प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय शोधण्यापूर्वी आणि आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी वाईट शक्तींनी शरिरावर आणलेले त्रासदायक आवरण काढण्याविषयी अभ्यासाअंती लक्षात आलेली सूत्रे !

Article also available in :

वाईट शक्तींचा तीव्र त्रास होत असलेल्या साधकांना प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय शोधून देण्याची सेवा मी करतो. अशा साधकांसाठी मुद्रा, न्यास आणि नामजप शोधतांना असे लक्षात आले की, या साधकांवर वाईट शक्ती सध्या वरचेवर त्रासदायक आवरण आणत आहेत, तसेच ते आवरण एकदा आध्यात्मिक उपाय करून काढले, तरी पुनःपुन्हा येत आहे. यासंदर्भात लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

 

पू. डॉ. मुकुल गाडगीळ

 

१. वाईट शक्तींनी व्यक्तीवर त्रासदायक आवरण आणले असल्यास प्रामुख्याने सूक्ष्मातून काय जाणवते ?

१ अ. आवरण आलेल्या व्यक्तीला स्वतःला काय जाणवते ?

ज्या व्यक्तीवर आवरण आले आहे, तिला स्वतःला सूक्ष्मातील कळत असल्यास शरिरात मुख्यत्वे जडपणा जाणवतो. संपूर्ण शरिरावर आवरण आले असल्यास आपल्या शरिराभोवती काहीतरी आहे आणि आपण कसल्यातरी कोषामध्ये आहोत, असे जाणवते. शरिराच्या काही ठराविक भागावर आवरण आले असल्यास तेथेही काही लक्षणे जाणवतात, उदा. डोक्यावर आवरण आले असल्यास आपल्याला वरून कोणीतरी दाबत आहे, असे जाणवते, डोळ्यांवर आवरण आले असल्यास डोळ्यांवर पट्टी किंवा पडदा असल्यासारखे जाणवते, छाती आणि गळा यांवर आवरण आले असल्यास श्‍वास घ्यायला कोणीतरी अडथळा आणत आहे, असे जाणवते.

१ आ. सूक्ष्मातील कळणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला काय जाणवते ?

सूक्ष्मातील कळणार्‍या दुसर्‍या व्यक्तीला आवरण आलेली व्यक्ती स्पष्ट न दिसता धूसर दिसते, तसेच ती जवळ आल्यास दाब जाणवतो, मळमळते आणि कधी कधी दुर्गंधही येतो.

 

२. आवरण व्यक्तीभोवती किती अंतरापर्यंत पसरलेले असते ?

वाईट शक्तींनी व्यक्तीभोवती आणलेले आवरण तिच्या शरिरापासून साधारण २ – ३ सें.मी. ते १५ सें.मी. किंवा कधी २ – ३ मी. इतके लांबपर्यंतही पसरलेले असू शकते.

(आवरणाची लांबी किती आहे ?, हे सूक्ष्मातील कळणार्‍या व्यक्तीला तिच्या तळहाताला झालेल्या आवरणाच्या स्पर्शावरून कळू शकते. त्यासाठी आवरण असलेल्या व्यक्तीसमोर तळहात करून दूरवरून हळूहळू तिच्या जवळ जावे लागते. आवरण आलेल्या व्यक्तीलाही सूक्ष्मातील कळत असल्यास आणि तिच्यावरचे आवरण ३० – ४० सें.मी. पर्यंत असल्यास तिने स्वतःचा तळहात दूरवरून हळूहळू स्वतःपर्यंत आणल्यास तिला स्वतःवरील आवरणाची लांबी कळू शकते.)

 

३. व्यक्तीवर आलेले त्रासदायक आवरण कसे असते ?

हे आवरण कधी व्यक्तीच्या डोक्याभोवती गोल कडे असल्याप्रमाणे, कधी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्याप्रमाणे, कधी तिने घोंगडे पांघरल्याप्रमाणे, कधी तिच्या शरिराच्या केवळ पुढच्या बाजूला, कधी तिच्या शरिराच्या केवळ अर्ध्या भागावर, कधी तिच्या संपूर्ण शरिरावर, तसेच कधी विरळ, तर कधी घट्ट (रबराप्रमाणे) असते.

 

४. प्रथम कुंडलिनीचक्रावर आवरण येणे आणि त्यानंतर त्रास वाढून शरिरावर बाहेरूनही आवरण येणे

सर्वसाधारणपणे वाईट शक्ती प्रथम व्यक्तीच्या एखाद्या कुंडलिनीचक्रावर आवरण आणतात आणि मग ते वाढवून तिच्या शरिरावर बाहेरूनही आवरण आणतात. जेव्हा शरिराच्या एखाद्या भागावर बाहेरून आवरण येते, तेव्हा बहुतेक वेळा त्या ठिकाणी असलेल्या कुंडलिनीचक्रावर किंवा त्या भागाच्या जवळच्या कुंडलिनीचक्रावर (उदा. डोळ्यांवर आवरण आले असल्यास आज्ञाचक्रावर) आवरण आलेले असते. कधी कधी कुंडलिनीचक्रावर आवरण न येता केवळ शरिरावर बाहेरून आवरण येते. जेव्हा कुंडलिनीचक्रस्थानी आवरण येते, तेव्हा तेथे पुष्कळ दाब जाणवतो; पण जेव्हा शरिराच्या बाहेरूनही आवरण आलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःवर आवरण आले आहे, हे कळतच नाही. तिला मानसिक त्रास मात्र होत असतात.

 

५. वाईट शक्तींनी त्रासदायक आवरण आणल्याने व्यक्तीला होणारे काही त्रास आणि ते आवरण काढण्याची आवश्यकता

वाईट शक्तींनी आणलेल्या आवरणामुळे व्यक्तीला न सुचणे, मन अस्वस्थ असणे, मनात नकारात्मक विचार येणे, निरुत्साह, नामजप करावासा न वाटणे, उपायांचा परिणाम न होणे, यांसारखे त्रास होतात. कधी कधी शरिराच्या एखाद्या भागात वेदना होणे, पित्त होणे यांसारखे त्रासही होऊ शकतात.

व्यक्तीवर त्रासदायक आवरण आले असेल, तर तिने कितीही वेळ मुद्रा आणि न्यास करून स्वतःवर आध्यात्मिक उपाय केले, तरी आवरणामुळे त्या उपायांची सात्त्विक स्पंदने तिच्यापर्यंत पोहोचत नाहीत अन् त्यामुळे तिच्या त्रासांचे निवारण होत नाही.

 

६. व्यक्तीवर वाईट शक्तींनी आवरण आणले असल्यास प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधतांना काय जाणवते ?

६ अ. शरिरावर आवरण असल्यास काय जाणवते ?

आपल्या त्रासावर आपण स्वतः आध्यात्मिक उपाय शोधत असतांना जेव्हा न्यास करण्याचे स्थान शोधण्यासाठी हाताची बोटे कुंडलिनीचक्रांवरून फिरवतो, तेव्हा शरिरावर वाईट शक्तींनी आवरण आणले असल्यास ते आपल्या हाताच्या बोटांना जाणवते. आवरण विरळ असल्यास आपल्या हाताची बोटे कुंडलिनीचक्रांवरून वर वर सरकतात; पण त्या वेळी आपल्या कुंडलिनीचक्रांना बोटांतून प्रक्षेपित होणारी प्राणशक्तीची स्पंदने जाणवत नाहीत. देहावर विरळ आवरण आणून वाईट शक्ती आवरण आहे, हे जाणवू देत नाहीत आणि आपल्याला फसवतात. जेव्हा आवरण पुष्कळ घट्ट असते, तेव्हा आपल्या हाताची बोटे कुंडलिनीचक्रांवरून वर वर सरकवणे अवघड जाते आणि आपल्या शरिरावर कसलातरी थर आहे, असे जाणवते. काही वेळा तर आवरण असलेल्या भागातून हाताची बोटे वर सरकतच नाहीत. (आवरणामुळेच नाही, तर कुंडलिनीचक्रस्थानी पुष्कळ काळी शक्ती असली, तरीही हाताची बोटे वर सरकत नाहीत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले) त्यामुळे आपल्याला न्यास करण्याचे स्थान शोधता येत नाही.

६ अ १. मायावी आवरण असल्यास काय जाणवते आणि तेव्हा काय करावे ?

कधी कधी असेही होते की, स्वतःला त्रास तर होत असतो; पण न्यास करण्याचे स्थान शोधण्यासाठी कुंडलिनीचक्रांवरून हाताची बोटे फिरवली असता कुठेही अडथळा किंवा कोणत्याही चक्रावर दाब जाणवत नाही, तसेच आवरणही जाणवत नाही. तेव्हा स्वतःवर मायावी आवरण आलेले असू शकते. ते मायावी आवरण दूर करण्यासाठी कुंडलिनीचक्रांवरून हाताची बोटे फिरवतो, तसा हाताचा तळवा फिरवल्यास हाताच्या तळव्यातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण स्पंदनांमुळे मायावी आवरण दूर होऊन शरिरावरील आवरण प्रकट होते आणि तेव्हा ते चक्रांवरून बोटे फिरवतांना जाणवू लागते.

आ. कुंडलिनीचक्रावर आवरण असल्यास काय जाणवते ?

केवळ एखाद्या कुंडलिनीचक्रावर आवरण आले असल्यास, उपाय शोधण्यासाठी त्या कुंडलिनीचक्रस्थानावरून हाताची बोटे फिरवत असतांना आपल्या बोटांना अडथळा जाणवत नाही; पण तेव्हा आपल्याला श्‍वास घेण्यास अडथळा येतो किंवा त्या स्थानी वेदना जाणवतात.

 

७. वाईट शक्तींनी आणलेले आवरण काढण्यासंबंधी लक्षात घ्यायच्या सर्वसाधारण सूचना

७ अ. आवरण काढण्यास आरंभ करतांना प्रथम उपास्यदेवतेप्रती भावपूर्ण प्रार्थना करावी !

प्रार्थना अशी करावी, हे देवते, तुझ्या कृपेने मला माझ्या शरिरावरचे आवरण काढता येऊ दे आणि मला होत असलेले वाईट शक्तींचे त्रास लवकर दूर होऊ देत, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

७ आ. आवरण काढतांना नामजप करावा !

आवरण काढतांना आपल्या उपास्यदेवतेचा किंवा श्रीकृष्णाचा नामजप करावा. असे केल्याने देवाचे साहाय्य लाभल्याने आवरण लवकर निघते, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांपासून आपले रक्षण होण्यास साहाय्यही होते.

(स्वतःच्या त्रासावर मुद्रा, न्यास आणि नामजप शोधून उपाय करत असतांनाही जेव्हा आपण मधे मधे आवरण काढतो, तेव्हा त्या वेळी उपायांमधून आलेला जप करावा.)

७ इ. आवरण काढतांना डोळे उघडे ठेवावेत !

यामुळे आवरण लवकर निघते; कारण त्या वेळी आपल्या डोळ्यांतून प्रक्षेपित होत असलेल्या तेजतत्त्वाचे आवरण काढण्यासाठी साहाय्य मिळते.

७ ई. उपास्यदेवतेप्रती कृतज्ञता

आवरण काढून झाल्यानंतर उपास्यदेवतेप्रती भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करावी !

 

८. वाईट शक्तींनी आणलेले आवरण काढण्याची पद्धत

८ अ. शरिरावरील आवरण पुढीलप्रमाणे काढू शकतो !

८ अ १. स्वतःच्या हातांनी अथवा एखाद्या सात्त्विक वस्तूच्या साहाय्याने आवरण काढणेे !

अ. उकाडा झाल्यावर आपण काही वेळा आपल्या हातांनी जसा वारा घेतो, तसे आपल्या दोन्ही हातांनी आपल्या शरिरावरील आवरण शरिरापासून दूर सारावे. हातांनी आवरण दूर सारतांना हातांच्या बोटांतून अविरतपणे प्रक्षेपित होत असलेल्या प्राणशक्तीमुळे आवरण दूर होण्यास साहाय्य होते.

आ. शरिरावरील आवरण आपल्या हातांच्या मुठींमध्ये गोळा केल्यासारखे करून ते बसल्यास्थानी शरिरापासून दूर टाकावे.

इ. आवरण दूर करण्यासाठी सात्त्विक वस्तू, उदा. सनातन प्रभात नियतकालिक, मोरपिसांचा झुपका, प्रज्वलित न केलेली सात्त्विक उदबत्ती इत्यादींचाही उपयोग केल्यावर आवरण दूर झाल्याचा अनुभव काही साधकांना आला आहे. या वस्तूंनी आवरण काढतांना जसे हातांनी आवरण शरिरापासून दूर सारतो तसे किंवा या वस्तू शरिराभोवती फिरवून आवरण काढता येईल. सात्त्विक वस्तूंतील चांगल्या शक्तीमुळे शरिरावरील आवरण दूर होण्यास साहाय्य होते.

८ अ २. शरिरावरील आवरण काढतांना आवरणाच्या बाहेरच्या अंगापासून आरंभ करून शरिरापर्यंतचे आवरण काढणे !

शरिराभोवती साधारण ४० सें.मी. अंतरापर्यंत आवरण आले असल्यास ते आपण स्वतःचे स्वतः काढू शकतो; कारण तेथपर्यंत आपले हात पोेचू शकतात. त्याहून अधिक अंतरापर्यंत आवरण आले असल्यास ते चांगली साधना असणार्‍या आणि वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या दुसर्‍या व्यक्तीकडून काढून घ्यावे लागते. दुसरी व्यक्ती उपलब्ध नसल्यास स्वतःच आवरण काढण्यासाठी उपाय करावेत. त्यानेही आवरण काढता येते.

स्वतःचे स्वतः आवरण काढतांना आधी हात लांब करून आपल्यावरील दूरचे आवरण काढावे. त्यानंतर हात जरा शरिराजवळ घेऊन तेथील आवरण काढावे. त्यानंतर हात आणखी जवळ घेऊन तेथील आवरण काढावे. असे करत करत शरिरालगतचेही आवरण काढावे. अशा प्रकारे आवरणाच्या बाहेरच्या अंगापासून आरंभ करून शरिरापर्यंतचे आवरण काढावे. प्रत्येक टप्प्याला साधारण अर्धा ते एक मिनिट आवरण काढावे. दुसर्‍याने आवरण काढतांनाही हीच पद्धत उपयोगात आणावी.

८ अ ३. आवरण खालून वरपर्यंत टप्प्याटप्प्याने काढणे !

शरिराच्या केवळ एखाद्याच भागावर, उदा. छातीवर आवरण आले असल्यास तेथील आवरण वरीलप्रमाणे काढावे; पण शरिराच्या मोठ्या भागावर, उदा. डोक्यापासून छातीपर्यंत आवरण आले असल्यास ते खालून वरपर्यंत टप्प्याटप्प्याने काढत जावे, उदा. प्रथम २ – ३ मिनिटे छातीवरील आवरण काढावे. तेथील आवरण काढतांना वर सांगितल्याप्रमाणे आवरणाच्या बाहेरच्या अंगापासून आरंभ करून शरिरापर्यंतचे आवरण काढणे ही पद्धत अवलंबावी. (असे प्रत्येक टप्प्याला करावे.) त्यानंतर आपल्या कुंडलिनीचक्रांवरून हाताची बोटे फिरवून आता आवरण कुठपर्यंत आहे, हे पहावे. तेव्हा छातीवरचे आवरण न्यून (कमी) होऊन गळ्याशी आवरण जाणवत असल्यास तेथील आवरण वरीलप्रमाणे काढावे. याप्रमाणे टप्प्याटप्प्याने डोक्यापर्यंतचे आवरण काढावे. वाईट शक्ती बहुतांशी व्यक्तींच्या शरिरावर वरून खालपर्यंत, म्हणजे आज्ञाचक्रापासून आरंभ करून खालच्या खालच्या कुंडलिनीचक्रांपर्यंत आवरण आणतात. (कधी उलटही होते.) जेथून त्यांनी आवरण आणणे आरंभ केलेले असते, तेथे ते घट्ट असते आणि पुढे ते विरळ होत गेलेले असते. विरळ आवरण काढणे सोपे असते; म्हणून ते प्रथम काढावे.

८ अ ४. स्वतःवर आवरण आले आहे कि नाही, हे नीट कळत नसल्यास सहस्रारचक्रापासून स्वाधिष्ठानचक्रापर्यंत आवरण काढण्याची कृती !

स्वतःवर आवरण आले आहे कि नाही, हे सूत्र ६ अ मध्ये दिलेल्या पद्धतीनुसार नीट कळत नसेल, तर सहस्रारचक्रापासून स्वाधिष्ठानचक्रापर्यंत एकेक चक्रावरील आवरण काढण्याची कृती १० – १५ मिनिटे करावी. यानंतर मुद्रा, न्यास आणि नामजप उपाय किंवा इतर उपाय करावेत. असे केल्याने शरीर आणि चक्रे यांवर थोडेफार जरी आवरण आले असेल, तर ते निघाल्यामुळे पुढील उपाय परिणामकारक होण्यास साहाय्य होते.

८ आ. कुंंडलिनीचक्रावरील आवरण काढण्याची कृती !

शरिराच्या बाहेरून आलेले आवरण काढल्यानंतर त्या भागातील कुंंडलिनीचक्रावर (किंवा चक्रांवर) असलेले आवरण काढावे. प्रथम थोडा वेळ शरिराच्या बाहेरून आवरण आल्यावर ते जसे काढतो, तसे त्या चक्रावरील आवरण काढावे. यामुळे त्या चक्रावर जाणवत असलेला दाब न्यून होऊन तो सहन होण्याइतपत होतो. त्यानंतर त्या चक्रावर उपाय करण्यासाठी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधून जी मुद्रा, न्यास आणि नामजप येईल, तो करावा. मुद्रा, न्यास आणि नामजप करून त्या चक्रावर उपाय केल्याने तेथे असलेले आवरण संपूर्णतः दूर होते आणि आपल्याला हलके वाटू लागते.

(जेव्हा एखाद्या चक्रावर पुष्कळ दाब जाणवत असतो, तेव्हा तेथे आवरण जास्त प्रमाणात असल्याने मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या उपायांची स्पंदने त्या चक्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आधी तेथील आवरण काही प्रमाणात काढावे लागते. त्यानंतर शोधलेली मुद्रा, न्यास आणि नामजप या उपायांनी ते आवरण पूर्णतः जाते.)

८ आ १. आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर पुष्कळ प्रमाणात आवरण असल्यास अन् श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास प्रथम आज्ञाचक्रावरील आवरण काढावे !

बर्‍याचदा साधकांचे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर आवरण आलेले असते. जेव्हा आवरण पुष्कळ प्रमाणात असते, तेव्हा काही वेळा त्या साधकांना श्‍वास घ्यायला त्रास होत असतो. यासंदर्भात असे लक्षात आले आहे की, वाईट शक्तींचे मुख्य आक्रमणाचे स्थान आज्ञाचक्र असते आणि त्या तेथे स्थान निर्माण करून अनाहतचक्रावर त्रासदायक शक्ती सोडून श्‍वास घेण्यास अडथळा आणतात. अशा वेळी प्रथम अनाहतचक्रावरील आवरण काढू लागल्यास त्याचा त्रास घटण्यावर फारसा परिणाम दिसून येत नाही; कारण वाईट शक्तींचे स्थान आज्ञाचक्र असते. याउलट प्रथम आज्ञाचक्रावरील आवरण काढल्यास वाईट शक्तींचे स्थान नष्ट होऊ लागल्याने त्यांना अनाहतचक्रावर त्रासदायक शक्ती सोडून त्रास देता येत नाही. त्यामुळे अनाहतचक्रावरील आवरण आपोआपच दूर होऊन त्या साधकांना श्‍वास सहजतेने घेता येऊ लागतो.

 

९. आध्यात्मिक उपाय (नामजप, मंत्रजप) करण्यापूर्वीही स्वतःवर आवरण नसल्याची निश्‍चिती करावी !

नामजप-उपाय, मंत्र-उपाय आदी उपाय करण्यापूर्वीही स्वतःवर आवरण नसल्याची निश्‍चिती करावी. आवरण असल्यास ते काढावे आणि नंतर आध्यात्मिक उपाय करावेत.

 

१०. स्वतःवर वाईट शक्तींनी आवरण आणले आहे का ?, हे मधे मधे पहाणे आवश्यक !

त्रास असणार्‍या साधकांनी एका घंट्यात २ – ३ वेळा स्वतःवर आवरण आले आहे का ?, हे पहावे. तेव्हा त्यांनी आपल्या हाताची बोटे स्वाधिष्ठानचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत फिरवावीत आणि पुन्हा ती स्वाधिष्ठानचक्रापर्यंत न्यावीत. असे २ – ३ वेळा करावे. या पूर्ण कृतीसाठी १ – २ मिनिटेच लागतात. त्रास नसलेले साधक दिवसभरात मधे मधे स्वतःवर आवरण आले नसल्याची निश्‍चिती करू शकतात. स्वतःवर आवरण आले असल्यास ते काढू शकतात.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

Leave a Comment