सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

राजापूर, रत्नागिरी येथील संत प.पू. उल्हासगिरी महाराज
यांची सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला सदिच्छा भेट

प.पू. उल्हासगिरी महाराज यांचा सन्मान करतांना श्री. प्रकाश मराठे, शेजारी पू. विनय भावे
रात्पर गुरु डॉ. आठवले (डावीकडे) यांचा सन्मान करतांना प.पू. उल्हासगिरी महाराज

रामनाथी (फोंडा) : समाजात अनेक आश्रम आहेत; पण सनातनच्या आश्रमासारखा आश्रम कुठेही नाही. सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल आहे, असे गौरवोद्गार ओणी-कोंडिवळे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाविषयी काढले. प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी १७ ऑगस्ट या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. अधिवक्ता योगेश जलतारे यांनी प.पू. उल्हासगिरी महाराज यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य, आध्यात्मिक संशोधन आदींविषयीची सविस्तर माहिती दिली. या वेळी प.पू. महाराजांसमवेत त्यांच्या भक्त कु. अस्मिता जोरे या उपस्थित होत्या.  सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी प.पू. उल्हासगिरी महाराज यांचा सन्मान केला. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे संत पू. विनय भावे यांची वंदनीय उपस्थिती होती. यानंतर प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सन्मान केला. यानंतर प.पू. महाराजांनी परात्पर गुरु आठवले यांच्याशी चर्चा केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले संत घडवत
असल्याने ते महान आहेत ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो. या प्रक्रिया अन्य कुठल्याही संप्रदायांत सांगितल्या जात नाहीत. खरे साधक केवळ सनातनमध्येच आढळतात. याहीपेक्षा आपले मोठे कार्य म्हणजे आपण संत घडवता. आपण महान आहात. अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन करण्याचा आपला उपक्रमही स्तुत्य आहे. हा उपक्रम आपण संकल्पिलेला असल्यामुळे तो पूर्णत्वास जाणारच आहे.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आपले गुरु प.पू. गगनगिरी महाराज यांच्या संकल्पाने हा उपक्रम पूर्णत्वास जाईल’, असे कृतज्ञतापूर्वक सांगितले. यानंतर प.पू. उल्हासगिरी महाराजांनी प.पू. गगनगिरी महाराज यांनी सनातनला वेळोवेळी केलेल्या साहाय्याविषयी माहिती दिली. हे सर्व ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडवळ्यावर (चेहऱ्यांवर) कृतज्ञतेचा भाव होता. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. महाराजांना सनातनच्या साधकांची वैशिष्ट्ये, अनेक संत करत असलेले साहाय्य आदींविषयी माहिती दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले महातपस्वी होतील !- प.पू. गगनगिरी
महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लाभलेला आशीर्वाद

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे महातपस्वी होतील, असा आशीर्वाद प.पू. गगनगिरी महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिला होता’, अशी माहिती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी या वेळी दिली. याशिवाय सनातनवरील संभाव्य बंदीच्या काळात ‘सनातनवर कोण कशी बंदी आणतो ते पाहूया ! मी सनातनच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत प.पू. गगनगिरी महाराजांनी सनातनवरील त्यांचे प्रेम व्यक्त केले होते.

सनातन प्रभातचे अंक पहातांना कु. अस्मिता जोरे, प.पू. उल्हासगिरी महाराज (मध्यभागी) आणि माहिती सांगतांना अधिवक्ता योगेश जलतारे

प.पू. उल्हासगिरी महाराज यांचा अल्पपरिचय

प.पू. उल्हासगिरी महाराज हे खोपोली येथील थोर संत प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य होत. ते ओणी कोंडिवळे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील त्यांच्या गगनगिरी महाराज आश्रमात वास्तव्यास असतात. प.पू. उल्हासगिरी महाराज हे गगनगिरी महाराज संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसाराचे कार्य करतात. ते दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभा आणि विविध आंदोलने यांना आवर्जून उपस्थित असतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात