त्वचेच्या बुरशीजन्य गजकर्णासारख्या विकारांवर (फंगल इन्फेक्शनवर) सोपे उपाय

वैद्य मेघराज पराडकर
वैद्य मेघराज पराडकर

जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात. या चट्ट्यांवर पुढील दोन्ही उपाय करावेत.

१. प्रतिदिन दिवसातून २ – ३ वेळा विकारग्रस्त त्वचा नुसत्या पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसावी आणि तेथील चट्ट्यांवर स्वतःची लाळ लावावी. यामुळे ८ – १० दिवसांत हे चट्टे पूर्ण बरे होतात, असा अनुभव आहे. या दिवसांत पूर्ण शरिराला साबण लावू नये.

२. ॐ पां पार्वतीभ्यां नमः । आणि ॐ वां वागीश्‍वरीभ्यां नमः । या २ मंत्रजपांनी पाणी अभिमंत्रित करून हे पाणी प्राशन करावे आणि विकारग्रस्त त्वचेलाही लावावे. पाणी अभिमंत्रित करण्यासाठी तांब्याच्या किंवा काचेच्या भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात उजव्या हाताची पाचही बोटे बुडवून वरील मंत्र प्रत्येकी २१ वेळा म्हणावेत.

त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी साबणाचा वापर टाळा !

स्नानाच्या वेळी साबण लावल्याने साबणातील कृत्रिम द्रव्यांमुळे त्वचा रूक्ष (कोरडी) बनते. तसे होऊ नये, यासाठी साबणाऐवजी उटणे लावावे. एका वेळी अंगाला लावण्यासाठी २ चमचे उटणे पुरेसे होते. उटण्याप्रमाणेच मुलतानी माती किंवा वारुळाची मातीही वापरता येते.

स्नान करतांना साबण न लावणे हे आदर्श असले, तरी तेल लावून अंघोळ करतांना अंगाला लागलेले अतिरिक्त तेल काढण्यासाठी काही जणांना साबण लावणे सोईचे वाटते. अशा वेळी साबण लावल्यावर अंग जास्त रगडू नये. त्वचेवरील सर्व तेल साबणाने न काढता तेलाचा थोडासा ओशटपणा त्वचेवर राहू द्यावा. अंग पुसल्यानंतर त्वचेवर आवश्यक तेवढा तेलकटपणा रहातो, तेल कपड्यांना लागत नाही आणि या तेलकटपणाचा त्रास न होता त्वचा मऊ रहाण्यास लाभ होतो.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात