चहाचे गंभीर दुष्परिणाम !

tea-cup१. कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूध साखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य घडवणारा (भूक अल्प करण्यास कारणीभूत असणारा) असतो. दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.

२. भारतियांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा अन् उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क अल्झायमर्स (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासांत सर्वांनी चहा जपून अन् प्रमाणात प्यायला हवा.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात चहा हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.

– वैद्य महेश ठाकूर, कार्यवाह, आयुर्वेद विद्यापीठ (ठाणे जिल्हा) (दैनिक लोकसत्ता, ऑक्टोबर २०००)

चहाला पर्याय

पुढील प्रत्येक पदार्थापासून दूध न घालता बनवलेले वेगवेगळे काढे (कशाय) हे चहाचा उत्तम पर्याय आहेत. या काढ्यांमध्ये आवश्यकतेनुसार साखर किंवा गूळ घालावा. – १. गवती चहा, २. तुळस, ३. आले किंवा सुंठ, ४. धने-जिरे, ५. लिंबाची साल किंवा पाने, ६. लवंग आणि ७. दालचिनी.

– वैद्य मेघराज पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.१२.२०१६)