पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा !


विठुमाऊली तू माऊली जगाची । माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ॥ असा वारकऱ्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रती असलेला भाव जगात सुविख्यात आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल, असे विठ्ठलाला आळवत वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. श्री विठ्ठल आणि पंढरपूरची वारी यांचे छायाचित्रांच्या माध्यमातून भावपूर्ण दर्शन घेऊया !

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर । कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा ॥

संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले, ते देहू येथील पवित्र नांदुरकी वृक्षाचे स्थान !

संत चोखामेळा यांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोरील समाधी
संत कान्होपात्रा विठ्ठल मंदिरातील तरटीच्या वृक्षात विलीन झाल्या. त्या ठिकाणी बांधण्यात आलेले त्यांचे समाधी मंदिर

संत ज्ञानेश्वरांच्या अस्तित्वाने पुनित झालेले पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी

श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तटावर स्नान करणारे सहस्रावधी वारकरी आणि उजवीकडे गोलात दाखवल्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांच्या समाधी मंदिराचा कळस ! हा कळस हलत असल्याची अनुभूती लाखो भक्तांना येते.

प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंदयात्रेत सहभागी होऊन विठुरायाला भेटूया. वारीसमवेत प्रत्येक जिवाच्या आयुष्याची वारीही भक्तीमय होऊ दे, ही प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात