मायभूमीच्या रक्षणासाठी सागरालाही कवेत घेऊ पहाणार्‍या सावरकरांची जगप्रसिद्ध उडी !

savarkar_jump

विश्‍वात केवळ आहेत ।
विख्यात बहाद्दूर दोन ।
जे गेले आईकरिता ।
सागरास पालांडून ।
हनुमानानंतर आहे ।
त्या विनायकाचा मान ॥ – लोककवी मनमोहन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग (खटला) हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना मोरिया या आगनौकेवर आरक्षकांच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. प्रवासात नौका फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली. ८ जुलै १९१० ची सकाळ उजाडली. प्रातर्विधीसाठी जायचे आहे, असे सांगून सावरकर शौचालयात गेले. आपल्या अंगावरील रात्रवेश (नाईट गाऊन) त्यांनी काचेच्या दारावर टाकून पहारेकर्‍यांना आतील काही दिसणार नाही, अशी व्यवस्था केली. उडी मारून गवाक्ष (पोर्ट होल) गाठले. शरीर आकुंचित करून त्यांनी स्वतःला अपरिचित समुद्रात झोकून दिले. छातीची आणि पोटाची कातडी सोलून निघाली. बंदीवान पळाल्याचे पहारेकर्‍यांच्या त्वरित लक्षात आले. त्यांनी पाठलाग चालू केला. एव्हाना ९ फूट उंचीचा धक्का सरसर चढून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवल्याने सावरकर स्वतंत्र झाले. काही अंतर धावून ते समोर दिसलेल्या फ्रेंच आरक्षकाच्या स्वाधीन झाले; परंतु मागून आलेल्या पहारेकर्‍यांनी फ्रेंच आरक्षकाला लाच दिली आणि बळाने, तसेच अवैधरित्या सावरकरांना परत नौकेवर नेले.

फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटिशांनी सावरकरांना केलेल्या अवैध अटकेचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. ज्याचा अभियोग आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला, असा पहिला हिंदुस्थानी देशभक्त म्हणजे स्वा. सावरकर !

भारतियांनो, मार्सेलिसची ही उडी पुन:पुन्हा आठवा आणि हृदयात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवा !

अधिक माहितीसाठी वाचा सनातन-निर्मित ग्रंथ ‘बोधकथा’