श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

आशीर्वादाच्या मुद्रेत श्री महंत शांतिगिरी महाराज

पनवेल – श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आणि विश्व हिंदु परिषदेचे उत्तर गुजरातचे केंद्रीय समितीचे सदस्य श्री महंत शांतिगिरी महाराज यांचे ९ एप्रिलला रात्री येथे आगमन झाले. श्री महाराजांचे गुरुबंधू पू. दादा खोत यांच्या सनातन संकुल, देवद येथील निवासस्थानी ते आले होते. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे अन्य भक्तगणही होते. पू. दादा खोत यांनी शाल घालून आणि सांप्रदायिक टिळा लावून महाराजांचा सन्मान केला. या वेळी महाराजांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी नाम श्वायसाला जोडण्याचे विविध लाभ सांगून त्याची अनुभूती घेण्यास सांगितले. सनातन संस्थेचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी महाराजांचा शाल, श्रीफळ देऊन आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ आणि ‘गोसंवर्धन’ हे सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ अर्पण करून सन्मान केला.

 

सनातन संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ! – श्री महंत शांतिगिरी महाराज

मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे. सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे. सनातन संस्था केवळ हिंदूंनाच नव्हे, तर सर्वांना सुख देणारी आहे. सनातन संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हिंदु राष्ट्र सर्वसमावेशक असणार आहे. तशी संस्थाही सर्वसमावेशक आहे. हिंदु राष्ट्राविषयी कार्य करत राहिले पाहिजे. यश त्वरित आले नाही, तरी कार्य करत राहिले पाहिजे. जे कोणी या राष्ट्रात रहातील, त्यांनी या देशाशी एकनिष्ठ रहाणे आवश्यक आहे. हिंदूंना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे आवश्यक असून हिंदूंचे संघटनही केले पाहिजे.

आपत्काळात साधकांच्या रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महाराजांनी भरभरून आशीर्वाद दिले. तसेच संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

हिंदु जनजागृती समितीनेही लव्ह जिहादविरोधी चांगले प्रयत्न केले !

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लव्ह जिहाद’विषयी ते म्हणाले की, हा ग्रंथ मी वाचला असून त्यातील माहिती चांगली आहे. लव्ह जिहादविरोधी तुम्ही चांगले प्रयत्न केले आहेत. (या वेळी महाराजांना भरून आले.)

 

श्री महंत शांतिगिरी महाराज यांचे अखंड अनुसंधान आणि जाणवलेली प्रीती !

श्री महंत शांतिगिरी महाराज यांच्या भेटीला गेल्यावर ‘ते इतरांशी बोलणे, प्रसाद देणे, प्रश्नांची उत्तरे देणे अशा विविध कृती करत असूनही आतून अखंड अनुसंधानात आहेत, तसेच त्यांच्या दृष्टीत प्रीती आहे’, असे सनातनचे साधक श्री. विनायक आगवेकर आणि श्री. यज्ञेश सावंत यांना जाणवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment