विमानाची तिकिटे लगेचच मिळणे, हे मोठे आश्‍चर्यच असणे : मी उद्या निघायचे असल्याचे सांगितल्यावर आमच्याबरोबरचे श्री. भरत शर्मा म्हणाले, ‘‘मी आताच्या आता जातो आणि उद्या सकाळच्या विमानाची तिकिटे मिळतात का, हे पहातो.’’ एका घंट्याने ते येऊन म्हणाले, ‘‘उद्या सकाळच्या ८ वाजताच्या विमानातील ९ अमेरिकन प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याने त्यांच्या जागेवर आपल्याला तिकिटे मिळाली आहेत.’’ अशा प्रकारे आम्हाला एवढ्या तातडीने तिकिटे मिळणे, ही मोठी आश्‍चर्याचीच गोष्ट होती.’

 

१५.३.२०१७ – मुक्तीनाथ देऊळ, नेपाळ

मुक्तीनाथ ते जोमसोम या परतीच्या प्रवासात
आम्हाला एका डोंगरावर ॐ आणि त्याखाली त्रिशूळ यांचे दर्शन होणे

डोंगरावर उमटलेला ॐ आणि त्याखाली त्रिशूळ (गोलात मोठे करून दाखवले आहे.)

मुक्तीनाथ येथून जोमसोम येथे परत येतांना आम्हाला हिमालयातील डोंगरावर ॐ आणि त्याखाली त्रिशूळ उमटलेला दिसला. त्याचे हे छायाचित्र आहे. यातून लक्षात येते की, निसर्ग कशी आपल्याला दैवी साक्ष देत आहे. निसर्ग त्याच्यातील देवत्वाचे दर्शन देत आहे, हे फार महत्त्वाचे आहे. निसर्गामुळे आम्हाला हे दर्शन झाले.

१६.३.२०१७ – जोमसोम ते पोखरा हा परतीचा प्रवास

१. काठमांडू येथे जाण्यासाठी त्या दिवसाची तिकिटे न मिळता दुसर्‍या दिवसाची तिकिटे मिळणे
आणि ‘इथे आम्हाला १ दिवस ठेवण्यामागे देवाची काहीतरी इच्छा असेल’, असा विचार मनात येणे

‘आज सकाळी ७ वाजता तयार होऊन जोमसोम विमानतळावर पोहचलो आणि ८ वाजताचे विमान पकडून साडेआठ वाजता पोखरा येथे पोचलो. तेथे पोहचल्यावर आम्ही ‘पोखरा ते काठमांडू विमानाचे तिकिट मिळते का ?’, हे बघितले; पण आजच्या सर्व विमानांची आसने आधीच आरक्षित झालेली होती. त्यामुळे आम्ही उद्या सकाळीच काठमांडूला जाऊ शकत होतो. त्याप्रमाणे आम्ही उद्या सकाळी ११ वाजताच्या विमानाची तिकिटे काढली. माझ्या मनात विचार आला, ‘देवाची काहीतरी इच्छा असेल. त्यामुळेच आम्हाला आजची काठमांडूला जायची विमानाची तिकिटे मिळाली नाहीत.’ त्याप्रमाणे आम्ही पोखरा येथे थांबलो आणि आमचे सर्व आवरून घेतले.

२. ‘श्‍वेत गंडकी’ नदीची माहिती मिळणे, तेव्हा ‘हेच वैशिष्ट्यपूर्ण स्थान
बघण्याचे नियोजन देवाने आज केले होते’, हे लक्षात येणे आणि त्याप्रमाणे तेथे जाणे

मी श्री. भरत शर्मा यांना विचारले, ‘‘इथे आणखी काही ठिकाणे बघण्यासारखी आहेत का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो, येथे ‘श्‍वेत गंडकी’ नावाची नदी वहाते. गंडकी नदीला ७ स्रोत आहेत. त्यांपैकी हा एक आहे. हिला इकडच्या भाषेमध्ये ‘सेती गंडकी’ असे म्हणतात.’’ तेव्हा ‘हेच वैशिष्ट्यपूर्ण स्थान बघण्याचे नियोजन देवाने आज केले होते’, हे लक्षात आले आणि आम्ही तेथे जायचे ठरवले.

३. ‘श्‍वेत गंडकी’ नदीचे स्थान

हे स्थान पोखरा येथून ५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे नदीचे सुंदर दर्शन होते. तेथे ती अरुंद दरीतून, म्हणजे खिंडीतून वहाते. तिच्या प्रवाहातील एका दगडावर आम्हाला ‘ॐ’चे दर्शन झाले.

४. तेथील पुजार्‍यांनी नदीची पूजा
करवून घेणे आणि नदीचे जल ‘प्रसाद’ म्हणून देणे

तेथे श्री. राम कडकी नावाचे एक पुजारी होते. त्यांनी माझ्याकडून नदीची पूजा करवून घेतली, तसेच आम्हाला नदीचे जल काढून ‘प्रसाद’ म्हणून दिले.

५. पुजारी श्री. राम कडकी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे बघून भावजागृती होणे,
त्यांच्या रूपात आपल्याकडे साईबाबाच आले असल्याचे वाटणे आणि सनातनच्या गुरुपरंपरेमध्ये साईबाबांचेच तत्त्व असणे

अरूंद दरीतून वहाणारा श्‍वेत गंडकी नदीचा प्रवाह

 

श्‍वेत गंडकी नदीच्या प्रवाहातील दगडावरील ॐ गोलात दाखवला आहे.

श्री. राम कडकी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांची माझ्याकडे बघून भावजागृती होत होती. ते दोघेही म्हणाले, ‘‘तुमच्या रूपात साईबाबाच आमच्याकडे आले’, असे आम्हाला का वाटत आहे, ते कळत नाही.’’ मी त्यांना सनातनच्या गुरुपरंपरेविषयी, तसेच गुरुपरंपरेतील साईबाबांचेच तत्त्व असणार्‍या अनंतानंद साईश यांच्याविषयी माहिती दिली. मग त्यांनी मला प्रसाद दिला.

६. पुजारी श्री. राम कडकी यांनी श्वेत गंडकीचे मोठे पात्र असलेल्या ठिकाणीही जाण्यास सांगणे, श्वे‍त गंडकी
नदीमधील श्वेत शाळिग्रामही देणे आणि ते बघून अभ्यासासाठी आणखी शाळिग्राम मिळवण्यासाठी त्या स्थानी जाणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्वेत गंडकी नदीमधील श्वेत शाळिग्राम देतांना श्री. राम कडकी

 

श्वेत गंडकी नदीमधील श्वेत शिळा

 

श्वेत गंडकी नदीचे मोठे पात्र

श्री. राम कडकी म्हणाले, ‘‘इथून थोड्या अंतरावर जेथे श्वेत गंडकी मोठ्या रूपात दिसते, ते स्थानही तुम्ही अवश्य बघा.’’ त्यांनी मला श्वेत गंडकी नदीमधील काही दगडही दिले. त्यांतील संपूर्ण श्वेत दगड बघून मी म्हटले, ‘‘हे तर श्वेत शाळिग्राम आहेत.’’ ते बघून मला पुष्कळ आनंद झाला आणि मी त्यांनी सांगितलेल्या स्थानी जायचे ठरवले. आम्ही तेथे गेलो. तेथे श्वेत गंडकीचे मोठे पात्र आहे. तेथून मी काही श्वेेत शाळिग्राम अभ्यासासाठी घेतले. श्वेेत गंडकीमध्ये श्वेत शाळिग्राम आहेत आणि काली गंडकीमध्ये काळे शाळिग्राम आहेत.

१६.३.२०१७ – नेपाळमधील जोमसोम ते पोखरा हा परतीचा प्रवास

७. श्‍वेत गंडकीचा उगम झालेल्या हिमालयामधील ‘मत्स्यपुच्छ्रे’ शिखराला नेपाळी
हिंदू देव मानत असणे, ‘मत्स्यपुच्छ्रे’ म्हणजे माशाची शेपटी, मत्स्य हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने
श्‍वेत गंडकी नदीचा उगम श्रीविष्णूच्या चरणांतून झाला असणे; म्हणून या नदीतील श्‍वेत दगड हे श्‍वेत शाळिग्राम असणे

हिमालयामधील ‘मत्स्यपुच्छ्रे’ शिखर

श्‍वेत गंडकीचा उगम हिमालयामधील ‘मत्स्यपुच्छ्रे’ शिखरातून होतो. हे शिखर ६९९३ मी. उंच आहे. हिमालयाची १० सहस्रपेक्षा अधिक शिखरे आहेत. त्यांतील पुष्कळशी शिखरे नेपाळमध्ये आहेत. त्यांपैकी केवळ मत्स्यपुच्छ्रे शिखराला नेपाळी हिंदू देव मानतात; म्हणून आजपर्यंत कोणी या शिखरावर गिर्यारोहण केलेले नाही. त्याची परवानगी नाही. ‘मत्स्यपुच्छ्रे’ म्हणजे माशाची शेपटी. तेथून जी नदी निघाली, ती श्‍वेत गंडकी. मत्स्य हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे श्रीविष्णूच्या चरणांतूनच श्‍वेत गंडकी नदीचा उगम आहे; म्हणून या नदीतील दगडांना ‘श्‍वेत शाळिग्राम’ म्हणू शकतो. तसा उल्लेख अजूनपर्यंत कोणी केलेला नाही.

८. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना बघून त्यांच्या रूपात साईबाबाच आपल्याकडे
आल्याचे एका दुकानातील ३ बायकांनी सांगणे आणि अशी अनुभूती एकाच दिवशी दोनदा येणे

बांबूपासून बनवलेले ईरले डोक्यावर घेतलेल्या सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ

पोखरा येथील आमच्या निवासस्थानी जात असतांना एका दुकानात मला बांबूच्या सालींची आसने आणि इतर वस्तू केलेल्या दिसल्या. मी त्या बघण्यासाठी त्या दुकानात गेले. तेथे ३ बायका होत्या. त्या तिन्ही बायका मला म्हणाल्या, ‘‘आम्हाला तुमच्या रूपात साईबाबाच आमच्याकडे आले आहेत’, असे वाटत आहे.’’ माझ्या रूपात साईबाबा आल्याची अनुभूती आज २ ठिकाणी आली.

८ अ. येथील दुकानात शेतकरी शेतात कामे करतांना ऊन आणि पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी अंगावर जे पांघरतात (ईरले), ते दिसले. त्याचा आकार सुंदर आणि सात्त्विक होता. ते बांबूपासून तयार केलेले असल्याने त्यात नैसर्गिकता होती.

१७.३.२०१७ – पोखरा ते काठमांडू हा परतीचा प्रवास

१. काठमांडू येथे पोचणे

आज सकाळी आम्ही सव्वा अकरा वाजताच्या विमानाने काठमांडूला जायला निघालो आणि अर्ध्या घंट्याने तेथे पोचलो.

२. डोलेश्‍वर महादेवाचे दर्शन

डोलेश्‍वर महादेव

आम्ही सायंकाळी या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. हे मंदिर भक्तपूर जिल्ह्यात आहे. ते काठमांडूपासून २१ कि.मी. अंतरावर आहे. येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग एका बाजूला डोललेले, म्हणजे झुकलेले आहे. हे शिवलिंग स्वयंभू असून जागृत स्थान आहे.

२ अ. डोलेश्‍वर महादेवाविषयी समजलेली गोष्ट : एक महंत या मंदिराचा गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करत होते. त्यांना असे लक्षात आले की, केदारनाथ येथील महादेव आणि डोलेश्‍वर महादेव यांचा काहीतरी संबंध आहे; कारण दोन्ही मंदिरांमध्ये साम्य आहे. केदारनाथचे लिंग आणि हे लिंग सारखे दिसते. दोन्ही मंदिरे साधारण ४ सहस्र वर्षांपूर्वीची आहेत. शास्त्राचा आणखी अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आले, ‘पांडव जेव्हा स्वर्गारोहणाच्या वेळी केदारनाथच्या मार्गाने जात होते, तेव्हा शिवाने त्यांना दर्शन दिले नाही. शिवाने बैलाचे रूप धारण केले. अर्जुनाला कळले की, शिवाने नंदीचे रूप धारण केले आहे. तेव्हा पाचही पांडवांनी मिळून ‘त्या बैलाला धरायचे’, असे ठरवले. त्यांनी तसा प्रयत्न केला, तेव्हा बैलाची शिंगे, म्हणजे डोके त्यांच्या हातात आले; बाकीचे धड त्यांच्या हातातून निसटले. तेव्हा त्यांनी ते मुख भिरकावून दिले. ते नेपाळमध्ये पडले. हे मुख म्हणजे नेपाळमधील डोलेश्‍वर महादेव. पांडवांनी शिवाला धरायचा प्रयत्न केला असल्यामुळे ते एका बाजूला झुकलेले, म्हणजे डोललेले आहे. ‘हे केदारनाथचे मुख आहे’, असे समजतात.’

२ आ. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या मोठ्या भूकंपाच्या वेळी हे मंदिर पूर्ण पडणे; पण शिवलिंगाला काही न होणे : एप्रिल २०१५ मध्ये जेव्हा नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला, तेव्हा हे मंदिर पूर्णपणे पडले; पण शिवलिंगाला काहीच झाले नाही. त्यामुळे सध्या हे मंदिर नव्याने बांधकाम करणे चालू आहे. या भूकंपानंतर या मंदिराचे दर्शन घेणार्‍या भक्तांची संख्या वाढत आहे.

३. कापराची झाडे विकत घेणे

नेपाळमध्ये कापराची झाडे मिळतात. आम्ही गोव्यातील रामनाथी आश्रमाच्या लागवडीमध्ये लावण्यासाठी येथील रोपवाटिकेतून कापराची काही झाडे विकत घेतली. कापराच्या झाडांची जंगले इंडोनेशिया, मलेशिया आणि नेपाळ येथे आहेत. भारतात आपल्याकडे तमिळनाडू आणि केरळ यांच्या सीमारेषेवर अगस्त्यमलई म्हणून जंगलाचा भाग आहे. तेथे कापराची झाडे आहेत. या झाडांना चिक येतो. तो म्हणजे कापूर. त्याच्या वड्या करतात. नेपाळचा भाग हा हिमालयाचा असल्याने हे शिवक्षेत्र आहे; म्हणून या भागात रुद्राक्ष आणि कापूर यांची झाडे आहेत.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात कापूर बनतो कसा ?, अशी जिज्ञासा निर्माण होणे, त्याच वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात नेपाळमधून कापराची झाडे घ्यावीत, असा विचार येणे आणि यावरून गुरूंच्या इच्छेनुसारच आपण कार्य करतआहोत, हे लक्षात येणे : परात्पर गुरु डॉ.आठवले यांना मी कापराच्या झाडाविषयी हे सर्व सांगितल्यावर ते म्हणाले, कालच मी कुणालातरी विचारले की, कापूर कसा बनवतात ? यावरून मला लक्षात आले, जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात कापराविषयी जिज्ञासा निर्माण झाली, तेव्हाच माझ्या मनात कापराच्या झाडाविषयी माहिती मिळवण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणजे गुरुच पुढे काय करायचे ?, याविषयी सुचवतात आणि आपण त्याप्रमाणे कार्य करतो. यावरून आपण गुरूंच्या इच्छेनेच कार्य करत आहोत. अध्यात्मात आपण स्वतःहून काहीही करत नाही. सर्वकाही गुर्वाज्ञेनेच होत असते. करवून घेणारे तेच आहेत. त्यामुळे आपण कसलाही अहं बाळगायला नको, हे माझ्या लक्षात आले.

४. नेपाळमधील महिलांची पारंपरिक वेशभूषा

नेपाळी पारंपारिक वेशभूषेतील महिलांसमवेत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (मध्यभागी)

मला येथील पारंपरिक वेशभूषेत असणारे लोक आवडले. त्यांची वेशभूषा सात्त्विक असून संपूर्ण अंग झाकले जाते. मी दोन महिलांसोबत माझे छायाचित्र काढून घेतले. तेव्हा त्यांनाही पुष्कळ आनंद झाला.

५. नेपाळच्या श्री. अमन मोगा यांनी हे माझे घर आता आपल्या
आश्रमासारखेच समजा, असे सांगणे आणि देवानेच नेपाळमध्ये ही सोय करून देणे

मागे हिंदू अधिवेशनाला नेपाळचे श्री. अमन मोगा आले होते. ते देहलीचे साधक श्री. संजीव कुमार यांचे नातलग आहेत. त्यांच्याकडे आज आम्ही गेलो होतो. ते म्हणाले, हे माझे घर आता आपल्या आश्रमासारखेच समजा. तुम्ही येथे केव्हाही येऊ शकता. त्यामुळे पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका पुढे जेव्हा केव्हा नेपाळला जातील, तेव्हा त्यांना श्री. अमन यांच्याकडे रहाता येईल. देवानेच ही सोय करून दिली.

१८.३.२०१७ – नेपाळहून भारतात देहली येथे प्रयाण

अवघड असा मुक्तीनाथचा प्रवास  महर्षि आणि गुरु यांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडणे : आज आम्ही दुपारच्या विमानाने काठमांडू येथून निघून सायंकाळी देहली येथे सुखरूप पोचलो. अशा प्रकारे आमचा अवघड असा मुक्तीनाथचा प्रवास महर्षि आणि गुरु यांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

Leave a Comment