आदिशक्तीच्या अखंड अनुसंधानात राहून तिचे आज्ञापालन करणारे आणि संतपद गाठलेले मंगळुरू (कर्नाटक) येथील देवीउपासक पू. उदयकुमार !

ध्यानावस्थेतील पू. उदयकुमार

मंगळुरू (कर्नाटक) : येथील देवीउपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला येथील सनातनच्या सेवाकेंद्रात झालेल्या भावसोहळ्यात घोषित केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पू. उदयकुमार यांचा श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी सनातनच्या संत पू. राधा प्रभु यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच या कार्यक्रमात पू. उदयकुमार यांचे भक्तही उपस्थित होते. या सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण वृत्तांत येथे देत आहोत.

अशी झाली श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठल्याची घोषणा !

या सोहळ्यात प्रारंभी सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी पू. उदयकुमार यांच्या सहवासात प्रेमभाव आणि नम्रता जाणवणे, शिकण्याची वृत्ती असणे, देवी सूक्ष्मातून सांगेल, त्याप्रमाणेच सर्व करणे म्हणजे तिचे आज्ञापालन करणे, आदी गुणवैशिष्ट्ये सांगितली.

त्यानंतर श्री. रमानंद गौडा यांनी उपस्थित सर्वांना श्री. उदयकुमार यांच्याकडे पाहून काय जाणवते ?, असे विचारले. यावर काही साधकांनी श्री. उदयकुमार यांच्याकडे पाहून आनंद आणि उत्साह जाणवला, त्यांच्यात सहजता दिसून आली अन् अहं अल्प आहे, असे सांगितलेे.

पू. उदयकुमार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करताना सद्गुरु सत्यवान कदम

पू. उदयकुमार यांच्या माध्यमातून देवीच आम्हाला
मार्गदर्शन करते ! – श्री. रघुनाथ (पू. उदयकुमार यांचे भक्त)

या वेळी पू. उदयकुमार यांचे भक्त श्री. रघुनाथ यांनी सांगितले की, श्री. उदयकुमार प्रत्यक्ष आदिशक्तीचे अवतारच आहेत. ॐकार स्वरूप शक्तीच आहेत. त्यांच्या माध्यमातून देवीच आम्हाला मार्गदर्शन करते, ही आमची पूर्वपूण्याईच आहे. अन्य एका भक्ताने सांगितले की, देवी तिचे कार्य पू. उदयकुमार यांच्या माध्यमातून करून घेते.

यानंतर श्री. रमानंद गौडा यांनी उपस्थितांना सांगितले की, या सर्व अनुभूतींतून श्री. उदयकुमार यांची साधना किती चांगल्या प्रकारे चालू आहे, हे लक्षात येते. ते सतत आदिशक्तीच्या अनुसंधानात राहून तिच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेत आहेत. पृथ्वीवरील लोकांचा उद्धार व्हावा, यासाठीच ते तळमळीने कार्य करत आहेत. त्यामुळेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सांगितले आहे.

पू. उदयकुमार यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. पू. उदयकुमार यांच्या संदर्भात देवीने शुभसंकेत देणे

पू. उदयकुमार यांच्याशी माझी पहिली भेट अविस्मरणीय होती. त्यांना पाहिल्यावर खूप प्रसन्न आणि आनंदी वाटते. एका कार्यक्रमासाठी पू. उदयकुमार एका भक्ताच्या घरी आले होते. त्या वेळी खूप ऊन होते; मात्र पू. उदयकुमार यांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा लगेच पाऊस चालू झाला आणि ते जेव्हा घरातून निघाले, त्या वेळी पाऊस थांबला. ते निघून गेल्यानंतर पुन्हा पाऊस चालू झाला. यावरून देवीनेच पावसाच्या रूपाने शुभसंकेत दिला होता. – श्री. सोमनाथ मल्ल्या

२. देवी आणि गुरु एकच आहेत, अशी अनुभूती येणे

मला ध्यान लावण्याची पुष्कळ आवड होती. याविषयी मी पू. उदयकुमार यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मला बसवले आणि माझा पूर्वजन्म कसा होता, ते सर्व सूक्ष्मातून दाखवले. या वेळी मला सूक्ष्मातून देवीचे चित्र दिसले आणि त्याच्या मागे माझे गुरु (पू. उदयकुमार) दिसले. या अनुभूतीमुळे माझ्या जीवनात पूर्ण पालट झाला.

– कु. भूमिका (पू. उदयकुमार यांच्या शिष्या)

पू. उदयकुमार यांचे कार्यालय म्हणजे देवालयच आहे, असे
जाणवते ! – कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. तेजल पात्रीकर यांनी पू. उदयकुमार यांच्याशी मे २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती सांगितल्या. कु. तेजल पात्रीकर म्हणाल्या, पू. उदयकुमार यांच्याशी संपर्क होणे, हे दैवी नियोजनच होते. पहिली भेट ही मंगळवारी, म्हणजे देवीच्याच वारी आणि हा संत सन्मानसोहळाही मंगळवारीच होत आहे, हे वैशिष्ट्य आहे. देवीच्या कृपेमुळेच हे सर्व होत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा पू. उदयकुमार यांच्या कार्यालयात गेले होते, तेव्हा तेथील आदिशक्तीची सुंदर मूर्ती पाहून मला वाटले की, हे कार्यालय नसून प्रत्यक्ष देवालयच आहे. मी संतांना भेटण्यासाठी आली आहे, असे वाटून तेथे पुष्कळ चैतन्य जाणवले.

पू. उदयकुमार यांनी व्यक्त केलेले मनोगत

अहंकार वाढू नये, यासाठी कर्तेपणा देवीच्या चरणी अर्पण करायला हवा !

संत म्हणून घोषित केल्यावर पू. उदयकुमार मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, जे सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असतात, त्यांना मानसन्मानाची अपेक्षा नसते. मी या सन्मानाचे श्रेय कृतज्ञतापूर्वक जगन्मातेला अर्पण करतो. हे सर्व केवळ देवीच्या कृपेमुळेच होऊ शकते. अशा सन्मानातून आपला अहंकार वाढू शकतो. त्यामुळे आपण अधिक जागृत राहून कर्तेपणा देवीच्याच चरणी अर्पण करायला हवा.

या वेळी ध्यानसाधनेविषयी मार्गदर्शन करतांना पू. उदयकुमार म्हणाले, मन:शुद्धीतून तनशुद्धी होते. माझ्याकडे येणार्‍या लोकांचे मन अस्थिर असते; परंतु मला सनातनच्या साधकांकडे पाहून आनंद वाटतो; कारण त्यांचे मन विचलित नसते. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळेच आहे. षड्रिपू आदी मनोविकारांवर आध्यात्मिक उपाययोजना सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले समाजात परिवर्तन घडवण्याचे महान कार्य करत आहेत.

पू. उदयकुमार यांच्याकडे पाहून
आनंद जाणवतो ! – सद्गुरु सत्यवान कदम

सोहळ्याच्या समारोप प्रसंगी सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम हे पू. उदयकुमार यांच्याविषयी म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे की, ज्यांच्याकडे पाहून आनंद जाणवतो, त्यांची साधनेत चांगली प्रगती होत असते. पू. उदयकुमार यांच्याकडे पाहूनही तसेच जाणवते. पू. उदयकुमार यांच्याशी माझी आज प्रथमच भेट होत आहे, तरीही आमची एकमेकांशी पूर्वीपासूनच ओळख आहे, असे जाणवून त्यांच्याविषयी जवळीक वाटत आहे.

सोहळ्याच्या शेवटी पू. उदयकुमार यांनी ध्यानसाधनेविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांकडून ध्यान लावण्याचे प्रात्यक्षिक करवून घेतले.

क्षणचित्रे

१. सनातनच्या मंगळुरू सेवाकेंद्रात प्रवेश केल्यावर पू. उदयकुमार यांनी या स्थानाचे सूक्ष्म-परीक्षण केले. त्या वेळी त्यांना सेवाकेंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.

२. सेवाकेंद्रातील चुका लिहिलेले फलक पाहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी जाणून घेतले. ते म्हणाले, स्वत:मध्ये पालट करणे, हा साधनेचा मुख्य टप्पा असतो, त्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेविषयी पू. उदयकुमार यांनी आनंद व्यक्त केला.

३. सनातनच्या साधकांविषयी बोलतांना पू. उदयकुमार म्हणाले, साधक पुष्कळ सात्त्विक आहेत. जे कोणी सनातन संस्थेच्या संपर्कात येतात, तेही सात्त्विक होऊन जातात. परात्पर गुरु डॉ. आठवले हे विश्‍वभरात हिंदु राष्ट्र आणणारच आहेत आणि त्यासाठी ते साधकांमध्ये साधनेने सात्त्विकता वाढवत आहेत.

Leave a Comment