माझे मृत्यूपत्र

veer_savarkar

‘मार्च १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर विलायतेत पकडले गेले, तेव्हा त्यांनी या जन्मात जिची भेट होणे जवळ जवळ असंभवनीय होते, अशा त्यांच्या स्वत:च्या वहिनीस लंडनमधील ब्रिक्सन कारागृहातून या जन्मातील त्यांचा बहुधा शेवटचा निरोप देणारे हे मृत्यूपत्र लिहून धाडले होते.
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला.

‘हे मातृभूमी, मी आतापर्यंत माझे मन, बुद्धी, कविता, लेखन, वक्तृत्व हे सर्व केवळ तुझ्याच कारणी लावले आहे. या सगळ्यांतून केवळ तुझेच वर्णन, तुझीच सेवा करीत आलो आहे.

त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा.

तुझे कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारे पवित्र कर्तव्य आणि तीच ईश्‍वरसेवा मानून आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही, मित्रवर्ग तुलाच अर्पण केले. माझे स्वतःचे तारुण्य स्वतःच्या हातून जाळून भस्म केले ते केवळ तुझ्यासाठीच !

त्वत्स्थंडिली ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारूण पुण्यसिंधू
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय ‘बाळ’ झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला.

तुझ्याच पूजेमध्ये माझे घर, पैसा, संपत्ती अर्पण केली. माझे लहान मूल, माझी पत्नी आणि माझी वहिनी, तुझ्या सेवेच्या वणव्यातच ढकलून दिली. तुझ्या अग्नीमध्ये माझा अतीधैर्यवान मोठा भाऊ आणि माझा लहान भाऊ ‘बाळ’ यांचीही आहुती दिली आणि आता माझा देहही मी त्याच यज्ञामध्ये समर्पण करत आहे.

हे काय ! असतो बंधु सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी
संतान ह्या भरतभूमिस तीस कोटी, जे मातृभक्ति-रत सज्जन धन्य होती.
हे आपुले कुलही त्यामधी ईश्‍वरांश, निर्वंश होउनी ठरेल अखंड-वंश

पण यात मोठे ते काय ? आम्ही ७ भाऊ जरी असतो, तरी आम्ही सर्व तुझ्याच सेवेत बलीदान करून कृतार्थ झालो असतो; कारण हे मातृभू, तुझ्या ३० कोटी संतानांपैकी जे कोणी तुझ्यासाठी बलीदान करतात, त्यांचेच आयुष्य सार्थकी लागतं. आपला हा वंशसुद्धा त्या उदात्त ईश्‍वरकार्यासाठीच निर्वंश होऊनही अमर ठरेल आणि असं नाही झालं तर ? तरीही खंत नाही. आम्ही मात्र आता संपूर्ण समाधानी आहोत. तुझ्या उद्धारासाठी या पवित्र कर्तव्यासाठीच आम्ही या वणव्यात आमचा स्वार्थ जाळून केव्हाच कृतार्थ ठरलो आहोत.

तेव्हा हे लक्षात ठेवून माझ्या प्रिय वहिनी, आता तुम्हालाही या पवित्र कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. तुम्हीही हिमालयावर जगादोद्धारासाठी तप करणार्‍या पार्वतीप्रमाणे अथवा स्वधर्मरक्षणासाठी हसत हसत ज्वालाजोहार करणार्‍या राजपूत स्त्रियांप्रमाणे धीराने हे कर्तव्य पार पाडून आपल्या वंशाचा उद्धार कराल.

तुमच्या या अतीधैर्यशील व्रतपालनाने ते दिव्य भारतीय स्त्रियांचे तेज अजूनही या देवभूमीत जागे आहे, हेच सिद्ध होईल. बाकी काय सांगावे ? वहिनी, हाच माझा शेवटचा निरोप समजा ! तुमच्या चरणावर डोकं ठेऊन वंदन करणार्‍या या तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या ! माझ्या लाडक्यांना आणि माझ्या पत्नीलाही हाच माझा शेवटचा संदेश.

की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें,
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे.

कारण आम्ही आंधळेपणाने हा निखार्‍यांचा मार्ग चोखाळला नाही. आमच्या जाज्वल्य इतिहासाला आणि कर्तव्याला साजेसंच असं हे दिव्य, दाहक, पवित्र कर्तव्य आम्ही सर्व विचाराअंतीच जाणतेपणानेच तर स्वीकारलंय.’

संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक २०१६