मंदिराच्या वर्धापनदिनाला गर्दी जमवण्यासाठी रज-तम प्रधान कार्यक्रमांचे आयोजन करणारे विश्‍वस्त !

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !

आम्ही जिल्ह्यातील एका गावात असणार्‍या एका मंदिराच्या वर्धापनदिनाला गेलो होतो. तो वर्धापनदिन तारखेनुसार होता. खरे तर तो तिथीप्रमाणे असायला हवा; परंतु लोकांना लक्षात ठेवायला सोपा जावा म्हणून इंग्रजी तारखेनुसार साजरा केला जात होता. हिंदु संस्कृतीनुसार तिथीला महत्त्व आहे, हेही त्या विश्‍वस्तांना ज्ञात नव्हते.

 

१. सोडतीचे (‘लकी ड्रॉ’चे) आमीष दाखवून देवळात गर्दी जमवणारे विश्‍वस्त !

डॉ. संजय सामंत

कार्यक्रमात सोडत (लकी ड्रॉ) ठेवण्यात आली होती. या सोडतीत गावातील मान्यवरांनी (यामध्ये त्या मंदिराचे पुजारीही होते) विविध बक्षिसे प्रायोजित केली होती. कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये वारंवार बक्षिसांची सूची घोषित करून भाविकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत होते. या सर्व प्रकारामुळे भक्तीभावाने आलेल्या भाविकांचे लक्ष विचलित होत होते. सोडतीमुळे लोकांची कार्यक्रमाला उपस्थिती वाढेल, हा विश्‍वस्तांचा उद्देश असल्याचे जाणवत होते. खरेतर देव हा भावाचा भुकेला असतो. त्यामुळे ज्या व्यक्ती भक्तीभावाने दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात त्यांच्यात अधिकाधिक भाव कसा निर्माण होईल, याचा प्रयत्न विश्‍वस्तांनी करायला हवा. यासाठी वारंवार दर्शन घेतांना रांगेमध्ये नामजप करावा, कारणाशिवाय एकमेकांशी बोलू नये, अशा प्रकारच्या सूचना देणे अपेक्षित होते. शक्य असल्यास त्या देवतेच्या नामजपाची ध्वनीफीत ध्वनीक्षेपकावर लावणे रास्त ठरले असते.

देवाचे दर्शन घेणे, ही सात्विक कृती आहे, तर सोडतीमध्ये तिकीट घेणे, ही तामसिक कृती आहे. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना सोडतीचे तिकीट घ्या, असे आवाहन करणारे आयोजक एक प्रकारे पापच ओढवून घेत होते. ज्याच्यामध्ये देवाप्रती भाव आहे, तो भाविक, अशी भाविकाची व्याख्या करता येईल. भाविक मंदिरात भक्तीभावाने देवतेच्या दर्शनासाठी अन्य कोणताही उद्देश न ठेवता येत असतो. असे असतांना वारंवार भाविकांनी या सोडतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केल्यामुळे भाविक या शब्दाचेही विडंबन होत होते. छोट्या छोट्या गोष्टीतही हिंदु स्वत:च्या धर्माचे कसे विडंबन करत असतात, याची जाणीव प्रकर्षाने झाली.

 

२. देवतेच्या नावाचा केक बनवणारे म्हणे भक्त !

देवळाच्या अंतर्गृहात सत्यनारायण पूजेच्या मखराच्या बाजूलाच एक मोठा केक ठेवला होता. या केकवर त्या देवतेचे नाव लिहिले होते. याविषयी चौकशी केली असता सदर केक प्रतीवर्षी एक भक्त (?) ज्यांचा स्वतःचा केक बनवण्याचा व्यवसाय आहे, ते देत असल्याचे समजले. काही वर्षांपूर्वी याला समाजातील काही घटकांनी विरोध केला असता आमची देवतेवर श्रद्धा असल्यामुळे श्रद्धापूर्वक त्या देवतेला केक अर्पण करतो, असे त्या भक्ताने सांगितले. त्या वेळी मनात पुढील सूत्रे जाणवली,

अ. हिंदु संस्कृतीमध्ये केकला स्थान नाही, याची माहिती कुणालाच नव्हती. सणासुदीमध्ये बनवले जाणारे पदार्थ, उदा. मोदक, पुरणपोळी हे सत्त्वगुणी असतात, तर केक तमोगुणी आहे. हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने कुणालाच हे माहीत नव्हते.

आ. आमची देवतेवर श्रद्धा असल्यामुळे श्रद्धापूर्वक त्या देवतेला केक अर्पण करतो, हा भक्ताने केलेला खुलासा अत्यंत हास्यास्पद वाटला. उद्या एखाद्या भक्ताचे मद्याचे वा मांस विक्रीचे आस्थापन असल्यास त्याने असे म्हटले, तर ते किती अयोग्य होईल.

इ. सदर केकवर त्या देवतेचे नावही लिहिलेले होते. ज्या वेळी केक कापला जाईल, तेव्हा ते नावही कापले जाईल. असे केल्याने आपण त्या देवतेचे विडंबन करून घोर पाप ओढवून घेत आहोत, याची जाणीव ना विश्‍वस्तांना होती, ना पुजार्‍यांना आणि ना अर्पणदात्याला.

 

३. नृत्यस्पर्धेच्या नावाखाली रेकॉर्ड डान्सचा कार्यक्रम आयोजित करणे !

धार्मिक कार्यक्रमांत आता रेकॉर्ड डान्स हा अपरिहार्य भाग बनला आहे. यामध्ये अनुमाने ४०० वर्षांची परंपरा असलेल्या जागृत मंदिराचादेखील समावेश आहे. या कार्यक्रमात काही वेळा हिंदी चित्रपटातील अश्‍लील गाण्यांवर युवक-युवती अचकट-विचकट हावभाव करत नृत्य करत असतात. आजकाल कोणताही धार्मिक अथवा अध्यात्मिक कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रमांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असा मोठा अपसमज कोकणात सर्वत्र आढळतो. किंबहुना कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला काहीतरी निमित्त लागते. यासाठी सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ! धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा कार्यक्रमातून देवतांचे आशीर्वाद मिळवण्याच्या ऐवजी त्यांची पदोपदी विटंबना केल्यामुळे आयोजकांच्या पदरी पापच पडते. अशा कार्यक्रमांना देणगी स्वरूपात रक्कम दिल्यामुळे कळत-नकळत अर्पणदातेसुद्धा या पापात सहभागी होतात. बर्‍याच ठिकाणी आपण असे धर्महानी करणारे सांस्कृतिक कार्यक्रम देवळाच्या प्रांगणात का ठेवता ? असे विश्‍वस्तांना विचारले असता सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकांची गर्दी होते. यामुळे मंदिराला आर्थिक लाभ होतो, असे धक्कादायक उत्तर ऐकायला मिळते. यावरून अशा विश्‍वस्तांच्या भक्त जाऊ द्यो पण भाविक तरी म्हणता येईल का ? असा प्रश्‍न पडतो. हे सर्व पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) हवे.

– डॉ. संजय सामंत, पिंगुळी, कुडाळ, सिंधुदुर्ग.