परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

Article also available in :

सौ. प्राजक्ता जोशी

‘गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले निःस्वार्थ भावाने समष्टी कार्य करत आहेत’, हे दर्शवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

१. ग्रहयोग

‘फलज्योतिषशास्त्रात कुंडलीतील ग्रहांच्या निरनिराळ्या स्थितीनुसार ग्रहांचे परिणाम अभ्यासले जातात. कुंडलीत ग्रहांची परस्परांपासून जी स्थिती असते, त्यानुसार त्यांच्या परिणामांत होणारे पालट, यांच्या फलितांत होणारी शक्ती, हे अभ्यासण्याच्या पद्धतीला ग्रहांचे योग (Planetary Aspects) म्हणतात.

२. राजयोग

सर्व संस्कृत ग्रंथांतून राजयोग, पंचमहापुरुषयोग दिलेले असतात. राजयोगाचा अभ्यास संस्कृत ग्रंथांत विशेषतः केला आहे. ‘कुंडलीत राजयोग, पंचमहापुरुषयोग असल्यास सामान्य कुळांतील व्यक्तीसुद्धा राजा बनते’, असे फळ सर्वच संस्कृत ग्रंथांत वर्तवले आहे.

३. परात्पर गुरु श्री श्री आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग

महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु श्री श्री आठवले स्वतः विष्णूचे अवतार आहेत. त्यांचे राहणीमान सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. ते स्वतःला विष्णूचे अवतार न मानता सर्व साधकांतीलच एक असल्यासारखे रहातात. ही त्यांची महानता आहे. राजयोग म्हणजे राजा होण्याचे किंवा सुखोपभोग प्राप्तीचे योग, असा सीमित अर्थ नाही. येथे ‘राजयोग’ हा शब्द ‘सनातन कुटुंबप्रमुख’ या अर्थी वापरला आहे. राजामध्ये प्रामुख्याने रजोगुणाचा अंतर्भाव असतो; परंतु परात्पर गुरु डॉक्टर हे त्रिगुणातीत आहेत.

‘यथा राजा तथा प्रजा’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ राजाप्रमाणे त्याची प्रजा असते. सर्वस्वाचा त्याग करून, स्वतः अष्टांग साधना करून, गुर्वाज्ञेने गुरुसेवक या भावाने समष्टी कार्य करणारे परात्पर गुरु डॉक्टर सनातन संस्थेचे संस्थापक आहेत. आपल्या गुरूंच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान ध्येयासाठी परात्पर गुरु डॉक्टर अहोरात्र झटत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर हे सनातन संस्थेच्या अंतर्गत गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या देश-विदेशातील सर्व साधकांपुढील महान आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणेच तत्त्वनिष्ठ रहाण्याचा त्यांचा आदर्श घेऊन आज अनेक साधक अष्टांग साधना करून संत आणि सद्गुरुपदी विराजमान झाले आहेत.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतांना प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीत अनेक नाविन्यपूर्ण सूत्रांचा अभ्यास होतो. ‘त्यांच्या जन्मकुंडलीत अनेक शुभयोग, महापुरुषयोग आहेत’, हे बुद्धीने वाचकांना कळावे, यासाठी त्यांच्या कुंडलीतील शुभयोगाचे विश्‍लेषण करण्याचा त्यांच्याच कृपेने केलेला हा अल्प प्रयत्न !

३ अ. लग्न स्थानापासून (कुंडलीतील प्रथम स्थानाला लग्न स्थान
म्हणतात.) नवम आणि दशम स्थानाचे अधिपती एकत्र असल्यास राजयोग होतो !

कुंडलीतील नवम स्थानावरून गुरुकृपा, धर्मकार्य, दूरचे प्रवास, कीर्ती, तप, उच्च शिक्षण इत्यादी अभ्यासतात. कुंडलीतील दशम स्थानावरून हातून घडणारी कर्मे, समाजसेवा इत्यादी अभ्यासतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत लग्न स्थानापासून नवम स्थानाचा अधिपती शनि आणि दशम स्थानाचा अधिपती गुरु व्यय स्थानात (बाराव्या स्थानात किंवा मोक्ष स्थानात) एकत्र आहेत. गुरुकृपेने साधनारत राहून स्वतः अध्यात्मातील परमोच्च पद प्राप्त करून (नवम स्थानाचे फळ) इतरांनाही आनंद आणि शांती यांची अनुभूती यावी, यासाठी अविरत झटणार्‍या (दशम स्थानाचे फळ) परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीतील हा योग आहे. नवम आणि दशम स्थानाचे अधिपती व्यय स्थानात एकत्र आहेत. याचा अर्थ गुरुकृपेने सत्सेवेत कार्यरत राहून आध्यात्मिक प्रगती साध्य करून इतरांनाही आपल्या कृतीतून आदर्श निर्माण करणे.

३ आ. भाग्य स्थानापासून (कुंडलीतील नवम स्थानाला भाग्यस्थान म्हणतात.) नवम
(पंचम) आणि दशम (षष्ठ) स्थानाचे अधिपती केंद्र स्थानी (केंद्रयोगात) असल्यास राजयोग होतो !

भाग्यस्थानाचे भाग्य स्थान आणि कर्म स्थान, म्हणजे कुंडलीतील पंचम आणि षष्ठ स्थान केंद्रस्थानात (केंद्रस्थानाला ‘विष्णुस्थान’ असेही म्हणतात.) असल्यास राजयोग होतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीतील हा योग आहे. त्यांच्या कुंडलीत भाग्य स्थानापासून नवम स्थानाचा, म्हणजे पंचम स्थानाचा अधिपती शुक्र दशम स्थानी केंद्रात आहे. भाग्य स्थानापासून दशम स्थानाचा, म्हणजे षष्ठ स्थानाचा अधिपती मंगळ लग्न स्थानी केंद्रात आहे. मंगळ अणि शुक्र हे दोन्ही केंद्र स्थानात आहेत. मंगळ क्षात्रतेज आणि शुक्र ब्राम्हतेज दर्शवणारा ग्रह आहे.

३ इ. दशम आणि व्यय स्थानाचे ग्रह एकमेकांच्या राशीत असता राजयोग होतो !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत दशमातील मीन राशीचा स्वामी गुरु वृषभ राशीत आणि व्यय स्थानातील वृषभ राशीचा स्वामी शुक्र मीन राशीत, म्हणजे गुरु आणि शुक्र एकमेकांच्या राशीत आहेत. याला ‘अन्योन्ययोग’ म्हणतात. आध्यात्मिक ग्रह मोक्ष स्थानात एकत्र असून त्याचा स्वामी शुक्र कर्म स्थानात उच्च राशीत असल्याने त्यांच्या साधनेच्या अनुभूती, शिकवण आणि वाचन यांतून अनेक जण प्रोत्साहित होऊन साधनेतील आनंद घेत आहेत.

३ ई. लग्नेश नवमांश कुंडलीत उच्च राशीत असणे

लग्नेश मंगळ नवमांश कुंडलीत उच्च राशीत असणारी व्यक्ती श्री, कीर्ती आणि शील यांनी युक्त, धाडसी, शास्त्री, मंत्र जाणणारी, राजासमान किंवा राजा, लावण्यसुंदर, सूर्यासमान तेजस्वी, शत्रूवर विजय मिळवणारी, उदार आणि धनवान असते. शौर्यामुळे कीर्ती मिळते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत असा योग आहे.

३ उ. मालव्ययोग

शुक्र उच्च राशीत केंद्र स्थानी असल्यास ‘मालव्ययोग’ होतो. पंचमहापुरुष योगांपैकी मालव्ययोग हा एक योग आहे. अशा व्यक्ती रूपवान, निश्‍चयी, सर्व ऐश्‍वर्य प्राप्त होणार्‍या, सुखी, विद्वान, तेजस्वी, मंत्रज्ञ, सर्व कलांमध्ये प्रवीण आणि कर्तृत्ववान असतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत शुक्र उच्च राशीत (शुक्र ग्रहाची उच्च रास मीन आहे.) केंद्र स्थानी आहे.

३ ऊ. काहलयोग

लग्नेश (कुंडलीतील प्रथम स्थानाचा अधिपती) ज्या राशीत असेल, त्या राशीचा अधिपती उच्च राशीत केंद्र स्थानी असेल, तर ‘काहलयोग’ होतो. (संदर्भ : ‘फलदीपिका’ ग्रंथ) हा योग असणारी व्यक्ती शूर, धाडसी, आणि चतुरंग राजा होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत हा योग आहे. त्यांच्या कुंडलीत लग्नेश बुध वृषभ राशीत आहे आणि त्या राशीचा अधिपती शुक्र ग्रह उच्च राशीत दहाव्या स्थानात म्हणजे केंद्र स्थानात आहे.

३ ए. पारिजातयोग

लग्नेश ज्या राशीत असेल, त्या राशीचा अधिपती केंद्र स्थानात उच्च राशीत असल्यास ‘पारिजातयोग’ होतो. हा योग असणार्‍या व्यक्तीची आयुष्याच्या मध्यावर किंवा उत्तरार्धात आध्यात्मिक उन्नती होते. ती राजा होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत लग्नेश बुध वृषभ राशीत असून त्या राशीचा अधिपती शुक्र केंद्र स्थानी उच्च राशीत आहे. बुध आणि शुक्र हे दोन्ही शुभ ग्रह आहेत. बुध ग्रह लग्नेश (कुंडलीतील प्रथम स्थानाचा अधिपती) आणि चतुर्थेश (कुंडलीतील चतुर्थ स्थानाचा अधिपती) आहे. प्रथम स्थान हे धर्माशी आणि चतुर्थ स्थान हे मोक्षाशी संबंधित आहे. शुक्र ग्रह पंचमेश (कुंडलीतील पंचम स्थानाचा अधिपती) आणि व्ययेश (कुंडलीतील बाराव्या स्थानाचा अधिपती) आहे. पंचम स्थान हे धर्माशी आणि बारावे स्थान हे मोक्षाशी संबंधित आहे. धर्म आणि मोक्ष स्थानाशी संबंधित असणारे हे ग्रह अध्यात्मात परमोच्च पद दर्शवणारे आहेत.

३ ऐ. गौरीयोग

भाग्येश (कुंडलीतील नवव्या स्थानाचा अधिपती) शुक्राच्या राशीत आणि शुक्र उच्च राशीत, तसेच चंद्र ग्रहावर गुरु ग्रहाची पूर्ण दृष्टी असल्यास ‘गौरीयोग’ होतो. हा योग असणारी व्यक्ती उच्च कुळातील, विरोधकांवर विजय मिळवणारी आणि स्तुतीस पात्र असणारी असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत हा योग आहे. त्यांच्या कुंडलीत भाग्येश शनि शुक्राच्या वृषभ राशीत असून शुक्र उच्च राशीत आहे, तसेच चंद्र ग्रहावर गुरु ग्रहाची नववी दृष्टी असल्याने ‘गौरीयोग’ होतो.

३ ओ. ख्यातीयोग

लाभ स्थानात (कुंडलीतील अकरावे स्थान) उच्च रवि आणि रवीच्या व्यय स्थानी (कुंडलीतील बारावे स्थान) उच्च शुक्र असल्यास ‘ख्यातीयोग’ होतो. असा योग असणार्‍या व्यक्तीची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच जाते. विद्याविभूषित, नित्य मंगल कार्ये करणारी, सत्कर्मे करणारी अशी व्यक्ती कुलश्रेष्ठ होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत असे योग आहेत.

३ औ. वीणायोग

कुंडलीत नऊ ग्रह सात स्थानांत असल्यास ‘वीणायोग’ होतो. अशी व्यक्ती कलाप्रिय, विविध शास्त्रे जाणणारी आणि जिज्ञासू असते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कुंडलीत हा योग आहे.

(ग्रहांमध्ये होणारे विविध योग अभ्यासण्यासाठी श्री. वसंत दामोदर भट यांच्या ‘फलज्योतिषांतील समग्र ग्रहयोग’ या ग्रंथाचा संदर्भ घेतला आहे.)

४. सारांश

वरील सर्व राजयोग पहाता ‘पत्रिकेत केवळ योग असून उपयोग नसतो, तर कृतीही व्हायला हवी आणि गुरुकृपाही असणे आवश्यक आहे’, हे लक्षात येते. हे योग कुंडलीच्या विशिष्ट स्थानांतून व्हावे लागतात. परात्पर गुरु श्री श्री आठवले यांच्या कुंडलीत विशिष्ट योग विशिष्ट स्थानांतून झाले आहेत. गुरूंवर नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे निःस्वार्थ भावाने ते समष्टी कार्य करत आहेत.’

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment