नृत्य करण्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. त्या माध्यमातूनही ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा देशमुख) आणि डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी आरंभ केला आहे. त्या नृत्यशैली आणि नृत्यातील विविध मुद्रा यांतून नवरस (शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भूत आणि शांत) नव्हे, तर अध्यात्मातील शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती अशा अनुभूती मिळण्यासाठी अभ्यास करत आहेत.

नृत्य या वरवर मनोरंजनात्मक वाटणार्‍या कृतीकडेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या अंगाने पहायला शिकवले. ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय देऊन नृत्याच्या माध्यमातून येणार्‍या अनुभूती आणि त्याचे होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम यांचा अभ्यास करण्यास उद्युक्त केले. आज समाजात नृत्य, गायन यांसारख्या कलांचे विकृतीकरण झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक करत असलेले हे अमूल्य संशोधन अवघ्या विश्‍वासाठी मार्गदर्शक आहे.

सौ. सावित्री इचलकरंजीकर

१. साधनेत येण्यापूर्वी नृत्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन

‘मी वयाच्या ८ व्या वर्षापासून पुढे ८ वर्षे ‘कथक’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकले. लहानपणी नृत्य शिकतांना ‘नृत्याद्वारे आपल्याला देवापर्यंत जाता येईल’, असे वाटायचे. देवाचे गुणगान करणार्‍या विविध पदांवर नृत्य करून त्या माध्यमातून देवाला आळवले जाते. त्यामुळे मला नृत्य करायला पुष्कळ आवडायचे. नृत्य शिकतांना आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्वही लक्षात येत होते. मी नृत्य शिकत असलेल्या संस्थेतर्फे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेला साजर्‍या होणार्‍या नृत्यमहोत्सवांतही मी बर्‍याचदा सहभागी झाले होते. त्या वेळी ‘आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व असाधारण आहे’, असे वाटायचे; परंतु त्याच वेळी नृत्यशिक्षक अथवा नृत्य शिकणारे सहविद्यार्थी या सर्वांचा नृत्याप्रतीचा व्यावसायिक दृष्टीकोनही लक्षात येत होता. तेव्हा ‘मला नृत्याचा व्यवसाय बनवायचा नाही. मला जे हवे, ते हे नाही. मला काहीतरी वेगळे हवे आहे’, असे विचार मनात येत असत; परंतु सभोवतालचे वातावरण नृत्याचे व्यावसायिकरण करणारे आणि व्यावसायिकरणाला प्राधान्य, प्रोत्साहन देणारे होते. ‘मला हे नको’, असे वाटून माझा नृत्यातील रस हळूहळू न्यून झाला.

शेषशायी श्रीविष्णूची मुद्रा
श्री सरस्वतीदेवीची मुद्रा

२. असा झाला नृत्यातून ईश्‍वरप्राप्तीचा श्री गणेशा !

वर्ष १९९७ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मी गुरुकृपायोगानुसार साधना करू लागले. वर्ष २००३ मध्ये अध्यात्मप्रसाराच्या निमित्ताने सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात गेले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले हेसुद्धा तेथेच होते. देवद आश्रमात असतांना १७.१२.२००३ या दिवशी सनातनची साधिका डॉ. (कु.) आरती तिवारी यांच्याशी माझे नृत्याविषयी बोलणे झाले. आम्हा दोघींना भारतीय शास्त्रीय नृत्य येते, तर ‘साधना म्हणून नृत्य कसे करू शकतो’, याविषयी आमचे बोलणे चालू होते. त्या वेळी आमच्यासमवेत खोलीत रहाणार्‍या एका साधिकेने आम्हाला भारतीय शास्त्रीय नृत्य येत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगण्यास सांगितले.

आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आम्हाला नृत्य येत असल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आपल्याला हेच हवे होते. ‘नृत्यातून ईश्‍वरप्राप्ती कशी करता येईल’, ते आता आपल्याला शिकता येईल. उद्यापासून याचा अभ्यास करण्यास आरंभ करा. मला तर नृत्यातील काही येत नाही. त्यामुळे तुम्हीच त्याचा अभ्यास कसा करायचा, हे शोधा !’’

३. नृत्याच्या ग्रंथांमध्ये ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्य’ ही संकल्पना
नसणे, तसेच संपर्क केलेल्या अन्य नर्तकांसाठी ती नवीन असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे झाल्यावर आम्ही नृत्यावरील निरनिराळ्या प्रसिद्ध ग्रंथांचा अभ्यास करण्यास आरंभ केला. आम्ही काही नर्तकांना भेटलो. त्यांना अनेक प्रश्‍न विचारून ‘ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने कशी वाटचाल करायची’, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणालाही यासंदर्भात काहीच सांगता आले नाही. त्यांच्यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्य’ ही संकल्पनाच नवीन होती.

(आता ही संकल्पना नवीन वाटत असली, तरी नृत्याचा (नाट्य = नृत्य + गीत + वाद्य यांचा) आरंभ त्रेतायुगाच्या आरंभी झाला. त्याचा उद्देश मोक्षप्राप्ती आणि मनोरंजन असाच होता. – संकलक)

४. स्तोत्रावर नृत्य बसवण्यापेक्षा नृत्यातील विविध अंगांतून ईश्‍वराकडे
कशी वाटचाल करायची, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधण्यास सांगणे

समाजात ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्य’ याविषयी कोणी विशेष मार्गदर्शन करू शकले नाही. ग्रंथांमध्येही हा विषय आढळला नाही. या कालावधीत आम्ही प्रतिदिन ‘नृत्यासंदर्भात काय शिकायला मिळाले’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगायचो. एकदा डॉ. (कु.) आरती यांच्या मनात ‘देवीच्या एका स्तोत्रावर नृत्य बसवावे. त्यातून ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ करून घेता येईल’, असा विचार आला. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर त्यांनी पुढील व्यापक दृष्टीकोन दिला, ‘स्तोत्रावर नृत्य बसवण्यापेक्षा नृत्यातील विविध अंगांतून ईश्‍वराकडे कशी वाटचाल करायची, हे आपल्याला शोधायचे आहे.’ (त्यांनी असे सांगितले; कारण हे त्यांना समष्टीलाही शिकवायचे होते.)

५. नृत्याशी संबंधित विविध प्रश्‍न विचारून परात्पर
गुरु डॉ. आठवले यांनी नृत्य साधनेची योग्य दिशा देणे

उपलब्ध झालेल्या माहितीतून आम्हाला ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्य’ याविषयी विशेष संदर्भ सापडत नसल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून नृत्याच्या विविध अंगांविषयी आम्हाला प्रश्‍न विचारण्यास आरंभ केला, उदा. नृत्यात केल्या जाणार्‍या विविध मुद्रा, हस्तक, तोडे, ताल, लय आदी म्हणजे काय ? या प्रश्‍नांना आम्ही दिलेली उत्तरे ऐकून ते आम्हाला म्हणाले, ‘‘आपण मुद्रांपासून आरंभ करूया.’’ त्यांनी आम्हाला विविध मुद्रा केल्याने करणार्‍याला काय लाभ होतो ? त्यातून काय अनुभूती येते ? मुद्रांचा मनावर काय परिणाम होतो? हे शोधण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही दोघी मुद्रांचा अभ्यास करू लागलो.

६. नृत्याचा अभ्यास करतांना नृत्याशी संबंधित विविध प्रश्‍नांची
उत्तरे आतून मिळणे आणि त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रोत्साहन देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला प्रथम हाताच्या बोटांच्या मुद्रांचा अभ्यास करण्यास सांगितले. आम्ही ‘हाताचा अंगठा आणि अन्य बोटे क्रमशः एकमेकांना जोडून तयार होणार्‍या मुद्रा केल्यावर काय जाणवते’, याचा अभ्यास करू लागलो. हा अभ्यास करत असतांनाच त्या वेळी मनात वेगवेगळ्या विषयांसंदर्भात प्रश्‍न निर्माण होऊ लागले आणि त्यांची उत्तरेही आतून मिळू लागली. उदा. ताल म्हणजे काय ? ताल कसे निर्माण झाले ? आदी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे लिखाण वाचल्यावर ‘चांगले लिखाण केले आहे’, असे सांगून साधनेला प्रोत्साहन देणारे पत्र आणि खाऊ पाठवला.

मुद्रांचा हा अभ्यास आमच्याकडून श्रीकृष्णाने साधारण पुढील ५ मास करवून घेतला.

७. नृत्य शिकतांना ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन असणे आवश्यक !

७ अ. पूर्वी नृत्य शिकण्यामागचा साधिकेचा दृष्टीकोन

‘एखादी कला आत्मसात असावी’, या उद्देशाने आणि आवड म्हणून मी नृत्य शिकले. नृत्य शिकत असतांना मी त्यातील बारकावे शिकत होते; पण ते केवळ मानसिक स्तरावरील होते. त्याला आध्यात्मिक पाया नव्हता.

७ आ. साधिकेसमवेत नृत्य शिकणार्‍या अन्य विद्यार्थिनींचा नृत्य शिकण्यामागचा दृष्टीकोन

मी शिकत असलेल्या नृत्यशाळेत नृत्य शिकणार्‍यांपैकी बहुतेक जणी नृत्याची आवड म्हणूनच ते शिकत होत्या. त्यांतील अगदी बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थिनी नृत्याच्या क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छित होत्या. तेही केवळ व्यवसाय म्हणून नृत्यकलेचा प्रसार करण्यासाठी शिकणार्‍या तर नगण्यच होत्या. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन त्यांच्यापैकी कोणालाच नव्हता. बहुतेक सर्वच ठिकाणी असेच पहायला मिळते.

७ इ. नृत्य करण्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी
‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वांसमोर मांडणे

नृत्याची निर्मिती झाली, तेव्हा ‘ईश्‍वराची आराधना’ म्हणून नृत्य सादर केले जाई. पुढे अशा पद्धतीने सादर केल्या जाणार्‍या नृत्याचा हळूहळू र्‍हास होत गेला. पुढे कला म्हणून आणि आता केवळ मनोरंजन अन् अर्थार्जन यांसाठी नृत्याचा वापर होऊ लागला आहे. आजकाल तर बहुतांश जण लोकेषणेच्या आहारी जाऊन मूळ तत्त्वालाच विसरले आहेत. याच मूळ तत्त्वाच्या, मूळ स्वरूपाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडला.

८. नृत्यकलेविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन

८ अ. भूमिकेशी एकरूप झाल्यानंतरच इतरांना तशी अनुभूती देऊ शकणे

साधकाने नृत्य करतांना भूमिकेशी एकरूप होणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. लास्य नृत्य करतांना ‘आपण खरोखर पार्वती आहोत’, असा भाव हवा. इतर वेळेस मूर्तीकडे मूर्ती म्हणून बघितले जाते, ईश्‍वर म्हणून नाही; पण नृत्य करतांना आपण ‘आपल्यासमोर खरोखर श्रीराम उभा आहे’, असे समजून त्याला सजवणे, त्याची पूजा करणे आदी करायला हवे. ‘खरा श्रीराम समोर उभा आहे’, असा भाव निर्माण व्हायला हवा. असे झाले तरच इतरांना आपण तशी अनुभूती देऊ शकतो.

८ आ. स्वभावदोष आणि अहं गेल्यावरच ईश्‍वरी नृत्य साकार होणे

स्वभावदोष आणि अहं विरहित अन् ईश्‍वराप्रती उत्कट भाव असलेले नृत्यच आपल्याला ईश्‍वराकडे घेऊन जाते. त्यामुळे स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करणे अन् ईश्‍वराविषयीचा भाव वाढवणेच महत्त्वाचे आहे. नर्तकाची आध्यात्मिक क्षमता असेल, तरच तो त्याच्या नृत्यातून नृत्य पहाणार्‍यांना शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची (आध्यात्मिक स्तरावरील) अनुभूती देऊ शकतो. हेच खरे ईश्‍वरी नृत्य !

८ इ. नृत्य आणि संगीत या माध्यमांतून साधना संपत्काळात करायच्या असल्याने साधकांच्या उन्नतीसाठी आवश्यक तेवढी साधना त्या कलांच्या माध्यमातून करून आपत्काळ येण्यापूर्वी आताच करावी.

९. नृत्यकलेविषयी संशोधन करतांना त्याचा व्यापक विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

नृत्यकलेविषयी संशोधन करतांना ‘नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून साधना केली, तर ईश्‍वरापर्यंत जाता येते. तसेच नृत्याचा अनिष्ट शक्तींवर काय परिणाम होतो ? नृत्याचा व्याधी निवारणासाठी कसा लाभ करता येईल ? याचाही अभ्यास करता येईल’, असा व्यापक विचारही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडला. ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा उत्क्रांती घडवून आणणारा नवा दृष्टीकोन केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच या कलियुगात सगळ्यांसमोर मांडला. त्यांची संशोधक वृत्ती या क्षेत्रातही आपल्याला दिसून येते.

१०. नृत्याचे प्रयोग करत असतांना साधिकेत झालेले पालट

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नृत्याचे अभिनव प्रयोग करत असतांना प्रतिदिन त्याविषयीची उत्कंठा वाढत होती.

आ. ‘आपल्याला जे आधी शिकायला मिळाले नव्हते, ते आता शिकायला मिळणार’, या जाणिवेने मन हर्षभरित होत होते.

इ. मनात स्वतःला पालटण्याची तळमळ निर्माण झाली.

ई. त्या दरम्यान नृत्याकडे ‘आराधना’ म्हणून बघता येऊ लागले.

उ. प्रत्यक्ष शरिराने नृत्य न करताही ‘मी देवाला नृत्याच्या माध्यमातून आळवत आहे’, असा मनात भाव ठेवून नामजप करतांना आनंद मिळू लागला. तेव्हा भावाचे महत्त्व मनावर अधिक बिंबले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हे सारे शिकता आले, त्यासाठी त्यांच्या चरणी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ’

– सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment