हम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांची रामनाथी येथील सनातन आश्रमास सहकुटुंब भेट !

डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे (उजवीकडून दुसरे) आणि त्यांचे कुटुंबीय यांना सनातन प्रभातविषयी माहिती सांगतांना साधिका सौ. विद्या शानभाग (सर्वांत उजवीकडे)

रामनाथी (गोवा) – हम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी २३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. या वेळी आश्रमातील साधिका सौ. विद्या शानबाग यांनी त्यांना आश्रमात विविध विषयांवर चालणार्‍या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. काशीबाई काळे, मोठा मुलगा श्री. कार्तिक, लहान मुलगा श्री. श्रीनाथ, मुली सौ. पूर्णिमा जाधव आणि सौ. स्नेहा सूर्यवंशी अन् नातवंडे उपस्थित होते.

डॉ. व्यंकटेश काळे यांनी संगितातील स्वर आणि राग यांविषयी काढलेल्या चित्रकलेच्या संदर्भात आश्रमातील या क्षेत्राशी संबंधित साधकांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्या वेळी साधना म्हणून चित्रकला करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, कोणतीही कला एका महासागराप्रमाणे असते. कलेसंदर्भात कितीही जाणून घेतले, तरी ते अल्पच आहे. त्यामुळे साधना म्हणून चित्र काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कलेच्या संदर्भात आपल्याला पुष्कळ काही कळते, असा अहं न बाळगता चित्र काढावे. सनातनच्या चित्रकार सौ. जान्हवी शिंदे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली विविध चित्रे आणि आश्रमातील कलाविभाग यांविषयी डॉ. काळे यांना माहिती दिली.

 

सनातन संस्थेसारखी सेवाभावी संस्था
आतापर्यंत कुठेच पाहिली नाही ! – डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशी संस्था आणि सेवाभावी साधक मी कुठेही पाहिले नाहीत. यापुढेही मला कुठे हे पहायला मिळेल, असे वाटत नाही, असे उद्गार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी आश्रम पहातांना काढले.

 

डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांचा परिचय

नाडोज डॉ. व्यंकटेश तुळजाराम हे कर्नाटकातील एक प्रथितयश चित्रकलाकार आहेत. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी चित्रकला क्षेत्राची निवड केली. एस्.एस्.एल्.सी. (मॅट्रीक) शिकत असतांनाच मुंबईच्या सर जे.जे. आर्ट या महाविद्यालयातून वर्ष १९५२ मध्ये ते चित्रकला विषयात पदवीधर (डिप्लोमा) झाले. तेव्हापासून आजपर्यंत ते चित्रकला काढण्यातच व्यस्त असतात. ६५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे कलाकृती काढण्यात व्यस्त राहून त्यांनी सांप्रदायिक, भारतीय, आध्यात्मिक चिंतन असलेली चित्रे, संयोजना चित्रे, निसर्गचित्रे आणि रेखाचित्रे काढली आहेत.

डॉ. काळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बागेश्री, धनश्री, वसंत, भैरव, भैरवी, केदार, तोडी, मेघ इत्यादी रागमालिकेतीलही चित्रे काढली आहेत. सप्तस्वरांची स्वतंत्र वर्ण चित्रकलाकृती, तसेच उषा, दिवा, संध्या आणि निशा या दिवसांच्या चार प्रहरांची सुंदर वर्णकलाकृती त्यांनी काढल्या आहेत. ते स्वतः नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कलालेखक आहेत.

त्यांनी केलेल्या चित्रकलेच्या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष १९८५ मध्ये ललीतकला अ‍ॅकॅडमी प्रशस्तीपत्रक, वर्ष २००४ मध्ये राज्योत्सव प्रशस्तीपत्रक, वर्ष २०१० मध्ये हम्पी (कर्नाटक) येथील कन्नड विश्‍वविद्यालयाने दिलेली नाडोज पदवी, वर्ष २०१२ मध्ये गुलबर्गा विश्‍वविद्यालयाने दिलेली मानद डॉक्टरेट, वर्ष २०१३ मध्ये कला तपस्वी प्रशस्तीपत्रक, तसेच वर्ष २०१४ मध्ये वर्णशिल्प वेंकटप्प आणि मुरुगाश्री ही प्रशस्तीपत्रके, त्याचप्रमाणे अन्य अनेक प्रशस्तीपत्रके त्यांच्या कलाक्षेत्राच्या अमूल्य सेवेला प्राप्त झाली आहेत.

डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे (डावीकडून तिसरेे) यांचा सत्कार करतांना श्री. मोहन गौडा (डावीकडून चौथेे). सोबत डावीकडून श्री. कार्तिक काळे, अधिवक्ता शिवाजी बांधेकर, श्री. नीलकंठ आणि धर्माभिमानी श्री. विक्रम
कर्नाटक शासनाचा सत्कार स्वीकारल्यानंतर बसलेले डावीकडून सत्कारमूर्ती डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे आणि श्री. महादेव शंबुलिंगप्प

 

संडुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध कलाकार
नाडोज पदवीप्राप्त डॉ. व्यंकटेश काळे यांचा कर्नाटक शासनाकडून सत्कार !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील रवींद्र कलाक्षेत्राला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कर्नाटक शासनाच्या कन्नड संस्कृती विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या चित्र आणि शिल्पकला सन्मान कार्यक्रमात संडुरू (कर्नाटक) येथील प्रख्यात चित्रकार तथा नाडोज पुरस्कार विजेते डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे आणि कलबुर्गी (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. महादेव शंबुलिंगप्प यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभापती, आमदार श्री. बी.एल्. शंकर, रवींद्र कलाक्षेत्राचे अध्यक्ष श्री. कप्पण्ण, रवींद्र कलाक्षेत्राचे सदस्य वेंकटचलापती आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराच्या वेळी डॉ. काळे म्हणाले, मी दुर्गम भागातील गावात रहातो. तेथून माझी निवड करून माझा सत्कार केल्याविषयी धन्यवाद देतो. रवींद्र कलाक्षेत्र हे कलेची देवता श्री सरस्वतीसह सर्व देवतांचा स्वर्ग आहे. अशा कलास्वर्गाची निर्मिती करून कलाकारांना संधी आणि प्रोत्साहन दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. अजिंठा, एलोरा आदी शिल्पकलाक्षेत्रे सहस्रो कलाकारांच्या परिश्रमाचे फळ आहे. कर्नाटकातील बेलूर येथील शिल्पकलेत आजदेखील दासोज, बीरोज, चवन आदी शिल्पकारांची नावे पाहू शकतो. अशा सहस्रो कलाकारांना संधी मिळावी, अशी इच्छा मी व्यक्त करतो. कलाकारांनी अधिक न बोलता कृतीकडे लक्ष दिले पहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment