एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नैसर्गिकपणे शारीरिक क्षमता न्यून असल्याने थोडाच व्यायाम करा !

वैद्य मेघराज पराडकर

‘ग्रीष्म, वर्षा आणि शरद हे ३ ऋतू म्हणजे साधारणपणे २१ एप्रिल ते २० ऑक्टोबर या ६ मासांच्या कालावधीत तुलनेने सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने नैसर्गिकपणे शारीरिक बळ न्यून असते. त्यामुळे या कालावधीत व्यायाम अल्प प्रमाणात करावा, उदा. स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गामध्ये एकेक व्यायामप्रकार थंडीच्या दिवसांत १० अंक करत असल्यास तोच व्यायामप्रकार ५ अंक करावा.

ऋतू आणि त्यांचा इंग्रजी मासानुसार सर्वसाधारण कालावधी पुढे दिला आहे. –


हेमंत ते वसंत या ऋतूंमध्ये शरिराची क्षमता जास्त असल्याने भरपूर व्यायाम करता येतो. शरद ऋतूचे शेवटचे आणि हेमंत ऋतूचे आरंभीचे ७ – ७ दिवस म्हणजे १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत क्रमाक्रमाने व्यायाम वाढवून त्यानंतर प्रत्येक व्यायामप्रकार १० – १० अंक करावा.’

असह्य उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आयुर्वेदानुसार ऋतूचर्येचे पालन करा !

उन्हाळ्याच्या दिवसांत शरिरात होणारे पालट आणि घ्यायची काळजी

 

१. त्वचा

१ अ. त्वचेमध्ये होणारे पालट

१ अ १. घामामुळे अंगाला कंड सुटणे

‘उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. घामासह शरिराबाहेर क्षारही निघून जात असल्याने थकवा येतो. त्वचेतील घामाच्या ग्रंथींसह तेलाच्या ग्रंथीही अधिक काम करत असल्याने त्वचा चिपचिपित होते. तेलाचा तवंग त्वचेवर असला, तर घामाचे बाष्पीभवन लवकर होणार नाही आणि शरीर जरा अधिक काळ थंड राहील अशी निसर्गाची योजना असते. घाम सुकला की, त्यातल्या क्षारांचे सूक्ष्म स्फटिक बनतात. या स्फटिकांमुळे अंगाला कंड सुटते. घामामुळे काखा, जांघा अशा आतल्या जागा ओलसर रहातात. ओलसर जागी बुरशीसारख्या जंतूंचा प्रादुर्भाव होतो. उन्हाळ्यात घामोळीही होतात. या सगळ्यांमुळे खाज येते. खाजर्या अंगावर नखांचे ओरखडे उठतात आणि वातावरणातील उष्णतेमुळे अंगाचा दाह होतो.

१ अ २. प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा काळवंडणे

उन्हाळ्यात सूर्याचे किरण तीव्र असतात. त्यामुळे त्या किरणांमधल्या अतीनील भागाचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचा भाजू नये म्हणून निसर्ग त्वचेमध्ये काळे पटल (पडदा) आणण्याचा प्रयत्न करतो. त्वचेच्या पेशींमधले काळे द्रव्य (मेलॅनीन) वाढते. त्यामुळे त्वचा रापते.

१ अ ३. ऊष्मादाह

उन्हाचा कडाका फारच वाढला, तर त्वचा भाजून निघते. याला ऊष्मादाह किंवा ‘सन बर्न’ म्हणतात. अतीउष्म्यामुळे क्वचित् प्रसंगी शरीर थंड करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि कधी कधी मृत्यूही ओढवतो.

१ आ. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी घ्यायची काळजी

१ आ १. प्रतिदिन अंघोळीपूर्वी सर्व अंगाला तेल लावणे

घामाचा त्रास आणि त्वचा विकार होऊ नयेत म्हणून प्रतिदिन नियमितपणे अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला खोबरेल तेल लावावे. तेल लावल्यावर अर्ध्या घंट्याने स्नान करावे. सकाळी तेल लावणे शक्य नसल्यास रात्री झोपतांना लावावे; मात्र रात्रीचे जेवण आणि तेल लावणे यांत किमान २ घंट्यांचे अंतर हवे. नियमित तेल लावल्यास वर दिलेल्या सर्वच त्रासांपासून त्वचेचे रक्षण होऊन त्वचा निरोगी रहाते.

१ आ २. सुती कपडे वापरावेत

या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी.

१ आ ३. प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत

कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत.

 

२. डोळे

२ अ. डोळ्यांच्या समस्या

उन्हामुळे डोळ्यांच्या बुब्बुळांमधील पाणीही अल्प होते. बुब्बुळे कोरडी झाल्याने डोळे जळजळतात.

२ आ. डोळे निरोगी राखण्यासाठीचे उपाय

२ आ १. डोळ्यांत तुपाची निवळी घालणे

रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही डोळ्यांमध्ये १-१ थेंब देशी गायीच्या साजूक तुपावर आलेली निवळी घालावी. योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘दिव्य फार्मसी’चे देशी गायीचे तूप सर्वत्र उपलब्ध असते.

२ आ २. उन्हात जातांना टोपी आणि गॉगल यांचा वापर करणे

डोके आणि डोळे यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी बाहेर जातांना टोपी आणि गॉगल यांचा वापर करावा.

 

३. नाक

३ अ. नाकातून रक्तस्राव होऊ शकणे

उष्णतेमुळे नाकाच्या आतल्या नाजूक त्वचेला दुखापत होते आणि त्यातून रक्तस्राव होऊ शकतो.

३ आ. नाकातून होणार्या रक्तस्रावावर औषधे आणि प्रतिबंधात्मक उपाय

उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव झाल्यास दोन्ही नाकपुड्यांमध्ये २-२ थेंब दूर्वांचा रस किंवा ओल्या कोथिंबिरीचा रस घालावा. सकाळी उठल्यावर दात घासून दोन्ही नाकपुड्यांमध्ये २-२ थेंब देशी गायीचे साजूक तूप किंवा खोबरेल तेल घालावे. यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याची शक्यता न्यून होते.

 

४. पचनशक्ती

४ अ. पचनशक्ती मंदावणे

उन्हाळ्यात भूक न्यून होते.

४ आ. पचनशक्ती बिघडवणारे पदार्थ टाळा !

शीतपेये (कोल्डड्रिंक्स), शीतकपाटातील थंड पाणी, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद रस यांचे सेवन करू नये. हे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात. पचनशक्ती चांगली राहण्यासाठी जेवणामध्ये भातावर किंवा पोळीवर १ चमचा देशी गायीचे साजूक तूप घ्यावे.

 

५. मल

५ अ. शौचाला घट्ट होणे

शरिरातील पाणी घामातून निघून गेल्याने शौचालाही घट्ट होते; कारण त्यातले पाणीही अल्प होते. याच कारणासाठी वयस्कर माणसांना उन्हाळ्यात बद्धकोष्ठाचा त्रास जाणवतो.

५ आ. बद्धकोष्ठतेवर उपाय

प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणापूर्वी १ चमचा (३-४ ग्रॅम) आवळा किंवा ज्येष्ठमध यांचे चूर्ण अर्धा कप पाण्यातून घ्यावे किंवा प्रतिदिन सकाळी अर्धा चमचा (१.५-२ ग्रॅम) हिरड्याचे चूर्ण तेवढ्याच गुळासह घ्यावे. उन्हाळ्याच्या दिवसांत होणारी आंबा, करवंद, जांभूळ यांसारखी फळे खाण्यात असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

 

६. मूत्र

६ अ. लघवीची जळजळ होणे

शरिरातील बरेचसे पाणी घामावाटे बाहेर पडते. त्यामुळे लघवीवाटे बाहेर पडण्यासाठी अल्प पाणी शिल्लक उरते. प्रतिदिन शरिराबाहेर टाकून द्यायचे पदार्थ मात्र तेवढेच असतात. या पदार्थांना अल्प पाण्यात भागवून घ्यावे लागते. साहजिकच लघवी कडक होते आणि लघवी करतांना जळजळ होते. स्त्रिया नाईलाजाने अधिक काळ लघवी तुंबवून ठेवत असल्याने त्यांना ही जळजळ अधिकच त्रासदायक ठरते.

६ आ. लघवीसंबंधी समस्या दूर होण्यासाठी करायचे उपाय

वाळ्याची मुळे घातलेले पाणी प्यावे किंवा तुळशीचे बी, सब्जाचे बी (तूपमिरी), धने यांपैकी कोणताही एक पदार्थ एका लिटरला १ चमचा या प्रमाणात घालून तहान भागेल एवढ्या प्रमाणात पाणी प्यावे.

 

७. झोप

७ अ. झोप अल्प होऊन चिडचिड वाढणे

उन्हाळ्यात झोप अल्प होते. झोप अल्प झाली की, साहजिकच माणसे चिडचिड करतात. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकांचे मनःस्वास्थ्य बिघडते. याचा परिणाम रक्तदाब वाढण्यात होतो.

७ आ. शांत निद्रेसाठी हे करा !

झोपण्यापूर्वी डोके आणि पाय यांना तेल लावावे, तसेच कानातही २-२ थेंब खोबरेल तेल घालावे. कानाच्या पटलाला छिद्र असल्यास किंवा कानाला बुरशीच्या संसर्गामुळे खाज येत असल्यास तेल घालू नये.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment