स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्थेची नितांत आवश्यकता !

करवीरच्या नव्या शंकराचार्यांच्या गादीरोहण समारंभाप्रसंगी मावळते शंकराचार्य म्हणाले, लोकशाही ही अंतिम व्यवस्था नाही. स्वाध्याय आणि संस्काराच्या आधाराने नवीन राज्यव्यवस्था आणावी लागेल. त्यासाठी नवी स्मृती (कायदे संहिता) लिहावी लागेल.

आमच्या देशात आदि शंकराचार्यांच्या काळात जशी समाजस्थिती होती, तशी समाजस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

१. विचारवंतांचा बुद्धीभ्रंश केला किंवा विकृत
विचार निर्माण केले, तर ते संपूर्ण राष्ट्र् नाश पावत असणे

तुम्ही एखाद्यावर शस्त्राने आघात केला किंवा एखाद्या व्यक्तीवर विषप्रयोग केला, तर ती एकच व्यक्ती मृत पावते; परंतु एखाद्या राष्ट्र्रातील जाणकार लोक, विद्वान, बुद्धीमंत, विचारवंत, समाजनेते, राजकारणी पुरुष यांच्यामध्ये बुद्धीभ्रंश निर्माण केला किंवा विकृत विचार निर्माण केले, तर ते संपूर्ण राष्ट्र्र नाश पावते. आजची आपली सामाजिक परिस्थिती अशीच झाली आहे.

२. परदेशी संस्कृतीचे अनुकरण केल्याने समाजस्थिती हाताबाहेर जाणे !

परदेशातून येणारे सर्व ते चांगले. परदेशी वेशभूषा, परदेशी वस्तूंचे आकर्षण, डॅडी-मम्मी संस्कृती, वाढत चाललेली भाषा संस्कृती, दूरदर्शनवरील (टीव्हीवरील) दाखवल्या जाणार्‍या तलाकनामे मालिका या मालिकांमधून स्त्रियांचा अपमान कसा करावा, स्त्रियांना विद्रुप कसे करावे, भ्रष्ट कसे करावे, याचे जणू शिक्षणच दिले जात आहे आणि आमच्या समाजातील बुद्धिमंत आज त्याची तरफदारी करत आहेत; म्हणूनच समाजस्थिती हाताबाहेर चालली आहे; असे आम्हास वाटते.

३. निषेधार्ह असणारी लाचारी राजाने कधीही स्वीकारू नये !

ग्लोबलायझेशन, लिब्रलायझेशन, प्रायव्हटायझेशन, इंडस्ट्रीलायझेशन अशा शब्दांची धुळफेक करण्यात येत आहे. या संबंधात धर्मराजाला भीष्माचार्यांनी राज्यकारभाराचे जे सूत्र सांगितले आहे, त्याचा उल्लेख आम्ही प्रकर्षाने करीत आहोत. आपण आरंभ रहाणे, आपल्यावर युद्धाचा प्रसंग येऊ नये. यासाठी अन्य देशांच्या कृपेवर जगण्याचा आणि लाचारी स्वीकारण्याचा प्रयत्न हा निंदनीय आहे. निषेधार्ह असणारी लाचारी राजाने कधीही स्वीकारू नये ! या सर्व प्रकाराला आमचे राज्यकर्ते विरोध करू शकत नसतील ! तरीही आमच्या धर्म बांधवांनी एकत्रित यावे आणि परकीय शिक्षणाचे आक्रमण हाणून पाडावे.

४. लोकशाही ही अंतिम व्यवस्था होऊ शकत नाही !

हिंदु धर्म हिंदुजीवन, पद्धती आणि सर्वधर्मसमभाव यांच्या सीमा रेषा आपल्या घटनेत स्पष्ट करण्याची वेळ आता आलेली आहे, हे ही आमच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. लोकशाही ही अंतिम व्यवस्था होऊ शकत नाही. स्वाध्यायाच्या आणि संस्काराच्या आधारावर नवीन राज्यव्यवस्था निर्माण करावी लागेल. स्वाध्यायावरील आधारित राज्यव्यवस्थेचा आराखडा निर्माण करण्यात प्रयत्नशील रहावे.

संदर्भ : मासिक, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, जून २००४