निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

Eknthmrj
संत एकनाथ महाराज

संत एकनाथ महाराज यांचा जन्म संत भानुदास यांच्या कुळात देशस्थ ऋग्वेदी आश्‍वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. नाथांचे माता-पिता त्यांच्या बालपणीच निवर्तले. त्यामुळे नाथांचा सांभाळ त्यांच्या आजी-आजोबांनी केला. नाथांना बालपणापासूनच भगवद्भक्तीचे वेड होते. गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

नाथांची सेवा पाहून स्वामींनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत बसून दत्ताचे ध्यान करत असत.

नाथांनी केलेल्या निस्सीम सेवेने ते दत्तात्रय दर्शनास पात्र झाले. स्वामींनी नाथांना शुलिभंजन पर्वतावर प्रथम दत्तदर्शन घडविले. नाथ पुढे तीर्थयात्रा करत पैठण येथे पोचले.

संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

 

निरहंकारपणाने गुरुकार्य करणारे संत एकनाथ महाराज

१. पाचव्या वर्षी गुरूंच्या शोधार्थ घर सोडणे आणि गुरुभेट होणे

‘संत एकनाथ महाराजांनी लहानपणी एका कीर्तनात गुरुचरित्राचे महत्त्व ऐकले. त्यांच्या मनात ते रुजले आणि त्यांनी ‘गुरु कसा भेटणार ?’, असा प्रश्‍न विचारला. कीर्तनकारांना त्या प्रश्‍नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी ‘गोदावरीमातेलाच हा प्रश्‍न विचार’, असे सांंगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी एकनाथ महाराजांनी गंगारूपी आईला तळमळीने, कळवळून आणि रडकुंडीला येऊन विचारले. तेव्हा गोदावरीमातेने सांगितले, ‘दौलताबाद गडाचे गडकरी तुझे गुरु आहेत. त्यांच्याकडे जा.’

५ वर्षांचे असतांना त्यांनी घर सोडले आणि गुरूंना शोधण्यासाठी निघाले. पंत जनार्दनस्वामी एका मुसलमान राजाच्या दौलताबाद येथील गडाचे गडकरी होते. ते प्रत्येक गुरुवारी सुटीवर जायचे. पाच वर्षांचे एकनाथ महाराज जेव्हा गडाच्या अनेक पायर्‍या चढून स्वामींसमोर आले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘ये, मी तुझीच वाट पहात होतो.’’ गुरुही शिष्याची वाट पहात असतात. त्यांनी एकनाथांना पुजेची सिद्धता करण्याची सेवा दिली. ती त्यांनी अत्यंत भावपूर्ण केली. गुरु प्रसन्न झाले. त्यांनी त्याला गणित शिकवले.’

– पू. मणेरीकरबुवा (२४.४.२००७)

२. जनजागृतीसाठी कुलस्वामिनी जगदंबेला प्रार्थना

‘त्या काळी देवगिरी गड निजामशाही राजवटीत होता. संत एकनाथांचे वास्तव्य तेथेच असल्यामुळे या राजवटीचे अत्याचारी स्वरूप जवळून पहाता येत होते. महाराष्ट्र परकीय सत्तेच्या हाती हतबल होऊन राहिला होता. लोक होईल तो अत्याचार मुकाट्याने सहन करत दिवस ढकलत होते. महाराष्ट्राची अवस्था ‘लोक मेले नाहीत; म्हणून जिवंत आहेत’, अशी होती. संत एकनाथांना ही भयाण परिस्थिती पालटण्यासाठी ‘समाज जागृती चळवळ उभी करावी’, असे वाटू लागले. त्यांनी महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी जगदंबेला ‘बया दार उघड’, असे आवाहन करून या जनजागरणाच्या गोंधळात सहभागी होण्याची प्रार्थना केली.’ (विश्‍वपंढरी, वर्ष १ ले, अंक २ रा, पृष्ठ १३)

३. संत एकनाथ महाराजांनी केलेला क्षात्रधर्म !

एकदा जनार्दनस्वामी समाधीत निमग्न असतांना देवगडावर परचक्र आल्याची वार्ता आली. संत एकनाथ महाराजांनी जनार्दनस्वामींचा लढाईच्या वेळचा पोषाख अंगावर चढवला आणि शस्त्रे घेऊन कमरेला तलवार लटकवून ते अश्‍वारूढ होऊन बाहेर पडले. स्वामींचा समाधीभंग होऊ न देता ४ घटका घनघोर युद्ध केले. शत्रूसैन्य नामोहरम होऊन पळाले. जनार्दन वेशधारी संत एकनाथांच्या शौर्याची सर्वांनी स्तुती केली. गुरु-शिष्यांचा अंतर्बाह्य पूर्ण अभेद असतो, हे कृतीने संत एकनाथांनी दाखवले. गुरूंचा पोषाख जेथल्या तेथे ठेवून संत एकनाथ महाराज कामाला लागले. जनार्दन महाराजांना एका शब्दानेही काही सांगितले नाही. स्वामींना ही गोष्ट कळल्यावर या थोर शिष्याची धन्यता वाटली. वेगळेपणाचा अभिमान लोपवून निरहंकारपणाने गुरुकार्य करणारे असे संत एकनाथ महाराजांसारखे शिष्य दुर्मिळ आहेत. (एकनाथ महाराज चरित्र, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, रम्यकथा प्रकाशन, पुणे २, पृष्ठ ६२)

४. लोकजागृतीसाठी केलेल्या रचना

नाथांना मायबोलीचा एवढा अभिमान की, त्यांनी पंडितांना बाणेदारपणे विचारले, ‘संस्कृतभाषा देवे केली । मराठी काय चोरापासून झाली ?’ लोकजागृतीसाठी त्यांनी भारूडे, गोंधळ, जोगवा, गवळणी, कोल्हाटी यांच्या रचना केल्या. तसेच आदर्श रामराज्याची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी भावार्थ रामायणाची रचना केली.

संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृष्ठ ५०६