स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दूरदृष्टीचे सैनिकी धोरण !

veer-savarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव सावरकर)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीचे हे १०६ वे वर्ष ! देशाला जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पदोपदी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नररत्नच. सावरकरांनी भारताकडे सक्षम सैन्यधोरण असावे, यासाठी महत् प्रयत्न केले. आज सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची न्यूनता पहाता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दूरदृष्टीची प्रचिती आल्यावाचून रहात नाही. त्यांच्या एकूणच दूरदृष्टी असलेल्या सैन्यधोरणाविषयी थोडेसे…

 

१. तात्याराव आणि सुभाषबाबू हेच
आधुनिक काळातील भारतीय 
सशस्त्र सेनादलाचे प्रणेते होत !

लहानपणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती संस्कारक्षम कथा सांगत. त्यात एक उ:शाप मिळावा म्हणून वाट पाहणारा गंधर्व, हे पात्र नेहमी आपणांस भेटत असे. कथेतील त्या शापित गंधर्वाला शेवटी न्याय मिळत तर असे; परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका तेज:पुंज गंधर्वाला आयुष्यात दुर्लक्षित जीवन कंठावे लागले. त्यास उचित सन्मान असा लाभलाच नाही. तरीही या महान नररत्नाने कधीही त्याचा ना खेद मानला किंवा ना खंत केली. सर्वस्वाचा त्याग करत इदं न मम। राष्ट्राय स्वाहा। या दधिची ऋषींच्या असीम व्रताचे पालन केले. आजही मला १५ जून १९६१ या मृत्युंजय दिनी पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात वीर तात्यारावांचा सेनापती बापट यांच्या हस्ते झालेला जाहीर सत्कार स्मरतो. तात्यारावांनी सत्काराला उत्तर देतांना आरंभीच उद्गार काढले, बहुधा तुमच्या दृष्टीकोनातून मी देशभक्त नसेनही; परंतु खुनी देशद्रोही म्हणून मला अपमानित तरी करू नका. आज हिंदुस्थानी संरक्षण दलाला तरुण अधिकार्‍यांची कमतरता भासत असून सहस्रो अधिकारी पदे रिकामी आहेत. मुख्यत: वैमानिकांची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४० च्या दशकात अवहेलना सोसून, रिक्रूटवीर देशद्रोही असा शेलक्या शब्दांत अपमान होत असतांनाही ती टीका पुष्पहार समजून स्वीकारली. ब्रिटीश राज्यकर्ते आपल्या हिंदुविरोधी सुप्त विचाराने एक षड्यंत्र रचत होते. इंडियन रॉयल आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये मुसलमान तरूणांची भरती करत होते. हिंदूंच्या क्षात्रतेजाची अवहेलना होत होती. ब्रिटीशधार्जिणे अधिकारी आणि कारकून यांची फौज उभी रहात होती. ती अनीती लक्षात घेऊन तात्याराव सैन्याचा विचार करत असतांना संधी मिळाली ती दुसर्‍या महायुद्धाची. ही एक पर्वणी आहे हे ओळखून तात्यांनी सैनिकीकरणाचा उद्घोष चालू केला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून संदेश दिला, लेखण्या तोडा, बंदुका उचला आणि आश्‍चर्य म्हणजे एक लाखांहून अधिक तरुण सैन्यात सहभागी होऊन हिंदूंची सैन्यावली संख्या तीन चतुर्थांश इतकी झाली. इतकेच नव्हे, तर देशगौरव सुभाष बाबूंना सत्तर सहस्रांहून अधिक प्रशिक्षित युद्धबंदी अनायासे आझाद हिंद सेना उभी करण्याच्या साहाय्याला आले. म्हणून आधुनिक काळातील भारतीय सशस्त्र सेनादलाचे प्रणेते तात्याराव आणि सुभाषचंद्रच आहेत, असे म्हणावेसे वाटते.

 

२. संकटसमयी सैन्यालाही उभारी देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

खरे तर तेव्हा ब्रिटीश सैन्यात दाखल होणार्‍या हिंदुस्थानींची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही दयनीय होती; कारण एतद्देशीय (नेटीव्ह) सैनिकाला गद्दार आणि देशद्रोही म्हणून वाळीत टाकत होता, तर ब्रिटीश अधिकारी काला आदमी म्हणून अपमानित करून अवहेलना करत होता. अशा संकटसमयी केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरच सैनिकांना आधार देऊन म्हणत, अरे, स्वातंत्र्य दृष्टीपथात येताच या संगिनी उलट्या वळवून गोर्‍यांना धडा शिकवा. क्षात्रतेजाचे दर्शन घडवा. झालेही तसेच. मुंबईस्थित हिंदुस्थानी आरमाराने बंड पुकारताच ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये स्वीकृती दिली की, हिंदुस्थानी सैन्य इत:पर साथ देणार नाही. तेव्हा हिंदुस्थानातील आपले चंबुगबाळे लवकर उचलून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे भाग आहे. हा सावरकरांच्या सैन्यभरती कार्यक्रमाचा विजय होता. ते वर्ष होते १९४५.

 

३. सावरकरांच्या त्या चेतावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच
चीनविरुद्धच्या युद्धात भारताचा दारूण पराभव !

अहिंसा, शांती, बंधूभावाच्या अतिरेकी तत्त्वज्ञानात गुंतलेल्या तत्कालीन हिंदुस्थानी सरकारला स्वा. सावरकर सतत सक्षम संरक्षण सिद्धतेविषयी चेतावणी देत होते. चीनच्या सुप्त विस्तारवादी आणि साम्राज्यशाही राक्षसी आकांक्षेची जाणीव करून देत होते. सैन्य उभारणी करतांना ७ भगिनी (सेव्हन सिस्टर) म्हणजे पूर्वोत्तर सीमा भागाकडे संरक्षण सिद्धतेवर भर देणे आवश्यक आहे, असेही आग्रही प्रतिपादन तात्याराव सावरकर आणि सरदार पटेल करत असत. सरदार पटेलांनी याविषयी मृत्यूपूर्वी १५ दिवस अगोदर लिहिलेले पत्र जिज्ञासूंनी अभ्यासावे; परंतु आंतरराष्ट्र्रीय नेतृत्वाचे डोहाळे लागलेल्या आमच्या नेत्यांनी त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. mountaineering warfare trainingची सेनापतींची /सैन्यांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे वर्ष १९६२ मध्ये आमच्या देशाला चीनकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.

 

४. सावरकरांच्या सैनिकी धोरणाची उपेक्षा !

आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वजन असणे आणि हिंदुस्थानचा शब्द मानण्यात यावा, असे सैनिकी धोरण हिंदुस्थानने आखून हिंदुस्थानी सैन्याची पुनर्रचना अन् बांधणी करावी, याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमीच आग्रही होते. सावरकरांच्या सैनिकी धोरणाकडे देशाच्या तत्कालीन नेतृत्वाने आणि तथाकथित विचारवंतांनीही दुर्लक्षच केले.

– श्री. विनायक श्रीधर अभ्यंकर (लेखक माजी लष्करी अधिकारी आहेत.)

 

५. एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

हठयोगी आणि कर्मयोगी स्वातंत्र्यवीर सावरकर !

‘सावरकर हठयोगी आणि स्वतःकडे साक्षीभावाने पाहू शकणारे कर्मयोगी असल्याने ते आयुष्यभर ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न अन् शेवटी स्वतःहून देहत्याग करू शकले.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

५ अ. निष्काम कर्मयोगी

स्वातंत्र्यवीर सावरकर निष्काम कर्मयोगी होते. त्यामुळे त्यांनी प्रचंड विरोधाला तोंड देऊन राष्ट्राची सेवा निरपेक्षपणे केली.

५ आ. हठयोगी आणि सहनशील

सावरकर हठयोगी असल्यामुळे ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतांना त्यांनी शारीरिक हालअपेष्टा हसतमुखाने सहन केल्या. त्यांची सहनशक्तीही पुष्कळ होती.

५ इ. धैर्यवान

सावरकर धैर्यवान होते. अपयश आणि विरोध यांमुळे ते कधीच खचले नाहीत. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरी त्यांनी सर्व प्रसंगांना धैर्याने तोंड दिले.

५ ई. प्रखर राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ

सावरकर प्रखर राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ होते. त्यामुळे त्यांनी जीवनाच्या अंतापर्यंत राष्ट्र आणि धर्म यांची अविरत सेवा केली.

५ उ. एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व

‘आहेत बहु, होतील बहु; परंतु या सम हा ।’ या उक्तीप्रमाणे स्वा. सावरकरांसारखा न दुसरा झाला, न आहे आणि पुढेही होणार नाही. ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केलेल्या राष्ट्रसेवेप्रती त्यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात