साधिकेने केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न

कु. स्वाती गायकवाड (६३ टक्के आध्यात्मिक पातळी, आॅक्टोबर २०१६) यांनी केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न आता आपण पाहूया.

swati_gaykawad_hasara
कु. स्वाती गायकवाड

‘स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्‍वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना या घटकावर अवलंबून असते. कृती बदलली की, विचार बदलतात आणि विचार बदलले की, कृती बदलते. या तत्त्वानुसार मन अन् बुद्धी या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास भाव लवकर निर्माण होण्यास साहाय्य होते. भाव निर्माण होण्यासाठी करावयाच्या कृती येथे देत आहोत.

१. निराशा येत असल्यास आपल्या ध्येयाची आठवण करणे

आपल्याला माझी साधना नीट होत नाही, या विचाराने निराशा येत असेल, त्या वेळी मी साधनेत आले, तेव्हा माझे ध्येय काय होते ?, हे आठवल्यास उत्साह वाढून मनाची मरगळ निघून जाते. अशा वेळी मनाला भावाच्या स्तरावर काही प्रश्‍नही विचारू शकतो. याचे एक उदाहरण येथे देत आहे.

प्रश्‍न : प.पू. डॉक्टरांनी मला रामनाथी आश्रमात कशासाठी आणले आहे ?

उत्तर :

अ. अखंड गुरुसेवा होण्यासाठी

आ. गोप-गोपींसह साधकांच्या सहवासात राहून शिकण्यातला आनंद घेण्यासाठी

इ. संत सहवासातील आनंद घेण्यासाठी

ई. दोष आणि अहं यांची जाणीव करून देऊन साधनेत जलद उन्नती होण्यासाठी

उ. गुणवृद्धी करून लवकरात लवकर देवाकडे जाण्यासाठी

ऊ. सतत आनंदी रहाण्यासाठी

ए. स्वचे अस्तित्व विसरून भगवंताला अखंड अनुभवता येण्यासाठी

ऐ. चराचरातील भगवंताला जाणायला शिकण्यासाठी

ओ. अखंड आनंद अनुभवता येण्यासाठी

औ. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटण्यासाठी

अं. हिंदु राष्ट्र स्थापनेत खारूताईचा वाटा उचलता येण्यासाठी

 

२. सकारात्मकता वाढवण्यासाठी मनाला प्रश्‍न विचारणे

दोष आणि अहं यांवर मात करता येण्यासाठी मनाला काही प्रश्‍न विचारल्यास सकारात्मकता वाढण्यास साहाय्य होते. याचे एक उदाहरण येथे देत आहे.

प्रश्‍न : प.पू. डॉक्टरांना कशी स्वाती आवडेल ?

उत्तर :

अ. सकारात्मक रहाणारी (जो दोष असेल, त्याच्या विरुद्ध असलेला गुण माझ्यात आल्यास ते प.पू. डॉक्टरांना आवडेल, असे उत्तर मनाला देऊ शकतो.)

आ. आत्मविश्‍वास असलेली

इ. पुढाकार घेऊन, तळमळीने आणि झोकून देऊन सेवा करणारी

ई. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारी

उ. चुका मनापासून स्वीकारणारी आणि प्रांजळपणा असलेली

ऊ. चुकांमधून शिकणारी

ए. सतत आनंदी रहाणारी

ऐ. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारी

ओ. इतरांना मनापासून साहाय्य करणारी

औ. इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होणारी

अं. अखंड अनुसंधानात आणि कृतज्ञता अन् शरणागत भावांत रहाणारी

क. स्थिर आणि अंतर्मुख असणारी

स्वतःचे नाव आणि आपल्यात नसलेला अथवा अल्प प्रमाणात असलेला गुण वरीलप्रमाणे सूत्रात जोडल्यास ती एक प्रकारची भावाच्या स्तरावरील स्वयंसूचना घेतल्यासारखे वाटते.

 

३. मनाची नकारात्मकता घालवण्यासाठी मनाला योग्य दृष्टीकोन देणे

काही वेळा साधकांमधील विविध गुण अनुभवत असतांना माझ्यात हेे गुण नाहीत, असे वाटून नकारात्मकता येते, तर कधी त्यांचा मत्सरही वाटू लागतो. स्वतःतील दोष आणि अहं यांमुळे साधकांकडून शिकण्यातील हा अडथळा असतो. अशा वेळी मनाला पुढीलप्रमाणे दृष्टीकोन दिल्यावर चांगले वाटते.

३ अ. साधक आणि संत हे अध्यात्माच्या शाळेतील चालते-बोलते मार्गदर्शक असल्याने त्यांच्या गुणांचा लाभ करून घेणे महत्त्वाचे !

शाळा-महाविद्यालयात शिकतांना आपण विद्यार्थी असतो. आपल्याला परीक्षेला सामोरे जायचे असते. योग्य उत्तरे मिळण्यासाठी आणि कशा प्रकारे उत्तर लिहायचे ?, याची दिशा मिळण्यासाठी आपण मार्गदर्शक (गाईड) अथवा सूत्रांचा (नोट्सचा) उपयोग करतो. त्यामुळे एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला सहजतेने मिळते. बुद्धीला पुष्कळ ताण द्यावा लागत नाही. त्याप्रमाणेच आता अध्यात्माच्या या शाळेत साधक आणि संत हे आपले प्रत्यक्ष चालते-बोलते मार्गदर्शकच आहेत. त्यांच्या योग्य कृतींमधून, योग्य दृष्टीकोनांतून आपण कसे वागायला-बोलायला हवे ?, याचे आपल्याला उत्तरच मिळून जाते. त्यामुळे आपण या सर्वांच्या गुणांचा लाभ करून घेऊन शिकायला हवे. असा दृष्टीकोन मनाला दिल्यावर शिकण्याच्या विचाराने मन सकारात्मक आणि उत्साही होते.

३ आ. अध्यात्माच्या शाळेतील दोष आणि अहं यांची गणिते भगवंताच्या साहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न केल्याने मनाचा संघर्ष घटून उत्साहात वाढ होते !

साधनेला प्रारंभ केल्यावरच आपल्या मनाची प्रक्रिया आरंभ होते. प्रारंभी देव विविध प्रसंग घडवून आपले दोष आणि अहं यांची तीव्रता आपल्या लक्षात आणून देतो. तेव्हा स्वीकारायला संघर्ष होतो; पण हळूहळू देवच आपल्या मनाची सिद्धता करवून घेतो. या गोष्टी स्वीकारता येऊ लागल्यावर आणखी पुढच्या टप्प्याचे प्रसंग घडवून देव मनाची सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया आपल्याला दाखवतो. कधी-कधी एखाद्या प्रसंगावर मात करायला न जमल्याने देव असे का करतो ? मी प्रयत्न करत आहे, तरी प्रसंग थांबवत का नाही ?, असाही विचार येऊन जातो. शाळेत असतांना प्रथम लहान-लहान गणिते सोडवायला शिकतो. प्रारंभी तेही जमत नाही; पण निराश न होता शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातला आनंद घ्यायला शिकतो. नंतर पुढच्या पुढच्या टप्प्याची अवघड गणिते सोडवावी लागतात. आधी अवघड वाटणारी गणिते सरावाने जमायला लागली की, त्यातला आनंद घ्यायला मन शिकते. ही तर अध्यात्माची शाळा आहे. इथली गणिते वेगळी आहेत. ही गणिते सोडवण्यासाठी साहाय्य करणारा भगवंतही आपल्यासमवेत आहे. त्याच्या आधाराने दोष आणि अहं यांची गणिते सोडवण्यातला आनंद घ्यायचा आहे आणि तीच माझी साधना आहे, असा विचार करायला प्रारंभ केल्यावर मनाचा संघर्ष न्यून होऊन कृती करण्याचा उत्साह वाढतो. मन प्रसंगातून चटकन बाहेर पडण्यास साहाय्य होते.

 

४. प.पू. डॉक्टरांनी केलेल्या कौतुकाचे स्मरण करणे

प.पू. डॉक्टरांनी माझ्या लहानसहान गोष्टींचे केलेले कौतुक, त्यांचे शब्द हे सर्व कृती करतांना आठवते. खरेतर देवाला वाटणार्‍या मायेतल्या या गोष्टींचे कौतुकही माझ्या साधनेसाठीच आहे, असा भाव ठेवल्यास अखंड अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांनी आणलेल्या पदार्थांचे कौतुक करत, आवडला, असे सांगत. नंतर भक्ताने कधीही तो पदार्थ केला, तर त्याला प.पू. बाबांची आठवण व्हावी, हा यामागे त्यांचा हेतू असायचा. त्याप्रमाणेच प.पू. डॉक्टरही करतात, असे वाटते. (ज्या साधकांना प.पू. डॉक्टरांचा सहवास लाभला नाही, त्यांनी आपली प्रत्येक वस्तू आणि कृती त्यांना आवडेल अशी आहे ना ?, असा विचार सतत ठेवावा. त्यामुळे आपला कल सात्त्विकतेकडे वाढून प्रत्येक कृतीही योग्य अशीच होण्यास साहाय्य होते, तसेच अनुसंधानही टिकते.)

 

५. दिवसभरातील विविध कृती करतांना प.पू. डॉक्टरांसमवेतचे क्षण आठवणे

प.पू. डॉक्टरांसमवेतचे क्षण आठवून त्यांतून आनंद घेण्याचा प्रयत्न करते. प.पू. डॉक्टरांच्या सगुण सेवेची संधी मला मिळाल्याने त्यांच्या सहवासात ज्या ज्या कृती झाल्या, त्यांची आठवण आता त्याच कृती करतांना ठेवते, उदा. खोली स्वच्छ करणे, कपडे धुणे, ते वाळत घालणे, हस्तप्रक्षालन पात्राची स्वच्छता करणे, अशा विविध कृती करतांना त्यांनी मला काहीतरी सांगितलेलेच होते. ते प्रसंग आठवून आनंद घेते.

(ज्यांना अशी संधी मिळालेली नाही, त्यांनी प्रत्येक कृती प.पू. डॉक्टरांसाठी करत असल्याचा भाव ठेवावा आणि ती कृती कशी केल्याने प.पू. डॉक्टरांना आवडेल ?, याकडे लक्ष द्यावे. असे केल्यास त्यातूनही आनंद मिळतो.)

 

६. प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तूशी जोडलेल्या त्यांच्या आठवणींचे स्मरण करणे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या निळ्या आसंद्या, आरसा, कपाट इत्यादी काही वस्तू अन्यत्र ठेवल्या आहेत. त्यांपैकी एखादी वस्तू दिसल्यास त्या वस्तूशी जोडलेल्या त्यांच्या आठवणीचे स्मरण करते.

 

७. चुका झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी शिकवलेल्या सूत्रांचा अन्यत्र उपयोग करणे

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सेवा करतांना माझ्याकडून झालेल्या चुका आठवून त्यांनी जे शिकवले, ते अन्यत्रही कसे लागू करता येईल ?, असे प्रयत्न करते. (आपल्या प्रत्येक चुकीतून आपण काय शिकलो ?, याकडे अंतर्मुख होऊन लक्ष दिल्यास या सूत्रांचा आपल्यालाही अन्य ठिकाणी उपयोग करून घेता येतो.)

 

८. दैनंदिन जीवनातील कृती करतांना प्रार्थना करणे

८ अ. स्वतःला आरशात पहातांना

देवा, मला माझ्या ठिकाणी तुलाच पहाता येऊ दे. माझे मन केवळ तुझ्यातच रममाण होऊ दे.

८ आ. केस विंचरतांना

गुरुदेवा, तुम्हाला आवडेल अशी सात्त्विक केशरचना करायला तुम्हीच शिकवा.

८ इ. कुंकू लावतांना

देवीमाते, कुंकवाच्या माध्यमातून मला तुझे तत्त्व ग्रहण करता येऊ दे.

८ ई. पाणी पितांना

गुरुदेवा, हे पाणी म्हणजे तुमचे चरणतीर्थ आहे, या भावाने पाणी पिता येऊ दे. या तीर्थाने अंतर्देहाची शुद्धी होऊ दे.

८ उ. अल्पाहार आणि महाप्रसाद करतांना

देवा, तुझा प्रसाद आहे, या भावाने हे अन्न आनंदाने ग्रहण करता येऊ दे. प्रत्येक घास नाम घेत ग्रहण करता येऊ दे. प्रसादातून मिळणारी शक्ती तुझ्या चरणसेवेसाठी वापरली जाऊ दे.

८ ऊ. पायर्‍या चढतांना

प्रत्येक पायरीला गुरुमाऊलीचा (प.पू. डॉक्टरांचा) चरणस्पर्श झाला आहे. त्यामुळे या पायर्‍या कृतज्ञताभावात आहेत. तो भाव मला अनुभवायचा आहे, यासाठी प्रार्थना करावी.

८ ए. सेवा करतांना

देवा, माझी पात्रता आणि क्षमता नसतांनाही या घोर आपत्काळात गुरूंच्या चरणांची सेवा माझ्यासाठी उपलब्ध करून दिली आहेस, याविषयी अखंड कृतज्ञताभाव ठेवून ही सेवा मला परिपूर्ण आणि मनापासून करता येऊ दे. या सेवेतून माझ्यातील दोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन गुणांचे संवर्धन होऊ दे. हा जीव तुला अपेक्षित असा लवकरात लवकर घडू दे.

८ ऐ. एखाद्या साधकाच्या दोषांविषयी मनात विचार येऊन बर्हिमुखता वाढू लागल्यास

गुरुदेवा, त्या जिवामध्ये गुणांच्या माध्यमातून तुम्ही आहात. मला तुम्हाला (गुणरूपातील) पहाता येऊ दे.

८ ओ. एखादा सहसाधक शिकवण्याच्या भूमिकेत असतो, असा विचार मनात आल्यास

समोरच्या साधकाकडून शिकून त्यातील आनंद घेणे, ही माझी साधना आहे, हे लक्षात घेऊन गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित ते त्यांच्याकडून मला शिकता येऊ दे.

८ औ. इतरांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष गेल्यास

हे भगवंता, ज्याप्रमाणे अर्जुनाचे लक्ष केवळ झाडावरील पोपटाच्या डोळ्याकडे होते, तसे कुणी कसेही सांगितले, वागले, बोलले, तरी मला त्यातून साधनेसाठी आवश्यक अशा गोष्टीकडेच लक्ष देता येऊ दे. माझे लक्ष परिस्थिती, वागण्या-बोलण्याच्या पद्धती यांकडे न जाता माझ्या साधनेकडेच असू दे.

८ अं. इतरांकडून अपेक्षा झाल्याने चिडचिड होऊ लागल्यास

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिसेल ते कर्तव्य असे वागायला सांगितले; पण माझ्याकडून तसे होत नाही. मी स्वतः योग्य कृती करणे, ही माझी व्यष्टी साधना असून इतरांकडून ती योग्य प्रकारे होण्यासाठी प्रयत्न करणे, ही माझी समष्टी साधना आहे, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यास साधनेला साहाय्य होते.

खोलीत सहसाधिकांनी खण नीट ठेवावेत, खोली स्वच्छता नियमित करावी, अशी अपेक्षा होऊन माझी चिडचिड झाली. त्या वेळी अपेक्षा न करता मला स्वतःला या सेवा करायच्या आहेत, याची जाणीव होऊन त्या सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. भिडस्तपणा या दोषामुळे मला त्यांच्या चुका सांगता न आल्याने सहसाधिकांना संबंधित सेवा करायला सांगणे, ही माझी समष्टी साधना आहे, या विचाराने भिडस्तपणावर मात करण्यास साहाय्य झाले.

८ क. मनात स्वकौतुकाचे विचार आल्यास

हे भगवंता, माझे हसणे, बोलणे, चालणे, कृती करणे सर्वकाही तुझ्यामुळे होते, ते केवळ तुझ्याचसाठी आहे. याची जाणीव अखंड राहू दे. माझी लहान कृती, हालचालही तुझ्यामुळेच होते; म्हणून मला अखंड शरणागत भावात रहाता येऊ दे. माझे अस्तित्व तुझ्यामुळे टिकून आहे. तू नसशील, तर माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही. माझ्यातील तुझ्या अस्तित्वाविषयी कृतज्ञता वाटू दे. हा मीपणा तूच नष्ट करून तुझ्यात या जिवाला विलीन करुन घे भगवंता !

– कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०१६)