जंक फूड त्यागून आयुर्वेद अंगीकारा !

Satvik_Asatvik_Ahar_banner

काही दिवसांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांमधून जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविद्यालयांमधील जंक फूडच्या सर्रास विक्रीवर गदा येईल. महाविद्यालयांमध्ये लावण्यात येणार्‍या चिनी आणि अन्य जंक फूडच्या गाड्या महाविद्यालयातून हद्दपार होतील, ही जमेची बाजू. त्याची अंमलबजावणी मुंबईतील काही महाविद्यालयांमधून चालू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय आहे; परंतु या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातूनच जंक फूड हद्दपार होईल, असे मात्र होणार नाही. त्यामुळे शासनाने या निर्णयापर्यंतच न थांबता त्याची काटेकोर अंमलबजावणी आणि देशात अन्यत्र कुठेच जंक फूडच्या गाड्या लागणार नाहीत, या दृष्टीने काही पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत निरनिराळ्या संशोधनातून पुढे आले आहे. जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी, तर अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते. सात्त्विक आणि पौष्टिक अन्न खाण्याचे संस्कारच हळूहळू लयास जातात कि काय, अशी भीती वाटण्याजोगे जंक फूडचे प्रस्थ वाढीस लागले आहे. जंक फूडचे प्राबल्य हे थांबवायचे असेल, तर केवळ महाविद्यालयांमध्ये त्यावर बंदी घालून विशेष साध्य होईल, अशी स्थिती नाही. मुले महाविद्यालयाच्या बाहेरील अथवा अन्यत्रच्या गाड्यांवरही त्याची खरेदी करून ते खाऊ शकतात. हे लक्षात घेऊन जंक फूड निर्मितीसच आणि देशभरातील सर्व जंक फूडच्या गाड्यांवर आळा बसला पाहिजे. जंक फूड हे शरिरासमवेत वैचारिक क्षमताही खिळखिळी करतात, हे लक्षात घेऊन या संदर्भातील उपाययोजना लवकरात लवकर होणे अवश्यक आहे.

जंक फूडची नवीन पिढीला चटक लागली आहे. त्यामुळे शरिराची हानी होते, हे माहिती असूनही चंगळवाद अंगात मुरल्याने काही गंभीर आजार होत नाही, तोपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मजा लुटण्यासाठी आयुष्य आहे, असा त्यांचा दृष्टीकोन असतोे. सध्याच्या काळात आपली अन्न हे पूर्णब्रह्म ही उदात्त संकल्पना माहीतच नाही, अशी स्थिती आहे. शरीर पोसण्यास आवश्यक आहे, म्हणून अन्न ग्रहण करायचे, असे आयुर्वेद सांगतो. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म अशी मनाला सूचना देऊन वासनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत अन्नग्रहण करायला हिंदु धर्म शिकवतो. त्याचसमवेत आपण आपले शरीर तरी का पोसायचे, तर शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्, म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती करून घेण्यास हे शरीर मला हवे आहे; म्हणून त्याचा सांभाळ करायचा ! आज मात्र ही उदात्त शिकवण मागे पडलेली दिसून येत आहे. जिभेचे चोचले पुरवण्याकडे मानवाचा कल वाढल्यानेच जंक फूडचा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समृद्धता असूनही निकृष्ट अन्न खाण्याची ही हौस वैचारिक मतिमंदत्वच दर्शवते.

जंक फूड टाळून आयुर्वेदाचा पुरस्कार, हाच या सर्वांवरील सर्वोत्तम उपाय आहे. आयुर्वेद केवळ शरिराचीच नाही, तर मन आणि बुद्धीचेही उत्तम संगोपन व्हावे; म्हणून सात्त्विक अन्नाचान आग्रह धरते. असे म्हणतात की, आपण जसे खातो, तसे आपण होतो. सुदृढ मन, बुद्धी आणि शरीर हवे असल्यास उत्तम अन्न खाल्ले पाहिजे. त्याही पुढे जाऊन अन्नामध्ये कस येण्यासाठी कसदार भूमी असली पाहिजे. त्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आणि कीटकनाशक यांचा वापर टाळण्याचा आग्रह धरला पाहिजे. असे करत करत आयुर्वेदिक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. तसे केल्यासच आपण जंक फूडच्या विळख्यातून बाहेर पडू. त्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवायला हवी, तरच एक सुदृढ आणि खर्‍या अर्थी प्रगल्भ पिढी निर्माण होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभातन

 

अनेक रोगांचे माहेरघर चॉकलेट !

‘वृक्षवल्ली नव्हे, तर आता विषवल्ली आम्हा सोयरी ! आपल्या संस्कृतीमध्ये नसलेला चॉकलेट हा पदार्थ अनेक रोगांचे विशेषतः दातांच्या अनेक रोगांचे माहेरघर आहे. त्याहीपेक्षा शरिरावर महाभयंकर परिणाम होतो, तो त्यामध्ये वापरलेल्या सॅक्रिनचा ! सॅक्रिन हा पदार्थ ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही आरोग्याला अपायकारक आणि घातक असल्याचे सांगितले आहे. सॅक्रिनमुळे कर्करोगही होऊ शकतो. आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर सॅक्रिनसारख्या पदार्थांपासून बनलेल्या चॉकलेटपासून लांबच राहिलेले बरे.’

– वैद्य सुविनय दामले